नाणार : मनसे अनुकूल, उद्धव ठाकरे म्हणतात 'नो कमेंट'

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यानंतर कोकणातील नाणार प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नाणारला पाठिंबा देणाऱ्या लोकांनी आज राज ठाकरे यांची भेट देखील घेतली.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र याबाबत वक्तव्य करण्यास नकार दिला आहे. हा अर्थसंकल्पाचा विषय नाही, त्यावर बोलणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर म्हटलंय.

राज ठाकरे यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाणारसंदर्भात पत्र लिहिलं आहे. ते लिहितात, "महाराष्ट्राने सुमारे तीन लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प हातातून गमावू नये. हे महाराष्ट्राला आज परवडणारं नाही".

भाजपवगळता शिवसेनेसह सर्वच पक्षांनी प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घेतल्याने तीन लाख कोटींची गुंतवणूक असणारा हा तेलशुद्धीकरण प्रकल्प वादात अडकला होता.

राज यांनी नाणारला अनुकूल भूमिका घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या भूमिकेचं स्वागत केलं आहे.

फडणवीस म्हणाले, "अनिल काकोडकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज यांनी ही भूमिका घेतली आहे. कोकणच्या विकासासाठी नाणार प्रकल्प महत्त्वाचा आहे. ही ग्रीन रिफायनरी आहे. गुजरातमधील ग्रीन रिफायनरीच्या परिसरात सर्वोत्तम आंबे होतात. फळबागा होतात. त्यामुळे प्रदूषणाबद्दलच्या शंका चुकीच्या आहेत.

मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. आर्थिक व्यवहार वाढणार आहेत. हजारो लोकांना थेट आणि लाखो लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतली ही आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठी गुंतवणूक असणार आहे. यामुळं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे".

ते पुढे म्हणाले, "नाणार प्रकल्पामुळे होणारे फायदे उद्धव ठाकरे यांनी देखील काकोडकर यांच्यासारख्या तज्ज्ञांच्याकडून समजून घ्यावेत आणि त्याला पाठिंबा द्यावा. याचा निवडणुकीशी संबंध लावण्याचं कारण नाही ही पूर्णपणे एका प्रकल्पाबद्दलची आमची भूमिका आहे.

शिवसेनेने स्थानिक नेत्यांना मन मोकळं करण्याची संधी दिली तर त्यांचाही या प्रकल्पाला पाठिंबा असल्याचं आपल्याला दिसेल. मात्र, पक्षाच्या भूमिकेमुळं त्यांना उसनं अवसान आणून नाणार प्रकल्पाला विरोध करावा लागत आहे."

दरम्यान शिवसेनेची कंपनीशी डिलिंग सुरू आहे. एकदा आकडा फिक्स झाला की, मग शिवसेना नाणारला पाठिंबा देईल, असा गंभीर आरोप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

मातोश्री आणि स्थानिक जनतेचा आता काहीच संपर्क उरलेला नाही. मातोश्रीशी जनतेशी संवाद तुटला आहे आणि हे आपण कोविड काळात पाहिले असं त्यांनी म्हटलं आहे.

"कोकणात रोजगार आणि विकासाचा प्रकल्प व्हावा असे लोकांना वाटत आहे. कोकणातील लोकांची भावना आता बदलली आहे. प्रकल्प व्हावा असेच लोकांना वाटत आहे. या प्रकल्पाबाबतचे लोकांचे गैरसमज आता दूर झाले आहेत. स्थानिकांनी राज ठाकरे यांना त्यांची भूमिका सांगितली असली पाहिजे. त्यामुळेच राज ठाकरेंनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा दिला असावा. राज यांच्या या भूमिकेचं आम्ही स्वागतच करतो", असे राणे म्हणाले. भारतीय जनता पक्षाने या प्रकल्पाला पहिल्या दिवसापासूनच पाठिंबा दिल्याचेही ते म्हणाले.

राणे पुढे म्हणाले की, "शिवसेनेचे आमदार राजन साळवी हे गेल्या १५ वर्षांपासून आमदार आहेत. ते लोकांमध्ये फिरत असतात. त्यांनी लोकांचे मत काय आहे हे समजून घेऊनच पाठिंबा दिला आहे. हा प्रकल्प व्हावा असे स्थानिक शिवसैनिकांना वाटते. त्यामुळे शिवसेनेनेही स्थानिकांच्या भूमिकेचा आदर केला पाहिजे, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत:च्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे ऐकत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला".

दरम्यान नाणार ग्रामस्थांनी प्रकल्प नको या भूमिकेचा पुनरुच्चार केला. कोकण शक्ती महासंघ आणि कोकण रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी सविस्तर पत्राद्वारे भूमिका स्पष्ट केली.

नाणार ग्रामस्थ नकारावर ठाम

"राज ठाकरे यांनी नाणार परिसरात येऊन स्वतःच्या डोळ्यांनी जनतेचा किती विरोध आहे हे पहिले आहे. त्यामुळेच आज त्यांनी मुख्यमंत्र्यांना केलेला पत्रव्यवहार हा आम्हाला धक्कादायक वाटत आहे," असं अशोक वालम यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)