भारतीय वंशाच्या मतिमंद तरुणाला फाशी, काय आहे वाद?

नागेंद्रन धर्मलिंगम

फोटो स्रोत, Sarmila Dharmalingam

फोटो कॅप्शन, नागेंद्रन धर्मलिंगम यांना सिंगापूरच्या चांगी तुरुंगात फाशी देण्यात येणार आहे.

नागेंद्रन धर्मलिंगम यांना सिंगापूरच्या चांगी तुरुंगामध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली. त्यांच्या बहिणीने याबाबत बीबीसीला माहिती दिली आहे.

2009साली 21 वर्षांच्या नागेंद्रनना मलेशियाहून सिंगापूरमध्ये हेरॉईनची तस्करी करताना पकडण्यात आलं होतं. गेले एक दशक ते कोठडीत होते. अखेर त्यांना फाशी देण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

नागेंद्रन यांना फाशी देण्यापूर्वी त्यांची बहीण शर्मिला बीबीसीशी बोलताना काय म्हणाल्या होत्या-

"मी एकटी असते तेव्हा भावाबद्दल विचार करून वेदना होतात. पण आम्ही धीर कायम ठेवत प्रार्थना करत रहायला हवं - काहीही होऊ शकतं," बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगिलं.

नागेंद्रनना 2021मध्ये नोव्हेंबरमहिन्यात फाशी देण्यात येणार होती, पण शेवटच्या क्षणी हा निर्णय थांबवण्यात आला. नागेंद्र यांना कोव्हिड 19 झाल्याचं आढळल्याने फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आली.

मलेशियन नागरिक असणाऱ्या नागेंद्रन यांचा IQ-69 इतकाच असून ते मतिमंद असल्याचं वैद्यकीय चाचण्यांमधून निष्पन्न झालं होतं. यानंतरही त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

"आपण काय करतोय याची त्यांना पूर्णपणे जाणीव होती आणि आपण करत असलेली गोष्ट चूक वा बरोबर याचीही त्यांना जाण होती," असं सिंगापूर सरकारने म्हटलं होतं.

ड्रग्ज आणि अंमली पदार्थांबद्दल सिंगापूरमधले कायदे जगातल्या सर्वात कठोर कायद्यांपैकी एक आहेत आणि या गुन्ह्यांसाठी मृत्यूदंडाची शिक्षाही दिली जाते. एरवी अशा मृत्युदंडांबद्दल फारसे वाद निर्माण होत नाहीत, पण या प्रकरणामुळे मात्र सिंगापूरमध्ये वाद सुरू झाला होता..

वाढता संताप

आंततराष्ट्रीय मानवी हक्क कायद्यांनुसार मानसिकदृष्ट्या अक्षम व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा देण्यास मनाई असल्याने नागेंद्रन यांची मृत्युदंडाची शिक्षा माफ करण्यात यावी अशी मागणी सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांकडे करणाऱ्या याचिकेवर आतापर्यंत 60 हजारांपेक्षा जास्त जणांनी सह्या केल्या आहेत.

"मानसिकदृष्ट्या विकलांग असणाऱ्या एका माणसाने एक अहिंसक गुन्हा केला आणि त्यासाठी त्याला शिक्षा मिळणं हे वेदनादायी आहे. त्याला किंवा त्याच्या कुटुंबीयांना अशा दुःखात ढकलणं योग्य नाही. त्याला वाचवायला हवं," या याचिकेवर सही करणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं.

सोशल मीडियावरूनही या मोहिमेला पाठबळ मिळतंय.

मलेशियात झालेलं आंदोलन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मलेशियामध्येही नागेंद्रनची शिक्षा माफ करण्याच्या मागणीसाठी आंदोलनं झाली.

आता 33 वर्षांच्या असणाऱ्या नागेंद्रनना परिस्थिती किती कठीण आहे याची कल्पना आहे वा नाही हे माहित नसल्याचं शर्मिला म्हणतात.

"कधीकधी तो मला फोन करून सांगतो की त्याला फाशी देण्यात येणार आहे आणि त्याला तयार व्हायचं आहे. तर कधी म्हणतो की त्याला घरी परत येऊन घरचं अन्न जेवायचं आहे. काय होणार आहे हे त्याला माहिती आहे की नाही, हे मला माहित नाही."

नागेंद्रनना फाशी देण्यात आली तर 2019नंतरची सिंगापूरमधली ही पहिली फाशीची शिक्षा असेल,

मानसिक विकलांगतेवरून वाद

2009मध्ये मलेशियाहून सिंगापूरला येताना नागेंद्रनना पकडण्यात आलं. त्यांच्या डाव्या मांडीवर 43 ग्रॅम हेरॉईन बांधलेलं होतं.

सिंगापूरच्या कायद्यानुसार 15 ग्रॅमपेक्षा जास्त हेरॉईन बाळगताना पकडण्यात आलेल्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

आपल्यावर ड्रग्ज नेण्याची बळजबरी करण्यात आल्याचं नागेंद्रननी सुनावणीदरम्यान सुरुवातीला सांगितलं. पण नंतर पैशाची गरज असल्याने आपण हा गुन्हा केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी सुरुवातीला घेतलेला बचावात्मक पवित्रा ठरवून घेतला होता, असं कोर्टाने म्हटलं. त्यानंतर त्यांना फाशीद्वारे मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

कुटुंबियांसोबत नागेंद्रन (डावीकडून दुसरे)

फोटो स्रोत, Sarmila Dharmalingam

फोटो कॅप्शन, कुटुंबीयांसोबत नागेंद्रन (डावीकडून दुसरे)

आपण मानसिकदृष्ट्या सक्षम नसून आपल्या मृत्युदंडाचं रूपांतर जन्मठेपेत करण्यात यावं अशी याचिका त्यांनी 2015मध्ये केली.

नागेंद्रन यांना सौम्य स्वरूपाचं मानसिक अपंगत्त्व असून ते हायपर अॅक्टिव्ह असून एका ठिकाणी लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, त्यांना दारूचंही व्यसन असल्याने या सगळ्याचा परिणाम त्यांच्या निर्णयक्षमतेवर झाला असण्याची शक्यता असल्याचं 2017मध्ये डॉ. केन उंग या मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटलं होतं. पण नंतरच्या उलटतपासणीत मात्र डॉ. उंग यांनी आपलं मत बदललं.

नागेंद्रन मानसिकदृष्ट्या अपंग नसल्याचं इतर 3 मानसोपचारतज्ज्ञांनी कोर्टाला सांगितलं. तर बुद्धीमत्ता कमी असल्याने कदाचित ते हा गुन्हा करण्यासाठी तयार झाल्याची शक्यता असल्याचं एका मानसोपचारतज्ज्ञाने सांगितलं.

नागेंद्रन बौद्धिकदृष्ट्या अपंग नसल्याचं कोर्टाने जाहीर केलं. राष्ट्राध्यक्षांकडून माफी मिळण्यासाठीची याचिकाही गेल्यावर्षी फेटाळण्यात आली.

"ही व्यक्ती गुन्हेगारी मानसिकता असणाऱ्या व्यक्तीप्रमाणे काम करत होती, त्याने यातले धोके विचारात घेतले होते," असं सिंगापूरच्या गृहखात्याने एका निवेदनाद्वारे म्हटलं होतं.

अॅम्नेस्टी इंटरनॅशन आणि ह्युमन राईट्स वॉचसारख्या मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांनी या निर्णयाचा निषेध केलाय.

"एखाद्या व्यक्तीचा जीव घेणं हेच मुळात क्रूर आहे आणि फक्त ड्रग्ज जवळ सापडल्याचा गुन्हा केलेल्या व्यक्तीला फाशीची शिक्षा देण्यात येतेय, जिथे काय होणार आहे हेच त्याला पूर्णपणे समजलं नसल्याची शक्यता आहे," अॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या सिंगापूरमधल्या संशोधक रेचल छो-होवार्ड म्हणाल्या.

'मी तिच्याकडे पाहू शकले नाही'

नागेंद्रन मलेशियाचे नागरिक आहेत. तिथेही ही फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी यासाठी आंदोलनं करण्यात येत आहेत.

मलेशियाचे पंतप्रधान इस्माईल साबरी याकुब यांनीही सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना स्वतः याबद्दल विनंती केली आहे.

गेली 10 वर्षं शिक्षा भोगल्यानंतर नागेंद्रन यांना 10 नोव्हेंबरला फाशी देण्यात येणार असल्याचं सांगणारं सिंगापूर तुरुंगाकडून पाठवण्यात आलेलं पत्र शर्मिला यांना मिळालं.

"मी ते स्वीकारताच येत नव्हतं....मी रडत होते. तो आख्खा दिवस मी रडले. माझ्या आईला आजार असल्याने तिला हे सांगायला मला भीती वाटत होती. मी तिच्याकडे पाहूही शकले नाही."

प्रवास, हॉटेल क्वारंटाईन आणि कोव्हिड टेस्ट या सगळ्या गोष्टी पार पाडून सिंगापूरमध्ये येण्यासाठी कुटुंबाला 2 आठवड्याचा कालावधी देण्यात आला होता.

"या कुटुंबाला आरोग्यविषयक प्रक्रिया पार पाडाव्या लागल्या, ट्रॅव्हल विमा घ्यावा लागला, त्यांच्या राहण्याची सोय करावी लागली आणि या सगळ्याचा खर्च त्यांचा करायचा आहे. एका मलेशियन कुटुंबासाठी हा मोठा खर्च आहे. यानंतर पुढेही त्यांना अंत्यविधीसारखे खर्च करावेच लागतील," या कुटुंबासाठी पैसे उभारण्याची मोहीम सुरू करणाऱ्या कार्यकर्त्या कर्स्टन हान यांनी बीबीसीला सांगितलं.

या मोहीमेद्वारे 17 हजार डॉलर्सचा निधी उभारण्यात आला. आपल्या कुटुंबाला या निधीशिवाय सिंगापूरला जाता आलं नसतं असं शर्मिलांनी म्हटलंय.

गेल्या आठवड्यात हे कुटुंब सिंगापूरमध्ये दाखल झालं. पण शर्मिला सिंगापूरला आलेल्या नाहीत. कोणतरी घरी थांबून इतर गोष्टी सांभाळणं गरजेचं असल्याचं त्या सांगतात.

फाशीच्या आधी भावाला भेटणं शक्य नसल्याने आता त्या दररोज त्याच्यासाठी प्रार्थन करतायत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)