Gadchiroli Encounter मध्ये माओवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडे ठार

मिलिंद तेलतुंबडे
    • Author, प्रवीण मुधोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी, नागपूरहून

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील कोटगूल-ग्यारापत्तीच्या घनदाट जंगलात झालेल्या चकमकीत 26 माओवादी ठार झाल्याची माहिती गडचिरोली पोलिसांनी दिली आहे. त्यापैकी माओवादी चळवळीतले महत्त्वाचे नेते मिलिंद तेलतुंबडे हे देखील एक आहेत.

या दरम्यान माओवाद्यांशी झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलीस दलाच्या C-60 चे चार जवान जखमी झाले आहेत. चारही जवानांना उपचारासाठी हेलिकॉप्टरद्वारे नागपूर येथे हलविण्यात आलं आहे.

रविंद्र नैताम (वय 42), सर्वेश्वर आत्राम (वय 34), महरु कुळमेथे (वय 34) आणि टीकाराम कटांगे (वय 41) अशी जखमी जवानांची नावे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मिलिंद तेलतुंबडे ठार

शनिवारी झालेल्या चकमकीत CPI (Maoist) सेंट्रल कमिटीचे मिलिंद तेलतुंबडे हे ठार झाले आहेत. या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची नावे पोलिसांनी प्रसिद्ध केली आहेत. त्या यादीमध्ये तेलतुंबडे यांचं नाव देखील आहे.

गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी बीबीसी मराठीला सांगितले की "मृत नक्षलवाद्यांचे मृतदेह रविवारी सकाळी गडचिरोली येथे आणल्यानंतर त्यांची ओळख पटवली जाईल. त्यानंतरच या चकमकीत कोणकोणते माओवादी ठार झाले हे सांगता येईल."

मिलिंद तेलतुंबडे हे दंडकारण्य भागातील (महाराष्ट्र, छत्तीसगड) महत्त्वाचे माओवादी नेते मानले जातात. त्यांना दीपक, ज्योतिराव आणि श्रीनिवास या नावांनी देखील ओळखलं जातं.

कशी झाली कारवाई?

या घटनेबाबत बीबीसी मराठीला अधिक माहिती देताना गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले, "आम्ही घटनास्थळावरून 26 मृतदेह ताब्यात घेतले आहेत. चकमकीत ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख रविवारी सकाळीच होऊ शकेल."

नक्षलवादी प्रशिक्षण

फोटो स्रोत, Getty Images

जखमी जवानांना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इंस्टिट्युट मध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत, असं ऑरेंज सिटी हॉस्पिटल आणि रिसर्च इंस्टिट्युटचे संचालक डॉ. अनुप मरार यांनी सांगितलं.

ते म्हणाले. "चारही जवानांना बंदुकीच्या गोळ्या लागल्यामुळे त्यांच्या शरिराला त्याची इजा झाली आहे. आमच्या रुग्णालयातील एमर्जन्सी विभागातील सहकाऱ्यांनाी शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता या चार जखमी जवानांना नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन हॉस्पिटलमध्ये आणलं."

"चारही जवानांवर Critical Care Unit मध्ये उपचार सुरू असून चोवीस तास त्यांच्या उपचारासाठी विशेषज्ज्ञ उपलब्ध आहेत." असंही डॉ. अनुप मरार यांनी सांगितलं.

मृत नक्षलवाद्यांची यादी पोलिसांकडून जाहीर

दरम्यान, या कारवाईत मृत्यूमुखी पडलेल्या नक्षलवाद्यांची यादी पोलिसांकडून रविवारी सकाळी जाहीर करण्यात आली. मृतांमध्ये 20 पुरुष नक्षलवादी असून त्याव्यतिरिक्त 6 महिलाांचाही त्यामध्ये समावेश आहे.

मृत नक्षलवाद्यांची यादी खालीलप्रमाणे -

1. जिवा उर्फ दिपक उर्फ मिलिंद तेलतुंबडे

2. अडमा पोड्याम

3. प्रमोद उर्फ दलपत लालसाय कचलामी

4. कोसा उर्फ मुसाखी

5. चेतन पदा

6. किशन उर्फ जैमन

7. महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा

8. भगतसिंग उर्फ प्रदिप उर्फ तिलक मानकूर जाडे

9. सन्नू उर्फ कोवाची

10. प्रकाश उर्फ साधू सोनू

11. लच्छू

12. नवलुराम उर्फ दिलीप हिरूराम तुलावी

13. लोकेश उर्फ मंगू पोड्याम/मडकाम

14. बंडू उर्फ दलसू राजू गोटा

15. नेरो (महिला)

16. विमला उर्फ ईमला उर्फ कमला उर्फ मान्सो सुखराम बोगा (महिला)

याशिवाय इतर 6 पुरुष आणि 4 अनोळखी महिला नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.

लाखोंची होती बक्षीसे

वरील नक्षलवाद्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीस पोलिसांकडून लाखोंची बक्षीसे जाहीर करण्यात आली होती.

यामध्ये सर्वाधिक बक्षीस मिलिंद तेलतुंबडे यांच्या नावावरच होतं.

मिलिंद यांच्यावर पोलिसांनी 50 लाखांचं बक्षीस जाहीर केलेलं होतं. ते CPI (माओवादी) चे सेंट्रल कमिटी सदस्य होते. तसंच ते MCC इन्चार्जही होते.

त्यांच्या खालोखाल लोकेश उर्फ मंगू पोड्याम/मडकाम यांच्यावर 20 लाख, महेश उर्फ शिवाजी रावजी गोटा यांच्यावर 16 लाखांचं बक्षीस होतं.

याव्यतिरिक्त किशन उर्फ जैमन आणि सन्नू उर्फ कोवाची यांच्यावर 8 लाख, भगतसिंग उर्फ प्रदित उर्फ तिलक मानकूर जाडे यांच्यावर 6 लाख तर बंडू उर्फ दलसू राजू गोटा, प्रमोद उर्फ दलपत लालसाय कचलामी, कोसा उर्फ मुखासी, विमला उर्फ ईमला, प्रकाश उर्फ साधू सोनू, लच्छू, नवलुराम उर्फ दिलीप हिरुराम तुलावी यांच्यावर प्रत्येकी 4 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं होतं. याशिवाय चेतन पदावरील बक्षीसाची रक्कम 2 लाख इतकी होती.

सर्वाधिक काळ चाललेली कारवाई

शनिवारी पोलीस आणि माओवाद्यांमध्ये झालेली चकमक ही माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक काळ चाललेली चकमक ठरली, असं म्हटलं जात आहे.

शनिवारी सकाळी 6 वाजता सुरू झालेली चकमक ही दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू होती. गडचिरोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष प्रशिक्षित C-60 कमांडोजच्या 100 जवानांनी या चकमकीत माओवाद्यांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं.

पोलीस बल

फोटो स्रोत, Getty Images

या 100 कमांडोजच्या मदतीला C-60 कमांडोजच्या च्या आणखी 16 पार्टीज म्हणजेच 500 जवानांची अतिरिक्त कुमक पाठविण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माओवादी हे धानोरा तालुक्यातील कोटगूल-ग्यारापत्तीच्या घनदाट जंगलात लपून बसले असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. माओवाद्यांच्या या दलामध्ये कोची दलमचे माओवादी असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली होती.

CPI (Maoist) या प्रतिबंधित माओवादी संघटनेच्या गडचिरोली डिविजनल कमिटीचा मेंबर सुखलाल या दलमचे नेतृत्व करत असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली होती. पण माओवाद्यांसोबत चकमक सुरू झाल्यानंतर इतरही काही दलमचे माओवादी याच ठिकाणी असल्याचं गडचिरोली पोलिसांच्या C-60 कमांडोजच्या लक्षात आलं.

माओवादी अड्डा

फोटो स्रोत, CPI MAOIST

माओवाद्यांनी C-60 कमांडोजवर गोळीबार सुरू ठेवला. त्यामुळे दुपारी 4 वाजेपर्यंत ही चकमक सुरुच होती. 26 माओवाद्यांना ठार करण्याची ही चकमक इतिहासातील दुसरी मोठी अशी ठरली आहे.

23 एप्रिल 2018 रोजी गडचिरोली पोलिसांच्या C-60 कमांडोजनी 40 माओवादयांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी चकमकीत ठार केले होते.

एटापल्ली तालुक्यातील बोरिया-कसनसुर येथए 34 माओवाद्यांना ठार करण्यात आलं होतं. तर सहा माओवाद्यांना अहेरी तालुक्यात ठार करण्यात आलं होतं.

पोलिसांच्या हाती टिप आली अन्..

सुरुवातीला धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात काही माओवादी हालचाल सुरू असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती.

त्यानंतर पोलिसांनी त्या भागात सर्च ऑपरेशन सुरू केलं. त्याच वेळी जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या कथित नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला.

त्यानंतर पोलिसांनीही माओवाद्यांना प्रत्युत्तर दिलं. गडचिरोली पोलिसांनी आपलं नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करून अधिक जवानांची कुमक घटनास्थळी पाठवली.

या कारवाईदरम्यान माओवाद्यांनी मृत पावलेल्या माओवाद्यांचे मृतदेह सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला होता.

पूर्वाश्रमीच्या माओवाद्यांना ओळख पटवण्यासाठी बोलवले

गडचिरोली पोलिसांनी नुकतेच आत्मसमर्पण केलेल्या राकेश नावाच्या पूर्वाश्रमीच्या माओवाद्याला 26 मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी आणले आहे.

आणखीही काही आत्मसमर्पित माओवाद्यांकडूनही मृतदेहाची ओळख पटवली जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पोलिसांनी यानंतर आता जंगलातलं सर्च ऑपरेशन आणखी तीव्र केलं आहे. ग्यारापत्तीच्या जंगलातून या कारवाईच्या वेळेस पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त केले आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)