You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
AK47 द्या, गाय घेऊन जा; आत्मसमर्पण करणाऱ्या दरोडेखोरांसाठी योजना
नायजेरियाच्या वायव्येला असणाऱ्या जमफारा प्रांतामध्ये आत्मसमर्पण करणाऱ्या दरोडेखोरांसाठी एक अनोखी योजना राबवली जात आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या प्रत्येकाला AK -47 रायफलच्या बदल्यात दोन गायी दिल्या जात आहेत.
गुन्हेगारीचं आयुष्य सोडून एका जबाबदार नागरिकासारखं सामान्य आयुष्य जगण्यासाठीचं प्रोत्साहन देण्याचा हा सरकारचा प्रयत्न असल्याचं जमफाराचे गव्हर्नर बेलो मटावाल्ले यांनी म्हटलं आहे.
या प्रांतामध्ये मोटरसायकलस्वार दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत दहशत निर्माण केली आहे.
इथल्या फुलानी गुराखी संस्कृतीमध्ये गाईला मान आहे आणि या भागांमध्ये होणाऱ्या हल्ल्यांमागे याच समुदायाचा हात असल्याचा आरोप झाला आहे. पण या समाजाने हे आरोप आतापर्यंत वारंवार फेटाळले असून उलट आपण पीडित असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
उत्तर नायजेरियामध्ये एका गाईची किंमत सुमारे 1 लाख नायरा (260 डॉलर्स) आहे तर काळ्या बाजारात एक AK -47 रायफल सुमारे 5 लाख नायरा (1,200 डॉलर्स) ला मिळत असल्याचं बीबीसीचे मन्सूर अबू बकर सांगतात.
कोण आहेत हे लुटारू?
गव्हर्नर मटावाल्ले यांनी एका निवेदनात म्हटलंय, "या लुटारूंनी आधी आपल्या गायींच्या बदल्यात बंदुका विकत घेतल्या. पण आता त्यांना पश्चाताप झालाय आणि अपराधमुक्त व्हायचंय. म्हणून आम्ही त्यांना आवाहन करतोय, त्यांनी आम्हाला AK-47 रायफल्स द्याव्यात आणि त्याबदल्यात दोन गायी घेऊन जाव्यात. या योजनेमुळे त्यांना प्रेरणा मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे."
हे हल्लेखोर घनदाट जंगलातून आपलं नेटवर्क हाताळतात आणि शेजारच्या राज्यांमध्ये लुटालूट करतात. हे लुटारू दुकानं, जनावरं, धान्यं लुटतात आणि लोकांकडून खंडणी वसूल करतात.
जमफारामध्ये नुकत्याच झालेल्या एका हल्ल्यामध्ये सशस्त्र लुटारूंनी 21 जणांची हत्या केली होती.
इंटरनॅशनल क्रायसिस ग्रूपच्या आकडेवारीनुसार गेल्या 10 वर्षांमध्ये केब्बी, सोकोट, जमफारा आणि शेजारी देश निजेरमध्ये 8,000 पेक्षा जास्त लोक अशा हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत.
फुलानी गुराखी समाज आणि शेतकरी यांच्यामध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादांमधून हे हल्ले होत आहेत.
जमफाराचे बहुतांश रहिवासी हे शेतकरी आहेत आणि राज्याच्या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे - 'शेती आमचं भूषण आहे.'
जंगलामधून लुटालुटीचं काम करणाऱ्या दरोडेखोरांची तळही हटवण्यात येणार असल्याचं गव्हर्नरनी म्हटलंय.
जमफाराबद्दल थोडी माहिती
- 2016च्या आकडेवारीनुसार जमफाराची लोकसंख्या सुमारे 45 लाख आहे.
- इथले 67.5% लोक हे गरीबीत जगतात. (राष्ट्रीय दर - 62%)
- राज्यातला साक्षरता दर 54.7% आहे.
- राज्याचं ब्रीदवाक्य - शेती आमचं भूषण आहे.
- इथले बहुतांश रहिवासी हौजा आणि फुलानी समाजाचे आहेत
- इथले बहुतांश जण मुसलमान आहेत
- शरिया कायदा पुन्हा लागू करणारं हे नायजेरियातलं पहिलं राज्य आहे. 2000 साली राज्याने हा कायदा पुन्हा लागू केला होता.
स्रोत : नायजेरिया डेटा पोर्टल आणि इतर
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)