You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
किरण गोसावी नेमके आहेत कोण? प्रायव्हेट डिटेक्टिव्ह की व्यावसायिक?
- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठीसाठी
क्रूझ ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीचे साक्षीदार असलेले किरण गोसावी यांना अटक झाली आहे. पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केली आहे.
किरण गोसावीला 8 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पुणे कोर्टाने आता किरण गोसावीच्या पोलीस कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ केली आहे.
किरण गोसावीला अटक करण्याआधी त्याने त्याच्या फोन मधील डेटा तसेच फेसबुकचा पासवर्ड आणि सोशल मीडियावरील डेटा डिलीट केला आहे. तो रिकव्हर करण्यासाठी सरकारी वकिलांनी 3 दिवसाची पोलीस कोठडी मागितली. त्यानुसार न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी दिली.
आतापर्यंत किरण गोसाविकडून 1 लाख रुपये आणि 2 फोन हस्तगत करण्यात आले आहेत.
किरण गोसावी याने सचिन पाटील यांचा फेक आधार कार्ड तयार करून त्यावर स्वतःचा फोटो लावून त्याचा वापर करत असल्याचे देखील पोलीस तपासात समोर आले आहे.
किरण गोसावी 2019 पासून फरार होते. आमच्या वेगवेगळ्या टीम्स ठिकठिकाणी गेल्या. आज (28 ऑक्टोबर) सकाळी त्यांना ताब्यात घेण्यात आलं, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
एनसीबीनं ड्रग्ज प्रकरणी क्रूजवर कारवाई केल्यानंतर आर्यन खान आणि इतरांना अटक केली. त्या कारवाईदरम्यान किरण गोसावी हे साक्षीदार म्हणून त्याठिकाणी होते.
मात्र, किरण गोसावींचा आर्यन खानला हाताला धरून आणण्याचा व्हीडिओ आणि आर्यनबरोबरची सेल्फी समोर आल्यानंतर याबाबत प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर किरण गोसावींवर गुन्हे असताना, त्यांना स्वतंत्र साक्षीदार बनवल्याच्या मुद्दयावरूनही आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली.
गोसावींना झालेली अटक आणि त्यांचे सुरक्षारक्षक प्रभाकर साईल यांनी आर्यन खान प्रकरणी केलेल्या आरोपांनंतर किरण गोसावी नेमके कोण आहेत, असा प्रश्न उपस्थित होत
नोकरी मिळवून देणारा डिटेक्टिव्ह?
किरण गोसावी आपण स्वतः प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचं सांगतात. मात्र त्याचबरोबर त्यांचे इतरही व्यवसाय असल्याचं समोर आलं आहे.
किरण गोसावी हे एका कंपनीच्या माध्यमातून तरुणांना नोकरी मिळवून देण्याचं कामही करतात. केपीजी ड्रीम्स सोल्युशन्स नावाच्या फर्मच्या माध्यमातून ते हे काम करतात.
केपीजे ड्रीम्स नावाच्या या फर्मचं कार्यालय घाटकोपर भागात असून, तिथूनच या कंपनीचं काम चालत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
गोसावींना सध्या झालेली अटक याच कंपनीच्या माध्यमातून फसवणूक केल्याप्रकरणी आहे.
इंपोर्ट- एक्सपोर्टचा व्यवसाय
याचबरोबर किरण गोसावी यांचा इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय असल्याचीही माहिती समोर येत आहे. .
किरण गोसावी यांनी स्वतः प्रसिद्ध केलेल्या एका व्हीडिओमध्ये त्यांचा इंपोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय असल्याचं सांगितलं आहे. प्रभाकर साईलनं केलेले आरोप फेटाळण्यासाठी तयार केलेल्या व्हीडिओत त्यांनी तसं सांगितलं.
'माझा इम्पोर्ट-एक्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यासंबंधी पैसे आणण्याबाबतचे आमचे काही जुने चॅट आहेत. मात्र या प्रकरणानंतर म्हणजे 2 ऑक्टोबरनंतर कधीही मी त्याला पैसे आणायला सांगितलं नाही,' असं गोसावी यांनी या व्हीडिओत म्हटलं आहे.
खंडणी वसुलीचे आरोप?
गोसावींवर होत असलेल्या विविध आरोपांमध्ये खंडणीच्या आरोपांचाही समावेश आहे. सामनाच्या बेवसाईटवर प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तामध्ये पोलिसांनीच तशी माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे.
किरण गोसावी फिरत असलेल्या गाडीवर पोलिस असं लिहिलेलं असायचं. ते ठाण्यात एका सोसायटीमध्ये भाड्याने राहत होते. त्यांच्याबरोबर एक तरुणी आणि सुरक्षा रक्षकही राहायचा, असं येथील सुरक्षारक्षकानं सांगितल्याचं 'सामना'च्या वृत्तात म्हटलं आहे.
बंदूक नव्हे लायटर
किरण गोसावी यांच्याबाबत चर्चा सुरू झाली ती आर्यन खानबरोबरचा त्यांचा सेल्फी व्हायरल झाल्यानंतर. मात्र त्यानंतर त्यांचा आणखी एक फोटो व्हायरल झाला.
डोळ्यावर गॉगल, हातात गन अशा स्टाईलमधला किरण गोसावी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यातील गनवरूनही चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.
मात्र, किरण गोसावी यांनी बीबीसी मराठीला फोनवरून दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांच्याकडं बंदूकच नसल्याचं सांगितलं आहे.
"माझ्याकडे गन नाही. ते लायटर आहे," असं किरण गोसावींनी म्हटलं आहे. ते खोटे फोटो असल्याचा दावाही गोसावी यांनी बीबीसीबरोबर बोलताना केला.
अटक झालेलं प्रकरण काय?
किरण गोसावी यांच्या विरोधात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्यांना झालेली अटक ही 2018 मध्ये दाखल झालेल्या पुण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी आहे.
गोसावी यांनी 2018 मध्ये मलेशियाला नोकरी लावण्याचं आमीष दाखवत पाठवलं आणि पैसे लुबाडून फसवणूक केल्याची तक्रार चिन्मय देशमुख नावाच्या तरुणाने केली होती.
फेसबुकच्या माध्यमातून चिन्मय यांना गोसावीबाबत माहिती मिळाली होती. त्यावरून संपर्क करून त्यांनी गोसावी यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर त्यांनी टप्प्याटप्प्यानं त्यांच्या सेक्रेटरीच्या अकाऊंटमध्ये तीन लाख रुपये मागवून घेतले, असं चिन्मय यांनी सांगितलं.
गोसावी यांनी टुरिस्ट व्हिसा देत चिन्मय यांना मलेशियाला पाठवलं. तिथं गेल्यानंतर हा व्हिसा वर्क व्हिसामध्ये कनव्हर्ट होईल, असं चिन्मयला सांगण्यात आलं. मात्र तिथं गेल्यानंतर हा प्रकार बेकायदेशीर असल्याचं चिन्मय यांच्या लक्षात आलं.
भारतात परतल्यानंतर चिन्मयनं गोसावी यांना भेटण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण त्यांना पाच-पाच तास केवळ कार्यालयात बसवून ठेवलं जात होतं, असं चिन्मय यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितलं.
गोसावींनी आरोप फेटाळले
किरण गोसावी यांनी बीबीसी मराठीबरोबर बोलताना हे आरोप फेटाळून लावले होते. उलट आताच ही केस ओपन का करण्यात आली? असा सवाल त्यांनी केला होता. सहा ऑक्टोबरनंतर या प्रकरणी लूक आऊट नोटिस काढली असं ते म्हणाले.
"माझ्यावर दाखल झालेली केस संपली आहे. हे गुन्हे टेक्निकल स्वरूपाचे आहेत. माझ्या कामाशी संबंधित आहेत," असं गोसावी यांनी म्हटलं होतं.
पुण्याच्या प्रकरणातील व्यक्तीला मी मलेशियाला पाठवलं होतं. पण काही वैद्यकीय कारणांमुळे ते परत आले. त्यांनी वैद्यकीय गोष्टी माझ्यापासून लपवल्या, असं त्यांनी सांगितलं होतं.
उलट त्यांच्यावर म्हणजे चिन्मय देशमुख यांच्यावर मलेशियात खटला दाखल होणार होता, त्यातून आपणच त्यांना वाचवलं, असं गोसावी यांनी सांगितलं.
"या प्रकरणी स्वतः पोलिसांकडे सरेंडर करण्यासाठी गेलो होतो, पण मला धमकीचे फोन आले. त्यामुळं मी लपून राहिलो. धमक्यांचे पुरावेही माझ्याकडे आहेत," असं गोसावींनी म्हटलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)