शमीसाठी विराट मैदानात, 'धर्मावरून टीका करणं अत्यंत वाईट'

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी

भारत-पाकिस्तान सामान्यानंतर ऑनलाईन ट्रोलिंगचा लक्ष्य ठरलेला भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज मोहम्मद शमीला पाठिंबा देण्यासाठी कर्णधार विराट कोहली पुढे आला आहे.

एखाद्यावर धर्मावरून टीका करणं अत्यंत वाईट असल्याचं विराट कोहलीनं म्हटलंय.

ट्वेन्टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानविरोधातील पहिला सामाना भारतानं गमावल्यावर मोहम्मद शमी आणि रोहित शर्मासारख्या काही खेळाडूंवर टीका होऊ लागली. पण शमीच्या बाबतीत त्या टीकेत एक विखारी सूरही दिसून आला.

तसं पराभवानंतर एखाद्या खेळाडूला टीकेचं लक्ष्य केलं जाणं, यात नवं काही नाही. विशेषतः भारतात तर अनेकदा पराभवाचं खापर गोलंदाजांवर फोडलं जातं.

शमी मुस्लीम आहे, म्हणून टीका?

या सामन्यातही काहीसं तसंच घडलं. पण भारतीय संघातल्या एकमेव मुस्लीम खेळाडूवरच टीका होऊ लागली आणि लगेचच त्याच्या कामगिरीला धर्माशी जोडलं गेलं, असं चित्र दिसलं.

एकानं ट्वीट केलं, की 'शमी भारतीय संघातला पाकिस्तानी खेळाडू आहे.' दुसरा म्हणाला, 'मुस्लीम आहे तर पाकिस्तानची बाजू घेणार.' तिसरा म्हणतोय, 'तुमच्या धर्माच्या लोकांची बाजू घ्यायला किती पैसे मिळालेत रे तुला?'

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटलंय, "मोहम्मद शमी आम्ही तुझ्यासोबत आहोत. या लोकांना कधी कुणी प्रेम न दिल्यामुळे त्यांच्यात तिरस्कार भरलेला आहे. त्यांना माफ कर."

माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाण याने ट्विट करत म्हटलं, "भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात मी प्रत्यक्षात मैदानात होतो आणि भारताचा पराभवही आम्ही अनुभवला होता. पण मला कुणी पाकिस्तानला जायला सांगितलं नाही. मी काही वर्षांपूर्वीच्या भारताविषयी बोलत आहे. ही वायफळ चर्चा थांबवणं आवश्यक आहे."

भारत-पाकिस्तान सामन्यात शून्यावर बाद झालेल्या रोहित शर्मालाही टीकेचा सामना करावा लागला. पण शमीच्या बाबतीत टीकेची पातळी घसरली आणि काहींनी अगदी सगळ्या मर्यादा सोडून शिवीगाळ केली.

पण दुसरीकडे हा सगळा प्रकार पाहून अनेकांनी खेदही व्यक्त केला. भारतीय टीमनं जाहीरपणे शमीच्या पाठीशी उभं राहून या टीकेला उत्तर द्यावं अशी मागणीही केली जाते आहे. काही पत्रकारांनी ती उचलून धरली आहे.

पत्रकार हरिणी लिहितात, "प्रिय भारतीय क्रिकेट टीम, तुम्ही आता तुमच्या सहकाऱ्यासोबत उभे राहिला नाहीत, तर तुम्ही ब्लॅक लाईव्ज मॅटर (वर्णद्वेषविरोधी मोहीम) साठी गुडघा टेकवलेत हे कोण गांभीर्यानं घेईल?'

पार्थ एम एन आठवण करून देतात, "युरो 2020 फुटबॉल स्पर्धेत इंग्लडच्या कृष्णवर्णीय खेळाडूंना लक्ष्य केलं गेलं, तेव्हा कर्णधार हॅरी केननं वर्णद्वेषी चाहत्यांची आम्हाला गरज नाही असं निक्षून सांगितलं होतं. आज भारताला पाकिस्ताननं हरवल्यावर मोहम्मद शमीवर टीका होते आहे. भारतातल्या हिंदू खेळाडूंनी त्यांच्या मुस्लीम सहकाऱ्यासोबत उभं राहण्याची वेळ आली आहे."

शमीवर टीका का होते आहे?

दुबईतल्या लढतीत मोहम्मद शमीनं 3.5 षटकांत तब्बल 43 धावा देऊ केल्या, म्हणजे पाकिस्ताननं केलेल्या 152 धावांपैकी जवळपास एक तृतीयांश धावा एकट्या शमीच्या गोलंदाजीवर लुटल्या.

अठराव्या षटकात पाकनं विजय साजरा केला, तेव्हा बाबर आणि रिझवाननं शमीला पाच चेंडूंमध्ये 17 धावा असं झोडपलं. साहजिकच शमीच्या त्या षटकातल्या गोलंदाजीवर टीका झाली.

पण एकट्या शमीला पराभवासाठी दोष देता येणार नाही, असं क्रिकेट समालोचक प्रसन्न संत सांगतात. "भारताच्या गोलंदाजांची कालची कामगिरी पाहिली तर सगळ्यांनीच प्रयत्न केले. पण विकेट्स कोणालाच काढता आली नाही. शेवटी एक टीम जिंकणार आणि एक हरणार. त्यासाठी एका कुठल्यातरी खेळाडूला लक्ष्य करणं चुकीचंच आहे."

"प्रत्येक खेळाडू जिंकण्यासाठीच खेळत असतो, तो शंभर टक्के प्रयत्न करतो. कधी ते प्रयत्न सफल ठरतात, कधी ते अपयशी ठरतात. हे फॅन्सनी लक्षात घ्यायला हवं. पुढच्या मॅचमध्ये शमी विकेट्स काढू शकतो, मॅन ऑफ द मॅचही होऊ शकतो. बॅटिंग करून मॅच जिंकूनही देऊ शकतो, जसं त्यानं लॉर्ड्सवर केलं होतं."

'धर्माच्या नावानं टीका चुकीची'

पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर मुस्लीम खेळाडूंवर अशी टीकाही भारतात नवी नाही.

पाकिस्तानविरुद्धचा पराभव चाहत्यांना इतका झोंबतो, की अशावेळी खेळाडूंच्या खेळावरच नाही तर देशप्रेमावरही शंका घेतली जाते. मोहम्मद अझरुद्दीनपासून ते मोहम्मद कैफपर्यंत अनेकांना त्याचा अनुभव आला आहे.

बरं, ही टीका फक्त क्रिकेटपुरती मर्यादीतही नाही. हॉकीतले गोलकीपर मीर रंजन नेगी यांचं अख्खं करियरच नाही तर आयुष्यच अशा टीकेनं बदलून गेलं होतं.

प्रसन्न संत सांगतात, "भारत आणि पाकिस्तानचे चाहते भावनिक होतात. त्यांच्या मनात जो राग असतो, तो त्या खेळाडूपेक्षा आपण हरलो कसे, याविषयी असतो. मग कोणामुळे मॅच हरलो, हे शोधलं जातं.

एकजण काहीतरी बोलतो आणि आग लावतो, मग दुसरा त्याचं समर्थन करतो आणि अशा वाईट गोष्टी पसरत जातात.

"भावूक होणं ठीक आहे, एखादा जोक मारणं ठीक आहे, एखादं मीम तयार करणं ठीक आहे. थट्टामस्करी, बँटर ठीक आहे. पण कुठल्याही अशा भेदाभेद करणाऱ्या गोष्टींना आपण वाव देता कामा नये, ते सुरुवातीलाच थांबवलं पाहिजे.

खराब कामगिरीवर टीका करणं योग्य आहे, ती मान्यही आहे, पण ती करताना चाहत्यांनी ट्रोलिंगच्या नावाखाली मर्यादा सोडणं योग्य आहे का? याचा चाहत्यांनाच विचार करावा लागेल.

नाहीतर एकीकडे खेळातून समानतेविषयी जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असताना चाहत्यांनी असं वर्तन करणं क्रिकेटच्या लौकिकालाच काळीमा फासणारं ठरू शकतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)