You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
MPSC : 'लवकर परीक्षा झाली नाही तर घरचे लग्न लावून देतील’
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
"गेल्या तीन वर्षांपासून मी पुण्यात परीक्षेची तयारी करतीये. पाच वेळा परीक्षा पुढे ढकलली गेलीय घरचे लग्नासाठी मुलं पाहतायेत आता मी त्यांना काय सांगू?"
पुण्यात एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. या आंदोलनात सहभागी झालेली 24 वर्षाची प्रीती धवस बीबीसी मराठीशी बोलताना तिची व्यथा सांगत होती.
प्रीती मुळची नागपूरची. घरी शेतीचा व्यवसाय. एमपीएससीची परीक्षा देऊन डीवायएसपी होण्याची तिची इच्छा आहे. 3 वर्षांपूर्वी ती पुण्यात आली. मैत्रिणींसोबत ती रूम घेऊन राहते.
सकाळी आवरलं की अभ्यासिकेत जाऊन दिवसभर अभ्यास करायचा असा तिचा दिनक्रम. कोरोनाच्या काळात देखील तिने पुण्यात राहण्याचा निर्णय घेतला होता. परीक्षा झाली तर घरी जाता येईल असा तिचा विचार होता. पण परीक्षा पुढे गेल्याने आता तिच्या अधिकारी होण्याच्या आशा धूसर होत चालल्या आहेत.
"पाच वेळा परीक्षा पुढे गेली. घरचे आता लग्नासाठी मुलं पाहतायेत. त्यांना आता काय उत्तर द्यायचं हे कळत नाहीये. माझ्यासारख्या अनेक मुली ही परीक्षा देऊन घरी जाता येईल या आशेवर पुण्यात थांबल्या होत्या. त्यांची माझ्यासारखीच अवस्था आहे," प्रीती सांगत होती.
पुण्यातील नारायण पेठ, सदाशिव पेठ, नवी पेठ या भागांमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे हजारो विद्यार्थी राहतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातुन हे विद्यार्थी पुण्यात परिक्षेच्या तयारीसाठी येतात.
घर भाडं, दोन वेळचं जेवण, क्लास, अभ्यासिका असा साधारण 10 हजाराहून अधिक रुपयांचा खर्च या विद्यार्थ्यांना येतो. बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातून आणि मध्यमवर्गीय घरातून येतात. त्यांच्यासाठी दरमहिना 10 हजार ही मोठी रक्कम आहे. तयारी करूनही परीक्षा होत नसल्याने त्यांच्या अडचणीत अधिक भर पडत आहे.
जुन्नरची 26 वर्षीय श्वेता मेहेत्रे म्हणते, "मी जॉब करून परीक्षेची तयारी करत होते. कुटुंब शेतीवर चालतं. दिवसभर जॉब करायचा आणि मिळालेल्या वेळेत अभ्यास करायचा.
घरच्यांना माझ्या खर्चाचा भार नको म्हणून मी जॉब धरला. अधिकारी होऊन एक चांगलं आयुष्य जगण्याची इच्छा होती. कोरोनाचे आकडे वाढत असताना पुण्यात राहणं अवघड आहे. तरी परीक्षा होईल या आशेवर थांबले होते आता पुढचं सगळं अस्पष्ट आहे."
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे 14 तारखेला होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. परिक्षेला अवघे 2 दिवस राहिलेले असताना परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थी आक्रमक झाले.
त्यांनी पुण्यातील शास्त्री रस्ता अडवून धरला. जोपर्यंत परीक्षेचा निर्णय होत नाही तोपर्यंत इथून न हलण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतलाय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)