खलिफा हारून रशीदचा काळ 'खिलाफतचा सुवर्णकाळ' का म्हटला जातो?

खिलाफत

फोटो स्रोत, Getty Images

बीबीसी रेडिओ थ्रीची विशेष मालिका 'इस्लामचा सुवर्ण काळ' च्या भागात प्राध्यापिका ज्युलिया ब्रे यांनी खलिफा (मुस्लीम प्रमुख किंवा जनतेनं निवडलेला शासक) हारून रशीदच्या व्यक्तिमत्वाबद्दल माहिती दिली आहे. त्याकाळी बगदाद नेमकं कसं होतं, हे त्याद्वारे समजावण्याचा प्रयत्न केला आहे.

हारून रशीद यांना चांगले आणि कलाप्रेमी शासक म्हणून ओळखलं जातं. मात्र, भविष्याबाबत त्यांनी केलेलं चुकीचं नियोजन हेच अराजकता आणि रक्तपातासाठी कारणीभूत ठरलं याचे पुरेसे पुरावे आहेत.

पण ते नेमकं कशामुळं घडलं? हे प्राध्यापिका ब्रे यांनी लिहिलेल्या या लेखातून समोर येईल. बीबीसी रेडिओ थ्रीच्या या भागात इसवीसन 750 ते 1258 पर्यंतचा काळ मांडण्यात आला आहे. त्या काळातील महत्त्वाच्या घटना, व्यक्तिमत्वं याशिवाय वास्तुकला, वैद्यकीय उपचार, नवे शोध अशा महत्त्वाच्या विषयांचा त्यात उल्लेख आहे.

हारून रशीद हे सर्वांना माहिती असलेले खलिफा आहेत. 'अलिफ लैला' या प्रसिद्ध कथेतील खलिफा किंवा टेनीसन या लेखकानं मांडलेले चांगल्या मनाचे हारून रशीद. पण आपल्याला त्यांच्याबाबत नेमकं काय माहिती आहे? माझ्या मते, त्यांचा काळ खिलाफतचा (खलिफाला मानणारी विचारसरणी) सुवर्णकाळ होता.

हारून रशीद यांचं साम्राज्य मध्य आशियापासून लीबियापर्यंत पसरलेलं होतं. "एक उत्तम काळ, उत्तम ठिकाण, कारण हा हारून रशीद यांच्या यश मिळवण्याचा कालखंड होता," असं टेनिसन यांनी या युगाबाबत लिहिलं आहे.

पण तो काळ खरंच किती चांगला होता? हा सुवर्ण काळ असल्याचा विचार खूप नंतर समोर आला. त्यामुळं कदाचित हीच खिलाफतच्या सर्वाधिक गुंतागुंतीच्या 600 वर्षांच्या इतिहासावर लक्ष केंद्रीत करण्याची योग्य पद्धत आहे. या 600 वर्षांमध्ये इसवीसन 786 ते 809 पर्यंत हारून रशीद यांच्या खिलाफतचा काळ 20 वर्षांपेक्षा थोडा जास्त आहे.

मात्र हारून रशीद नंतरही कला, विज्ञान आणि सहित्याच्या क्षेत्रात खूप चांगलं काम व्हायचं होतं, असं माझ्यासारख्या अनेकांचं मत आहे.

आमच्या मते, हारून रशीद आणि बगदाद ही नाव परस्परांशी जोडलेली आहेत. त्यांचं बगदाद हे अत्यंत चांगलं असावं. अगदी ज्या पद्धतीनं ते अलिफ लैलामध्ये वर्णन किंवा सादर करण्यात आलं आहे तसं. पण प्रत्यक्षात ते कसं होतं? याबाबत आम्ही काही सांगू शकत नाही, कारण हारून रशीद यांच्या काळातील बगदादचं आता काहीही शिल्लक नाही.

खिलाफत

फोटो स्रोत, BIBLIOTHÈQUE NATIONALE DE FRANCE

पण खिलाफतच्या अखेरच्या दहा वर्षांत त्यांचं आवडतं शहर शाम (आताचं सीरिया) मधील रक्का हे होतं. ते बगदादच्या उत्तरेला हारून रशीद यांचं साम्राज्य आणि बायजंटाईन साम्राज्याच्या वायव्य सीमेजवळ होतं.

पुरातत्व विभागानं आता रक्कामध्ये पूर्वी असलेल्या कारखान्यांचाही शोध लावला आहे. आठव्या शतकात कारखाने असणं हा विचारच प्रचंड रोमांचक आहे. पण त्याला प्रोत्साहन देण्यात हारून रशीदचा नेमका किती वाटा होता, याबाबत निश्चित माहिती नाही.

हारून रशीद यांच्याबाबत कथांमधून जी माहिती समोर आली आहे, ती यापेक्षा वेगळी आहे, हे खरं आहे. आपल्याला ती माहिती मध्य पूर्वच्या ऐतिहासिक पुस्तकांतून मिळते. कदाचित आधुनिक पुरातत्व शोधातून आणखी काहीतरी नवंही समोर येईल.

तुम्ही इतिहासाचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर, हारून रशीद त्यांच्या अधिकांश जीवनकाळात कमकुवत व्यक्ती असल्याचं पाहायला मिळतं. खिलाफत त्यांच्या हातून निसटणार होतं. आई आणि पत्नी झुबेदा यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांच्या कार्यकाळात प्रशासनाची बहुतांश जबाबदारी नोकरशाही किंवा सरदारांनी पार पाडली. ते प्रशासन बारमाकिदच्या प्रभावाखाली होतं.

शासनकाळाच्या अखेरिस त्यांनी सगळा कारबार हाती घेण्याचा प्रयत्न केला. तसंच बारमाकीद कुटुंबाला (बरमॅकियन) तुरुंगात टाकलं, तसंच त्यांच्या आवडत्या जाफरचीही हत्या केली. पण त्यांना भविष्यासाठी चांगलं नियोजन करता आलं नाही.

वारसा हक्कासाठी ठरवलेला असा नियम नसल्यानं त्यांनी खिलाफत पद त्यांचा आणि पत्नी झुबेदा यांचा मुलगा अमीनला दिलं. तर अर्ध साम्राज्य अमीनचा सावत्र भाऊ, मामूनला देण्याचं वचन दिलं. तो एका दासीचा मुलगा होता.

खिलाफत

फोटो स्रोत, ANGELO HORNAK

त्यांच्या मृत्यूनंतर दोन्ही भावंडांमध्ये युद्ध सुरू झालं आणि बगदादमध्ये वास्तू अवशेषांमध्ये रुपांतरीत होऊ लागल्या.

मामूनने अमीनची हत्या केली आणि सिंहासनावर कब्जा करत भविष्यासाठी एक वेगळा पायंडा पाडून ठेवला. या घटनांचा विचार करता हारून रशीद यांचा राजकीय वारसा फार चांगला होता, असं म्हणता येणार नाही. जर त्यांचा काळ 'सुवर्ण युग' असेल, तर तो अत्यंत कमी काळ होता. कारण वयाच्या चाळीशी ते पन्नाशीदरम्यान त्यांचं निधन झालं होतं.

मात्र, 'अलिफ लैला'च्या कथेतील अमर झालेलं पात्र हारून रशीद हे वास्तविक हारून राशीद यांच्या मृत्यूच्या काही काळानंतर समोर आलं होतं. हेच हारून आपल्या आठवणींमध्ये कायम आहेत.

त्या अशा सुखद दिवसांच्या आठवणी आहेत, जे दिवस प्रत्यक्षात कधी नव्हतेच. मात्र असू शकले असते. अनेकदा भूतकाळ वाईट काळातील आशेचा किरण बनूनही समोर येतो. ते केवळ एक चांगले शासक नव्हते तर, सभ्य समाजाच्या निर्मितीसाठी एक शासक जे काही करतो, ते सर्व ते करत होते.

ते तत्वज्ञानी आणि शायर यांचं संरक्षण करतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ते एक रोमँटिक नायक आहेत. एक कोमल मनाचे आणि सौंदर्यावर प्रेम करणारे व्यक्ती आहेत. विशेषतः हुशार आणि उच्चशिक्षित तसेच संगीत आणि शायरीमध्ये हातखंडा असलेल्या दासींवर प्रेम करणारे.

खिलाफत

फोटो स्रोत, Getty Images

ते एक प्रेमळ पती आहेत आणि त्यांच्या पत्नीही त्यांच्यावर प्रेम करतात. झुबेदा, या बुद्धिमान, उदार आणि चांगल्या महिला तर होत्याच, शिवाय त्या आत्मनिर्भरही होत्या. त्यांनी चांगल्या - वाईट काळात हारून यांची साथ दिली.

सामाजिक सेवेतील मोठी-मोठी कामं त्यांनी केली. विशेषतः मक्का आणि मदिनाच्या मार्गावर अनेक प्रकल्प तयार केले. त्यांचं व्यक्तिमत्व आणि चांगलं बोलणं यासाठी कायम स्मरण ठेवण्यात आलं आहे.

हारून रशीद आजही जिवंत आहेत. केवळ कथांमध्येच नव्हे, तर आता अरबी टिव्ही वाहिन्यांवर दीर्घकाळ चालणाऱ्या नाटकांमध्येही जीवंत आहेत. यूट्यूबवर तुम्ही ते पाहू शकता.

टिव्हीवरील हारून रशीद, त्यांचं कुटुंब, दरबारातील लोक आणि जनतेला या नाटकांमध्ये त्यांच्या भावनांची परीक्षा घेण्याची संधी दिली जाते. ते जीवनातील अडचणींचा सामना करतात. त्यांच्या प्रामाणिकपणाची परीक्षा घेतली जाते. अत्यंत हिंसक अशा विश्वासघातकी वातावरणात ते जगत आहेत. पण त्यांच्या जीवनातील घटनांचा सामना करणे आणि त्याच्याशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेत ते कला आणि नैतिक सौंदर्याला जन्म देतात.

हारून रशीद आणि त्यांच्या समकालीन असणाऱ्यांचे टिव्हीवर दाखवले जाणारे चित्र आजच्या अरबांना आरसा दाखवण्यासारखे आहे. मध्य पूर्वमधील कथा आणि टिव्हीवरील हारून यांच्याबाबत काही गोष्टी समानही आहेत. अगदी शेक्सपिअरच्या नाटकांतील पात्रांप्रमाणे. आपला परिचय असलेल्या जीवनातील नाटकं, शक्यता आणि विचारांचे ते केंद्र आहेत. आपल्या सर्वांनाच ते माहिती आहे.

आपण इतिहासातीर हारून रशीद पासून कथांमधील हारून रशीद पर्यंत कसे पोहोचलो. ते एक व्यक्ती आहेत का? इतिहासाच्या मते हारून रशीद 'मीम्स बॉय' होते.

त्यांची आई खिजरान गुलाम दासी होत्या. अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व असलेले त्यांचे वडील खलिफा अल-महदी यांनी त्यांना परंपरांचा विचार न करता स्वतंत्र करून त्यांच्याशी विवाह केला होता.

खिलाफत

फोटो स्रोत, YAHYÁ AL-WASITI

पण अशाप्रकारे रोमँटिक सुरुवात झाल्यानंतर वाईट काळ सुरू झाला. अल-महदी यांचं कमी वयात निधन झालं. खिजरानपासून त्यांना दोन मुलं होती. ते एकापाठोपाठ एक खलिफा बनणार होते.

त्या दोघांचं वय नेमकं तेव्हा काय होतं, हे माहिती नाही. मात्र ते 20 च्या आसपास असावं. त्यांची नावं पैगंबरांच्या (हजरत मुसा आणि हजरत हारून) नावांवर ठेवण्यात आली होती. पण त्या दोघांमध्ये एकमेकांप्रती द्वेषाची भावना होती.

मुसाचा एक लहान मुलगा होता. त्याच्या नंतर गादी किंवा खिलाफत त्याला मिळावी अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळं त्यांनी हारूनबरोबर राजकुमारासारखं वर्तन करण्याऐवजी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.

हारून यांच्या जीवाला धोका होता. त्यामुळं खिजरान पुढं आल्या आणि सर्व परिस्थिती सांभाळली. त्या खलिफा अल-महदी यांच्या कार्यकाळातही शक्तिशाली होत्या. पण मुसाने त्यांचाही अपमान केला. मुसानं त्यांना महिलांची प्रकरणं सोडवायला आणि राज्यांतील इतर गोष्टींपासून लांब राहण्यास सांगितलं.

हा वैयक्तिक लढा नव्हता, तर महदी हयात असतानाच निर्माण झालेली ही लढाई होती. खिजरान आणि बारमाकिद कुटुंबानं मुसाला गादीवरून उतरवून हारूनला खलिफा बनवण्यासाठी कारस्थान सुरू केलं.

लवकरच मुसाचं निधन झालं. काही संदर्भांनुसार खिजरान यांनी त्यांना विष दिल्याचेही आरोप आहेत. तर एका दासीच्या माध्यमतून उशीने तोंड दाबत त्यांची हत्या केल्याचंही, काहींनी म्हटलं आहे. मात्र, याच्या तुलनेत अत्यंत साधं कारण सांगायचं झाल्यास, पोटाच्या अल्सरमुळं मुसा यांचं निधन झालं होतं.

मुसा यांच्या मृत्यूमुळं हारून ऐवजी बारमाकीद वंशाच्या काळाची सुरुवात झाली. बारमाकीद उच्चभ्रू होते आणि त्यांचे पूर्वज इराणचे होते. भूतकाळात हे कुटुंब मध्य आशियात बौद्ध वर्गाच्या एका मोठ्या तीर्थस्थळातील अनेक पिढ्यांचे संरक्षक होते. पण तेही आता स्थानिकांच्या रंगात रंगले होते. तर अरबी भाषा बोलणारे मुस्लीम होते. खिलाफतनं सत्तेच्या साच्यात स्थान निर्माण केलं होतं आणि त्यांना ते स्थान टिकवायचं होतं.

आपल्या मालकाच्या अडचणी आपल्या अंगावर कशा घ्यायच्या हे त्यांना चांगलंच माहिती होतं. त्याशिवाय ते अत्यंत श्रीमंत आणि उदार होते. त्यामुळं त्यांच्यासाठी प्रामाणिकपणा खरेदी करणंदेखील कठिण बाब नव्हती.

बारमाकिद कुटुंबातील एका महिलेनं हारून यांना स्तनपानही केलं होतं. त्यामुळं बारमाकिद कुटुंबाबरोबर त्यांचं नातंही होतं. शिवाय त्याकाळी दुधाचं नातं, रक्ताच्या नात्याप्रमाणे पक्कं मानलं जात होतं.

खिलाफत

फोटो स्रोत, Getty Images

त्याशिवाय बारमाकिद कुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य हारून यांचे शिक्षक आणि संरक्षकही होते. हारून त्यांना वडील म्हणायचे. याहया त्यांचे मंत्री बनले आणि याहया यांच्या दोन मुलांनी इतर जबाबदाऱ्या वाटून घेतल्या.

हारून यांचा दूध भाऊ (वेगवेगळ्या पित्याचे मात्र एकाच महिलेचं दूध पिणारे) फझल विश्वासार्ह आणि योग्यदेखील होता. तर जाफर बुद्धिमान आणि आकर्षक व्यक्तिमत्व असलेला व्यक्ती होता. तो हारूनचा सर्वाच जवळचा मित्र बनला होता.

या घट्ट अशा कौटुंबीक आणि भावनिक संबंधांचा विचार करता, हारून रशीद यांच्या काळातील कथा एका कौटुंबीक नाटकाच्या रुपात लिहिण्यात आली आहे. या कथेतील प्रत्येक घटना अशा पद्धतीने वर्णन करण्यात आली आहे की, त्याच ठोस पुरावा शोधणं अत्यंत कठीण आहे.

पण या सर्व कथा कौटुंबीक नात्यांच्या कथांच्या शैलीत सादर करण्यात आल्या आहेत. त्या व्यक्तिमत्व, भावना, ईर्ष्या, भय आणि प्रेमाचं रुपांतर द्वेषात होण्यावर आधारित आहेत.

मुसाच्या मृत्यूबाबतची भयानक कथा हे त्याचंच उदाहरण आहे. आणखी एक उदाहरण म्हणजे हारून हे फझल आणि याहयांच्या विरोधात का गेले? आणि त्यांनी जाफरची हत्या का केली.

मानसशास्त्रीय दृष्टीनं विचार करता, याचं योग्य कारण म्हणजे बारमाकिद कुटुंबावर अवलंबून असल्यामुळं मनासारखं काही करता येत नाही, असं हारून यांना वाटू लागलं होतं. त्यांना त्याचा त्रास होऊन ते स्वतःच्याच मनाला खाऊ लागले होते. तर दुसरं म्हणजे त्यांना बारमाकिद कुटुंबाची आणि विशेषतः जाफरची प्रतिष्ठा खटकू लागली होती.

यासंदर्भात एक कथाही सांगतली जाते. हारूनने बारमाकिद कुटुंबावर वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि जाफरला आपल्या बाजुने करण्यासाठी आधी त्यांनी गुपचूप बहीण अब्बासाबरोबर त्याचा निकाह करून दिला आणि नंतर त्या दोघांना एकत्र (जवळ) येण्यास मनाई केली.

खिलाफत

फोटो स्रोत, Getty Images

त्या दोघांनी हा आदेश धुडकावून लावला आणि हारूननं अधिकारांचा वापर करत जाफरला मारलं. इतिहासकार ही कथा खोटी असल्याचं सांगत आहेत. मात्र त्यांनाही बारमाकिद कुटुंबाच्या पतनासाठी राजकीयदृष्ट्या योग्य स्पष्टीकरण देता आलेलं नाही.

इतिहासाचा विचार करता त्यांचा मुलगा अमीनच्या बाबत एक खरी माहिती आहे.

ज्याप्रमाणे मुसाने हारूनला दिलेलं वचन तोडून मुलाला वारसदार बनवण्याची घोषणा केली होती. त्याचप्रमाणे अमीनने त्यांच्या मुलाऐवजी, भाऊ मामूनला खिलाफत देण्याचं आश्वासन सार्वजनिकरित्या तोडलं होतं.

बारमाकिद कुटुंबाबरोबर दीर्घकाळ सत्ता सांभाळण्यादरम्यान खलिफा हारून रशीदसमोरचं महत्त्वाचं राजकीय काम त्यांच्या मुलांना सत्ता सोपवणं हे होतं. पण ते पूर्णपणे फसलं.

हे मानवी प्रकृतीच्या किंवा या कथेतील पात्रांच्या प्रकृतीच्या विरोधी होतं. हा अध्याय पुन्हा एकदा एका कथेच्या माध्यमातून स्पष्टपणे मांडण्यात आला आहे. त्यात नैतिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तीकडे सत्ता सोपवल्यास त्याचा परिणाम काय होतो? हा सवाल उपस्थित होतो.

झुबेदा ज्या रात्री गर्भवती राहिल्या (अमीनच्या जन्माच्या वेळी) त्या रात्री त्यांना एक स्वप्न पडलं होतं. त्यात तीन महिला आल्या आणि त्यांच्या जवळ बसल्या. त्यांच्या पोटावर हात ठेवून त्यांनी त्यांचा मुलगा कसा असेल, हे त्यांना सांगितलं होतं. त्या महिलांनी हा मुलगा बिनकामाचा, विश्वासघातकी आणि मूर्ख असेल असं सांगितल्याचं म्हटलं जातं.

खिलाफत

फोटो स्रोत, HERITAGE IMAGES

अमीनचा जन्म झाला त्या रात्री त्या तीन महिला पुन्हा झुबेदा यांच्या स्वप्नात आल्या आणि त्यांनी पुन्हा तेच म्हटलं. ज्या रात्री त्यांनी अमीनला दूध पाजनं बंद केलं, तेव्हा त्या महिला शेवटच्या वेळी त्यांच्या स्वप्नात आल्या. त्यांचे दोषच पतन आणि मृत्यूला कारणीभूत ठरतील असं त्या म्हणाल्या.

ज्योतिषांनी ग्रहांची स्थिती उत्तम असल्याचं सांगून आणि अमीन यांच्या उत्तम प्रशिक्षणानंतरही या भविष्यवाणी खऱ्या ठरल्या. मानवाचं चारित्र्य हेच त्याचं नशीब असतं, असा या कथेचा निष्कर्ष सांगितला जातो. मात्र, याचा एक अर्थ असाही काढला जातो की, एखाद्याच्या भाग्याबाबत माहिती असल्यास, त्यामुळं त्याचं चारित्र्य सुधारू किंवा बिघडूदेखील शकतं.

अमीनकडून सर्वप्रथम वयाच्या पाचव्या वर्षी भावाला सत्ता देईल असं वचन घेण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा 15 वर्षांचा असताना आणि 20 वर्षांचा असतानाही हे वचन घेण्यात आलं. त्यानंतर काही काळातच त्याला सत्ता मिळाली होती. त्यामुळं हे वचन तोडण्याचं कारस्थान रचण्यासाठी त्याला बराच वेळ मिळाला होता.

सत्य बाब म्हणजे, त्या काळात सत्ता शपथेची बांधील नव्हती. कायद्याचा हस्तक्षेप तर त्याहीपेक्षा कमी होता. प्रत्येक खलिफा स्वतः शक्ती मिळवायचा आणि त्यानुसार वर्तन करायचा. मग हारूनने स्वतः बारमाकिदच्या उपस्थितीत सत्ता आणि नंतरच्या शक्तींचा सामना का केला? त्यांना किती शक्ती जमवावी लागणार होती.

त्यांनी शांत राहत बारमाकिद कुटुंबाला राज्य कारभारात लक्ष घालू दिलं. म्हणजे त्यांनी वडिलांकडून वारसा हक्काने मिळालेल्या शक्तीशाली प्रशासनाला त्यांचं काम करू दिलं.

पण काही नवीन गोष्टींचाही त्यांनी समावेश केला. खिलाफतला स्वतःला धार्मिक पद म्हणूनही पुढं यायचं आहे, हा विचार त्यांनी पुढं आणला. तो विचार रुजवण्यासाठी त्यांनी काम केलं.

खिलाफत

फोटो स्रोत, UNIVERSAL HISTORY ARCHIVE

त्यांनी सातत्यानं ख्रिश्चन बायजंटाईन साम्राज्याच्या विरोधात युद्ध पुकारलं आणि अनेकदा त्याचं नेतृत्वही केलं. अनेकवेळा हज यात्रा केल्या आणि तीर्थस्थळी दान धर्म केले. झुबेदाही तसंच करत होत्या. त्यांनी मक्का आणि मदीनामध्ये पाणी योजना आणि या दोन्ही शहरांच्या मार्गात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाईल यासाठी मोठी रक्कम खर्च केली.

झुबेदा यांनी सुरू केलेल्या पद्धतीमुळं नंतर मुस्लीम राज्यांमध्ये दान पद्धतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी मोठ्या संस्था स्थापन करायला सुरुवात झाली. सत्ता असलेल्या कुटुंबाशी संबंधित महिला म्हणून झुबेदा चांगली कामं करण्यात आघाडीवर होत्या. त्यांच्या या राजकीय भूमिकेचं त्यानंतरच्या काळातही महिलांनी अनुकरण सुरू ठेवलं.

राज्याच्या दृष्टीनं यात हारून यांचाही प्रतिकात्मक वाटा मोठ्या प्रमाणावर होता. हारून आणि झुबेदा यांनी निर्माण केलेला आदर्श त्यानंतर अनेक शतकं मुस्लीम शासकांसाठी मार्गदर्शक ठरला. म्हणजेच कोणत्याही राज्याचं स्थान हे कामावरून ठरत असतं.

याचा अर्थ म्हणजे केवळ कल्याणकारी कामं आणि युद्ध एवढंच नव्हता. तर न्याय मिळणं ही राज्याची जबाबदारी समजून त्याचं प्रतिकात्मक संरक्षण करण्यात आलं. त्यासाठीच न्यायाधीश पद निर्माण करण्यात आलं.

हारून त्यांच्या जीवनात शासक म्हणून न्याय, कुटुंब आणि राजकारण सर्वाला महत्त्व देत होते. त्यामुळं त्यांचं खासगी आणि सार्वजनिक जीवन हे वेगळं ठेवणं कठिण आहे. पित्याप्रमाणे त्यांनाही संगीत आणि शायरीची आवड होती. त्यांची एक सावत्र बहीण आणि सावत्र भाऊ दोघंही व्यावसायिक संगीतकार आणि शायर होते. त्यांच्या रचना आजही सादर केल्या जातात.

हारून हे कलेचं शाही संरक्षक होते. ही परंपरा कायम ठेवत त्यांनी सार्वजनिक पातळीवर याला मान्यता दिली होती. अनेक शतकं ही परंपरा कायम होती.

त्यामुळं शेवटी याचं विश्लेषण करताना असं वाटतं की, लोकांच्या आठवणींमध्ये हारून यांना जे स्थान दिलं गेलं आहे, तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी सभ्यपणाची विचारसरणी कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.

राज्य मोठी मोठी कामं करून लोकांना कशा प्रकारे सोबत घेऊ शकतात हे, हारून आणि झुबेदा यांनी नंतर येणाऱ्या शासकांना दाखवून दिलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हारून, झुबेदा, त्यांची मुलं आणि बारमाकिद कुटुंबांच्या कथांनी लोकांना अनेक शतकं विचार करण्यासाठी साहित्य पुरवलं आहे. इंटरनेट आणि टिव्हीच्या माध्यमातून आजही ते सुरुच आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)