सलमान खुर्शीदः ‘हिंदुत्ववादी गट, ISIS आणि बोको हराम सारखेच’

काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांचं नवं पुस्तक 'सनराईज ओव्हर अयोध्या' वरून आता एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

या वादग्रस्त पुस्तकाच्या एका पानावर एक वाक्य आहे ज्यामुळे सगळा वाद निर्माण झाला आहे.

भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या काही नेत्यांचं म्हणणं आहे की या पुस्तकात हिंदुत्वाच्या नव्या अवताराची तुलना जिहादी गट ISIS आणि बोको हरामशी केली गेली आहे.

तर सलमान खुर्शीद यांचं म्हणणं आहे की त्यांनी पुस्तकात 'हिंदू धर्माची नाही तर हिंदुत्वाची तुलना अतिरेकी संघटनांशी केली.' पुस्तकात हिंदू धर्माविषयी अनेक चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत. लोकांनी पूर्ण पुस्तक वाचायला हवं.

तर काँग्रेसचे जेष्ठे नेते गुलाम नबी आजाद यांनी उघडपणे हा मुद्दा आपल्याला पटला नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ट्वीट करून म्हटलंय, "सलमान खुर्शीद आपल्या नव्या पुस्तकात भले आपण हिंदुत्व हिंदू धर्माच्या सर्वसमावेशक संस्कृतीपासून वेगळी अशी राजकीय विचारधारा आहे असं म्हणू. हिंदुत्व आपल्याला पटत नसेल पण त्याची तुलना ISIS आणि जिहादी इस्लामशी करणं तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचं आहे, अतिशयोक्ती आहे."

पुस्तकाचा विषय काय?

सलमान खुर्शीद यांचं पुस्तक अयोध्या वाद आणि सुप्रीम कोर्टाच्या ताज्या निर्णयावर आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला योग्य म्हणत इथपर्यंत येण्याचा प्रवास सांगितला आहे.

हे पुस्तक लिहायची इच्छा व्यक्त करत त्यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, "लोकांना वाटायचं की निर्णय यायला 100 वर्षं लागतील. मग लोकांना वाटायला लागलं की अरे हा निर्णय तर लवकर येईल.

निर्णय आल्यानंतर तो न वाचताच लोक आपली आपली मतं बनवायला लागले. पण हा एक चांगला निर्णय आहे. आजची जी परिस्थिती आहे, त्यावर मलम लावायचं काम हा निर्णय करतो. अशी गोष्ट पुन्हा घडू नये यासाठी केलेला प्रयत्न आहे."

सलमान खुर्शीद भारताचे कायदा आणि परराष्ट्र मंत्री होते. त्यामुळे त्यांनी या निर्णयावर केलेलं भाष्य अधिकच महत्त्वाचं ठरतं.

पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजप आपल्याकडून अयोध्या निर्णयांचं पूर्ण श्रेय लाटायच्या प्रयत्नात आहे तर विरोधी पक्ष याला कोर्टाचा निर्णय असं म्हणून या मुद्द्याला जास्त महत्त्व देत नाहीयेत.

वाद कशावरून?

खुर्शीद यांच्या पुस्तकातला वादग्रस्त भाग सहाव्या प्रकरणात म्हणजे 'द सॅफ्रन स्काय' या पुस्तकात येतो. यात इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे -

"Sanatan Dharma and classical Hinduism known to sages and saints was being pushed aside by robust version of Hindutav, by all standards a political version similar to jihadist Islam of groups like ISIS and Boko Haram of recent years."

याचा मराठी अर्थ होतो -

"सनातन धर्म आणि साधुसंताचा पारंपारिक हिंदू धर्म बाजूला करून ताकदवान हिंदुत्व पुढे येत होतं. हे जिहादी इस्लामिक गट म्हणजेच ISIS किंवा बोको हरामसारखीच एक राजकीय आवृत्ती होती."

यावरून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

मुख्तार अब्बास नक्वी म्हणालेत की, 'यावरून काँग्रेसच्या नेत्यांचं अज्ञान लक्षात येतं. ते स्वतःला सेक्युलर म्हणवतात. त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीही माहिती नाहीये. कधी ते हिंदुत्वाला दहशतवादाशी जोडतात कधी तालिबानशी. हा सगळा मुर्खपणा आहे.'

केंद्रीय मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनीही यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, 'सलमान खुर्शीद यांचे विचार धार्मिक विद्वेष पसरवणारे आहेत. आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी ते अशी तथ्यहीन वक्तव्य करत आहेत. त्याच्या वक्तव्याचा निषेध असो.'

विश्व हिंदू परिषदेचे नेते सुरेंद्र जैन यांनी म्हटलं की, 'ज्या लोकांचं राजकारण हिंदू समाजाचा अपमान करण्यावर बेतलेलं होतं, ज्यांनी वारंवार रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं केलं, ज्यांनी हिंदू दहशतवाद हा शब्द पुढे आणला, ज्यांनी सिमीची वकिली केली अशा लोकांना हिंदुत्वाची प्रगती सहन होत नाहीये. त्यांच्या लांगुलचालनच्या राजकारणाचा शेवट झालाय आणि हे त्यांच्या पचनी पडत नाहीये.'

भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी व्टीट करून म्हटलंय की, "ज्यांच्या पक्षाने मुस्लीम मतं मिळवण्यासाठी भगवा दहशतवाद हा शब्द तयार केला, त्यांच्याकडून काय वेगळं काय अपेक्षित असणार?"

महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसची सहकारी असणाऱ्या शिवसेनेनेही सलमान खुर्शीद यांना टीकेचं धनी बनवलं आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही या मुद्द्यावर ट्वीट केलं आहे.

त्यांनी लिहिलंय, "अवघे विश्वची माझे घर या तत्त्वावर चालणाऱ्या हिंदू धर्माला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. अशी अर्धवट माहिती तुम्हाला प्रसिद्धी देऊ शकते पण लाखो हिंदूच्या भावना याने दुखावल्या जातील."

सलमान खुर्शीद यांच्या पुस्तक प्रकाशनात काँग्रेसचे दुसरे मोठे नेते पी चिदंबरमही उपस्थित होते.

अयोध्या निर्णयावर आपलं मत मांडताना ते म्हणाले, "खूप काळ गेल्यामुळे दोन्ही पक्षांनी सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य केला. दोन्ही पक्षांनी हा निर्णय मान्य केला म्हणून या एक चांगला निर्णय ठरला. निर्णय चांगला होता म्हणून दोन्ही पक्षांनी मान्य केला असं नाहीये."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)