नारायण राणे अटक : शिवसेना भाजपच्या जाळ्यात अडकतेय की धोबीपछाड देतेय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
नारायण राणे विरूद्ध उद्धव ठाकरे हे वैर महाराष्ट्रासाठी नवं नाही. उद्धव ठाकरेंचे कट्टर विरोधक राणे शिवसेना पक्षप्रमुखांवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री राणे विरुद्ध मुख्यमंत्री ठाकरे या संघर्षाचा नवा अध्याय सुरू झालाय.
मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ अप्रत्यक्षरित्या फोडताना राणेंनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली. दिल्लीहून परतल्यापासून राणे उद्धव ठाकरेंवर सातत्याने हल्ला चढवताना दिसून येत आहेत.
नारायण राणे आक्रमक आहेत. शिवसेनेसोबत त्यांचं शत्रुत्व नवीन नाही. पण, राणेंचा आक्रामकपणा शिवसेनेच्या पथ्यावर पडेल? राणेंचं उद्धव ठाकरेंविरोधात आक्रमक होणं शिवसेनेसाठी फायद्याचं आहे?
आक्रमक राणे शिवसेनेला फायदेशीर?
राजकीय जाणकार सांगतात, शिवसेना सत्तेत असल्यामुळे आणि उद्धव ठाकरे स्वत: मुख्यमंत्री बनल्याने शिवसेनेचा आक्रमकपणा कमी झालाय.
रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा शिवसैनिक, आता आक्रमक होताना दिसून येत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
पण, राणेंनी थेट उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे शिवसैनिकांना आक्रमक होण्याची एकत्र येण्याची आयती संधी मिळालीये. शिवसैनिक मरगळ झटकून रस्त्यावर उतरले आहेत.
द-हिंदूचे वरिष्ठ राजकीय पत्रकार आलोक देशपांडे म्हणतात, "महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक हल्ला चढवून कोणत्याच पक्षाचा फायदा झाला नाही. अगदी कॉंग्रेसचं उदाहरण घ्या."
"शिवसेनेच्या इतर कोणत्या नेत्यावर हल्लाबोल केला तर, शिवसैनिक आक्रमक होताना दिसून येत नाहीत. "मात्र, ठाकरे कुटुंबावर वैयक्तिक हल्ला केल्यानंतर, पक्ष म्हणून शिवसेना एकत्र येते आणि खूप आक्रमक होते," ते पुढे सांगतात.
शिवसेना सोडून गेलेल्या नेत्यांविरोधात शिवसैनिकांच्या भावना नेहमीच आक्रमक राहिल्या आहेत.
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणाले, "शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नेत्यांबाबत शिवसेना कार्यकर्त्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. पक्षातून बाहेर पडलेल्या व्यक्तीविरोधात शिवसेना नेहमीच एकत्र होते. याचा अनेकवेळा शिवसेनेला फायदा झालाय."

फोटो स्रोत, SHAHID SHEIKH/BBC
भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे यांच्याबाबत शिवसैनिकांच्या अत्यंत तीव्र भावना पाहायला मिळाल्या आहेत. ते पुढे सांगतात, "भुजबळ आणि राणेंना, शिवसेना सोडल्यानंतर मुंबईतून पुन्हा विजय मिळाला नाही. हे वास्तव आहे."
कोव्हिडच्या काळात शिवसेना मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप झाले. उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री असूनही घराबाहेर पडत नाहीत, असा वारंवार आरोप होते. यामुळे, शिवसेना थोडी बॅकफूडवर गेल्याचं दिसून येतंय.
आलोक देशपांडे पुढे सांगतात, "या काळात राणेंनी उद्धव ठाकरेंविरोधात वैयक्तिक विधान करणं शिवसेनेसाठी फायद्याचं आहे. नेते, कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याची यामुळे संधी मिळते."
राणेंचं आक्रमक होणं भाजपसाठी तोट्याचं?
राणे शिवसेनेला आणि पर्यायाने उद्धव ठाकेरेंना थेट अंगावर घेतात. त्यामुळे राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या वैमनस्याचा फायदा घेण्याचा भाजपचा प्रयत्न नक्कीच आहे.

फोटो स्रोत, NArayan Rane/Twitter
त्यासाठीच त्यांनी राणेंना केंद्रात नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान दिलंय, असं राजकीय जाणकार म्हणतात.
राणे उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक हल्ला चढवतात. त्यांची भाषा अत्यंत आक्रमक आहे. मग, याचा भाजपला फायदा होईल की तोटा?
द-हिंदू वृत्तपत्राचे आलोक देशपांडे म्हणतात, "राणे उद्धव ठाकरेंवर जेवढा वैयक्तिक हल्ला करतील तेवढा भाजपसाठी तोटा असेल."
राणेंचं राजकारण जवळून पहाणारे अभय देशपांडे यांनी सांगितलं, "कोकणी माणसाची राणेंना सहानुभूती असली तरी शिवसेनेच्या पारंपारिक मतदाराला राणे शिवसेनेपासून दूर ठेऊ शकतील याबाबत अजून खात्री नाही."
राणेंनी 2005 मध्ये शिवसेना सोडली. त्यानंतर, 2007 आणि 2012 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसला राणेंचा काहीच फायदा झाला नाही.
राणे गेल्यामुळे शिवसेनेचं मुंबईत तेवढं नुसकान झालं नाही, असं राजकीय विश्लेषक म्हणतात.

फोटो स्रोत, Twitter /MeNarayanRane
अशात राणे कोकणातून विधानसभा हरले. मुंबईत विधानसभेची पोटनिवडणुकही राणेंना जिंकता आली नाही.
राणेंचा ठाकरेंवर हल्ला भाजपच्या रणनितीचा भाग?
नारायण राणे आणि शिवसेनेचं वितुष्ठ सुरू झालं 2005 मध्ये. शिवसेना सोडल्यापासूनच उद्धव ठाकरेंवर सातत्याने हल्लाबोल हा राणेंच्या राजकारणाचा एककलमी कार्यक्रम आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना हा भाजपचा नंबर एकचा शत्रू आहे. त्यामुळे, उद्धव ठाकरेंविरोधात राणेंना उतरवणं भाजपच्या रणनितीचा भाग असू शकतो, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
राणेंची मुंबईतील एन्ट्री, उद्धव ठाकरेंबद्दलचं वक्तव्य आणि शिवसेना आक्रमक होणं, हा भाजपचा प्लान आहे?
वरिष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात, "राणें विरोधात शिवसेना आक्रमक होणं ट्रॅप असू शकतो. हा संघर्ष विकोपाला गेला. तर, कोणीच नियंत्रण ठेऊ शकणार नाही."
"मग, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून, सरकारवर हल्लाबोल करण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो," असं ते पुढे सांगतात.
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना नारायण राणेंनी माझ्याकडून प्रचाराचा नारळ फुटलाय, असं वक्तव्य केलं होतं.
राजकीय विश्लेषक सांगतात, मुंबईत भाजप संधी शोधतेय. आपलं अस्तित्व दाखवण्याशिवाय त्यांना पर्याय नाहीये. त्यामुळे, राणेंसारखा नेता त्यांच्यासमोर महत्त्वाचा पर्याय आहे.
आलोक देशपांडे म्हणतात, "राणेंच्या एंन्ट्रीमुळे भाजपला काही प्रमाणात फायदा मिळण्याची शक्यता आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








