चंद्रकांत पाटील : किरीट सोमय्या नांदेडला जाणार, पुढचा नंबर कुणाचा? #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. किरीट सोमय्या नांदेडला जाणार, पुढचा नंबर कुणाचा? - चंद्रकांत पाटील
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेते ईडी आणि आयकर विभागाच्या निशाण्यावर आहेत. पण पुढची कारवाई नांदेडमध्ये होणार असल्याचे संकेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
भाजप नेते किरीट सोमय्या येत्या आठवड्यात नांदेडला जाणार असून पुढचा नंबर कुणाचा, असा सूचक प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.
नांदेडमधल्या देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलत होते.
येत्या 26 किंवा 27 तारखेला किरीट सोमया नांदेडला येणार आहेत, करा बातमी मोठी असं पाटील म्हणाले. ही बातमी झी 24 तासने दिली.
2. भाजप नेते दर आठवड्याला मंत्रिपदाच्या अपेक्षेने नवे कपडे शिवतात - बाळासाहेब थोरात
'दर आठवड्याला सरकार पडेल या आकांक्षाने भाजपमधील अनेक लोक मंत्रिपद मिळेल याकरता नवीन कपडे शिवतात पण त्यांना काही मुहूर्त लागत नाही, असा टोला काँग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपला लगावला आहे.

फोटो स्रोत, Twitter
ठाणे येथे पक्षाच्या बैठकीसाठी आल्यानंतर थोरात बोलत होते.
केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून महाविकास आघाडीचे सरकार कसे पाडता येईल. याकरता भाजप रोज नवनवीन युक्त्या लढवत आहे.
भाजप सत्तेसाठी इतका हपापला आहे की ते लोकांना दगड मारायलाही कमी करणार नाहीत, अशी टीका थोरात यांनी यावेळी केली. ही बातमी न्यूज 18 लोकमतने दिली.
3. दिवाळीत काळे झेंडे घेऊन मंत्र्यांचं स्वागत करा, राजू शेट्टींचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
दसरा गोड झाला नाही तर दिवाळीला शिमगा करू, असं मी म्हणालो होतो. आता दिवाळीला गावात येणारे नेते आणि मंत्री यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करा. त्यांची दिवाळी गोड होऊ देऊ नका, ही माझी विनंती आहे, असं आवाहन शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 20 व्या ऊस परिषदेत एफआरपीच्या मुद्द्यावरून शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
साखरेला चांगला भाव आले असताना एफआरपीचे तुकडे करण्याचं कारस्थान रचलं जात आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला.
पावसात भिजत हे सरकार आलं. यांना महापुराची जाण असेल असं वाटलं होतं. पण सरकारने काय मदत केली, हे तुम्ही पाहिलंच असेल, असं शेट्टी म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.
4. 'शिवतीर्थावर लावलेले दिवे इटलीतून आयात केले, हा योगायोग की लांगुलचालन?'
मुंबईतील दादर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर कायमस्वरूपी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पण या रोषणाईसाठी विद्युत दिव्यांसह इतर सर्व साहित्य इटली येथून मागवलेले आहे. या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

फोटो स्रोत, cmo maharashtra
या रोषणाईचं लोकार्पण नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आमदार निधीचा वापरही सर्वप्रथम याच ठिकाणी करण्यात आला आहे.
संदीप देशपांडे यावर टीका करताना ट्वीट करून म्हणाले, "शिवतीर्थावर मुख्यमंत्री निधीतून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारे दिवे हे इटलीमधून आयात करण्यात आले आहेत. हा योगायोग आहे की इटलीचं लांगुलचालन." ही बातमी लोकमतने दिली.
5. पाच हजारांपेक्षा जास्त वीज बिलांचा भरणा रोख नाही
पाच हजारपेक्षा जास्त रुपयांचं वीज बिल असल्यास त्याचा भरणा ग्राहकांना धनादेश अथवा ऑनलाईन करावा लागणार आहे.
पूर्वी दोन लाख रुपयांपर्यंतच्या बिलाची रक्कम रोख स्वरुपात घेतली जात होती. पण यात बदल करून वरील निर्णय लागू करण्यात आला आहे.
वीज नियामक आयोगाने घेतलेला हा निर्णय येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्यात सर्वत्र लागू होईल. आयोगाने महावितरणच्या सर्व विभागांना नव्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
रोख रकमेऐवजी ऑनलाईन, डीडी अथवा धनादेश यांनी भरणा करून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. ही बातमी ई-सकाळने दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








