कासगंज प्रकरण : मृत तरुणाच्या शवविच्छेदन अहवालात काय समोर आलं?

    • Author, अनंत झणाणे
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये 22 वर्षीय तरुण अल्ताफच्या पोलीस ठाण्यातील आत्महत्या प्रकरणात शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.

मुलानं शौचालयातील नळाला फाशी घेत आत्महत्या केली नसून, त्याच्यावर अत्याचार करण्यात आले आणि त्यानंतर संशयास्पद परिस्थितीत अल्ताफचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांनी पोलिसांवर मुलाची मारून-मारून हत्या केल्याचा आरोप केला आहे.

एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी पोलिसांनी अल्ताफला कासगंज येथील पोलीस ठाण्यात आणलं होतं.

शव विच्छेदन अहवालात नेमकं काय?

कासगंजचे पोलीस अधीक्षक रोहन पी. बोत्रे यांनी अहवालानुसार "एस्फिक्सिया ड्यू टू अँटी मॉर्टम हँगिंग" असं मृत्यूचं कारण असल्याचं म्हटलं आहे.

सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, फाशीमुळं जीव गुदमरल्यानं मृत्यू होणं असा याचा अर्थ आहे.

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, "मृतदेहावर फाशीशिवाय इतर कोणत्याही जखमेच्या खुणा नाहीत. त्यावरून अल्ताफबरोबर कुठल्याही प्रकारची मारहाण किंवा अत्याचार झाला नसल्याचं, स्पष्ट होतं."

अल्ताफचा पोस्ट मॉर्टर्मचा रिपोर्टही व्हायरल झाला आहे. संपूर्ण रिपोर्टमध्ये केवळ एक ओळ हिंदीत लिहिली आहे. "गले में कोई रस्सी या कपडे का फन्दा नहीं पाया गया है" अशी ती ओळ आहे.

"डॉक्टरांना दोरी तर मिळाली नव्हती. पण दोरी फार जोरानं आवळलेली होती, त्यामुळं ती काढण्यात आली," असं रोहन बोत्रे म्हणाले.

पोलीस अधीक्षकांनी माहिती दिलेली असली तरी, दोन फुटांच्या नळाला फाशी घेऊन कोणी आत्महत्या कशी करू शकतं? हा प्रश्न अजूनही कायम आहे.

त्यावर "अल्ताफचा गळा चिरलेला आहे. तसंच गळ्याला खूण आहे. विंड पाइपला जखम व्हायला फार वेळ लागत नाही," असं पोलीस अधीक्षक म्हणाले.

दरम्यान, निष्काळजीपणाच्या आरोपात पोलीस ठाण्याचे एसएचओ आणि इतर चार पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.

अल्ताफच्या वडिलांनी हत्येच्या आरोपाचा जबाब मागे घेतला?

बुधवारी सायंकाळी आणखी एक पत्र व्हायरल झालं होतं. त्यात अल्ताफचे वडील चाँदमियां हेच एका प्रकरणात मुलाला पोलीस ठाण्यात सोडून गेले होते, असा उल्लेख होता. पत्रावर चाँद मिया यांचा अंगठा आहे. तसंच त्यात, "माझा मुलगा अल्ताफनं नैराश्यातून फाशी घेतली. पोलीस त्याला उपचारासाठी अशोक नगरच्या रुग्णालयात घेऊन गेले, तिथं उपचारादरम्यान त्याचं निधन झालं," असं लिहिलेलं होतं.

या पत्रात "मला पोलिसांविषयी काही तक्रार नाही. तसंच माझी किंवा माझ्या कुटुंबाची कोणत्याही कारवाईची इच्छा नाही, भविष्यातही करणार नाही," असंही लिहिलेलं आहे.

त्यानंतर चाँदमियाँ यांचा एक व्हायरल व्हीडिओदेखील समोर आला. "मी मीडियाला रागात म्हटल होतो. मी डॉक्टरांशी बोललो तेव्हा त्यांनी मुलानं फाशी घेतल्याचं सांगितलं. पोलिसांनी त्याच्यावर उपचारही केले, पण तो वाचला नाही. पोलिसांनी माझ्याबरोबरही चांगलं वर्तन केलं. मी कारवाईनं समाधानी आहे," असं ते व्हीडिओत म्हणत आहेत.

हा व्हीडिओ कोणी प्रसिद्ध केला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, माध्यमांनी जेव्हा चाँद मियां यांना व्हीडिओ आणि पत्राबाबत विचारलं तेव्हा, "मी निरक्षर आहे. कागदावर काय लिहिलं आहे, ते मला माहिती नाही. मला सीओंनी सही करायला सांगितली तर मी केली. मी पोलिसांकडे माझा मुलगा व्यवस्थित सोपवला होता. मला आता न्याय हवा आहे. पोलिसांमुळं माझ्या मुलाचं आयुष्य उध्वस्त झालं. त्याची हत्या करण्यात आली आहे. माझा मुलगा गेला आहे. मी काय करू. मला जसं सांगितलं, तसं मी केलं. मला काही माहिती नाही," असं ते म्हणाले.

"पत्राबाबतचा विषय खरा आहे. माझ्याकडे ते पत्र आहे. त्यांनी पत्रात हे सर्व लिहिलं आहे. तसा बाईटही दिला आहे. त्यात त्यांनी डॉक्टरांशी बोललो असून फाशीमुळं मृत्यू झाला दुसरं काही कारण नाही, यावर समाधानी असल्याचं म्हटलं आहे," असं पोलीस अधीक्षक रोहन बोत्रे म्हणाले.

कासगंजबाबत राजकारण कशामुळं?

बसपा प्रमुख मायावती यांनी अल्ताफच्या मृत्यूबाबत एक ट्वीट केलं. त्यात "कासगंजमध्ये पोलीस कोठडीत आणखी एका तरुणाचा लज्जास्पद मृत्यू झाला आहे. सरकारनं घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी आणि पीडिताच्या कुटुंबीयांना मदत द्यावी. युपी सरकार पोलीस कोठडीत मृत्यूचे प्रकार रोखण्यात आणि पोलिसांना जनतेचे रक्षक बनवण्यात अपयशी ठरलं आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.

मुजफ्फरनगरमध्ये शेतकऱ्यांच्या एका मोर्चात अखिलेश यादव यांनी कासगंज घटनेबाबत सरकारवर टीका केली. "एक नव्हे तर उत्तर प्रदेशात भाजप सरकारच्या काळात अनेक निर्दोषांची हत्या झाल्याची आम्ही, उदाहरणं देऊ शकतो. कालच्या घटनेत पोलिसांनी एका तरुणाला उचलून नेलं आणि एवढं मारलं, ठाण्यात एवढे अत्याचार केले की, त्याचा मृत्यू झाला. यासाठी भाजप सरकार दोषी आहे," असं अखिलेश यादव म्हणाले.

मायावती आणि अखिलेश यांनी या प्रकरणाबाबत टीका केली आहे. पण प्रमुख राजकीय पक्ष अल्ताफच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी फारसे सक्रिय झालेले नाहीत.

काँग्रेसचं एक शिष्टमंडळ गुरुवारी अल्ताफच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोहोचलं. त्यात पक्षाच्या प्रवक्त्या पंखुडी पाठकसह हरियाणाचे काँग्रेस प्रभारी विवेक बन्सलही होते.

"कुटुंबाबरोबर घडलेली सर्वांत चुकीची बाब म्हणजे, त्यांना मुलाचं पार्थिव आधी दाखवण्यात आलं नाही. शवविच्छेदनानंतर अशा प्रकारचा अहवाल आल्याचं सांगत आहेत. कोणीही यावर विश्वास करू शकत नाही. मुलाला चौकशीसाठी नेलं तेव्हा तो आत्महत्या करण्याच्या मानसिक स्थितीत नव्हता, असं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. आपण सर्वांनीच फोटोही पाहिले आहेत. दोन फुटांचा नळ आणि दोरीनं कुणी आत्महत्या कशी करेल, हे कोणत्याही हुशार व्यक्तीला हे कळू शकतं," असं पंखुडी पाठक म्हणाल्या.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)