You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरसचा समूह संसर्ग भारतात सुरू झाल्याचा दावा IMA ने का केलाय?
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी मराठी
कोरोना व्हायरसचा देशात सध्या वेगाने प्रसार होत आहे. लॉकडाऊन, कंटेनमेंट झोन आणि इतर खबरदारीच्या उपयांनंतरही देशात रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भारतात समूह संसर्ग सुरू झाल्याचा दावा 'इंडियन मेडीकल असोसिएशन'ने (IMA) केला आहे.
गेल्या अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतरही ही बिकट परिस्थिती निर्माण झाली असता देशाने आंतरराष्ट्रीय प्रतिमेचा विचार करता समूह संसर्ग झाल्याचं नाकारणं आयोग्य ठरेल असंही आयएमएने म्हटलं आहे. मात्र, आयएमएच्या या दाव्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच ICMR ने खंडन केलं आहे.
समूह संसर्ग झाल्याचा दावा का?
भारतात गेले 4 दिवस सतत 30 हजारांपेक्षा अधिक रुग्ण वाढले आहेत. तसंच, देशातल्या एकूण बाधितांची संख्या ही 11 लाखांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. रविवारी (19 जुलै) 38 हजार 902 रुग्णांची नोंद देशात झाली. यानंतर 'आयएमए'च्या भारतीय रुग्णालय मंडळाचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. मोंगा यांनी समूह संसर्ग सुरू झाल्याचं म्हटलं.
डॉ. मोंगा पुढे सांगतात, "हे सगळं परिस्थिती बिघडल्याचं लक्षण आहे. दररोज रुग्णवाढ व्हायला अनेक घटक कारणीभूत आहेत. मात्र, देशाच्या ग्रामीण भागांतही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. ही गोष्ट अधिक चिंताजनक आहे. राज्यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावेत. त्यासाठी गरजेनुसार केंद्राची मदत घ्यायला हवी.'
केंद्रीय आरोग्य मंत्रालय तसेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) समूह संसर्गाचा दावा फेटाळला आहे. हा केवळ स्थानिक उद्रेक असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात सांगितलं होतं. आयसीएमआरने केलेल्या सर्वेक्षणातही छोट्या जिल्ह्यांमध्ये केवळ एक टक्का लोक कोरोनाबाधित झाल्याचा निष्कर्ष काढला होता.
समूह संसर्ग म्हणजे काय?
मुळात हा समूह संसर्ग किंवा संसर्गाचा तिसरा टप्पा काय आहे? आपण या तिसऱ्या टप्प्यात प्रवेश केलाय का? या फेजमध्ये प्रवेश केल्यावर काय होतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा केलेला हा प्रयत्न.
समूह संसर्ग किंवा तिसरा टप्पा असं आपण ऐकतो. पण पुढे जाण्याआधी हे टप्पे नीट समजून घेणं गरजेचं आहे. कोव्हिड-19चं संक्रमण होण्याचे चार टप्पे ICMRने म्हणजेच भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं स्पष्ट केले आहेत.
पहिल्या टप्पा हा कोरोनाचा संसर्ग ज्या देशांमध्ये झाला आहे, अशा देशांमधून जेव्हा लोक आपल्या देशात येतात तो असतो. त्यांच्या माध्यमातून हा विषाणू पसरतो. हा टप्पा आपण पार केला आहे.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
दुसरा टप्पा हा परदेशातून आलेल्या माणसांच्या संपर्कात आलेल्या लोकांना जेव्हा लागण होते, तेव्हा सुरू होतो. म्हणजे परदेशातून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कात तिचा नवरा आला किंवा तिची आई आली, आणि मग त्या दोघांनाही कोव्हिड 19 झाला, तर तो दुसरा टप्पा मानला जातो. आपण या टप्प्यात असल्याचं भारत सरकारचं म्हणणं आहे. या टप्प्यात कोरोनाची लक्षणं आढळणाऱ्या व्यक्तीला हा संसर्ग कुणामार्फत झाला असेल हे सहज शोधून काढता येतं.
तिसऱ्या टप्प्यात होतं काय?
तिसरा टप्पा म्हणजे कम्युनिटी ट्रान्समिशन किंवा समूह संसर्ग. या टप्प्यात कोरोनाच्या संसर्गाचा स्रोत शोधून काढता येत नाही. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जेव्हा एखाद्या पेशंटला कोव्हिड झाल्याचं कळतं, पण तो पेशंट कधी परदेशात गेलेला नसतो किंवा परदेशातून आलेल्या कुणाच्या संपर्कात आलेला नसतो, तेव्हा कळत नाही की याला आजार नेमका कुणामुळे झालाय.
संक्रमणाचा स्रोत कळत नसल्याने विषाणूचा प्रसार रोखणं अवघड होतं. कारण या माणसाला कोरोना व्हायरस भाजीवाल्याकडून मिळालाय की शेजाऱ्याकडून मिळालाय की आणखी कुठून हे कळायला मार्ग नसतो. त्यामुळे जो कुणी मूळ स्रोत आहे, त्याला शोधणं आणि पुढचं संक्रमण थांबवणं कठीण असतं. तसं तर त्या मूळ व्यक्तीच्या माध्यमातून आणखी किती लोकांना आणि कुठेकुठे कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे, हेही शोधून काढता येत नाही. या टप्प्यात संक्रमण जाणं आपल्या सगळ्यांसाठी धोकादायक आहे. या टप्प्यात संक्रमण पोहोचल्यास विषाणूने चांगलेच हातपाय पसरल्याचं लक्षात येतं.
चौथा टप्पा म्हणजे पेशंट्सची संख्या झपाट्याने वाढत जाणे. तेव्हा आपण साथ आली असं म्हणतो. या टप्प्यांपर्यंत चीन पोहोचला होता. जेव्हा समाजात सगळीकडून हजारो किंवा लाखो पेशंट्स येऊ लागतात आणि हजारोंचा मृत्यू होऊ लागतो, तेव्हा तो चौथा टप्पा असतो. या टप्प्यात विषाणूचा संसर्ग कमी करणं किंवा मृत्यूचा दर आटोक्यात आणणं अवघड होऊन बसतं.
भारत तिसऱ्या टप्प्यात गेलाय का?
ICMRने काही दिवसांपूर्वीच एक अहवाल प्रसिद्ध केला. श्वास घेण्यासंदर्भात गंभीर आजार असलेल्या 5,911 रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यापैकी 104 जणांमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली. या 104 पैकी 40 रुग्णांनी परदेश प्रवास केलेला नव्हता, किंवा कोरोनाबाधित व्यक्तींच्या ते संपर्कात आलेले नव्हते. मात्र तरीही त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळली आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांनुसार हे कम्युनिटी ट्रान्समिशनचं किंवा तिसऱ्या टप्प्यांचं लक्षण आहे. पण भारतात समूह संसर्ग झाला की नाही, याबद्दल या अहवालात काही उल्लेख नाही. केंद्र सरकारची रोज जी पत्रकार परिषद होते, त्यात केंद्र सरकार पुन्हा पुन्हा सांगतं की भारतात समूह संसर्गाची सुरुवात झालेली नाही.
कोरोनाबाधित असणाऱ्या जवळपास प्रत्येक व्यक्तीला कुणामुळे लागण झालीये, त्याचा माग आम्ही काढू शकतो, त्यामुळे आपण दुसऱ्याच टप्प्यात आहोत. पण बीबीसीचे प्रतिनिधी देशभरातल्या अनेक डॉक्टरांशी आणि अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. त्यांच्याकडून मिळणारी माहिती वेगळी आहे. बीबीसी प्रतिनिधी शौतिक बिस्वास यांच्याशी बोलताना अनेक डॉक्टरांनी सांगितलं की समूह संसर्गाला भारतात सुरुवात झाली आहे.
तामिळनाडूमधल्या वेल्लोर इथल्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजमधले व्हायरॉलॉजीचे निवृत्त प्रोफेसर टी. जेकब जॉन यांनी सांगतिलं की "आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की समूह संसर्गाला भारतात सुरुवात झाली आहे. पुढच्या दोन महिन्यांमध्ये केवढं मोठं संकट येणार आहे, ते कदाचित आपल्याला लक्षात आलं नाहीये."
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूसंदर्भात काही अहवाल तयार केले. त्यापैकी एकात भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झाल्याचं म्हटलं होतं. याचाच अर्थ भारतात या विषाणूचा प्रसार तिसऱ्या टप्प्यात गेला आहे. भारत सरकारने यावर आक्षेप घेतला. भारत तिसऱ्या टप्प्यात गेला तर आम्ही स्वतः जाहीर करू, असं सरकारच्या वतीने आरोग्य मंत्र्यालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल म्हणाले.
मग काही तासातच जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHOने स्पष्टीकरण दिलं की भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालेलं नाहीये. भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन नव्हे तर 'क्लस्टर ऑफ केसेस' सापडल्याची सारवासारव जागतिक आरोग्य संघटनेने केली. म्हणजे काही विशिष्ट ठिकाणी कोरोना पेशंट्सचे समूह आहेत,पण हा रोग असून समाजात सर्वत्र पसरलेला नाही, असं WHOने म्हटलं.
मुंबई-महाराष्ट्र तिसऱ्या टप्प्यात?
मुंबईत कोरोना पेशंट्सचा आकडा झपाट्याने वाढतोय. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी न्यू इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं की "मुंबईत समूह संसर्ग झालाय,पण तो मोठ्या प्रमाणात नाहीये."
मुंबईत वरळी, धारावीसारख्या ठिकाणी अनेक रुग्ण आढळले आहेत, जे कधी परदेशात गेले नव्हते किंवा परदेशात गेलेल्या कुणाच्या संपर्कात आले नव्हते. तिथे आता राज्य सरकारने क्लस्टर कंटनेमेंट प्लॅन लागू केला आहे. आपण मुंबईत तिसऱ्या टप्प्याच्या आगदी उंबरठ्यावर उभे आहोत, असं सत्ताधारी आणि विरोधकही मान्य करतात.
उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असणाऱ्या जयंत पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की,सार्वजनिक सुविधांचा वापर केला की या रोगाचा प्रसार होतो हे आपल्या लक्षात आलेलं आहे. धारावीमध्ये तसंच झालं. दाटवस्तीमध्ये कोव्हिड-19जायला नको होतो पण दुर्दैवाने गेलाय. त्याठिकाणी सरकारने तातडीने विविध पावलं उचलली आहेत.
दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की, मुंबईत होणारी वाढ ही गंभीर बाब आहे. मुंबई ही कम्युनिटी स्प्रेडच्या उंबरठ्यावर उभी आहे. एक चूक जरी केली तर कदाचित याहीपेक्षा भयानक स्थितीचा सामना करावा लागेल.
तिसऱ्या टप्प्यात मुंबई कधीही जाऊ शकते, याची राज्य सरकारला जाणीव आहे, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी आता माजी सैनिक, माजी आरोग्य सेवकांना सेवेत रुजू होण्याचं आवाहन केलंय. जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आरोग्य सुविधेचं प्रशिक्षण घेतलेल्यांनी या युद्धात सहभागी व्हावं असं आवाहन करताना आपली महाराष्ट्राला गरज आहे, असं भावनिक आवाहनही केलं.
हजारो आशा वर्कर्स आणि होम गार्ड्सचं ट्रेनिंग सुरू करणं, प्रत्येक जिल्ह्यात कोव्हिड-19 स्पेशल हॉस्पिटल्स तयार करणं, आयसोलेशनसाठी म्हाडाच्या हजारो खोल्या मिळवणं, रेल्वेच्या डब्यांचं आयसोलेशन कंपार्टमेंट्समध्ये रूपांतर करणं, हजारोंनी व्हेंटिलेटर्सची ऑर्डर देणं... या सगळ्या गोष्टींचा अर्थ एकच आहे की येणाऱ्या दिवसांत कोविड पेशंट्सची संख्या वाढू शकते आणि सरकार त्यासाठी युद्धपातळीवर तयारी करतंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)