ठाणे-मुंबई लॉकडाऊन: शहरातील हॅाटस्पॅाट क्षेत्रात लॅाकडाऊन

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढण्यास सुरुवात झालीय. या पार्श्वभूमीवर जिथे जिथे मोठ्या संख्येत रुग्ण सापडत आहेत, तिथे निर्बंध आणण्यास सुरुवात झालीय. याचाच भाग म्हणून ठाणे शहरातील हॉटस्पॉट असणाऱ्या भागात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

तर, मुंबईत देखील अंशतः लॉकडाऊन लागू शकतो असं मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी म्हटलं आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात सोमवारी 151 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

ठाणे शहरातील 16 विभाग हॅाटस्पॅाट घोषित करण्यात आले असून, 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत या भागात लॅाकडाऊन असेल. ठाणे महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी हे आदेश जारी केले आहेत.

ठाण्यातील कुठल्या भागात हॉटस्पॉट?

  • आईनगर कळवा
  • सूर्यनगर विटावा
  • खारेगाव हेल्थ सेंटर
  • चेंगणी कोळीवाडा
  • हिरानंदानी इस्टेट
  • लोढा
  • रुनवाल गार्डनसिटी बाळकुम
  • लोढा आमरा
  • शिवाईनगर
  • दोस्ती विहार
  • हिरानंदानी मेडीज
  • पाटीलवाडी
  • रुनवाल प्लाझा
  • रूनवालनगर, कोलवाड
  • रुस्तमजी, वृन्दावन स्टॅाप

हॉटस्पपॉट नसलेल्या भागात आधीप्रमाणे मिशन बिगीन अगेन सुरू राहील, असेही महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

दुसरीकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला.

10 मार्च रोजी राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपणार आहे. त्यानंतर कोरोनाचा पार्दुर्भाव रोखण्यासाठी आणखी कडक पावलं राज्य सरकारकडून उचलण्याची शक्यता वर्तवली जातेय.

मुंबईत अंशतः लॉकडाऊनचे संकेत

कोरोनाच्या केसेस वाढत राहिल्या तर मुंबईत अंशतः लॉकडाऊन लावण्याचे संकेत मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिले आहेत. ट्वीट करून त्यांनी म्हटले आहे की "सुरुवातीला प्रशासनाकडून दंड लावण्यात येईल पण तरी देखील केसेस कमी झाल्या नाहीत तर अंशतः लॉकडाऊन लावल्याशिवाय पर्याय राहणार नाही."

मुंबईत लॉकडाऊन लागेल का असं माध्यमांनी विचारलं असता शेख म्हणाले, 'होण्याची शक्यता आहे.'

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)