MPSCची परीक्षा रद्द, विद्यार्थ्यांचा उद्रेक, निर्णय मागे घेण्यासाठी काँग्रेसचा सरकारवर दबाव

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी MPSC ची परीक्षा पुन्हा एकदा लांबणीवर गेलीय. 14 मार्चला होणारी ही परीक्षा आता पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे.

परिणामी राज्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. पुणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती आणि इतर शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.

"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या अशी विनंती करत आहे. हे विद्यार्थी हताश झाले आहेत," असं मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.

काँग्रेसनं मात्र हा परीक्षेचा निर्णय रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.

"असं शचानक शेवटच्या क्षणी परीक्षा रद्द करणं योग्य नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होतो. आधी यूपीएससीची परीक्षा झालेली आहे. काळजी घेऊन आपल्याला ही परीक्षा घेता येईल. अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांची शहरात राहण्याची सोय नाही. मी सरकारला विनंती करतो की हा निर्णय रद्द करावा," असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

तर "वेगवेगळ्या विभागाची कार्यालय सुरू आहेत, अधिवेशन होत आहे, परीक्षासुद्धा होऊ शकते, त्यामुळे ज्या तारखेला परीक्षा ठरली होती त्याच तारखेला घ्या,प" असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलंय.

"माझी सुद्धा सरकारला हीच विनंती राहील की त्यांनी पुन्हा विचार करावा. पण परीक्षा पुढे ढकलल्यामुळे वयोमर्यादा ओलांडली जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्यावी," अशी मागणी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय.

"परीक्षा रद्द करणं अत्यंत अयोग्य ठरेल, मुलं वर्षानुवर्ष मेहनत करतात, त्यामुळे परीक्षा झाल्या पाहिजेत. सरकारनं हा निर्णय रद्द केला पाहिजे," असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

मराठा विद्यार्थ्यांसाठी वेगळी परीक्षा घेऊन त्यांचा बॅकलॉग भरून काढता येईल. सरकारकडे अनेक जागा आहेत, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

राज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचं सांगण्यात आलंय.

येत्या रविवारी - 14 मार्चला ही परीक्षा होणार होती. परीक्षेची नवीन तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचं पत्रकात म्हटलंय.

"हा निर्णय चुकीचा आणि विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळणारा निर्णय असून 3 दिवस राहिले असताना परीक्षा पुढे ढकलणं निषेधार्ह आहे. याचं समर्थन होऊच शकत नाही, तातडीने हा निर्णय बदलला पाहिजे," असं महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेंनी म्हटलंय.

या आधी 3 वेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. 11 ऑक्टोबर 2020 ला नियोजित परीक्षाही पुढे ढकलण्यात आली होती. ती आता 14 मार्चला होणार होती, पण वाढत्या कोव्हिड रुग्णसंख्यंमुळे ती देखील पुढे ढकलण्यात आली आहे.

या निर्णयाचा निषेध करत पुण्यामध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांनी विद्यार्थ्यांसोबत पुण्यातल्या शास्त्री रस्त्यावर रास्ता रोको केला आहे.

याआधी देखील हेच कारण देऊन परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पुण्यातील शास्त्री रोड परिसरात अनेक क्लासेस तसंच अभ्यासिका आहेत. हा निर्णय आल्यानंतर हे विद्यार्थी संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले.

ग्रामीण भागातून आलेले हे विद्यार्थी आहेत, त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला, असं भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी म्हटलंय.

अधिवेशन होतं, आंदोलनं होत आहेत, मग परीक्षा का नाही, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीसुद्धा हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे.

जर आरोग्य सेवेच्या परिक्षा घेतल्या तर MPSC परीक्षाला काय हरकत आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलंय.

"MPSC परिक्षा पुढे ढकलू नये, परीक्षा वेळेत घ्याव्यात. विद्यार्थ्यांचं वर्ष वाया गेलं तर वयोमर्यादा एका वर्षाने वाढवावी," अशी मागणी सुद्धा संभाजीराजे यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार तसंच पुण्यात विद्यार्थ्यांची भेट घेणार असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलंय.

अमरावतीमध्ये आंदोलनकर्ते विद्यार्थ्यांवर सौम्य बळाचा वापर करण्यात आला. तर काही विध्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)