शेतकरी आंदोलनः दिल्लीच्या सीमांवरून शेतकरी निघाले माघारी

राजधानी दिल्लीच्या सीमांवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन स्थगित झालं असून, आज (11 डिसेंबर) शेतकरी आंदोलनस्थळारून माघारी परतत आहेत.

मोदी सरकारनं कृषी कायदे रद्द केल्यानंतर हमीभावासह इतर पाच मागण्यांबाबत लिखित पत्र केंद्राकडून देण्यात आलंय. हमीभावासाठी पाच सदस्यांची समितीही नेमण्यात आलीय. या समितीत संयुक्त किसान मोर्चाचे प्रतिनिधी सुद्धा समाविष्ट आहेत.

सरकारनं लिखित स्वरूपात दिलेल्या आश्वासनांची पुढच्या वर्षी जानेवारीपासून प्रत्येक महिन्यात समीक्षा केली जाईल, असं संयुक्त किसान मोर्चानं म्हटलंय.

शेतकरी नेते बलबीर राजेवाल यांनी म्हटलं की, "अहंकारी सरकारला झुकवून जात आहोत. मात्र, हा आंदोलनाचा शेवट नाहीय. आंदोलन केवळ स्थगित केलंय. पुढच्या वर्षी 15 जानेवारीला पुन्हा संयुक्त किसान मोर्चाची बैठक होईल आणि या बैठकीत आंदोलनाची समीक्षा करण्यात येईल."

गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलनात 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावाही संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात येतो.

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला सिंघू बॉर्डरजवळ ट्रॅक्टर आणि ट्रॉलीज लावत आंदोलनाला सुरुवात केली. नंतर हळुहळू छावण्या उभ्या राहिल्या आणि सिंघू बॉर्डरच्या या भागाला जणू एका गावाचं रूप आलं होतं. आता शेतकरी परत जात असल्याने छावण्या उठतायत.

आंदोलनासाठी दिल्लीच्या सीमांवर दाखल होताना पंजाब - हरियाणातले शेतकरी त्यांच्यासोबत काही महिने पुरेल इतका शिधा - सामान घेऊन आले. या ट्रक्- ट्रॅक्टर आणि ट्रॉलीजच्या आडोशानेच त्यांनी रहायला सुरुवात केली. तंबू - भटारखाने - शौचालयं - आरोग्य शिबीरं उभारली.

आता याच ट्रॅक आणि ट्रॉलींवर सामान लादून त्यांनी परत जायला सुरुवात केलीय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)