You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर, ‘महाविकास आघाडी सरकार पडणार की नाही यातून बाहेर या’
सतत आघाडी सरकार पडण्याची वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना पंकजा मुंडे यांनी घरचा आहेर दिला आहे. भगवान भक्तीगडावर झालेल्या दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरसुद्धा टीका केली आहे.
"विरोधी पक्षातला प्रत्येक नेता उठतो, हे सरकार पडणार आहे, असा मुहूर्त देतो. प्रत्येक सत्ताधारी नेता आमचं सरकार मजबूत आणि खंबीर असल्याचं म्हणतो. पण तुम्ही सरकार पडणार की नाही पडणार याच्यातून बाहेर येणार आहात की नाही? याबद्दल मी पक्षातील नेत्यांशी बोलणार आहे," अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी भाजपला घरचा आहेर दिला.
"सरकार मजूबत आहे की पडणार हे आमचं ध्येय नाही. जनतेसाठी काय करता याच्यावर बोला," असंही पंकजा मुंडे म्हणाल्यात.
"राजकारणातलं गुन्हेगारीकरण मिटवण्यासाठी विरोधी पक्षनेते असताना गोपीनाथ मुंडे यांनी रान उठवलं होतं, तेव्हा राज्यातलं सत्ता परिवर्तन झालं. त्यामुळे आता गरज असताना आपण आपल्या भूमिकेत जावं. विरोधकांनी विरोधकांच्या भूमिकेत तर सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत जावं," असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
यावेळी पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला.
एकमेकांना खुश करण्याचा नादात जनतेला दुःखी करण्याचं काम राज्यात सुरू आहे. बाळासाहेब ठाकरेंना शोभतील अशा भूमिका उद्धव ठाकरे घेणार आहेत का, याकडे मी डोळे लावून वाट पाहत आहे, असं त्यांनी म्हटलं.
लोक मला यावेळी दसरा मेळावा न घेण्याची सूचना करत होते. पण सध्या महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली, त्यात लोकांना दिशा दाखवण्यासाठी भक्ती आणि शक्ती मेळावा आयोजित केला आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
धनंजय मुंडेंवर टीका
बीडमध्ये माझ्याच कार्यकाळात सुरू केलेली कामे अजून सुरू आहेत. नवीन काहीच सुरू झालं नाही. पालकमंत्री काम काय करतात माहिती नाही, असं म्हणत पंकजा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.
लोकांना केंद्र सरकारचे दोन हजार रुपये मिळतात, राज्याकडून काही मिळत नाही. अतिवृष्टी झाल्यावर आम्ही मदत मिळवून दिली. पण तीही पुरेशी नाही, कुणाला मदत मिळाली का? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला.
लोकांचं बंद आहे, यांचं व्यवस्थित सुरू आहे, आपलं मंत्रिपद भाड्याने दिल्यासारखं काही लोकांचं काम सुरू आहे, अशी टीका पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता केली.
तुम्ही लोकांसाठी काम करा. आम्ही तुमचं अभिनंदन करू, असंही त्या म्हणाल्या.
'गळ्यात हार, डोक्यावर फेटा घालणार नाही'
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही. ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा घालणार नाही, अशी शपथ मी घेतली आहे, असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं.
राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावायचं काम सुरू आहे. पण हे दोन्ही समाज एकच बहुजन समाज आहेत. त्यांच्यासाठी मी आवाज उठवणार आहे, असं मुंडे म्हणाल्या.
याच बहुजन समाजाची वज्रमूठ करण्याचं काम आम्ही करणार आहे, असं त्या म्हणाल्या.
भगवान बाबा की जय म्हणत पंकजा मुंडे यांनी भाषणाला सुरुवात केली.
आज विजयादशमी आहे, आपली भक्ती आणि शक्तीची परंपरा कायम ठेवण्यासाठी घरची पुरणपोळी सोडून या मैदानावर उपस्थित झालात, त्यामुळे मी नतमस्तक होऊन तुमच्या पाया पडले. माझी झोळी तुमच्या प्रेमासमोर कमी पडू लागली आहे, असं भावनिक वक्तव्यसुद्धा त्यांनी केलं.
पंकजा मुंडे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- भगवान बाबांच्या भक्तीची परंपरा कायम ठेवण्याचं श्रेय तुमचं आहे.
- मी हेलिकॉप्टरमधून फुलं वाहिली. ती भगवानबाबांच्या चरणी आणि तुमच्या चरणी वाहिली. कोणत्याही नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी फुलं वाहिली नाही.
- पदर ओवाळून टाकला तसा जीवही तुमच्यावरून ओवाळून टाकीन आहे. माझं तुमच्याशिवाय कोण आहे. माझे वडील जिवंत आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारला.
- मला मुंडे साहेबांनी शिकवलं, आपण ज्या ठिकाणी जन्मलो, त्या मातीचा-जातीचा कधीच अपमान वाटता कामा नये.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आज जी परिस्थिती आहे, त्यात लोकांना दिशा दाखवण्यासाठी हा भक्ती आणि शक्तीचा मेळावा आहे.
- हा कोणत्याही पक्षाचा कार्यक्रम नाही. हा लोकांचा कार्यक्रम आहे, असं मुंडे यांनी म्हटलं.
- सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मी कार्यक्रम पाहत होते. आदरणीय मोहन भागवत यांचं भाषण पाहत होते. देशातला भेदभाव मिटला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं. तसंच महाराष्ट्रातला भेदभाव मिटला पाहिजे.
- पेपर उघडला की बलात्काराच्या घटना वाचायला मिळतात. महिलांवर अत्याचार होत आहेत. मुलीकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर हत्तीच्या पायाखाली देऊ.
- महाराष्ट्रात सध्या हे काय सुरू आहे? राज्यात महिला, माऊली मुलीवर अत्याचार होत असताना उत्तर मागायचं की नाही?
- मी तुमच्या मदतीसाठी 24 तास उभी आहे.
- कोणत्याही मंदिरात गेलं तरी उदास वाटतं. आपल्या देशात-राज्यात प्रार्थनालयं, रुग्णालयं आणि विद्यालयं स्वच्छ नाहीत.
- गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून हे स्वच्छतेचं काम करण्याची जबाबदारी घेऊ
- ऊसतोड महामंडळाचं काम मला ज्या वेगाने पाहिजे होतं तसं झालं नाही.
- ऊसतोड कामगारांची नोंदणी आता सुरू झाली आहे.
- राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावायचं काम सुरू आहे.
- दोन्ही समाज एकच बहुजन समाज आहेत. त्यांच्यासाठी मी आवाज उठवणार आहे.
- सरकार मजूबत आहे की पडणार हे आमचं ध्येय नाही. जनतेसाठी काय करता याच्यावर बोला.
- मंत्रिपद भाड्याने दिल्यासारखं काही लोकांचं काम सुरू आहे.
- बाळासाहेब ठाकरेंना शोभतील अशा भूमिका उद्धव ठाकरे घेणार आहेत का, याकडे मी डोळे लावून वाट पाहत आहे.
- मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही. ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा घालणार नाही, अशी शपथ मी घेतली.
- मागच्या वेळी स्त्री जन्म स्वागताचा संकल्प केला होता. यंदाच्या वर्षी व्यसनमुक्तीचा संकल्प करू.
पंकजा मुंडे यांच्या भाषणानंतर बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर दिलंय.
"आज केंद्रात त्या सत्तेत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, असा माझा प्रश्न आहे. राज्य सरकारनं 10 हजार कोटींचं पॅकेज दिलंय. आमचं पॅकेज कमी वाटत असेल तर इथं बोलण्यापेक्षा तुम्ही भाजपच्या सचिव आहात, तुमची ताकद वापरून अधिकची मदत मिळावी यासाठी प्रयत्न करा. केंद्रानं वेगळं पॅकेज जाहीर करावं, यासाठी तुम्ही काही करणार आहात का," असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
'हा राजकीय मेळावा नाही'
मेळाव्याचं प्रास्ताविक बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी केलं. दरम्यान आवाज येत नसल्याची तक्रार उपस्थित प्रेक्षकांनी केली.
त्या म्हणाल्या, "देवीचं सोज्वळ साधं रुप आपण पाहिलं आहे. नुकतीच दुर्गाष्टमी पार पडली. अन्याय वाढल्यानंतर देवी दुर्गेचं रुप घेते, हेसुद्धा आपल्याला माहिती आहे.
हा मेळावा मुंडे परिवारासाठी महत्त्वाचा आहे. पण मुंडे परिवार म्हणजे फक्त पंकजा आणि प्रीतम मुंडे नाही. तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं येणारा प्रत्येक जण आमच्या परिवारातलाच आहे. त्यांच्यामुळेच हा मेळावा महत्त्वाचा आहे.
हा कोणत्याही पक्षाचा मेळावा नाही. हा कोणताही राजकीय मेळावा नाही. हा मेळावा, भगवान भक्तांचा, हातावर पोट असलेल्या प्रत्येकाचा हा मेळावा आहे. रोज संघर्ष करण्यासाठी उर्जा मिळण्यासाठी लोक इथं येतात.
मुंडे कुटुंबात आम्ही जन्म घेतला, हे आमचं भाग्यच. नेते बंगले घेतात, प्रॉपर्टी वाढवतात, पण आमची संपत्ती इथं जमा झालेले लोक आहेत.
आज गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांचं दर्शन घेतलं. समाजात पसरत असलेल्या नकारात्मकतेला लढा देण्याची शक्ती देण्याची प्रार्थना मी केली.
तुम्ही उन्हात असताना आम्ही सावलीत बसायला हा काही आघाडीचा कार्यक्रम नाही. ते आम्हाला पटतही नाही, म्हणून स्टेजवर छप्पर बांधलेलं नाही," असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.
महादेव जानकर काय म्हणाले?
आजचा कार्यक्रम कुठलाही राजकीय कार्यक्रम नसल्याचं प्रीतम ताईंनी सांगितलं, त्यामुळे त्यांचं अभिनंदन म्हणत महादेव जानकर यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली.
ते पुढे म्हणाले, "आजचा कार्यक्रम पंकजा ताईंची शक्ती आणि युक्ती यांचा कार्यक्रम आहे. आपल्याला आमदार, खासदार, मंत्री मिळतो, पण नेता कधीच मिळत नाही. पंकजा मुंडे यांच्या स्वरुपात नेता आपल्याला मिळालेला आहे. त्यांना सांभाळण्याचं काम तुम्ही आणि आम्ही करायचं आहे."
नेता विकत घेता येत नाही, नाटक करता येत नाही. नेता खरा असावा लागतो. रक्ताचा नेता असावा लागतो.
पक्ष येतील किंवा जातील, आपला माणूस जिवंत ठेवा.
वुई आर नॉट डिमांडर, वुई आर कमांडर, हे तुम्ही लक्षात ठेवा.
आम्ही लाचार कधीच होणार नाही. तुमची मान कधीच खाली जाऊ देणार नाही.
हा मेळावा राजकीय नाही. पंकजा मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांचं सेलिब्रेशन आहे, भगवान बाबाचं सेलिब्रेशन आहे. भगवाना बाबा यांची जात नव्हती. तसंच गोपीनाथ मुंडे यांचीही जात नव्हती.
गोपीनाथ मुंडे नसते तर महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता, असं जानकर म्हणाले.
एखादं पोरगं मेलं तरी चालेल, पण आई मरता कामा नये आणि पंकजा मुंडे आपली आई आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा असं आवाहन परळीकरांना जानकर यांनी केलं.
आपला नेता कोण आहे हे ओळखायला शिका, नाहीतर तुमचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही.
भाजप असो वा काँग्रेस, केंद्र-राज्य जबाबदारी झटकण्याचं काम करत आहेत. तुम्ही ओबीसीची जनगणना करण्याचा ठराव करा, जो हे करत नसेल त्यांना हिसका दाखवण्याचं काम आपण करू, असं जानकर म्हणाले.
पंकजा मुंडे यांचा दुसरा दसरा मेळावा
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे. सावरगाव या भगवान बाबा यांच्या जन्मस्थानी हा मेळावा घेण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही नियम आणि अटींसह मेळाव्याला परवानगी दिली आहे.
पंकजा मुंडे बीडमधून या मेळाव्यासाठी हेलिकॉप्टरने सावरगावला दाखल झाल्या. त्या याठिकाणी नेमकं काय बोलतात, याची उत्सुकता सर्वांना लागून आहे.
मेळाव्याच्या ठिकाणी भाजप नेते आणि कार्यकर्ते यांची मोठी गर्दी जमल्याचं दिसून येत आहे. बीड आणि नगर परिसरातील सर्वच भाजप आमदार यांच्यासह खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार सुजय विखे पाटील, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर याठिकाणी उपस्थित आहेत.
दरम्यान, आज सकाळी पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांनी रॅली काढून शक्ती प्रदर्शन केलं. त्यानंतर त्या वाहनाने सभेच्या ठिकाणी दाखल झाल्या.
पंकजा मुंडे यांचा हा भगवान भक्तीगडावरील दुसरा मेळावा असणार आहे. 2019 मध्ये पहिल्यांदा अमित शाह यांच्या उपस्थितीत त्यांनी इथं मेळावा घेतला होता.
गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा रद्द करण्यात आला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)