कोरोना व्हायरस: N-95 मास्क किंवा व्हॉल्व असलेला मास्क हानिकारक

व्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कचा वापर कोव्हिड-19 विरोधातील लढाईत हानिकारक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं म्हणणं आहे.

व्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कच्या वापराबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहीलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आरोग्यसेवा संचालक डॉ. राजीव गर्ग यांनी या पत्रात व्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कमुळे कोव्हिड-19 व्हायरसला बाहेर जाण्यापासून थांबवता येत नाही. त्यामुळे या मास्कचा वापर कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत हानिकारक असल्याचं नमुद केलंय.

बीबीसीने तीन दिवासांपूर्वी व्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कचा वापर हानिकारक आहे का? याबाबत तज्ज्ञांचं मत जाणून घेतलं होतं. फुफ्फुसविकार तज्ज्ञांनी व्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कचा वापर सामान्यांनी करू नये असा सल्ला दिला होता.

आरोग्यसेवा संचालकांचं पत्र

असं लक्षात आलं आहे की व्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कचा वापर चुकीचा वापर आरोग्य सेवेशी निगडीत नसलेले सामान्य लोक करत आहेत.

तुमच्या लक्षात आणून द्यायचं आहे की कोव्हिड-19 विरोधातील लढाईत व्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कचा वापर हानिकारक आहे. हे मास्क कोरोना व्हायरस बाहेर जाण्यापासून थांबवत नाही.

त्यामुळे N-95 मास्कच्या चुकीच्या वापराबाबत सर्वांना माहिती द्यावी आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने चेहरा आणि तोंड कव्हर करण्यासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच पालन करावं.

कोरोना व्हायरस इन्फेक्शन झालेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकेतून उडणाऱ्या थेंबांमुळे पसरतो. त्यामुळे कोरोनापासून स्वत:ची आणि इतरांच्या सुरक्षेसाठी मास्क घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्याप्रमाणे, कोव्हिड-19 व्हायरस हवेतून पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे भारतातही सरकारने मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे.

कामावर जाताना, ट्रेन-बस मधून प्रवास करताना, बाजारात जाताना म्हणजेच घरातून बाहेर पडल्यावर मास्क घालणं गरजेचं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गरजेचे असणारे विविध प्रकारचे मास्क वापरतो.

मास्कचे प्रकार

  • सर्जिकल मास्क
  • कॉटन मास्क
  • N-95 मास्क
  • व्हॉल्व्ह असलेला N-95 मास्क (मास्कच्या बाजूला हवा जाण्यासाठी असलेलं छिद्र)

रस्त्यावर चालताना अनेक लोक रेस्पिरेटर व्हॉल्व्ह असलेला N-95 मास्क वापरताना दिसतात. पण, तुमचं N-95 मास्क तुमच्यासाठी सुरक्षेचं आहे, पण इतरांसाठी धोक्याचं ठरू शकतं. असं तुम्हाला सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल? नाही..ना! पण, डॉक्टरांच्या मते व्हॉल्व्ह असलेला N-95 मास्क तुमच्यासाठी सुरक्षेचं आहे. पण, इतर लोकांसाठी धोक्याचं ठरू शकतं.

फोर्टिस रुग्णालयातील सूचना

असं खरंच आहे का? व्हॉल्व्ह असलेला N-95 मास्क वापरू नये? हे आम्ही डॉक्टरांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला माहिती मिळाली की मुंबईच्या फोर्टिस रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयात काम करणारे कर्मचारी, रुग्ण आणि सोबत येणाऱ्या नातेवाईकांनी व्हॉल्व्ह असलेले मास्क घालून रुग्णालयाच्या आवारात येऊ नये अशी नोटीस रुग्णालयात लावली आहे.

या नोटीशीप्रमाणे, व्हॉल्व्ह असलेले मास्क रुग्णालय परिसरात वापरणं प्रतिबंधित आहे. एक्झलेशन व्हॉल्व्ह असलेल्या मास्कमधून बाहेर पडणारी हवा फिल्टर झालेली नसते. ही हवा बाहेर पडल्यानंतर पसरू शकते ज्यामुळे इतरांना त्रास होण्याची शक्यता आहे.

याबाबत बोलताना फोर्टिस रुग्णालयाचे रेस्पिरेटरी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत छाजेड म्हणाले, "एक्सपिरेटरी व्हॉल्व्ह असलेला मास्क वापरणाऱ्या व्यक्तीला श्वास घेताना हवा फिल्टर करून मिळते. पण, श्वास सोडताना मास्कला व्हॉल्व्ह असल्याने बाहेर पडणाऱ्या हवेतून ड्रॉपलेट्स हवेत पसरतात. त्यामुळे इतर लोकांना इन्फेक्शन होण्याची शक्यता असते किंवा आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते."

"आपण बोलताना किंवा खोकताना ड्रोपलेट्स तयार होतात आणि हवेत पसरतात. मास्क घातल्याने तयार होणारे ड्रोपलेट्स मास्कमध्येच अडकतात किंवा मास्कमध्येच थांबवले जातात. एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला असेल, तर हे ड्रोपलेट्स मास्कमध्येच अडकलेल्याने दुसऱ्यांना आजारी व्यक्तीपासून संसर्ग होत नाही.

मास्क योग्य पद्धतीने घातलं नाही किंवा काही कारणांमुळे लिक झालं तर, ड्रोपलेट्स हवेमध्ये पसरण्याची शक्यता असते. यामुळे इतरांनाही धोका असतो," असं डॉ. डॉ. प्रशांत छाजेड पुढे म्हणाले.

रुग्णालयात व्हॉल्व्ह असलेला N-95 मास्क वापरू नये? याबाबत बोलताना पुण्याच्या पल्मोकेअर रिसर्च आणि एज्युकेशन फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी सांगतात, "रुग्णालयात हे मास्क न वापरणं योग्य आहे. रुग्ण, तपासणी करणारे डॉक्टर, नर्स यांना कोव्हिडची लक्षणं दिसून येतीलच असं नाही. ते asympomatic असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांपासून रुग्णांना आणि रुग्णांपासून इतरांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही."

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांचं याबाबत मत वेगळं आहे. ते म्हणतात, "व्हॉल्व्ह असलेल्या रेस्पिरेटरी मास्कमधून विषाणू बाहेर पडेल असं म्हणतात. पण, जगभरात लाखो लोकं हे मास्क वापरत आहेत.

फिल्टर नसलेल्या मास्कच्या बाजूला असलेल्या जागेतून पण हवा बाहेर पडतेच. त्यामुळे मास्क कोणतही असो लोकांनी त्याचा आपल्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी वापर केला पाहिजे."

तज्ज्ञांच मत काय?

हल्ली अनेक लोकं हवेच्या शुद्धीकरणासाठी आवरण असणारे N-95 मास्क मोठ्या संख्येने वापरताना पहायला मिळत आहेत. साध्या आणि नॉर्मल N-95 पेक्षा लोकांची पसंती व्हॉल्व्ह असणाऱ्या मास्कसाठी आहे.

व्हॉल्व्ह असलेलं मास्क सामान्यांनी वापरलं तर? सामान्यांनी हे मास्क वापरू नये का? याबाबत डॉ. साळवी म्हणतात, "मास्क घालण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे आपल्यापासून दुसऱ्यांना होणारा संसर्ग थोपवणं आणि मग आपलं संरक्षण. पण, व्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कमधून श्वास सोडल्यानंतर ड्रोपलेट्स सहजतेने बाहेर पडतात आणि हवेत मिसळतात. ज्यामुळे इतरांना त्रास होण्याची शक्यता असते. हे मास्क घालून आपलं प्रमुख उद्दिष्ट आजाराचं संसर्ग दुसऱ्यांना न होऊ देणं साध्य होत नाही."

"व्हॉल्व्ह असणारे मास्क फक्त दिसायला चांगले असतात. त्यामुळे हे मास्क वापरण्याकडे लोकांचा ओढा जास्त आहे. हे मास्क कोरोनासाठी बनवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे व्हॉल्व्ह असलेला मास्क घालून विशेष काहीच फायदा नाही.

अनेक लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून येत नाहीत. अशांनी हे मास्क वापरले तर उलट दुसऱ्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सामान्यांनी हे मास्क वापरू नये," असं डॉ. साळवी पुढे म्हणतात.

मुंबईच्या ग्लोबल रुग्णालयातील कन्सल्टंट इंटेसिव्हिस्ट आणि छातीरोगतज्ज्ञ डॉ. हरीष चाफळे बीबीसीशी बोलताना म्हणाले की, "कोव्हिड-19 पासून बचाव करण्यासाठी सद्य स्थितीत बाजारात अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. यातील काही मास्कना हवेच्या शुद्धीकरणासाठी झाकणाप्रमाणे आवरण असतं. पण, एखाद्या कोव्हिड-19 पॉझिटिव्ह व्यक्तीने हा मास्क घातला तर त्याच्या श्वसनातून बाहेर पडणारे विषाणू हवेत मिसळल्यास, इतरांना धोका पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारचे मास्क वापरणं धोकादायक ठरू शकतं."

पुण्यातील बेरिअॅट्रीक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. सतीश पटनशेट्टी म्हणतात, "लोकांनी रेस्पिरेटरी व्हॉल्व्ह असलेलं मास्क घालून खूप गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. रुग्णालयात हे मास्क अजिबात वापरू नये."

व्हॉल्व्ह असलेल्या मास्कने काय होतं?

लोक हा मास्क का वापरतात? यावर बोलताना डॉ. हरीष म्हणतात, "रुमालाने किंवा अन्य मास्कने चेहरा झाकल्याने काही वेळ गुदमरल्यासारखं वाटल्याने लोक हा मास्क वापरतात. या मास्कमध्ये जास्त उष्णता जाणवत नाही. याशिवाय या मास्कचा फारसा उपयोग नाही.

सर्दी, खोकला अशी लक्षणं असल्यास त्या व्यक्तीने हा मास्क वापरणं टाळावं. जेणेकरून इतर कोणत्याही निरोगी व्यक्तीला संसर्गाची लागण होणार नाही."

"बाजारात किंवा कामाला जाताना हे मास्क लोक वापरू शकतात. या मास्कमध्ये कार्बनडायऑक्साईड मास्कच्या आत रहात नाही. त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत नाही." असं डॉ. सतीश यांचं मत आहे.

रेस्पिरेटर असलेला मास्क कोणी वापरावा?

डॉ. साळवी यांच्या माहितीनुसार, N-95 मास्क हा प्रदुषित ठिकाण काम करण्यासाठी बनवण्यात आला आहे. जेणेकरून श्वास घेताना प्रदुषणाचे कण शरीरात जाणार नाहीत.

हा मास्क कोव्हिड-19 आयसीयूमध्ये काम करणाऱ्यांनी वापरावा. ज्याठिकाणी 4-5 तास पीपीई किट घालून काम करावं लागतं.

जागतिक आरोग्य संघटनेचं मत

2006 मध्ये H5N1 एव्हिअन इन्फ्लूएन्झा व्हायरस इन्फेक्शनबाबत माहिती देताना जागतिक आरोग्य संघटनेने व्हॉल्व्ह असलेल्या मास्कबाबत सूचना प्रसिद्ध केली होती.

एक्झलेशन व्हॉल्व्ह असणारे मास्क निर्जंतुकीकरण झालं असलेल्या (Stereile) परिसरात वापरण्यात येऊ नये. ऑपरेशन थिएटरमध्ये वापरण्यात येऊ नये. व्हॉल्व्ह असलेल्या मास्कमधून श्वास सोडताना ड्रॉपलेट्स आणि काही पार्टिकल हवेमध्ये पसरतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)