You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मीनाक्षी राठोड : 'आई, तुला आम्हाला मारून टाकावसं नाही का वाटलं?'
"5 मुली पदरात असतानासुद्धा एवढं कसं तू स्वतःला सांभाळलस.! राग कसा गं नियंत्रणात ठेवलास? ते ही पप्पा नसतांना ,तुला नाही का गं आम्हाला मारून टाकावसं वाटलं"?
हे शब्द आहेत अभिनेत्री मीनाक्षी राठोड यांचे. राज्यात काही दिवसांपूर्वीच औरंगाबादजवळच्या वैजापूर इथे ऑनर किलिंगचं प्रकरण घडलं. या घटनेसंदर्भात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
बहिणीने पळून जाऊन लग्न केल्याने भावाने आईच्या मदतीने बहिणीचं शीर उडवलं आणि त्याच्याबरोबर सेल्फीही घेतला. बहीण दोन महिन्यांची गरोदर होती.
यासंदर्भात पाच मुलींची आई असूनही लेकींची काळजी घेणाऱ्या आणि त्यांना स्वातंत्र्य आणि शिक्षण देणाऱ्या आईविषयी मीनाक्षी यांनी भावनिक पोस्ट लिहिली आहे.
मीनाक्षी लिहितात, "मोठ्या ताईचं आंतरजातीय लग्न झालं तेव्हा लोकांनी खूप त्रास दिला तुला. मी पाहिलंय. किती राग आला असेल नं तुला ताईचा.
माझं कैलाशसोबत आंतरजातीय लग्न झालं तेव्हा लोकांनी जवळजवळ तुला त्यांच्यात गृहीत धरणं सोडलं होतं. किती किती राग आला असेल तुला माझा!
पण कायम उसाचे पाचट अंगाखांद्यावर बाळगणारा तांडा आणि पुढारल्यापणाचे सोंग मिरवणारी आपली शहरातली कॉलनीही तुझ्या एका स्वीकाराने तुझ्या सोबत उभी राहिली!
कालपरवा लहान मुलीचंही आंतरजातीय लग्न मोठ्या थाटात लावून दिलंस. आणि सगळ्यांनाच जणू हीच कशी नवीन जन रीत आहे हे सांगून दिलेस! हे स्वीकाराचं बीज तुला कुठे गवसलं?
5 मुली असतानासुद्धा एवढं कसं तू स्वतःला सांभाळलस.! राग कसा गं ताबा राखलास? ते ही पप्पा नसताना, तुला नाही का गं आम्हाला मारून टाकावसं वाटलं?
हे असंच "कीर्ती थोरे "च्या आईला का नाही वाटलं एवढं राग अनावर होत असतो का प्रतिष्ठेपायी? तिने तर जातीतच लग्न केले होते. तुझ्या एवढं नाही फक्त एकाच मुलीला स्वीकारायचं होते तिला.
पोटच्या मुलीचा इतक्या अमानुषपणे खून करावसं वाटणं या पेक्षा क्रूर काय असू शकतं या जगात. काश माझ्यासारखी आई कीर्तीला लाभली असती तर? आणि हो! स्वप्निल शुभम सारखे भाऊ ही! या बेगडी प्रतिष्ठेच्या बंजर जमिनीवर तुझ्या स्वीकाराचं बियाणं सापडूदे आई!
काल परवाच सकारात्मक वाटणारी तुझ्या वाढदिवशी लिहिलेली ही पोस्ट, आज ही घटना एकूण अस्वस्थ करणारी आहे. सगळ्या चिंता, रुढी परंपरांना झुगारून हा जो swag तू स्वीकारला आहेस याने तुझ्या लेकरांची आयुष्य सुखी झाले आहेत. तुझ्यातल्या या सकारात्मक बदलाने आजूबाजूची परिस्थिती कूस बदलतेय! हा swag खर्या अर्थाने तुलाच शोभून दिसतो! जो प्रत्येक स्त्री मधे येवो!'
पोस्टमध्ये मीनाक्षी यांनी स्वत:च्या आंतरजातीय विवाहाविषयी लिहिलं आहे. मुलींनी आंतरजातीय विवाह केल्यावर ते खुलेपणाने स्वीकारणाऱ्या आईविषयी मीनाक्षी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. मीनाक्षी यांच्या पोस्टला नेटिझन्सनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. मीनाक्षी यांच्या आईच्या सर्वसमावेशक विचारांना अनेकांनी दाद दिली आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत मीनाक्षी देवकीची भूमिका साकारत आहे. ऊसतोडणीचं काम करणाऱ्या वडिलांची लेक असणाऱ्या मीनाक्षीचा प्रवास जालन्यातून सुरू झाला. मुंबईत अकादमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' या गाजलेल्या नाटकात त्यांनी काम केलं होतं. बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेतील वैजयंती त्यांनी साकारली होती.
मीनाक्षी यांचं कैलाश वाघमारे यांच्याशी लग्न झालं आहे. कैलाश अभिनेता असून तानाजी-द अनसंग वॉरियर, आश्चर्यचकित, भोन्सले, हाफ तिकीट, मनातल्या उन्हात, म्हादू अशा चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. काही चित्रपटांचं लेखन तसंच संगीत संयोजनही त्यांनी केलं आहे.
वैजापूरला काय घडलं होतं?
औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील गोयेगावमध्ये खोट्या प्रतिष्ठेपायी आई आणि भावानेच तरुणीचं शीर धडावेगळं केलं होतं. सोमवारी ही घटना घडली. आई-वडील आणि कुटुंबीयांच्या विरोधात जात या तरुणीनं प्रियकराबरोबर पळून जात विवाह केला होता. त्याच्या रागातून हा प्रकार घडला.
धक्कादायक बाब म्हणजे हत्या करण्यात आलेली तरुणी ही दोन महिन्यांची गरोदर होती.
या प्रकारानंतर आई व मुलानं पोलिस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली आणि पोलिसांसमोर समर्पण केलं. पोलिसांनी त्यांना ऑनर किलिंगच्या प्रकरणात अटक केली आहे. पोलिसांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे.
मृत कीर्ती उर्फ किशोरी मोटे ही तरुणी आणि अविनाश थोरे हे दोघंही गोयगाव येथीलच होते. अंदाजे अवघी 500 लोकसंख्या असलेलं हे गाव. अविनाश हा गावापासून अंदाजे 2-3 किलोमीटर अंतरावरच्या लाडगाव शिवारातील शेतवस्तीवर राहत होता.
किशोरी आणि अविनाश हे शिकायला एकाच महाविद्यालयात होते. महाविद्यालयात असताना या दोघांचं एकमेकांवर प्रेम बसलं. मात्र किशोरीच्या कुटुंबीयांचा त्या दोघांच्या नात्याला विरोध होता.
या नात्याला विरोध असण्यामागचं प्रमुख कारण हे सामाजिक प्रतिष्ठा किंवा कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमध्ये असलेली तफावत हे होतं. अविनाश आणि किशोरी यांचं एकमेकांवर नितांत प्रेम होतं, त्यामुळं कुटुंबाच्या विरोध मोडून काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
मोटे कुटुंबाच्या विरोधानंतरही किशोरी आणि अविनाश यांनी त्यांच्या नात्याला पुढे नेत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं सहा महिन्यांपूर्वी हे दोघं घरातून पळून गेले होते.
जून महिन्यात पळून गेल्यानंतर त्या दोघांनी आळंदी याठिकाणी लग्न केलं आणि लग्नानंतर अविनाश थोरे त्याची पत्नी बनलेल्या किशोरीला घेऊन घरी आला.
तेव्हापासून सासरी म्हणजे लाडगाव येथील वस्तीवर असलेल्या घरामध्येच किशोरी राहत होती. मधल्या काळात माहेरच्या कुटुंबीयांबरोबर तिचा फारसा संपर्कही नव्हता.
मात्र सोमवारी घटना घडली त्याच्या आठ दिवसांपूर्वी मृत किशोरी यांच्या आई शोभा मोटे या त्यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. मुलीला भेटून चहा-पाणी घेऊन त्या गेल्या होत्या.
निर्घृण हत्या
सोमवारी 5 डिसेंबर 2021 रोजी मुलीची आई शोभा आणि भाऊ म्हणजे संजय मोटे हे दोघं पुन्हा एकदा लाडगाव शिवारातील तिच्या सासरच्या घरी तिला भेटण्यासाठी आले.
त्यावेळी किशोरी या शेतामध्ये निंदणीचं काम करत होत्या. आई आणि भाऊ आलेला पाहून काम सोडून आनंदानं त्या पळत आल्या आणि त्यांना भेटल्या.
त्यांना पाणी वगैरे देऊन किशोरी चहा करत होत्या, त्याचवेळी शोभा आणि संजय म्हणजे आई आणि भावानं त्यांची निर्घृणपणे हत्या केली.
धारदार शस्त्रानं संजय मोटे यांनी किशोरी यांच्या गळ्यावर सपासप वार केले आणि त्यांचं शीर धडापासून वेगळं केलं. या संपूर्ण प्रकारादरम्यान आई शोभा मोटे यांनी किशोरीचे पाय धरून ठेवले होते, असं पोलिसांनी प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे.
धडावेगळं केलेलं शीर संजय मोटे यांनी बाहेर आणून त्याठिकाणी असलेल्या लोकांना दाखवलं आणि त्यानंतर ते शीर अंगणामध्ये ठेवून ते त्याठिकाणाहून निघून गेले.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)