नारायण राणे यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंबाबत केलेली ही 8 विधानं खरी की खोटी?

फोटो स्रोत, Twitter
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
नारायण राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत 8 मोठे दावे केले. मात्र ही विधानं खरी आहेत का खोटी? हे बीबीसीने तपासून पाहण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेली टीका भाजप खासदार नारायण राणेंच्या जिव्हारी लागली आहे. उद्धव ठाकरेंनी राणे यांना रविवारी (25 ऑक्टोबर) झालेल्या दसरा मेळाव्यात 'बेडूक' म्हणून संबोधलं होतं.
सोमवारी (26 ऑक्टोबर) नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. सुशांत सिंह राजपूतचा खून करण्यात आलाय आणि यात आदित्य ठाकरे कोठडीत जातील, असा थेट आरोप राणेंनी केला.
विधान क्रमांक 1 - सुशांतचा खून झाला
नारायण राणेंनी बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा खून झाला, ही आत्महत्या नाही असा दावा केला.
बीबीसीने राणेंच्या या विधानाबाबतची माहिती तपासून पाहिली. सुशांत मृत्यूनंतर मुंबई पोलिसांनी, पोस्टमार्टम रिपोर्टचा दाखला देत ही आत्महत्या असल्याचा दावा केला. मुंबई पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. प्रकरण सीबीआयकडे गेलं.
सीबीआयने ऑल इंडिया इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (AIIMS) टीमला याबाबत पुन्हा तपासणी करण्यास सांगितलं. सीबीआयने काही दिवसांपूर्वी याबाबतचा रिपोर्ट सादर केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
एम्सच्या न्यायवैद्यक (Forensic) विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी याबाबत बोलताना सांगितलं होतं, "सुशांतचा मृत्यू पंख्याला लटकून आत्महत्या केल्याने झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गळफासाशिवाय कोणत्याही खुणा त्याच्या अंगावर नव्हत्या. त्याचसोबत विरोध केल्याच्या खुणाही नव्हत्या."
सुशांतच्या शरीरात नशा आणणारा पदार्थ सापडला नसल्याचं बॉंबे फॉरेंसिक सायन्स लॅब आणि एम्सच्या टॉक्सीकोलॉजी लॅबच्या तपासात स्पष्ट झाल्याचंही डॉ. गुप्ता यांनी म्हटलं होतं.
या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहे.
विधान क्रमांक 2- दिशा सालियनवर बलात्कार
सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचा जून 8 रोजी मृत्यू झाला. नारायण राणेंनी दिशावर बलात्कार झाल्याचा आरोप केलाय.
बीबीसीने राणेंच्या आरोपात काही तय्थ आहे का याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर 5 ऑगस्टला तिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहीलं.
त्या पत्रात सतीश सालियन म्हणतात, "माझ्या मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून झाल्याचं मीडिया दाखवत आहे. या बातम्या पूर्णत: चुकीच्या आणि फेक आहेत. यात काहीच तथ्य नाही. चुकीच्या बातम्या देऊन टीव्ही चॅनल्स माझ्या मुलीची आणि माझ्या कुटुंबाची बदनामी करत आहेत."
"दिशाचा राजकीय नेत्याशी संबंध आणि बॉलीवूडमधील मोठ्या अॅक्टरसोबत पार्टीच्या बातम्या पूर्णत: बनावट आहेत," असं तिच्या वडिलांनी स्पष्ट केलं होतं.
दिशाचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत बोलताना पोलिसांनी, दिशाचा मृतदेह नग्न अवस्थेत सापडला नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्याचसोबत पंचनामा करताना आई-वडील उपस्थित असल्याची माहिती दिली होती.
विधान क्रमांक 3- दिशाचा खून झाला
नारायण राणेंनी दिशाला ढकलून दिल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला. याबाबत दिशाचे कुटुंबीय आणि पोलिसांनी काय म्हटलं हे आम्ही तपासण्याचा प्रयत्न केला.
दिशाच्या वडिलांनी पत्रकारांशी बोलताना, दिशाचा खून झाल्याचा दावा फेटाळला होता. "दिशाच्या मृत्यूप्रकरणी माझा कोणावरही संशय नाही. मुंबई पोलिसांनी मला पुरावे दाखवले. पोस्टमार्टम रिपोर्ट दाखवला. माझी मुलगी गरोदर नव्हती," असं सतीश सालियन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.
मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, 8 जूनला दिशाला लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीचा फोन आला. फोनवर बोलत ती आतमध्ये गेली. दिशाच्या लंडनमधील मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दिशाने लॉकडाऊन अजूनही सुरू असून काम बाकी असल्याचं सांगितलं. ती थोडी चिंतेत वाटत होती. त्यानंतर तिचे मित्र आणि होणारा नवरा रोहन यांनी खोलीचा बंद असलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दिशा खोलीत नव्हती. खिडकीतून खाली पाहिलं तर दिशा पडलेली दिसून आली.
विधान क्रमांक 4 - सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचा सहभाग
सुशांतची आत्महत्या नसून हा खून आहे. खुनाचे आरोपी गजाआड होतील. त्यातील एक मंत्री असेल. तो उद्धव ठाकरे यांचा पुत्र असेल, असा थेट आरोप नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन केला. सत्तेचा दुरुपयोग करून स्वत:च्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असल्याचंही त्यांनी पुढे म्हटलं.
आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांचे तुमच्याकडे पुरावे आहेत का? असतील तर सादर करा, या प्रश्नाचं उत्तर देताना राणे म्हणाले, "सीबीआयने विचारणा केली तर मी हे पुरावे सीबीआयला देईन."

फोटो स्रोत, Twitter
राणेंनी तिसऱ्यांदा आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. मात्र, पत्रकारांना पुरावे दाखवलेले नाहीत. त्यांनी सीबीआयला याबाबत माहिती दिलेली नाही किंवा दोन महिने चौकशी केल्यानंतर अजूनही सीबीआयने त्यांना याबाबत विचारणा केलेली नाही.
युवासेनाप्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी राणेंचे आरोप फेटाळून लावले आहेत.
ऑगस्ट महिन्यात राणेंच्या आरोपांनंतर दिलेल्या प्रतिक्रियेत आदित्य ठाकरे म्हणतात, "सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी व्यक्तिश: माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखी आहे. मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंकित करणारा आहे. या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही."
आदित्य ठाकरे यांच्यावर पोलिसांनी कोणतेही आरोप केलेले नाहीत तसेच त्यांना आतापर्यंत चौकशीसाठी बोलवण्यात आलेले नाही.
विधान क्रमांक 5 - बेईमानीकरून मुख्यमंत्रिपद मिळवलं
"यांच्याकडे 145 आमदार नाहीत. यांनी 56 आमदारांवर बेईमानीकरून मुख्यमंत्रिपद मिळवलं. हिंदुत्वाला मुठमाती देऊन त्यांनी हे पद मिळवलं," असा आरोप नारायण राणेंनी केला.
याचा फॅक्टचेक करताना आढळून आलं, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना एकत्र लढले. फेब्रुवारी 2019 मध्ये लोकसभा आणि विधानसभेचा फॉर्म्युला शिवसेना-भाजपने एकत्र येऊन पत्रकार परिषदेत जाहीर केला. ज्यात उद्धव ठाकरे, तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, "लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 जागा लढवणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्या-निम्या जागा लढवणार आहेत. त्याचसोबत पद आणि जबाबदाऱ्याही समान पद्धतीने सांभाळण्यात येतील. पुढे यात काही कन्फ्युजन निर्माण झालं तर उद्धवजी आणि अमितभाई जो निर्णय घेतील तो अंतिम असणार आहे."
पण, या पत्रकार परिषदेत पद आणि जबाबदाऱ्यांचं सम-समान वाटप असा निर्णय झाला असला तरी मुख्यमंत्रीपदाबाबत ठोस निर्णय स्पष्ट करण्यात आला नव्हता.

फोटो स्रोत, Getty Images
विधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर फॉर्म्युल्याप्रमाणे अडीच वर्षं मुख्यमंत्री पदाची मागणी केली. पण, अमित शहांनी मुख्यमंत्रिपद शिवसेनेसोबत अडीच वर्षं शेअर करण्याबाबात आश्वासन दिलं नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं.
फडणवीसांच्या दाव्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, अमित शहांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्रिपद अडीच वर्षं मिळेल असं ठरलं होतं. तसंच मुख्यमंत्र्यांनीही पद आणि जबाबदारी यांच समसमान वाटप होईल, असं जाहीर केलं होतं. मग मुख्यमंत्री हे पद नाही का? मुख्यमंत्रिपद ही जबाबदारी नाही?
शिवसेना-भाजपच्या जागावाटपाची चर्चा बंद दरवाज्याआड झाल्यामुळे यात कोणाचा दावा खरा आणि कोणाचा खोटा हे ओळखता येणं कठीण आहे.
विधान क्रमांक 6- राज्यात कोरोनाचे 43 हजार मृत्यू
कोरोनामुळे देशातील सर्वांत जास्त रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला. पण, त्यावर उद्धव ठाकरे काहीच बोलले नाहीत. भाषणात साधा उल्लेखही नाही. राज्यात 43 हजार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. मग त्याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर येत नाही का? असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला.

फोटो स्रोत, SOPA Images
राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 43,264 कोरोनाग्रस्त रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. राणेंच्या या आरोपात तत्थ आहे.
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाबाबत एकही शब्द काढला नाही. सरकारच्या कामांबाबत माहिती दिली नाही.
"जे काम आज झालं आहे ते पुढच्या महिन्यात लोकांसमोर मी ठेवणार आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले.
मात्र कोरोनाबाबत उद्धव ठाकरे वेळोवेळी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी चर्चा करत असतात.
विधान क्रमांक 7 - शिवसेनेत असंतोष आहे
"उद्धव ठाकरे मंत्रालयात भेटत नाहीत. मातोश्रीत प्रवेश नाही. यांना विचारतं कोण? किती शिवसैनिक विचारतात?" असा थेट हल्ला राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला. याबाबत आम्ही माहिती काढण्याचा प्रयत्न केला.
सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर उद्धव ठाकरे मंत्रिपद देतील अशी आशा शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांना होती. मात्र रामदास कदम, दिवाकर रावते यांसारख्या नेत्यांना मंत्रिपद मिळालं नाही. तर आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनाही विधानपरिषदेची मुदत संपल्यानंतर राजीनामा द्यावा लागला. "कोरोनाच्या काळात माझ्या अनुभवाचा फायदा घेता आला असता," असं म्हणत दीपक सावंत यांनी नाराजी बोलून दाखवली होती.
कोकणातील शिवसेनेचे आमदार आणि आघाडी सरकारमध्ये माजी मंत्री असलेले भास्कर जाधव यांनी मंत्रिपद मिळालं नसल्याची नाराजी उद्धव ठाकरेंसोबत एका कार्यक्रमात व्यासपीठावर जाहीर दाखवून दिली. तर माजी मंत्री तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंच्या बैठकीला दांडी मारली. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्याचं पाहायला मिळालं.

"आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मात्र, शिवसेना आमदारांची कामं होत नाहीत. स्थानिक जिल्हाधिकारी ऐकत नाहीत. या उलट आमच्या मित्रपक्षाचे मंत्री त्यांच्या आमदारांची कामं करतात," अशी खंत एका आमदाराने बीबीसीशी बोलताना व्यक्त केली.
उद्धव ठाकरेंच्या कारभारामुळे शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी आहे. मात्र, पक्षात उद्धव ठाकरेंविरोधात असंतोष आहे असं ठामपणे सांगता येणार नाही.
विधान क्रमांक 8 - उद्धव ठाकरे मराठाविरोधी माणूस
मराठ्यांना आम्ही आरक्षण दिलं. कोणत्या कलमाने दिलं? यापुढे कोणत्या कलमाने देणार? याबाबत थोडी माहिती आहे का? कायदा, घटना काय माहीत आहे यांना? असा आरोप राणेंनी केला.
ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण सरकार देणार, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. पण, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाची सुनावणी खंडपीठाकडे पाठवल्यामुळे मराठा समाज नाराज झालाय. राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यानंतर सर्वोच्य न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र सरकार अपील करणार असल्याचंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं. सरकारने सुप्रीम कोर्टात अपील करणारी याचिका दाखल केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणाविरोधात कोणतेही वक्तव्य केलेले नाही. सर्व पक्षांनी आपले मतभेद बाजूला ठेवून मराठा आरक्षणासाठी लढण्याची गरज आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








