Big Boss Marathi मधून आदिश वैद्य एलिमिनेट, पंधरा दिवसांतच पडला घराबाहेर

बिग बॉस मराठीच्या घरातून अभिनेता आदिश वैद्यची एक्झिट झाली आहे. वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळालेल्या आदिशला बिग बॉसच्या घरात अवघे दोन आठवडेच राहता आलं.

या आठवड्यात मीनल शाह, विकास पाटील, संतोष चौधरी उर्फ दादूस आणि आदिश वैद्य एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले होते. रविवारच्या (24 ऑक्टोबर) एपिसोडमध्ये आदिश वैद्य एलिमिनेट झाला.

पंधरा दिवसांपूर्वी या शोमध्ये आल्यानंतर आदिश वैद्यचा घरातील एक स्पर्धक जय दुधाणेसोबत वाद झाला होता.

आदिश जय दुधाणेला म्हणाला होता, "मला फालतू अॅटिट्यूड द्यायचा नाही. बॉडी वगैरे दुसऱ्यांनाना दाखवायची... मला नाही." आदिशनं असं म्हटल्यानंतरही जय त्याच्या समोर आला. त्यानंतर आदिश जयला म्हणाला की, हा पुन्हा माझ्या जवळ आला 'बिग बॉस' तर रुल्स गेले उडत.

आदिशचा केवळ जय दुधाणेसोबतच नाही, तर घरातील इतर सदस्यांसोबतही किरकोळ कारणांवरून खटके उडाले होते.

सोनाली पाटील, सुरेखा कुडचींसोबत वाद

काही दिवसांपूर्वी आदिशचा सोनाली पाटीलसोबत जेवणावरून वाद झाला होता. सोनाली पाटीलला आदिश पोळ्या लाटण्यावरून विचारत होता. मात्र दोघांचेही आवाज चढले होते.

आदिश तिला म्हणाला की, फुकट आवाज चढवू नकोस. त्यावर सोनालीनं त्याला उत्तर दिलं की, तू बोलायला लागलास तर मी उत्तर द्यायचं नाही का? मी याच आवाजात बोलणार, तू मला नको सांगूस कोणत्या आवाजात बोलायचं ते. त्यावर आदिश तिला म्हणतो, की माझ्याशी नाही असं बोलायचं.

घरात आल्यानंतरही सुरेखा कुडचींसोबत आदिशचं जोरदार भांडण झालं होतं.

कॉलेज कल्ला या टास्कमध्ये सुरेखा कुडची, सोनाली पाटील, दादूस, आदिश वैद्य हे प्रोफेसर झाले होते. सुरेखा कुडची जेव्हा क्लास घ्यायला आल्या तेव्हा त्यांची काही सदस्यांसोबत मस्करी सुरू होती.

त्यावेळी आदिश वैद्य त्यांना, "चला चला कार्य सुरू ठेवा" असं म्हणत होता. त्यावर सुरेखा कुडची त्याला म्हणाल्या, "प्रोफेसर आदिश वैद्य यांना विनंती करते की, प्लीज तोंड बंद ठेवा. तुमची या घरात आता एन्ट्री झाली आहे, आम्ही जुने आहोत.

त्यानंतर आदिश काही सदस्यांसोबत रागारागाने सुरेखा कुडचींबद्दल बोलत होता. "कालपर्यंत गेम खेळायचा नव्हता या बाईला... रडत होती, बाहेर जायचं होतं आणि ही टॉप 5 कन्टेस्टन्ट."

कोण आहे आदिश वैद्य?

आदिश वैद्य हा मराठी आणि हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतला एक प्रसिद्ध चेहरा आहे. आदिशने 'कुंकू, टिकली, टॅटू' या मराठी मालिकेत काम केलं होतं. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत देखील तो महत्वाच्या भूमिकेत दिसला होता. नागिन, जिंदगी नॉट आउट या मालिकेतही आदिश दिसला होता.

नुकतीच आदिशने 'गुम है किसी के प्यार में' या हिंदी मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री करण्याआधी त्याने या मालिकेचा निरोप घेतला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)