हसीना पारकर : डॉन दाऊदच्या बहिणीबद्दल तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत का?

महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने 2 महिन्यांसाठी जामीन मंजूर केला आहे.

नवाब मलिक यांना ईडीने अटक केली होती आठ तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली होती.

वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यांच्यावतीने वकील युक्तिवाद करत आहेत. कॅबिनेट मंत्री असलेल्या मलिक यांच्या अटकेनंतर महाविकास आघाडी सरकार आणि भाजप हा संघर्ष तीव्र झाला होता

दरम्यान मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहोती. राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक ईडी कार्यालयाबाहेर आणि नंतर न्यायालयाबाहेर जमले आहोते. याठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता..

फडणवीस यांनी केलेल्या आरोपांनुसार, "1993 बॉम्बस्फोटातील दोषी असलेला सरदार शाह वली खान या व्यक्तीकडून एका कंपनीच्या मार्फत नवाब मलिकांनी एलबीएस रोडवर जागा विकत घेतली होती.

"आर. आर. पाटील हे एकदा एका इफ्तार पार्टीला गेले होते. त्या पार्टीत उपस्थित असलेल्या मोहम्मद सलीम पटेल या व्यक्तीसोबत त्यांचा फोटो झळकला होता. सलीम पटेल हा दाऊदचा माणूस होता. यात आर. आर. पाटील यांचा काही दोष नव्हता पण याच सलीम पटेलकडून नवाब मलिकांनी जमीन विकत घेतली," असं देवेंद्र फडवणीस यांनी म्हटलं होतं.

सलीम पटेल हा हसीना पारकरचा ड्रायव्हर होता. त्याच्या नावावरच पॉवर ऑफ अॅटर्नी देण्यात आलेली होती.

या प्रकरणात मलिक यांना अटक झाल्यानंतर आता पुन्हा दाऊद इब्राहिम तसंच त्याची बहीण हसीना पारकर चर्चेत आली आहे.

हसीना पारकर कोण होती?

हसीना पारकर दाऊद इब्राहिमची लहान बहीण होती. ते एकूण 12 भावंड होते.

हसीनाचं निधन जुलै 2014 मध्ये झालं होतं. तिचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झाला होता.

51-वर्षीय हसीनाला 'हसीना आपा' आणि 'अंडरवर्ल्ड क्वीन' या नावांनी ओळखलं जायचं.

आपली मुलगी आणि मुलगा अलीशाह यांच्यासह ती नागपाडाच्या गॉर्डन हाऊस बिल्डिंगमध्ये राहायची. योगायोगाने ही बिल्डिंग पोलीस स्टेशनच्या अगदीच समोर होती.

हसीनाच्या मृत्यूनंतर काही लोकांना वाटलं होतं की, दाऊद भारतात परत येईल पण असं झालं नाही. पोलिसांनाही अशी कोणतीही अशा नव्हती.

1991 साली हसीना पारकरचा नवरा इब्राहिम पारकरचा खून झाला होता.

पोलिसांनी एकदा हसीनाच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता पण तेव्हा तिने पोलीस आणि कोर्टाला सांगितलं की इब्राहिमचा खून झाल्यानंतर तिने कधीही दाऊदशी संपर्क साधला नाही.

पण एनडीटीव्हीने म्हटलंय की पोलिसांना तिचं बोलणं पटलं नाही.

आपल्या मेव्हण्याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी दाऊदने जेजे हॉस्पिटलमध्य अरूण गवळीच्या शूटर्सवर हल्ला केला होता. इथूनच हसीनाचं प्रस्थ वाढायला सुरुवात झाली.

हसीना सांभाळायची दाऊदचा भारतातला कारभार?

असंही म्हटलं जातं की दाऊदने भारत सोडल्यानंतर हसीनाच त्याच्या भारतातला कारभार सांभाळायची. त्याच्या प्रॉपर्टीची देखभालही तीच करायची.

पोलीस अधिकाऱ्यांच्या मते ती बिल्डर लोकांकडून कमिशन घ्यायची. बिल्डरांना झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी बिल्डिंग्स उभ्या करायच्या असायच्या, अशावेळेस ती मध्यस्ताचं काम करायची. पोलिसांना संशय होता की दाऊदच्या नियमित संपर्कात होती आणि त्याची दुबई-कराचीत अनेकदा भेट झाली.

हसीनाच्या मृत्यूसमयी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. तिच्या अंतयात्रेला कोण कोण आले यावरही पोलिसांचं बारीक लक्ष होतं.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी सदैव चर्चेत राहाणारे समाजवादी पार्टीचे आमदार अबु आजमी हसीनाच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.

2017 साली हसीना पारकरच्या आयुष्यावर 'हसीना' नावाचा चित्रपट आला होता. यात प्रमुख भूमिका श्रद्धा कपूरने केली होती.

हे वाचलंत का?

बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.