नाणार प्रकल्पाबाबत शिवसेनेची नेमकी भूमिका काय?

शिवसेना कोकणातील नाणार प्रकल्पाप्रती मवाळ झाली आहे का?

हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे, शिवसेनेचे लांजा-राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी केलेलं वक्तव्य.

काय म्हणाले राजन साळवी?

बुधवारी शिवसेना आमदार राजन साळवी यांनी मुंबईत नाणार आणि जैतापूर प्रकल्पाबाबत पत्रकारांना मुलाखत दिली.

'स्थानिक जनतेने प्रकल्प हवा अशी भूमिका घेतली आहे. स्थानिकांना प्रकल्प हवा आहे. रोजगाराचा प्रश्न आहे. इतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. भविष्यात स्थानिक जनतेचे प्रश्न, त्यांचं मत अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे,' असं आमदार राजन राळवी 'नाणार' प्रकल्पाबद्दल बोलताना म्हणाले.

'नाणार' ला शिवसेनेने पहिल्यापासून विरोध केला होता. 'नाणार' चा प्रकल्प कोकणाचा विनाश करेल अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली होती. तर, सरकारमध्ये आल्यानंतर, उद्धव ठाकरेंनी 'नाणार' प्रकल्प रद्द केला होता.

तर, 'जैतापूर अणूउर्जा प्रकल्पाबाबत 90 टक्क्यांपेक्षा जास्त स्थानिक जनतेने जागेचा मोबदला घेतला आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत पुढची भूमिका केंद्र सरकार घेईल,' असा आशावाद मला आहे असं वक्तव्य त्यांनी केलं.

साळवींचा यू-टर्न

'नाणार' बद्दल पत्रकारांना मुलाखत दिल्यानंतर, पाच तासातच राजन साळवी यांनी 'हे पक्षाचं मत नाही,' असं म्हणत यू-टर्न घेतला.

शिवसेना आमदार राजन साळवी म्हणाले, 'जैतापूर आणि 'नाणार' बद्दल स्थानिक जनतेने प्रकल्प हवा म्हणून मत व्यक्त केलं. ते मी मीडियासमोर मांडलं. 'हे पक्षाचं मत नाही.'

ते पुढे म्हणाले, ' स्थानिक जनतेचा प्रकल्पाला विरोध होता. त्यामुळे प्रकल्प होणार नाही. 'नाणार' चा प्रकल्प रद्द ही पक्षाची भूमिका होती. आमदार म्हणून पक्षाच्या भूमिकेशी मी सहमत आहे. स्थानिक जनतेचं मत, मी वैयक्तिक मत म्हणून मीडियासमोर मांडलं होतं.'

शिवसेनेची अधिकृत भूमिका काय?

शिवसेना आमदाराने पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या परस्परविरोधी भूमिका घेतल्याने 'नाणार' ची पुन्हा चर्चा सुरू झाली. राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. शिवसेना आमदाराच्या वक्तव्यामुळे 'नाणार' प्रश्नी शिवसेना मवाळ झाली आहे? हा प्रश्न उपस्थित झाला.

'नाणार' प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जिव्हाळ्याचा. त्यामुळे शिवसेना आमदार राजन साळवी यांच्या वक्तव्यानंतर तातडीने सूत्र हलली.

मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर बीबीसीशी बोलताना म्हणाले, 'जैतापूर आणि नाणार प्रकल्पाबाबत आमदार राजन साळवी यांनी केलेलं वक्तव्य ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. ही शिवसेनेची अधिकृत भूमिका नाही.'

दरम्यान "नाणार रिफायनरी बाबत स्थानिक आमदारांनी मांडलेलं मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. या मताशी शिवसेनेचा कोणताही संबंध नाही. नाणार रिफायनरी हा विषय शिवसेना पक्षासाठी संपलेला आहे. नाणार, जिल्हा रत्नागिरी येथे रिफायनरी होणार नाही", असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी म्हटलं आहे.

आमदार साळवींच्या भूमिकेवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

नागपूरमध्ये पत्रकारांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना आमदार राजन साळवींच्या जैतापूर आणि नाणारबद्दलच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला.

जैतापूरबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'ही आनंदाची गोष्ट आहे. शिवसेना राज्यातील प्रकल्पांना नेहमीच विरोध करते. पण, आता त्यांची भूमिका बदलताना दिसून येत आहे. शिवसेनेने प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका बंद केली पाहिजे.'

तर, 'नाणारमध्ये देशातील सर्वात मोठी रिफायनरी सरकार निर्माण करत होती. या प्रकल्पामुळे रोजगाराची संधी उपलब्ध झाली असती. पण, स्थानिकांचा विरोध असं सांगत शिवसेनेने याला विरोध केला. लोक जमीन देण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे शिवसेनेने नाणारबाबतही हीच भूमिका घेतली पाहिजे,' असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले.

जैतापूरचा वाद

डिसेंबर 2010 मध्ये जैतापूर येथे अणुउर्जा प्रकल्प करण्यासाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी फ्रांन्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकोलस साक्रोझी यांच्यासोबत करार केला होता. मात्र, या प्रकल्पात जाणाऱ्या जमीनी आणि अणुउर्जा प्रकल्पाचे होणारे कथित परिणाम यांच्यामुळे या प्रकल्पाला स्थानिकांकडून विरोध सुरू झाला.

कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यामुळे शिवसेनेने कोकणी माणसासोबत रस्त्यावर उतरून जैतापूरला विरोध केला.

नाणारला शिवसेनेचा विरोध

नाणारचा रिफायनरी प्रकल्प माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणून ओळखला जायचा. मात्र, उद्धव ठाकरेंनी स्थानिकाचा या प्रकल्पाला विरोध असल्याने, हा प्रकल्प रद्द करण्याची भूमिका घेतली. 2019 च्या विधानसभा निवडणूक प्रचारात भाजप आणि शिवसेनेमध्ये नाणारच्या मुद्यावरून बरीच वादावादी झालेली पहायला मिळाली.

सत्तेत येताच नाणार रद्द करू, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती.

भाजपसोबतची युती तोडल्यानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री बनले. शिवसेनेने सत्तेत येताच नाणार प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला.

शिवसेनेसाठी राजकीय अस्तित्वाचा मुद्दा

शिवसेना आमदार राजन साळवींच्या वक्तव्याकडे कोकणातील राजकीय विश्लेषक कशा पद्धतीने पहातात. हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

लोकसत्ताचे वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सतीश कामत बीबीसीशी बोलताना म्हणाले, 'एकीकडे शिवसेना नाणारला विरोध करते. आणि, दुसरीकडे उद्धव ठाकरे स्थानिकांचा विरोध नसेल तर आम्ही स्थानिकांसोबत असं वाक्य अत्यंत चलाखीने वापरतात. शिवसेनेची लबाडी ही नेहमीचीच आहे.'

वर्षभरापूर्वीपासून नाणारबद्दल कोकणात वातावरण बदलू लागलं आहे. गेल्यावर्षी नाणारच्या समर्थनार्थ मोठी रॅली लोकांनी काढल्याचं पहायला मिळालं होतं.

'प्रकल्प झाला तर, फायदा सत्तेत असलेल्या शिवसेनेला होणार आहे. त्यामुळे उलट-सुलट वक्तव्य करून, शिवसेना नेत्यांकडून नाणारच्या मुद्यावर वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात आहे,' असं सतीश कामत पुढे म्हणाले.

राजापूरमध्ये शिवसेनेचा आमदार, तर तळकोकणात शिवसेनेचा खासदार आहे. त्यामुळे हा मुद्दा शिवसेनेसाठी राजकीय अस्तित्वाचा असल्याचं, ते पुढे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)