नवाब मलिकांच्या मुलीचं खुलं पत्र- 'ड्रग्ज पेडलरची बायको म्हणून हिणवलं' #5मोठ्याबातम्या

विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. 'पेडलरची बायको म्हणून हिणवलं, मुलांनी मित्र गमावले'- नवाब मलिकांच्या मुलीचं खुलं पत्र

नवाब मलिक यांच्या जावयाच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर वारंवार टीका केली जात आहे. मात्र, त्यांची मुलगी निलोफर यांनी एक खुलं पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाबाबत माहिती दिली आहे. कुटुंबाला आलेल्या अडचणींचा उल्लेख त्यांनी यात केला आहे.

'फ्रॉम द वाइफ ऑफ अॅन इनोसंट, द बिगनिंग' असं शीर्षक निलोफर यांनी या पत्राला दिलं आहे. निलोफर यांचे पती आणि नवाब मलिकांचे जावई समीर खान यांच्यावरील एनसीबीच्या कारवाईमुळं कुटुंबावर आलेल्या संकटाबाबत त्यांनी पत्राद्वारे सांगितलं आहे.

पती समीर खानला एनसीबी अटक केल्यानंतर कुटुंबाला दिलेली वागणूक ही 'अन्याय्य आणि बेकायदेशीर' असल्याचं निलोफर यांनी म्हटलं.

'या प्रकारानंतर आमच्या कुटुंबाला जणू वाळीत टाकलं. पेडलरची बायको, ड्रग स्मगलर अशा शब्दांचा आम्हाला सामना करावा लागला. माझ्या मुलानं मित्र गमावले,' असं निलोफर यांनी या पत्रात म्हटलं आहे.

'पुरावे नसतानाही पतीला आठ महिने तुरुंगात राहावं लागलं,' असंही निलोफर यांनी म्हटलं आहे.

टीव्ही9 मराठीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

2. सुनील पाटीलला राष्ट्रवादीनं सुरक्षित ठेवलं आहे का? आशिष शेलारांचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेस आणि नवाब मलिक यांच्यावर पलटवार करत शनिवारी (6 ऑक्टोबर) करण्यात आलेल्या आरोपांनंतर आता भाजपनं राष्ट्रवादी विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

धुळ्याच्या सुनील पाटीलचा राष्ट्रवादीशी नेमका काय संबंध आहे? तो खरंच गायब आहे की राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याला सुरक्षित ठेवलं आहे? असे प्रश्न भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

सुनील पाटील मंत्रालयातील बदल्यांचा धंदा चालवतो, असा आरोप शेलार यांनी केला आहे. सुनील पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून सीबीआयकडे याचा तपास द्यावा अशी मागणी भाजपच्या वतीनं करण्यात आली आहे.

आमच्या हाती खूप काही लागलं आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेळीच खरं काय ते सांगावं, अन्यथा सत्य समोर आल्यास कठीण होईल, अशा इशाराही शेलार यांनी दिला आहे.

महाराष्ट्र टाईम्सनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

3. उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर जिन्नांचा उल्लेख, योगींचा अखिलेश यांना टोला

उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी मोहम्मद अली जिन्ना यांचा पुन्हा एकदा उल्लेख झाला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्यावर जिन्ना आणि सरदार पटेल यांची तुलना केल्याच्या मुद्द्यावरून नाव न घेता टीका केली आहे.

सरदार पटेल आणि जिन्ना यांचं नाव एकत्र घेतलं जाऊ शकत नाही, किंवा त्यांची तुलना करता येणार नाही. त्याचं कारण म्हणजे एकानं देश जोडण्याचं काम केलं आहे, तर दुसऱ्यानं तोडण्याचं, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

"देश जोडणाऱ्या सरदार पटेलांची तुलना देश तोडणाऱ्याशी जिन्नांशी करत आहेत. जनतेनं अशी लज्जास्पद वक्तव्य पूर्णपणे फेटाळून लावावीत," असं योगी म्हणाले.

योगींच्या या वक्तव्यावर अखिलेश यांनीही त्यांना पुस्तकं वाचण्याचा सल्ला दिला, तर त्याला पुन्हा प्रत्युत्तर देताना योगी यांनी प्राथमिक शिक्षण चांगलं नसल्यानं लोकांना नायक आणि देशद्रोही यांच्यातील फरक कळत नाही, असं म्हटलं.

आज तकनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

4. जागतिक नेत्यांमध्ये पुन्हा मोदीच लोकप्रिय

जागतिक नेत्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच लोकप्रियता सर्वाधिक असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. अप्रुव्हल रेटिंग एजन्सीच्या एका सर्वेक्षणातून हे स्पष्ट झालं आहे.

या सर्वेक्षणाद्वारे तयार करण्यात आलेल्या लोकप्रिय जागितक नेत्यांच्या यादीत मोदींनी अनेक बड्या जागतिक नेत्यांना मागे टाकत पहिलं स्थान मिळवलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह सर्वच नेत्यांना मागं टाकत मोदींनी हे स्थान मिळवलं आहे.

या सर्वेक्षणात मोदींना सर्वाधिक 70 टक्के रेटिंग मिळालं आहे. दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष लोपेज ओब्राडोर आहेत. त्यांना 66 टक्के रेटिंग मिळालं आहे. जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल पाचव्या तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन या यादीत सहाव्या क्रमांकावर आहेत.

लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

5. अरुणाचलमधील चीनच्या सीमेवर असणाऱ्या गावावर तयार करणार माहितीपट

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने अरुणाचल प्रदेश 1962 च्या भारत चीन युद्धात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या काहो या सीमेवरील गाव आणि तेथील शूर वीर नागरिकांच्या योगदानाबाबत देशाला माहिती देणार आहे.

राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागानं अंजाव जिल्ह्यात असलेल्या या गावावर आणि गावातील नागरिकांवर माहितीपट तयार करण्यासाठी पथक पाठवलं आहे.

लोहित नदीनं विभागलेल्या काहो गावानं 1962 मध्ये चीननं केलेल्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या गावातील नागरिकांनी भारतीय लष्कराला मदत केली होती.

चीनच्या सीमेपासून काहो हे पहिलं गाव आहे. हे गाव आणि गावाचं महत्त्वं फार कमी लोकांना माहिती आहे. याठिकाणच्या नागरिकांवर आधारित माहितीपट तयार करण्याचा विचार अल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

द हिंदूनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)