You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वैजापूर ऑनर किलिंगसारख्या घटना घडू नये यासाठी काय करायला हवं?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात एका भावानं आपल्या सख्ख्या बहिणीचं मुंडकं कापून शरीरावेगळं केल्याची घटना नुकतीच घडली.
त्यानं हे कृत्य का केलं, तर बहिणीनं घरच्यांच्या मर्जीविरुद्ध प्रेमविवाह केला म्हणून.
पण, या अशा घटना महाराष्ट्राला नवीन नाहीयेत. खर्ड्यातील नितीन आगे प्रकरण असो की सोनई हत्याकांड प्रकरण, ऑनर किलिंगच्या बातम्या आपण वेळोवेळी वाचत किंवा पाहत असतो.
प्रेमविवाह किंवा आंतरजातीय विवाह आणि त्यामुळे होणाऱ्या ऑनर किलिंगच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.
पण, मग ऑनर किलिंग वाढण्याची कारणं काय आणि हे टाळण्यासाठी काय पर्याय असू शकतात?
सुरुवातीला जाणून घेऊया या अशा घटना का घडतात ते.
'पुरुषी आणि जातीय मानसिकता कारणीभूत'
ऑनर किलिंगच्या घटनांसाठी पुरुषी आणि जातीय मानसिकता कारणीभूत आहे आणि या दोन्ही मानसिकता एकमेकांच्या हातात घालून नांदत आहेत, असं मत बीडमधल्या सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले व्यक्त करतात.
हे समजून सांगताना त्या म्हणतात, "एखादी स्त्री स्वत: निर्णय घेत असेल, तर ते पुरुषी मानसिकतेला सहन होत नाही. जर स्त्री एखाद्याचं प्रेम किंवा जातीय परंपरा नाकारत असेल तर जातीय मानसिकतेला सहन होत नाही. यामुळे मग तथाकथित उच्च जातीतली माणसं तथाकथित खालच्या जातीतल्या मुला-मुलींचे बळी घेतात."
ऑनर किलिंगला बळी पडलेली मुलं-मुली हे खोट्या प्रतिष्ठेचे बळी असल्याचं मानसशास्त्रज्ञ हमीद दाभोळकर यांचं मत आहे.
ते सांगतात, "ऑनर किलिंगला बळी पडलेली मुलं-मुली हे खोट्या प्रतिष्ठेचे बळी आहेत. आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा वगैरे असं म्हणत या मुलांचा जीव घेतला जातो. पण ही प्रतिष्ठा खोटी असते. दैनंदिन जीवनातल्या बहुतांश गोष्टींवर जातीचा प्रभाव असतो आणि मग याचंचं टोकाचं रुप म्हणजे आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणांना मारून टाकलं जातं."
पण, मग या अशा घटना रोखण्यासाठी काय पर्याय असू शकतात, असाही प्रश्न उपस्थित होतो.
ऑनर किलिंगच्या घटना रोखायच्या असतील तर पालक, समाज आणि कायदा अशा तिन्ही पातळीवर प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
ऑनर किलिंग रोखण्यासाठी पर्याय काय?
मॅरेज काऊन्सिलर डॉ. डी. एस. कोरे यांच्या मते, "मुलगा किंवा मुलगी ही आपली खासगी मालमत्ता नसते, हे पालकांनी समजून घ्यायला पाहिजे. शिवाय पालकांनी जोडीदार निवडण्याची हुकूमशाही वृत्तीही सोडायला हवी. आपली मुलं वाढत्या वयात असतील, तर त्यांच्या वर्तनाकडे अधिक लक्ष द्यायला हवं. त्यांना काय हवं काय नको, हे पाहायला हवं. त्यांचं प्रेमप्रकरण किती वास्तवाला धरून आहे, हेही समजून सांगायला हवं."
समाज म्हणून आपण काय करू शकतो, तर ऑनर किलिंगच्या घटना रोखण्यासाठी सामाजिक स्तरावर 'एका विचाराची भावकी' निर्माण करण्याची गरज असल्याचं मनीषा तोकले सांगतात.
त्यांच्या मते, "एक समाज म्हणून आपण एका आडनावाची, जातीची नव्हे, तर 'एका विचाराची भावकी' निर्माण करणं गरजेचं आहे. या भावकीनं आंतरजातीय विवाह घडवून आणण्यासाठी कार्यक्रम तयार करायला हवा आणि आंतरजातीय विवाहांचा उत्सव घडवून आणायला हवा."
कायद्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पोलीस यंत्रणेनं ऑनर किलिंगच्या तक्रारींची वेळीच दखल घेतली आणि कारवाई केली, तर अशा प्रकरणांना चाप बसू शकतो, असं दाभोळकर यांचं मत आहे.
हाच मुद्दे पुढे नेत मनीषा तोकले सांगतात, "पोलीस यंत्रणांनी अशाप्रकरणांना गांभीर्यानं घ्यावं. अनेकदा पोलीस या प्रकरणांतील मुलींचं काऊन्सलिंग करतात, तू आई-वडिलांकडे परत जा, असं सांगतात. पण, हे पोलिसांचं काम नाही. त्यांनी त्यांचं कायदा राबवण्याचं काम करावं."
आंतरजातीय विवाहांना संरक्षण द्यायला हवं आणि या जोडप्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कार्यक्रम राबवायला हवेत, असं स्पष्ट मत जाणकारांच्या बोलण्यातून समोर येतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)