You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतात गाड्यांच्या किमती वाढण्याची कारणं काय आहेत?
एकीकडे पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले आहेत आणि दुसरीकडे कारच्या किमतीही वाढल्या आहेत.
पेट्रोल डिझेलच्या किमतींबद्दल गेल्या काही दिवसांत आपण बरंच काही वाचलं असेल. पण भारत आणि जगभरात गाड्या का महाग झाल्या आहेत?
आज कार खरेदी बऱ्यापैकी इन्स्टंट झाली आहे. कंपन्या त्यांच्या साईटवरून तुम्हाला थेट गाडी बुक करण्याची सोय उपलब्ध करून देताहेत. म्हणजे शोरूम मध्ये जाण्याचीही गरज नाही.
असं असलं तरीही बुकिंगनंतर डिलिव्हरीसाठी काही आठवडे किंवा प्रसंगी अनेक महिने वाट पाहावी लागतेय, हा एक विरोधाभासच.
कार घेण्याचं स्वप्न का महागलं?
कोव्हिडच्या उद्रेकापासूनच गाड्यांच्या उत्पादनावर आणि पुरवठा प्रणालीवर कमालीचा ताण आलाय. त्यातच लोक सार्वजनिक वाहतूक टाळू लागल्याने खासगी गाड्यांची मागणीही वाढू लागली. त्यामुळे एकंदर जगभरातच गाड्यांची उपलब्धता कमी होत गेली, त्यामुळे गाड्यांचं वेटिंग तर वाढलंच पण नवीन तसंच जुन्या कार्सच्या किमतीही वाढल्यात.
यामागची काही प्रमुख कारणं पाहू या
1. सेमीकंडक्टर्सचा तुटवडा
फोक्सवॅगन, फोर्ड, होंडा, टोयोटासह सर्वच मोठ्या कंपन्यांनी सध्या कार उत्पादन काही प्रमाणात घटवलंय, याला कारण आहे सेमीकंडक्टर्सचा तुटवडा.
सेमीकंडक्टर चिप्स गाडीत अनेक गोष्टींसाठी वापरतात, म्हणजे तुमच्या डॅशबोर्डवरच्या डिस्प्लेपासून ते गाडीच्या सेफ्टी फीचर्सपर्यंत आणि हे सेमीकंडक्टर चिप्स तयार करणाऱ्या जगभरात काही मोजक्याच कंपन्या आहेत.
एकीकडे उत्पादन कमी आणि दुसरीकडे मागणी वाढलेलीच, यामुळे सेमीकंडक्टर्स महाग होत चाललेत. अमेरिकेच्या कोलोराडो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये बिझनेसच्या प्राध्यापक सुझॅन गॉलिकिक म्हणतात, "चिप्स उपलब्ध नसल्याने कार उत्पादक कंपन्यांना हे ठरवावं लागतं आहे की कोणत्या गाड्या बनवाव्या आणि कोणत्या गाड्यांचं उत्पादन मागे ठेवावं. अनेक कंपन्या फक्त त्याच गाड्या बनवतायत ज्यातून त्यांना मोठा नफा होईल. उदाहरणार्थ SUV, ट्रक किंवा लक्झरी कार."
ऑटो क्षेत्रात एक बलाढ्य अर्थव्यवस्था असलेल्या जपानची कार निर्यात गेल्या वर्षभरात 46 टक्क्यांनी घटली आहे. भारतातही या सेमिकंडक्टरच्या तुटवड्यामुळेच तुमच्या नवीन गाड्यांच्या डिलेव्हरीला अनेक महिने लागतायत.
2. स्टीलच्या वाढत्या किमती
भारतात स्टीलच्या किमती वाढल्याचा थेट परिणाम कारच्या किमतींवर झाला. चालू तिमाहीत स्टीलच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत दर टनामागे अडीच हजार रुपयांनी वाढतील, असं टाटा स्टीलने म्हटलंय.
कोळसा तसंच iron ore च्या किमती वाढल्यामुळे स्टीलच्या किमती वाढतायत. यंदाच्या वर्षांत भारतात स्टील उत्पादक आणि कार उत्पादकांमध्ये किंमतवाढीबद्दल वाटाघाटींच्या फेऱ्याही झाल्या आणि त्यात परस्पर सहमतीने किमतीही ठरल्या. याचा परिणाम म्हणून काही गाड्या महाग झाल्या.
3. पार्ट्सच्या वाढत्या किमती
आता कार बनवताना फक्त स्टील नाही तर शेकडो वेगवेगळ्या गोष्टी लागतात. प्लॅस्टिक, फायबर्स, कापडं, चामडं, काच इ. या कच्च्या मालाच्या किमतीही गेल्या काही काळात वाढल्या आहेत.
स्टीलव्यतिरिक्त तांब्याचे भाव गेल्या काही काळात प्रतिटन 5,200 डॉलर्सवरून 10,400 डॉलर्सवर गेले आहेत. तर पलेडियम, प्लॅटिनम, रोडियमसारख्या इतर महागड्या धातूंचेही भाव जवळपास दुपटीने किंवा तिपटीने वाढलेत.
भारतातील सर्वांत मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने सप्टेंबर महिन्यात आपल्या गाड्यांच्या किमती वाढवल्या होत्या.
न्यू इयरकडे सर्वसाधारणपणे गाड्यांच्या किमती वाढतात, यंदाही तसंच होणार का, असं विचारलं असता मारुती सुझुकीचे वरिष्ठ कार्यकारी संचालक (मार्केटिंग आणि सेल्स) शशांक श्रीवास्तव यांनी म्हटलं, "आम्हाला परिस्थितीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवावं लागेल, कारण यापूर्वी इतर वस्तूंमध्ये झालेल्या भाववाढीचा परिणाम आम्ही आमच्या गाड्यांच्या किमतींच्या रूपात ग्राहकांपर्यंत पोहोचू दिलेला नाही."
कार उत्पादनात लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंनी भाववाढीने उच्चांक गाठलेला दिसतोय, आणि येत्या काळात हा ताण हलका होईल, अशी शक्यता श्रीवास्तव यांनी व्यक्त केली.
4. गाड्यांमधील अद्ययावत सुविधा
आधी गाड्या म्हणजे फक्त प्रवासाचं साधन असायच्या, पण आता सगळ्याच गाड्यांमध्ये आरामाच्या, सुरक्षेच्या सोयीसुविधा भरपूर असतात. त्यामुळेच मोठ्ठी स्क्रीन, उत्तम दर्जाचा स्टिरिओ सिस्टिम, सीट बेल्ट आणि एअरबॅग्ससारख्या काही गोष्टी आता नवीन गाड्यांमध्ये स्टँडर्ड म्हणूनच दिसतात, पण त्यामागची छुपी किंमत गाडी घेताना अनेकदा लक्षात येत नाही.
आणखी एक गोष्ट म्हणजे, आता गाड्यांचं प्रदूषण कमी करण्यासाठी तसंच त्यांनी चांगलं ॲव्हरेज द्यावं, यासाठी बराच तांत्रिक खर्चही कार उत्पादक कंपन्या करतात, ज्याची परतफेड मग गाड्यांच्या किमती वाढवूनच होऊ शकते. त्यामुळे गाड्यांची value किती आहे, यापेक्षा ती value for money आहे की नाही, हेसुद्धा पाहिलं जातं.
नवीनच नाही, जुन्या गाड्याही महागल्या
फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ बिझनेसचे प्राध्यापक डेव्हिड मॅनाकॉफ यांनी बीबीसीला सांगितलं,"2020 मध्ये जवळपास 80 लाख गाड्यांचं उत्पादन थांबवलं गेलं होतं. यामुळे ऑटो उद्योगाला जवळपास 20 हजार कोटींचा फटका बसला. बाजारात नवीन गाड्या उपलब्ध नसल्यामुळे आता जुन्या गाड्यांच्याही किमती वाढल्या आहेत."
म्हणजेच शोरूममध्ये गाड्यांचा वेटिंग पिरेड इतका असतो की ज्यांना तातडीने गरज आहे, तेही मग सेकंड हँड गाड्यांच्या बाजारातही फिरताना दिसतायत. त्यामुळे मागणी तिकडेही वाढलेली आहेच. जुन्या गाड्यांची सरासरी किंमत दर महिन्याला 200 डॉलर्सने वाढतेय, असा एक अंदाज आहे.
या सगळ्याचे परिणाम जगात सर्वदूर जाणवतायत. मेक्सिको जगातला सर्वांत मोठा कार निर्यातदार आणि सातवा सर्वांत मोठा उत्पादक आहे. आपल्या एकूण ऑटोमोबाईल उत्पादनापैकी 80 टक्के हिस्सा मेक्सिको निर्यात करतो. पण या वर्षात नवीन गाड्यांच्या किमती सरासरी 9 टक्के वाढल्या आहेत आणि जुन्या गाड्याही महाग झाल्या आहेत असं मेक्सिकोच्या कार उत्पादक संघटनेने म्हटलं आहे.
भारतातला कार वापरणाऱ्यांचा टक्का वाढत जातोय आणि कार उद्योगावर इतरही अनेक लहानमोठे उद्योग अलवंबून असतात.
एखाद्या गावात एक प्लांट लागला की त्यातून स्थानिक पातळीवर उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या, इतर लहान सहान उद्योगधंद्यांना मिळणारी चालना, या सगळ्या गोष्टींचा एकूण आर्थिक प्रभाव मोठा असतो. त्यामुळे कुठल्याही अर्थव्यवस्थेची तब्येत कशी आहे हे पाहण्यासाठी तिथला वाहन उद्योग कसा चालतोय, हा एक महत्त्वाचा मानक मानला जातो.
(बीबीसी प्रतिनिधी सेसेलिया बारिया यांच्या माहितीसह)
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)