सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाचं श्रेय नेमकं कुणाचं?

- Author, नितीन सुलताने
- Role, बीबीसी मराठीसाठी
सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाचं आज लोकार्पण होणार आहे. मात्र उद्घाटनापूर्वीच या विमानतळावरून अनेक वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
विशेषतः विमानतळ कुणामुळं आलं याचं श्रेय मिळवण्यासाठी स्पर्धा चाललेली दिसते. मात्र प्रत्येकजण आपल्यामुळंच हे झाल्याचा दावा करत असताना, याचं खरं श्रेय कुणाचं? हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया दुपारी दोन वाजता या विमानतळाचं व्हर्च्युअल उद्घाटन करणार आहेत. तर, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष विमानतळाचं लोकार्पण करणार आहेत.
विमानतळ प्रत्यक्षात आजपासून सुरू होत असलं तरी गेल्या अनेक दिवसांपासून यावरून चर्चा आणि वादविवाद सुरू आहेत. प्रामुख्यानं राणे आणि शिवसेना यांच्यात श्रेयवादावरून शाब्दीक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
अनेक वर्षांपासून कामं प्रलंबित असलेल्या या विमातळावर आजपासून अखेर विमानसेवा सुरू होत आहे. त्यामुळं सिंधुदुर्ग आणि कोकणवासीयांना याचा फायदा होणार आहे.
मात्र, दोन्ही बाजुंनी दावे प्रतिदावे केले जात असताना हे विमानतळ नेमकं कुणाच्या प्रयत्नांमुळं होऊ शकलं, हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. त्याचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत.
विमानतळाचा श्रेयवाद?
नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग येथील विमानतळ आपल्या प्रयत्नातून पूर्ण झालं असून ज्योतिरादित्य सिंधिया त्याचं उद्घाटन करणार असल्याचं सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंनी उपस्थित राहण्याची गरज नसल्याचं राणे म्हणाले होते.
मात्र त्यानंतर शिवसेनेनं लगेचच याला उत्तर देत शिवसेनेच्या प्रयत्नांमुळंच विमानतळाचं काम पूर्ण होऊ शकलं. उलट राणेंच्या कारकिर्दीत विमानतळाचं केवळ 14 टक्के काम झालं होतं, असा दावा केला. उद्धव ठाकरेंनीच ज्योतिरादित्य सिंधियांना भेटून उद्घाटनाची तारीख ठरवली होती, असंही शिवसेनेकडून सांगण्यात आलं.

यावर पुन्हा उत्तर देत विमानतळाचा पायाच नारायण राणेंनी घातला होता, असं आमदार नितेश राणे म्हणाले. याशिवाय माजी खासदार ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनीही विमानतळाचं श्रेय त्यांचं असल्याचा दावा केला.
असे सगळ्याच पक्ष आणि नेत्यांकडून दावे होत असताना नेमकं कुणाच्या प्रयत्नामुळं हे विमानतळ होऊ शकलं, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. या भागातील काही स्थानिक पत्रकारांनी हा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.
राणेंचा दावा किती खरा?
विमानतळाचं श्रेय कुणा एकाला देणं योग्य ठरणार नसल्याचं मत रत्नागिरी येथील लोकसत्ताचे ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांनी व्यक्त केलं.
पण, 2008 मध्ये जेव्हा या विषयाची सुरुवात झाली, तेव्हा राणेंनी प्रफुल्ल पटेल यांच्यासमोर हा विषय मांडला आणि त्याला प्राथमिक परवानगी मिळाली होती, हे खरं असल्याचं कामत यांनी सांगितलं. मात्र त्यावेळी राणे हे काँग्रेस आघाडी सरकारमध्ये होते.

सिंधुदुर्गमधील दैनिक सकाळच्या आवृत्तीचे प्रमुख शिवप्रसाद देसाई यांनीदेखील राणेंच्या काळातच याच्या कामाला सुरुवात झाली असं म्हटलं.
प्रत्यक्षात माधवराव सिंधिया मंत्री होते, तेव्हापासून याची चर्चा सुरू होती. मात्र विमानतळाच्या कामाला खऱ्या अर्थानं मूर्त रुप हे नारायण राणे पालकमंत्री असताना आल्याचं देसाई म्हणाले.
त्यानंतर विमानतळासाठी महत्त्वाच्या पर्यावरण विषयक परवानग्या 2012 च्या दरम्यान मिळाल्या. त्यावेळीही नारायण राणे हे महसूल मंत्री होते, असं कामत यांनी सांगितलं.
त्यामुळं राणे याबाबत दावा करून श्रेय घेत असले, तरी त्यांना भाजपला त्याचं श्रेय देता येणार नाही, कारण तेव्हा राणे आघाडी सरकारमध्ये होते, असंही कामत म्हणाले.
सर्वांचाच हातभार!
अशा प्रकारच्या प्रकल्पांमध्ये पर्यावरणाच्या मान्यता या सर्वात महत्त्वाच्या असतात. त्याशिवाय कामं पुढं सरकत नाहीत. त्यामुळं सर्वच सरकारच्या काळात यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचं, सतीश कामत म्हणाले.
"काँग्रेस आघाडी सत्तेतून गेल्यानंतर युतीची सत्ता आली. त्यानंतर या विमानतळाचं पुढचं काम वेगानं सुरू झालं. केंद्र सरकारच्या परवानग्या किंवा इतर गोष्टी मिळाल्या," असं शिवप्रसाद देसाई यांनी सांगितलं.

केंद्रात सुरेश प्रभू यांचं रेल्वेमंत्रीपद गेल्यानंतर त्यांच्याकडं नागरी हवाई मंत्रालयाचा अतिरिक्त पदभार आला. त्यांच्या काळातही अनेक महत्त्वाच्या परवानग्या मिळाल्याचंही देसाई म्हणाले.
यानंतरही काही कामं अडकली होती. त्यावेळी विनायक राऊतांनी पुढाकार घेत, पाठपुरावा करून कामं करून घेतली. त्यामुळं सगळ्यांचीच यासाठी मदत झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
"2008 ते 2014 हा विमानतळाच्या मान्यतांसाठीच्या दृष्टीनं महत्त्वाचा कालावधी ठरला. त्यानंतर 2018 पर्यंत प्रत्यक्ष काम झालं. या दोन्ही टप्प्यांत केंद्र आणि राज्यात आधी आघाडी आणि नंतर युतीची सत्ता होती," असं कामत म्हणाले.
सुधीर सावंतांचा मुद्दाही अगदीच चूक नाही असंही त्यांनी म्हटलं. त्यांनी याबाबत माधवराव सिंधियांशी चर्चा केली होती. सिंधियांनी त्यावेळी या परिसराची हवाई पाहणी करून सर्वेक्षणाचे आदेश दिले होते, असं कामत यांनी सांगितलं.
सिंधुदुर्ग वासियांचंही श्रेय
या प्रकल्पाच्या श्रेयवादासाठी पक्ष आणि नेत्यांची चढाओढ सुरू आहे. मात्र याचं श्रेय सिंधुदुर्गवासियांनाही द्यायला हवं, असं शिवप्रसाद देसाईंनी म्हटलं.
"सिंधुदुर्गमध्ये एखादा प्रकल्प होणं हे फार सोपं नाही. कारण अशा प्रकल्पांना इथं विरोध होतो. त्याची विविध कारणं आहेत. लोकांना प्रकल्प नीट समजावून सांगितला जात नाही, त्याचे फायदे सांगितले जात नाहीत, त्यामुळं त्याला विरोध होतो."
चिपी विमानतळालाही सुरुवातीला काही प्रमाण विरोध झाला. मात्र तरीही सिंधुदुर्गवासियांनी तयारी दाखवत यासाठी स्वतःच्या जमिनी दिल्या. त्यामुळं त्याचं यात मोठं योगदान असल्याचं, देसाई म्हणाले.
विलंबाचं श्रेय कुणाला?
या विमानतळाच्या कामाला प्रचंड विलंब झाला. मग त्यासाठी जबाबदार कोण हाही महत्त्वाचा मु्द्दा आहे.
विमानतळाच्या कामाची परवानगी मिळाली आणि काम सुरू झालं तेव्हा सुरुवातीला महाराष्ट्र सरकार स्वतः विमानतळाचं काम करत होतं. पण नंतर त्याचं काम IRB या कंपनीकडे सोपवण्यात आलं.

या कंपनीला विमानतळांच्या उभारणीचा अनुभव नव्हता. केवळ रस्ते, महामार्ग अशा कामांचा अनुभव होता. त्यामुळं या कंपनीमुळं काम लांबल्याची शक्यता शिवप्रसाद देसाईंनी मांडली.
विमानतळासाठी ज्या गोष्टींची गरज असते, त्यात परवानग्या किंवा इतर बाबींचा अनुभव कंपनीला नसावा. कारण त्यांनी काम सुरू केलं, पण त्यांना ते त्याच वेगानं पुढं नेता आलं नाही. भूसंपादन आणि इतर पातळ्यांवरही काम रखडलं असं देसाई म्हणाले.
"एखादं घर असतं, त्याचा पाया रचणाराही तितकाच महत्त्वाचा असतो, आणि कळस चढवणाराही तितकाच महत्त्वाचा असतो. त्याचप्रमाणे या विमानतळासाठीही सगळ्यांचाच मोलाचा वाटा राहिला आहे," असं मत देसाईंनी मांडलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








