You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
MPSC: या 6 कारणांमुळे स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी चिडलेत
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
"ही पाचवी वेळ आहे आयोगानं परीक्षा पुढे ढकलण्याची. तेही ऐनवेळी निर्णय जाहीर करतात. आम्हाला याचा प्रचंड आर्थिक आणि सामाजिक भूर्दंड सोसावा लागतो. मी गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात तयारी करतोय. प्रचंड आर्थिक ताण आहे."
मुळचा सोलापूरचा असलेलाया महेश घरबुडे गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे. बीबीसी मराठीशी बोलताना त्याने ही प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 14 मार्च रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
या निर्णयाविरोधात पुण्यात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रद्द करावा अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
पण हे विद्यार्थी अचनाक एवढे का संतापले? या निर्णयाला तीव्र विरोध करण्याची नेमकी काय कारणं आहेत? हे आपण जाणून घेऊया,
1. सलग पाच वेळा परीक्षा पुढे ढकलली
MPSCची परीक्षा पुढे ढकलण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर गेल्या दहा महिन्यात ही परीक्षा तब्बल पाच वेळ पुढे ढकलण्यात आली आहे.
ही परीक्षा गेल्यावर्षी एप्रिल 2020 रोजी होणार होती, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दोन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. यामुळे विद्यार्थ्यांचं जवळपास वर्षं वाया गेलं आणि म्हणून या निर्णयाला विरोध असल्याचं विद्यार्थी सांगतात.
स्पर्धा परीक्षेचे उमेदवार सुशील अहिरराव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "एकाबाजूला कोरोना आणि लॉकडॉऊनमुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. स्पर्धा परीक्षा सतत पुढे ढकलल्या जात असल्याने विद्यार्थी खचले आहेत. आत्मविश्वास कमी होतोय. नैराश्य येत आहे."
2. ऐनवेळी निर्णय
वर्षभरात सलग पाच वेळा परीक्षा पुढे ढकलताना दरवेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ऐनवेळी निर्णय घेतल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
14 मार्चला परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी सज्ज होते. विद्यार्थ्यांसाठी वर्षभरानंतरची ही पहिलीच संधी होती. पण परीक्षेच्या तीन दिवस आधी म्हणजे 11 मार्चला दुपारी आयोगाने पुन्हा एकदा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.
"यापूर्वीही आयोगाने ऐनवेळी निर्णय घेतले आहेत. यामुळे आम्हाला मानसिक त्रास होतो. मनस्ताप होतो. संधी तर हुकते पण वेळ वाया जातो. पुढील तारखेनुसार पुन्हा तयारी करावी लागते," असं महेश घरबुडे सांगतो.
3. वयोमर्यादा
MPSC, UPSC या स्पर्धा परीक्षांसाठी स्पर्धकांना वयाची मर्यादा आहे. विशिष्ट वयानंतर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी पात्र ठरत नाहीत. त्यामुळे प्रत्येक संधी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची ठरते.
कोरोना संकट काळात विद्यार्थ्यांच्या अशा पाच संधी हुकल्याने विद्यार्थी प्रचंड नाराज आहेत. शिवाय, ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा गेल्या वर्षभरात संपली त्या विद्यार्थ्यांची परीक्षेची शेवटची संधीही हुकण्याची शक्यता आहे.
याबाबत आयोगानेही अद्याप स्पष्ट निर्णय घेतलेला नाही.
4. आर्थिक आणि सामाजिक
पुण्यात हे आंदोलन तीव्र होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे याठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी येत असतात.
ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी पुण्यात हॉस्टेलमध्ये राहत असतात. त्यात ही परीक्षा पास होण्यासाठी काही वर्षांचा वेळ द्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींनाही सामोरं जावं लागतं.
सुशील अहिरराव सांगतात, "वैयक्तिक आयुष्याचे निर्णय घेण्यासाठी सुद्धा यामुळे विलंब होतो. अनेकांचे लग्नाचे निर्णय यामुळे प्रलंबित आहेत. त्यात नोकरी करून परीक्षेसाठी पुरेसा वेळ देता येत नाही. त्यामुळे किती वर्षं कुटुंबाच्या मदतीने केवळ अभ्यास करत राहणार? असा विचार करत असताना मानसिक स्वास्थ्य बिघडतं. अशा परिस्थितीत वारंवार आयोगाकडून एकच चूक होत असेल तर आम्ही त्रास का सहन करायचा? असा आमचा प्रश्न आहे."
5. 'अधिवेशन आणि निवडणुका कशा होतात?'
"राज्यात लग्न समारंभ सुरू आहेत. राजकारण्यांच्या लग्नाला मोठी गर्दी होत आहे. अधिवेशन नुकतेच झाले. हे सर्व कार्यरत राहू शकतं मग आमच्या परीक्षा पुढे ढकलण्याचे काय कारण आहे? आम्हाला कोरोनाचे गांभीर्य कळतं आणि आम्ही काळजी घेऊ शकतो पण त्यासाठी आमचे मोठे नुकसान करून परीक्षा पुढे ढकलणं योग्य नाही," बीबीसी मराठीशी बोलताना आंदोलक विद्यार्थ्याने ही प्रतिक्रिया दिली.
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलं. तसंच राज्यात अद्याप लग्न समारंभांचे कार्यक्रम सुरू आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकाही राज्यात पार पडल्या.
केंद्रीय आयोग UPSC परीक्षा घेत आहे. मग अशा परिस्थितीत केवळ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा सतत का पुढे ढकलल्या जातात? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
6. 'मराठा आरक्षणामुळे निर्णय'
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. तोपर्यंत राज्यात मराठा आरक्षण लागू करण्यावर अंतरिम स्थगिती आहे. या कारणामुळेच सरकार स्पर्धा परीक्षा होऊ देत नाही असाही आरोप काही विद्यार्थ्यांनी केला आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना सुशील अहिरराव असं सांगतात, "गेल्यावेळेस सुद्धा सरकारने मराठा आरक्षणासाठीच परीक्षा पुढे ढकलली असं आम्हाला वाटतं. सरकारी भरतीसुद्धा याच कारणासाठी रखडल्या होत्या. मराठा समाजाला नाराज करायचं नाही म्हणून सरकार सर्व विद्यार्थ्यांवर का अन्याय करत आहे? या परीक्षांचंही राजकारण केलं जात आहे असं आम्हाला वाटतं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)