You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीस यांचा आरोप, 'आरोग्य विभागाच्या पदांसाठी 5 ते 10 लाखांची दलाली'
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठीची 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा वेळेवर रद्द करण्यात आली आहे.
या मुद्द्यावरून विरोधी पक्षानं राज्य सरकारला धारेवर धरलं आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय, "आदल्या रात्री परीक्षा रद्द झाल्याचं विद्यार्थ्यांना कळालं. या सरकारमध्ये नेमकं काय चाललं ते कळत नाही. ज्यापद्धतीनं प्रवेशपत्र देण्यात आलं, त्यात घोळ आहे.
"याशिवाय मला तर अशाकाही तक्रारी मिळाल्या आहेत की, आता काही दलाल मार्केटमध्ये आले आहेत आणि या पदांकरता 5 लाखांपासून, 10 लाखापासून पैसे गोळा करण्याकरता काही दलाल काम करत आहेत. या प्रकरणाकडे सरकारनं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. याप्रकरणाची चौकशी झाली पाहिजे."
दरम्यान, याप्रकरणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षार्थींची माफी मागितली आहे.
आरोग्य विभागाचा प्रमुख म्हणून मी दिलगिरी व्यक्त करतो, परीक्षार्थींची माफी मागतो, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे..
ते पुढे म्हणाले, "25 आणि 26 सप्टेंबरला सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत गट क आणि गट ड या प्रवर्गातील होऊ घातलेल्या परीक्षा बाह्यस्रोत संस्था 'न्यासा' यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात येत आहे."
परीक्षेच्या नवीन तारखेविषयी ते म्हणाले, "परीक्षेची तारीख चर्चा करून लवकरात लवकर ठरवण्यात येईल. कुठल्याही परिस्थितीत आम्ही एखाद्या आठवड्याभरात नवीन तारीख देऊ."
प्रकरण काय?
आरोग्य विभागाच्या गट क आणि गट ड संवर्गातील पदांसाठीची 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा वेळेवर रद्द करण्यात आली.
विशेष म्हणजे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेसंबंधीच्या अफवांना बळी पडू नये, भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे, असं ट्वीट केल्याच्या काही तासानंतर ही नियोजित परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
25 आणि 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द झाल्याचे मेसेज परीक्षार्थींना 24 सप्टेंबरच्या रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मिळाले आहेत.
आरोग्य भरती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लवकरच नवीन तारखा घोषित केल्या जातील, असं या मेसेजमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
परीक्षा वेळेवर रद्द झाल्यामुळे परीक्षेसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालं आहे. काही जणांना प्रवासादरम्यान ही माहिती मिळाली, तर काही जण आधीच परीक्षा केंद्रावर जाऊन पोहोचले आहेत.
परीक्षा रद्द झाल्याचं समजताच अनेकांनी मनस्ताप व्यक्त केला आहे.
शारदा बाहेकर या तरुणीनं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "परीक्षा अचानकच रद्द करण्यात आलीय. तसा मेसेज रात्री दहाच्या सुमारास आला. यावेळेला आम्ही परीक्षेला निघायची तयारी करत होतो. पण, आता आमच्या सगळ्यांचा गोंधळ उडाला आहे. आमचे हॉलतिकीट पण आले होते. पण, परीक्षा कसं काय रद्द झाली, ते कळत नाही. परीक्षेला पोहोचायला उशीर होऊ नये म्हणून माझ्या काही मैत्रिणी कालच औरंगाबादला गेल्या आहेत."
अहमदनगर जिल्ह्यातील अप्पा गरसुळे या तरुणाचं परीक्षा केंद्र औंरगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे होतं.
तो रात्री 2 वाजता परीक्षेसाठी निघणार होता. पण, परीक्षा पुढे ढकलल्याचं समजताच त्याला धक्का बसला.
बीबीसी मराठीशी बोलताना तो म्हणाला, "ज्यांचे परीक्षा केंद्र लांब होते, कोल्हापूर, सातारा अशा ठिकाणी होते, ते माझे मित्र आधीच त्या त्या ठिकाणी गेले आहेत. आम्हीही रात्री निघणार होतो. पण, अचानकच परीक्षा पुढे ढकलल्याचं कळालं आणि धक्का बसला. आता परीक्षा कधी होणार, हाच प्रश्न आम्हाला पडलाय."
राजेश टोपे यांच्या ट्विटला रिट्वीट करताना एका परीक्षार्थीनं काल रात्री व्हीडिओ ट्वीट केलाय. त्या तो एसटीत प्रवास करताना दिसतोय.
तो म्हणतोय, "उद्या सकाळी 9 वाजता परीक्षा केंद्रावर आम्हाला पोहोचायला सांगितलंय. आता आम्ही प्रवासात असताना रात्री 10 वाजता आम्हाला परीक्षा रद्द झाली असं आम्हाला सांगत असाल तर अशावेळी आम्ही काय करावं? आम्ही 600 ते 700 किलोमीटर अंतरावरून आलोय. चाच-चार, पाच-पाच हजार रुपये खर्च केलाय. फॉर्म भरण्यासाठी पैसे आमचे खर्च झाले. पण, असंच जर चालणार असेल तर आम्ही काय करायला पाहिजे?"
'कंपनीवर कारवाई करा'
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी याप्रकरणी सरकारला खडे बोल सुनावले आहेत.,
त्यांनी म्हटलंय, "मागील सरकारने आरोग्य भरती रखडवल्याने आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली. आपल्या सरकारने आरोग्य भरती सुरू केली पण गोंधळाचं वातावरण दिसतंय. असंच चालू राहिलं तर आधीच्या आणि आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील? याचा राज्य सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा.
"परीक्षा सुरळीत होणं आवश्यक होतं. अनेकांची आर्थिक स्थिती सामान्य आहे. परीक्षेला जाण्यासाठी त्यांनी उसने तर काहींनी व्याजाने पैसे आणले. पण, आता त्यांना आर्थिक भुर्दंड बसलाय. त्यामुळं पुन्हा लवकर परीक्षा घ्यावी आणि त्यावेळी मोफत एसटी प्रवासाचा पर्याय देता येईल का,याचा विचार व्हावा."
तर, आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याने अनेक युवकांना मनस्ताप व आर्थिक भुर्दंड झालेला आहे. हे अतिशय चुकीचे आहे, यासंबंधी दोषी असलेल्या अधिकारी व कंपनीवर तात्काळ कार्यवाही केली पाहिजे, अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)