गुरूग्राम: हिंदू संघटनांच्या विरोधानंतर प्रशासनाकडून आठ जागी नमाज पढण्याची मान्यता रद्द

फोटो स्रोत, Getty Images
गुरुग्राममध्ये दर शुक्रवारी 37 ठिकाणी खुल्या मैदानात नमाज अदा केली जाते. त्यासाठी जागाही चिन्हांकित केल्या आहेत.
त्यातल्या 8 जागांची मान्यता प्रशासनाने रद्द केली आहे. या जागांवर नमाज अदा करण्यासाठी दिलेली परवानगी प्रशासनाने मागे घेतली आहे.
दर शुक्रवारी खुल्या मैदानात नमाज अदा करण्यावरून वाद झाल्यानंतर 2018 साली गुरूग्राम प्रशासनाने 37 जागा या नमाजासाठी नेमून दिल्या होत्या. पण गेल्या एका महिन्यापासून गुरुग्राममधल्या अनेक रहिवासी भागांमधले स्थानिक निवासी आणि हिंदू संघटना नमाज पढण्याचा विरोध करत होते.
मंगळवारी गुरुग्राम पोलीस आणि प्रशासनाने एक पत्रक काढत म्हटलं की या 8 जागा चिन्हांकित केलेल्या जागांच्या यादीतून काढून टाकल्या आहेत. याचं कारण देताना 'स्थानिक रहिवासी आणि रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशनची हरकत' असं म्हटलं आहे.
या पत्रकात असंही म्हटलंय की जर दुसऱ्या ठिकाणच्या लोकांनीही अशाप्रकारे 'हरकत' घेतली तर त्या जागांची परवानगीही मागे घेण्यात येईल.

फोटो स्रोत, Getty Images
ज्या आठ जागांची परवानगी मागे घेतली आहे त्यात जकारंगा मार्गावर डीएलएफ स्क्वेयर टॉवर जवळ, सुरज नगर फेज - 1, डीएलएफ फेज - 3 चा व्ही ब्लॉक, सेक्टर 49 ची बंगाली वस्ती या भागांचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त गुरुग्रामच्या बाहेरचे भाग जसं की, खेडकी माजरा, दौलताबाद गांव, सेक्टर 68 मध्ये रामगढ गावाजवळ, रामपूर गाव, नरखोला रोड या भागांचा समावेश आहे.
समितीची स्थापना
इंग्लिश वर्तमानपत्र 'द इंडियन एक्स्प्रेस' नुसार गुरुग्रामचे डेप्युटी कमिशनर यश गर्ग यांनी एक कमिटी स्थापन केली आहे ज्यात एसडीएम, एसीपी अशा पदांवरचे अधिकारी, हिंदू आणि मुस्लीम समुदायातले लोक आणि सामाजिक संघटनांच्या लोकांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ही कमिटी अशा जागांची यादी बनवेल जिथे मोकळ्या जागेत नमाज पढता येईल.
यश गर्ग म्हणाले, "गेल्या दोन दिवसात मी दोन्ही समुदायांच्या प्रतिनिधींना भेटलो आहे. एक समितीही स्थापन केली आहे आणि सगळ्या बाजूच्या लोकांशी बोलून आपण येत्या काही दिवसात यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न करू."
पोलिसांनी आपल्या वक्तव्यात म्हटलंय की, "नमाज रस्त्याचं क्रॉसिंग किंवा सार्वजनिक जागेवर पढली जाणार नाही याची काळजी ही समिती घेईल. नमाजासाठी ती जागा चिन्हांकित करण्याचा निर्णय तिथल्या स्थानिक रहिवाशांशी बोलून समिती घेईल.
"स्थानिक लोकांना या नमाज अदा करण्याच्या निर्णयामुळे काही अडचण यायला नको याची हे पाहणं देखील समितीचं काम असेल. तसंच स्थानिक रहिवाशांना नमाज अदा करण्यामुळे त्रास होणार नाही, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहाणार नाही हे पाहणं प्रशासनाचं काम असेल. नमाज कोणत्याही मशिदीत, ईदगाह, खाजगी किंवा चिन्हांकित जागी पढली जाऊ शकते," पोलिसांनी सांगितलं.
विरोधात सतत होणारी निदर्शनं
मोकळ्या जागेत उघड्यावर नमाज अदा करण्यावरून गुरुग्रामच्या अनेक भागांमधले स्थानिक रहिवासी आणि हिंदू संघटनांचे कार्यकर्ते निदर्शनं करत आहेत.
गेल्या आठवड्यात गुडगावच्या सेक्टर 12 ए मध्ये अशाच प्रकारची निदर्शनं झाल्यानंतर 28 हून अधिक लोकांना ताब्यात घेतलं होतं. अशाच प्रकारची साप्ताहिक निदर्शनं सेक्टर 47 मध्येही होत होते.

फोटो स्रोत, Getty Images
एसपी अमन यादव यांनी म्हटलं की, "स्थानिक रहिवासी सेक्टर 47 च्या मैदानात शुक्रवारच्या नमाजच्या विरोधात सलग चार आठवडे पूजा करत विरोध करत होते. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. नमाजसाठी वैकल्पिक जागा शोधण्याचाही प्रयत्न सुरू आहे."
2018 साली हिंदू आणि मुस्लीम समुदायांमध्ये खुल्या जागेत नमाज पढण्यावरून वाद झाले होते. त्यानंतर प्रशासनाने 37 जागा नमाजसाठी ठरवून दिल्या होत्या.
आंदोलकांचं म्हणणं आहे की प्रशासनाची ही 'व्यवस्था' कायमस्वरूपी नव्हती आणि फक्त एका दिवसासाठी ही परवानगी दिली गेली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








