You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नायजेरिया: सशस्त्र हल्लेखोरांचा शाळेवर हल्ला, जवळपास 300 विद्यार्थ्यांच्या अपहरणाची शंका
नायजेरियातल्या जाम्फ्रामध्ये शेकडो विद्यार्थ्यांच्या अपहरणाची शंका व्यक्त केली जातेय.
एका शिक्षकाने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (26 फेब्रुवारी) सकाळी सशस्त्र हल्लेखोरांच्या हल्ल्यानंतर जवळपास 300 विद्यार्थ्यांबाबत अद्याप कुठलीच माहिती मिळाली नाहीय.
सरकारच्या प्रवक्त्यांनी हल्ल्याला दुजोरा दिला. मात्र, त्याबाबत अधिक माहिती दिली नाही.
गेल्या काही आठवड्यांमध्ये घडलेल्या अपहरणाच्या घटनांमधील ही सर्वात मोठी घटना आहे. नायजेरियातील सशस्त्र गट कायम खंडणीसाठी लोकांचं अपहरण करत असतात.
नायजेरीयाच्या शेजारील नायजर देशात गेल्या आठवड्यात 27 विद्यार्थ्यांसह किमान 42 जणांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यांच्याबाबतही अजून काहीच अधिक माहिती उपलब्ध नाही.
गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात 300 हून अधिक विद्यार्थ्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. मात्र, चर्चेनंतर त्यांना सोडण्यात आलं.
शुक्रवारचा (26 फेब्रुवारी) हल्ला स्थानिक वेळेनुसार रात्री एक वाजण्याच्या सुमारास झाला. एका शिक्षकाने पंच नामक एका वेबसाईटला सांगितलं की, जंगेबे परिसरातल्या एका शाळेवर दुचाकी आणि गाड्यांमधून आलेल्या सशस्त्र हल्लेखोरांनी हल्ला केला.
हल्लेखोरांनी सरकारी सुरक्षा अधिकाऱ्यांच्या कपड्यांसारखे कपडे परिधान केले होते आणि जबरदस्तीने विद्यार्थ्यांना आपल्या गाडीत बसवलं होतं.
नायजेरियाची राजधानी अबुजामधील बीबीसीचे प्रतिनिधी ईशाद खालिद यांच्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांचे पालक काळजीत आहेत. शाळेच्या बाहेर बरेच लोक गोळा झाले आहेत आणि काही लोक जंगलात आपापल्या मुलांना शोधतही आहेत.
एका शिक्षकाने बीबीसीला सांगितलं की, शाळेत एकूण 421 विद्यार्थी आहेत. यातील 55 विद्यार्थी सुरक्षित आहेत आणि शंका आहे की, 300 विद्यार्थ्यांचं अपहरण झालंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)