उद्धव ठाकरेंवर शिवसेनेतले ज्येष्ठ नेते नाराज आहेत का?

फोटो स्रोत, facebook
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
नोव्हेंबर 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. 30 डिसेंबरला महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. या विस्तारात फडणवीस सरकारच्या काळात मंत्री असलेल्या जेष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आला. उध्दव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये आपल्याला स्थान मिळेल या आशेवर असणाऱ्या जेष्ठ नेत्यांना ठाकरे धक्का दिला.
माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम, माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते, माजी गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, माजी जलसंपदा मंत्री तानाजी सावंत, माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना नव्या मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आलं आणि नवीन चेहर्यांना संधी देण्यात आली. भास्कर जाधव, तानाजी सावंत यांनी त्यांच्या कृतीतून ते नाराज असल्याचं उघडपणे दाखवूनही दिलं.
रामदास कदम यांनी नवं मंत्रिमंडळ स्थापन झाल्यापासून दोन अधिवेशनात क्वचित उपस्थिती लावल्याचं बघायला मिळालं. शिवसेनेतल्या जेष्ठ नेत्यांचा गट सरकार स्थापन झाल्यापासून नाराज आहे. पण आता याला बरेच महिने उलटून गेले असले तरी या नेत्यांची नाराजी उध्दव ठाकरे दूर करू शकले नाहीत. या नेत्यांच्या मनातील खदखद वाढत असताना ठाकरे सरकारला या नेत्यांच्या नाराजीचा फटका बसू शकतो का? अशी शक्यता वर्तवली जातेय.
नेते राजीनाम्याच्या तयारीत..?
शिवसेनेचे नेते सध्या काय करतात? याचा आम्ही शोध घेतला. काही नेत्यांचं स्थानिक पातळीवर कोरोनासाठी काम सुरू आहे, काहीचं शेतकऱ्यांसाठी काम सुरू आहे तर काही घरी थांबून राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. आम्ही काही नेत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण कुणीही प्रसारमाध्यमासमोर बोलायला तयार नाही. काही नेते नाव न घेण्याच्या अटीवर आमच्याशी बोलले.
"अनेक वर्षे पक्षासाठी काम केल्यानंतर आम्हाला चुकीच्या पद्धतीने बाजूला केलं गेलं. सध्या काही विशेष जबाबदारी नाही त्यामुळे पक्षात राहून काय करायचं? त्यापेक्षा राजीनामा देणार," असं शिवसेनेच्या एका जेष्ठ नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं. इतर काही नेत्यांची परिस्थिती अशीच काहीशी असल्याचं चित्र आहे.
मला निवृत्त व्हायचं नाही....!
मला निवृत्त व्हायचं नाही असं शिवसेना नेते आणि माजी मंत्री दीपक सावंत यांनी केलंय. दीपक सावंत हे फडणवीस सरकारच्या काळात आरोग्य मंत्री होते.
विधान परिषदेचे सदस्य असलेल्या दीपक सावंत यांची आमदारकीची मुदत संपत आली होती. मंत्री पदाचा कार्यकाळ सहा महिने बाकी असताना सावंत यांना उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेत पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेच्या विलास पोतनीस यांना संधी दिली.
7 जानेवारी 2019 ला दीपक सावंत यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपला. त्यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी दिपक सावंत यांच्या कारभारावर युवा सेना प्रचंड नाराज असल्याची चर्चा होती.

फोटो स्रोत, facebook
सध्या दीपक सावंत यांच्याकडे पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली नाही. दीपक सावंत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना ही खंत बोलून दाखवली.
ते म्हणाले "मी प्लेगची साथ आली होती तेव्हाही प्रचंड काम केलं होतं. आतापर्यंत जितक्यावेळा महामारीची परिस्थिती आली आहे त्या परिस्थितीत मी काम केलंय. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून मी पहिली बैठक घ्यायला लावली. त्यानंतर या परिस्थितीचं गांभीर्य समजलं. आजही कोरोनाबाबत किंवा कुपोषणासंदर्भात माझं काम सुरू आहे".
पक्ष सोडण्याचा विचार आहे का? यावर प्रश्नावर सावंत यांनी सूचक उत्तर दिलं. ते म्हणाले "कुठलंही काम करताना राजकीय व्यासपीठ असेल तर ते काम करणं अधिक सोपं होतं. शिवसेना पक्षाकडून या परिस्थितीत माझ्या वैद्यकीय अभ्यासाचा वापर करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. मला पदाचं आश्वासन देऊनही दीड वर्ष उलटलं पण अद्याप मला जबाबदारी दिली नाही. शिवसेना पक्षात नवीन चेहर्यांना संधी देण्याबाबत आमचं काहीच मत नाही. पण शेवटी अनुभवही महत्त्वाचा असतो. इतर नेत्यांचं मला माहिती नाही पण मला जबाबदारी हवी आहे. मी इतक्यात निवृत्त होणार नाही."
कोणी व्यक्त केली होती नाराजी?
मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दांडी मारली होती. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचं पाहायला मिळालं.
उस्मानाबाद जिल्हा परिषदेत तानाजी सावंत यांनी भाजपशी केलेल्या हातमिळवणीमुळे अध्यक्षपदी राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थक अध्यक्षपदी आणि तानाजी सावंत यांचे पुतणे उपाध्यक्ष पदी विराजमान झाले. त्यामुळे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला फोल ठरला. त्यानंतर मला मंत्री पद मिळायला हवं होतं पण मी नाराज नाही अशी प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी दिली होती.

फोटो स्रोत, facebook
कॉंग्रेसमधून आलेल्या अब्दुल सत्तार यांना मंत्रीपद मिळालं पण राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले माजी मंत्री भास्कर जाधव यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज होते. "हो मंत्री पद न मिळाल्यामुळे मी नाराज आहे," असं भास्कर जाधव यांनी उघडपणे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं.
त्यानंतर उध्दव ठाकरे गणपतीपुळे विकास आराखडा भूमिपूजन प्रसंगी रत्नागिरीला गेले असताना व्यासपीठावर भास्कर जाधव हे मागे उभे होते. ठाकरे यांच्या सत्कारावेळी विनायक राऊत यांनी भास्कर जाधव यांचा हात पकडून त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी विनायक राऊत यांचा हात झटकला. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये चित्रित झाला होता. त्यानंतर भास्कर जाधव हे कुठेही दिसले नाहीत.
नाराजीचा फायदा भाजपला?
या नाराजीचा भाजप फायदा करून घेऊ शकतं का? या प्रश्नाचं उत्तर आम्ही काही राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ पत्रकार संजीव शिवडेकर सांगतात, "जेष्ठ नेत्यांचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. पण त्यांना गेली अनेक वर्षे मंत्रिपदं मिळत आली. आता नवीन चेहर्यांना संधी दिली. या नाराजीचा फटका म्हणण्यापेक्षा झळ शिवसेनेला बसू शकते. पण मोठ्या प्रमाणात भाजपला याचा काही फायदा मिळेल असं वाटत नाही. शिवसेनेचे हे जेष्ठ नेते या वयात पक्ष सोडणार नाहीत. जरी सोडला तरी नवीन पिढीमध्ये या नेत्यांचे फार समर्थन नाहीत. त्यामुळे हे नेते काही प्रमाणात दबावाच्या राजकारणापलिकडे फार काही सरकारला फटका बसेल असं वाटत नाही. "
राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात," भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी जितकं संख्याबळ आवश्यक आहे तितकं शिवसेनेच्या नाराजांमधून मिळणं शक्य नाही. शिवसेना नेत्यांच्या तक्रारी, कुरबुरी, भाजप नेत्यांच्या गाठीभेटी यापलिकडे शिवसेनेतल्या नाराजांचा भाजपला फायदा होईल असं वाटतं नाही आणि आता तशी परिस्थितीही नाही."
ज्येष्ठ नेत्यांची नाराजी आहे का आणि त्याबद्दल पक्ष काय करत आहे, असं विचारल्यावर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









