You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी 14 दिवसांनी वाढवली
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी आज (16 एप्रिल) आणखी 14 दिवसांनी वाढवण्यात आली आहे, अशी माहिती ANI वृत्तसंस्थेने दिली आहे.
यामुळे माजी गृहमंत्री देशमुख यांचा मुक्काम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत तुरुंगातच असणार आहे. देशमुख यांना सुमारे पाच महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सध्या ते मुंबईच्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या आर्थर रोड तुरुंगात कैदेत आहेत.
ईडीने गेल्या वर्षी 1 नोव्हेंबर रोजी लांबलचक चाललेल्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेतलं होतं.
त्यांनी प्रीव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रींग कायद्यांअंतर्गत कलम 19 अन्वये अटक करण्यात आलेली आहे. अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचाही आरोप आहे.
सुरुवातीला विशेष न्यायालयाने ईडी कोठडीची मागणी फेटाळली होती. मुंबई हायकोर्टाने विशेष न्यायालयाचा आदेश रद्द करत अनिल देशमुखांची ईडी कोठडी कायम केली होती. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांपासून अनिल देशमुख यांच्या कोठडीत अनेकवेळा वाढ करण्यात आली.
1 नोव्हेंबरला झाली होती अटक
1 नोव्हेंबरला सकाळी देशमुख अचानक ईडी कार्यालयात हजर झाले होते. त्यांची 9 तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
PMLA कायद्याच्या सेक्शन 19 अंतर्गत त्यांच्यावर अटकेची तारवाई करण्यात आली आहे. त्यांना आज ( मंगळवार) मुंबईच्या सेशन्स न्यायालयात हजर केलं गेलं.
या प्रकरणी अनिल देशमुख याचे दोन स्वीय सहाय्यक संजय पालांडे आणि कुंदन शिंदे यांना याआधीच अटक करण्यात आली आहे.
जुलैमध्ये संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांची ईडी कोठडी मागताना ईडीनं 14 दावे केले होते.
- अनिल देशमुख या कटाचे प्रमुख सूत्रधार.
- पालांडे यांनी जबाबात सांगितलंय की IPS अधिकाऱ्यांच्या बदली मागे अनिल देशमुख यांचा हात होता.
- सगळा व्यवहार रोखीने व्हायचा.
- संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे मध्यस्थ आहेत.
- पैसे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे जात होते.
- चौकशीत अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांचा थेट सहभाग असलेल्या 11 आणि अप्रत्यक्ष सहभाग असलेल्या 13 कंपन्यांची भूमिका.
- चौकशीत उघड झालंय की अनिल देशमुख यांच्या अप्रत्यक्ष मालकीच्या कंपन्यातून त्यांच्या प्रत्यक्ष मालकीच्या कंपन्यात पैशांचा व्यवहार होत होता.
- हा मनी लॅांडरिंगचा प्रकार आहे,
- सचिन वाझे यांच्या जबाबानुसार त्यांना अनिल देसमुख यांच्याकडून काही प्रकरणात थेट आदेश मिळत होते.
- वाझे जबाबात सांगतात त्यांनी अनिल देशमुख यांच्या आदेशावरून 4.70 कोटी रूपये कुंदन शिंदे यांना दिले.
- अनिल देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेत 4.18 कोटी रूपये ट्रान्सफर झालेत. पैसे देणाऱ्या दिल्लीच्या कंपन्या फक्त पेपरवर आहेत.
- हवालाच्या माध्यमातून पैसे दिल्लीहून नागपूरला आणण्यात आले.
- अनिल देशमुख यांना बार मालकांकडून 4.70 कोटी रूपये लाच म्हणून मिळाले.
- मुलगा ऋषीकेष देशमुख याच्या माध्यमातून दिल्लीच्या कंपन्यांना पैसे देऊन हा पैसा साई शिक्षण संस्थेत फिरवण्यात आला.
अनिल देशमुख प्रकरणाचा घटनाक्रम
21 मार्च - रोजी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं.
5 एप्रिल - अनिल देशमुख यांचा राजीनामा.
10 मे - ईडीने मनी लॅाडरिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला.
26 जून - अनिल देशमुख यांना पहिलं समन्स.
29 जून - दुसरं समन्स.
5 जुलै - तिसरं समन्स पाठवण्यात आलं.
16 जुलै - चौकशीसाठी चौथं समन्स देण्यात आलं.
17 ऑगस्ट - अनिल देशमुख यांना पाचवं समन्स.
2 सप्टेंबर- देशमुख यांनी बॅाम्बे हायकोर्टात समन्स रद्द करण्याची याचिका केली.
29 ऑक्टोबर - अनिल देशमुख यांची समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली.
1 नोव्हेंबर - अनिल देशमुख चौकशीसाठी ईडीसमोर हजर.
2 नोव्हेंबर - अनिल देशमुख यांना अटक.
मी ED समोर हजर झालो, आरोप करणारे परमबीर सिंग कुठेत - अनिल देशमुख
गेल्या काही दिवसांपासून देशमुख अज्ञातवासात होते. याआधी ईडीनं अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी छापे टाकले होते.
अनिल देशमुखांनी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझेंना महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्याचे लक्ष्य दिले होते ,असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता.
अनिल देशमुख यांनी मात्र परमबीर सिंगांचे आरोप फेटाळून लावले होते.
अनिल देशमुखांची भूमिका काय?
अनिल देशमुख यांनी याप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.
ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हीडिओत त्यांनी म्हटलंय की, "मला ईडीचं समन्स आलं, तेव्हा मी ईडीला सहकार्य करत नाही, अशापद्धतीच्या चुकीच्या बातम्या वर्तमानपत्र आणि प्रसार माध्यमांमध्ये आल्या. मला ज्या ज्या वेळी समन्स बजावण्यात आलं, त्या त्या वेळी मी सांगितलं की, माझी याचिका हायकोर्टात आहे. त्याची सुनावणी चालू आहे.
"मी सुप्रीम कोर्टातसुद्धा याचिका दाखल केलेली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वत: ईडीच्या ऑफिसमध्ये येईल."
ते पुढे म्हणाले, "माझी केस अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंगमध्ये आहे. पण, आज मी स्वत: ईडीच्या ऑफिसमध्ये हजर झालो आहे. ज्या परमबीर सिंगांनी माझ्यावर आरोप केले, तेच देश सोडून पळून गेल्याच्या बातम्या येत आहेत.
"परमबीर सिंग यांच्या आदेशानुसार, सचिन वाझेनं माझ्यावर आरोप केला. तो स्वत: आज तुरुंगात आहे. या अशा लोकांच्या आरोपांमुळे माझी चौकशी करत आहे, माझ्या कुटुंबाला त्रास दिला जात आहे, त्याचा मला त्रास होत आहे."
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "अनिल देशमुख यांना शेवटी ईडीच्या कार्यालयात यावं लागलं. ते आले तर स्वत:च्या गाडीत बसून पण आता 100 दिवस ईडीच्या कस्टडीत राहावं लागणार. दरमहिन्याचा 100 कोटींचा वसुलीचा हिशोब द्यावा लागणार.
"शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे दरमहिन्याला किती, अनिल परब यांची भूमिका काय, सगळी माहिती द्यावी लागणार."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)