मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपला थेट आव्हान का देत आहेत?

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसैनिकांना संबोधन करत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर थेट निशाणा साधला. भाजपची सत्तेची भूक एखाद्या नशेच्या व्यसनाप्रमाणे आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून दाखवा असं आव्हानही त्यांनी यावेळी भाजपला दिलं. तसंच हिंदुत्व आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामकाजाबाबत भाजपवर टीका केली.
ते म्हणाले, "आम्ही जोपर्यंत तुमच्यासोबत होतो तोपर्यंत चांगले होतो. ईडीचा वापर करू नका. समोरुन हल्ला करा. आमचं सरकार अस्थिर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही पुढील महिन्यात आमचे सरकार दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. मी तुम्हाला सरकार पाडण्याचं आव्हान देतो."
एवढंच नाही तर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. "मी फकीर नाही, जो झोळी घेऊन निघून जाईल."
सावरकर आणि गांधी यांच्यावरही प्रतिक्रिया
राज्यात आयकर विभागाची छापेमारी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाहता उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्यांचा अर्थ समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसचे माजी नेते हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर आलेल्या एका जाहिरातीवरूनही त्यांनी नक्कल केली. हर्षवर्धन पाटील भाजपत गेल्यानंतर बोलतात, "आधी मला झोप येत नव्हती. दरवाजा वाजला की अंगावर काटा यायचा, मग मी भाजपत प्रवेश केला आणि आता मी कुंभकर्णासारखा झोपतो."
राजनाथ सिंह यांच्या सावरकर आणि गांधींच्या वक्तव्यावरही उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. भाजप ना सावकरकरांना समजू शकले ना महात्मा गांधींना असं ते म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेपासून शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाला सुरूवात झाली. पण राजकीयदृष्ट्या थेट भाजपवर कडव्या शब्दात हल्ला करण्याची उद्धव ठाकरे यांची ही पहिलीच वेळ होती. याचे राजकीय अर्थ काय याविषयी जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने काही राजकीय विश्लेषकांची मतं जाणून घेतली.
बाळ ठाकरे यांच्यासारखा अंदाज?
उद्धव ठाकरे यांचं भाषण आक्रमक होतं असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात. ते म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांचा समावेश केला. एक प्रकारे ते सर्वसमावेशक होते. पण त्यांची शैली शिवसेना किंवा त्यापेक्षा बाळ ठाकरेंसारखी होती."

फोटो स्रोत, Getty Images
ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्या मते, उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एवढ्या आत्मविश्वासाने बोलत होते.
ते म्हणाले, "दोन वर्ष सरकार स्थिर राहिल्याचा आत्मविश्वास त्यांच्यात दिसत आहे. विजयादशमीच्या दोन दिवस आधी चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी त्यांनी अशाच पद्धतीने भाषण केले होते. दसरा मेळाव्याचे भाषणही आक्रमक होते."
सरकार धोक्यात नाही हे उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरुन दिसून येते असंही चोरमारे सांगतात.
ज्येष्ठ राजकीय पत्रकार दीपक भातुसे सांगतात, "सततच्या छापेमारीमुळे उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आहे का? अशी चर्चा सुरू होती. परंतु उद्धव ठाकरे यांच्या या भाषणामुळे स्पष्ट होते की ते आता भाजपसोबत जाणार नाहीत."
तुमचे हिंदुत्व आणि आमचे...
विजय चोरमारे म्हणाले, "महाविकास अघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेला लक्ष्य करण्यात आले. पण आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नाही असं उद्धव ठाकरे यांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे."

फोटो स्रोत, Getty Images
गुजरात दंगलीदरम्यान ठार झालेल्या लोकांबाबत आणि इतर घटनांचा आपल्या भाषणात उल्लेख करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, हे हिंदुत्व आमचं नाही. शिवसेनेचे हिंदुत्व सर्वांना सामावून घेणारं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, "हिंदुत्वासाठी शिवसेनेने भाजपशी युती केली होती. शिवसेनेला मुख्यमंत्री पद देण्याची चर्चा झाली असती तर आज मार्ग वेगळे झाले नसते. मी फकीर नाही जो झोळी उचलेल आणि निघून जाईल."
याविषयी बोलताना हेमंत देसाई म्हणतात, "भाजपप्रमाणे हिंदुत्वाचे राजकारण करणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं."
शिवसेनेने असं यापूर्वी कधीही जाहीरपणे म्हटलेलं नाही असं राजकीय विश्लेषक सांगतात. दीपक भातुसे म्हणाले, "हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देशभरात मुस्लिमविरोधी ध्रुवीकरण करण्याचा भाजप प्रयत्न करत असताना हिंदुत्व मुस्लिमविरोधी नाही असं सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेना यांची हिंदुत्ववादी भूमिका वेगवेगळी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय."

फोटो स्रोत, @SHIVSENACOMMS
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, "देशात हिंदुत्व धोक्यात आहे अशी चर्चा अनेकदा केली जाते. पण हिंदुत्वाला बाहेरच्या लोकांकडून नव्हे तर नवहिंदू आणि या विचारसरणीचा वापर करून सत्तेची शिडी चढणाऱ्यांकडून धोका आहे."
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्याच्या घटनेबाबतही बोलायला उद्धव ठाकरे विसरले नाहीत.
"मुंद्रा बंदरावर कोट्यवधी रुपयांचे ड़्रग्ज जप्त करण्यात आले पण त्यावर कोणतीही कारवाई नाही. इथे फक्त चिमूटभर गांजा पकडला गेला आणि त्याचा ढोल वाजवला जातोय."
भाजवर थेट निशाणा पण आरएसएसवर नाही?
मोहन भागवत यांनी या देशात सर्वांचे पूर्वज एक होते, असं म्हटलं. ते खरं आहे. मग विरोधी पक्षांचे पूर्वज परग्रहावरून आले होते का. आता आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरून आले होते का? लखीमपूर खिरीमध्ये जे झालं त्या शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरून आले होते का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

फोटो स्रोत, @SHIVSENACOMMS
हेमंत देसाई यांच्या मते उद्धव ठाकरे यांना संघाशी असलेले संबंध कायम ठेवायचे आहेत. ते सांगतात, "संघाचा प्रयत्न सुरुवातीपासूनच शिवसेनेला सोबत घेण्याचा आहे आणि उद्धव ठाकरेही आपल्या भाषणात संघाशी संबंध राखण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते."
मोहन भागवत, संघ, सावरकर हे मुद्दे शिवसेनेला भाजपशी जोडतात, त्यामुळे भविष्यात एकत्र यायचे असल्यास हा पर्याय कायम राखण्याचा हा प्रयत्न आहेत असं विजय चोरमारे यांना वाटतं.
केंद्र सरकारने कितीही आव्हानं उभी केली तरी झुकणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालचे उदाहरण दिले.
हेमंत देसाई सांगतात, "पश्चिम बंगालमध्ये जे झालं त्याची पुनरावृत्ती आपला पक्ष करेल असा संदेश त्यांना द्यायचा होता असं वाटतं."
"शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुखांनी कोणालाही घाबरायचे नाही असं शिकवलं आहे. ईडी, सीबीआयला आम्ही घाबरत नाही. धमकीने पोलिसांच्या मागे लपणारे आम्ही नाही." असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

फोटो स्रोत, @SHIVSENACOMMS
याविषयी बोलताना विजय चोरमारे म्हणाले, "उद्धव ठाकरे यांनी भाजपला स्थानिक ते केंद्रीय स्तरापर्यंत आव्हान देण्याविषयी म्हटलं आहे. आतापर्यंत ते असं थेट बोलले नव्हते पण आता ते तयार आहेत असे दिसते."
तर भाजपसोबत लढण्यासाठी ते तयार आहेत असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातून दिल्याचं दिपक भातुसे सांगतात.
राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा असल्याचे संकेत
राष्ट्रीय राजकारणात उद्धव ठाकरे महत्त्वाची भूमिका बजावतील, असं संजय राऊत यांनी अनेकदा म्हटलं आहे.
हेमंत देसाई याविषयी बोलताना सांगतात, "शरद पवार सध्या केंद्रीय पातळीवर विरोधकांचा चेहरा बनण्याच्या शर्यतीत नाहीत. ममता बॅनर्जी आणि राहुल गांधी यांच्यासोबत काम करत उद्धव ठाकरे यांना विरोधकांचा चेहरा बनवण्यासाठी काम करू शकतात."
उद्धव ठाकरे यांचं भाषण पाहता त्यांनी यासाठी स्वत:ला तयार केलं असल्याचं दिसून येतं. आपल्या भाषणात त्यांनी उत्तर प्रदेशची घटना, शेतकरी आंदोलन यांसह राष्ट्रीय पातळीवरील अनेक मुद्द्यांचा उल्लेख केला. म्हणूनच या भाषणाकडे राष्ट्रीय दृष्टीकोनातूनही पाहण्याची गरज आहे असं हेमंत देसाई सांगतात.

फोटो स्रोत, SHIV SENA
केंद्र सरकार राज्यांना नुकसान पोहोचवत असून केवळ गुजरातला महत्त्व मिळत असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे राष्ट्रीय प्रश्नांबद्दल बोलत असतील पण ते राष्ट्रीय पातळीवर विरोधकांचा चेहरा बनू शकतील की नाही याबद्दल शंका वाटते असं विजय चोरमारे यांना वाटतं.
ते म्हणाले, 'राष्ट्रीय पातळीवर महत्त्व प्राप्त करण्यासाठी शिवसेनेकडे पुरेशी ताकद नाही आणि ती वाढवण्यासाठीही ते प्रयत्नशील असल्याचं दिसत नाही. लोकसभेत पक्ष स्वबळावर लढला तर तेवढ्या जागा जिंकता येणार नाहीत. त्यांच्याकडे ममता बॅनर्जींएवढी ताकद नाही."
तर दीपक भातुसे सांगतात, "उद्धव ठाकरे यांच्या भाषणावरून ते भाजपविरोधात ममता बॅनर्जींसारखी भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येतं."
शिवसेनेने भाजपशी फारकत घेतल्याने महाराष्ट्र आणि शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे, असंही उद्धव यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आणखी एक प्रश्न उपस्थित होतो.
तो म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांना प्रत्युत्तर देत महाराष्ट्र सरकार पश्चिम बंगाल सरकारप्रमाणे राज्याच्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून भाजप नेत्यांवर निशाणा साधणार का? उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या माध्यमातून याचे संकेत मिळतात असं दिपक भातूसे यांना वाटतं.
उद्धव ठाकरे आपल्या भाषणात शिवसैनिकांना असंही म्हणाले, "तुम्हाला कोणी काहीही म्हटलं तरी सिंहाप्रमाणे त्यांना उत्तर द्या. शिवसेनाप्रमुख या नात्याने मला कोणाला धमकवायचे असेल राज्याचा मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर तुमच्या बळावर धमकी देईन."
या घडामोडी पाहता आगामी काळात भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आणखी तीव्र होईल हे उघड आहे. तेव्हा उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी यांच्याप्रमाणे भूमिका निभावतील की नाही हे सुद्धा स्पष्ट होईल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








