नागपूर लॉकडॉऊन : वाचा काय सुरू काय बंद

नागपूर शहरात आज पासून म्हणजेच 15 ते 21 मार्चपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही माहिती दिलीय. यावेळी अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असंही त्यांनी सांगितलं. 10 मार्चला नागपूरमध्ये 1700 हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झालीय. यानंतर लॉकडॉऊनचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी उद्योग सुरू राहणार असून खासगी कार्यलय मात्र बंदच राहणार आहेत. सरकारी कार्यालयांमध्ये केवळ 25% कमर्चारी उपस्थित राहू शकतात.

नागपुरात काय बंद राहणार?

  • नागपूर शहरातील शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, शिकवणी वर्ग, प्रशिक्षण संस्था ( कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था) आणि इतर तत्सम संस्था सुरु ठेवण्यास प्रतिबंध. पण नलाईन क्लासेस सुरु ठेवता येतील.
  • राष्ट्रीय/राज्य/विद्यापीठ/शासन स्तरावरील पूर्वनियोजित परीक्षा कोव्हिड विषयक सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून घेता येतील.
  • नागपूर शहरातील शासन स्तरावरील पूर्वनियोजित परिक्षा कोव्हिड विषयक सर्व मार्गदर्शक सुचनांचे पालन करून घेता येतील.
  • नागपूर शहर सीमेत कोणत्याही धार्मिक सभा, राजकीय सभा, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम यावर प्रतिबंध.
  • नागपूर शहरातील संबंधित सभागृह/मंगल कार्यालयं/लॉन याठिकाणी होणारे लग्न समारंभाचे आयोजनास प्रतिबंध.
  • धार्मिक/पूजाअर्चनेची स्थळं नागरिकांना दर्शनासाठी बंद राहतील. सदर स्थळाची नियमित पूजा, अर्चना/ साफसफाई विषयक दैनंदिन कामं जास्तीत जास्त 5 व्यक्तीच्या उपस्थितीच्या मर्यादेत करण्यास मुभा राहील.
  • नागपूर शहरातील सर्व आठवडी बाजार बंद राहतील.
  • रेस्टॉरंट/ हॉटेल/खाद्यगृह मधील प्रत्यक्ष डायनिंग सुविधा बंद राहील, मात्र होम डिलीव्हरी ठेवण्याची मुभा राहील आणि त्यासाठी किचन रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहू शकतील.
  • तरणतलाव (Swimming Pools) बंद राहतील.
  • सर्व प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन बंद राहतील.
  • सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालय (अत्यावश्यक सेवेशी संबंधित कार्यालय वगळून) त्यांच्या एकूण क्षमतेच्या केवळ 25 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीने सुरू ठेवता येतील.
  • सर्व खाजगी आस्थापने/कार्यालय पूर्णपणे बंद राहतील. (आर्थिक लेखाविषयक सेवेशी संबंधित वगळून)
  • मॉल्स, चित्रपटगृहे/नाट्यगृहे बंद राहतील.
  • दुकाने, मार्केट बंद राहतील.
  • नागपूर शहरातील उद्याने नागरिकांसाठी बंद राहतील.
  • व्यायामशाळा / जिम बंद राहतील.

नागपुरात काय सुरु राहणार?

  • वैद्यकीय सेवा, मेडिकल स्टोअर्स
  • वृत्तपत्र, मीडीया संदर्भातील सेवा (ओळखपत्राच्या आधारे)
  • दूध विक्री आणि पुरवठा.
  • भाजीपाला विक्री आणि पुरवठा.
  • फळे विक्री आणि पुरवठा.
  • पेट्रोल पंप, गॅस एजन्सी
  • सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवा ( 50 टक्के क्षमतेने)
  • माल वाहतूक सेवा
  • बांधकामं
  • उद्योग आणि कारखाने
  • किराणा दुकाने (फक्त Stand Alone स्वरुपातील)
  • चिकन, मटन, अंडी आणि मास दुकाने
  • पशू खाद्य दुकाने
  • बँक आणि पोस्ट सेवा
  • कोरोना विषयक लसीकरण सेवा आणि चाचणी केंद्र
  • ऑप्टीकल्स दुकानं
  • खते आणि बी-बियाणं दुकाने (फक्त Stand Alone स्वरुपातील)
  • निवासाकरिता असलेले हॉटेल/लॉजेस (50 टक्के क्षमतेने)

राज्यात अनेक ठिकणी कडक निर्बंध लागू

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्यास सुरुवात झालीय. या पार्श्वभूमीवर जिथे जिथे मोठ्या संख्येत रुग्ण सापडत आहेत, तिथे निर्बंध आणण्यास सुरुवात झालीय. याचाच भाग म्हणून ठाणे शहरातील हॉटस्पॉट असणाऱ्या भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

ठाणे शहरातील 16 विभाग हॅाटस्पॅाट घोषित करण्यात आले असून, 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत या भागात लॅाकडाऊन असेल. ठाणे महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी हे आदेश जारी केले आहेत.

तर, मुंबईत देखील अंशतः लॉकडाऊन लागू शकतो असं मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी म्हटलं आहे.

तसंच पुण्यातील वाढती रुग्णसंख्या पाहता शहरात नव्याने काही निर्बंध घालण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुण्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून मंगळवारी एकाच दिवशी 1086 नवीन रुग्ण आढळून आले. तर 7020 इतके सक्रिय रुग्ण सध्या शहरात आहेत.

तर कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.

बुधवारी (10 मार्च) कल्याण-डोंबिवलीत 392 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा असल्याने प्रशासनाने निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला.

दुकानांसोबतच खाद्यपदार्थांच्या गाड्यांनाही संध्याकाळी सात वाजेपर्यंतच परवानगी असणार आहे. लग्न आणि इतर सार्वजनिक समारंभांमध्ये नियमांचे पालन करा तसंच रात्री नऊपर्यंत कार्यक्रम संपवा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

बार आणि रेस्टॉरंट्स रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील तर होम डिलिव्हरीसाठी रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी असणार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)