उद्धव ठाकरेंची शिवसेना आधीपेक्षा मवाळ झालीये का?

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, FACEBOOK/UDDHAV THACKERAY

    • Author, दीपाली जगताप
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज ५४ वा वर्धापन दिन आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बाळासाहेब ठाकरेंच्या 'जहाल' शिवसेनेचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. पण आजची शिवसेना ही बाळासाहेबांची 'जहाल' सेना राहिली आहे का? की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात ती 'मवाळ' झाली आहे? याविषयी आज मतमतांतरं आहेत.

शिवसेना हा एकाधिकारशाहीने चालत आलेला राजकीय पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना उभी राहिली असली तरी ठाकरे कुटुंबातल्या सदस्याने थेट सरकारचा भाग होऊन मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसण्याची ही पहिलीच वेळ आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच वर्धपान दिन आहे.

मराठी बाणा आणि कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी असलेली शिवसेना आज धर्मनिरपेक्षतेची भूमिका असलेल्या काँग्रेससोबत महाराष्ट्रात सरकार चालवत आहे. म्हणूनच बाळासाहेबांची शिवसेना ते उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये बरंच ट्रान्सफॉर्मेशन झालं आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन किती आणि कसं झालं आहे? यासाठी शिवसेनेच्या वाघाला वाघनखं कापावी लागली आहेत का?

शिवसेनेतील बदलाची गोष्ट

1966 मध्ये शिवसेनेचा जन्म झाला. प्रबोधनकार ठाकरेंच्या उपस्थितीत काही मोजक्या सहकाऱ्यांसोबत बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. सर्व काही मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी या मूळ हेतूने जन्माला आलेल्या शिवसेनेने १९८० पासून हिंदुत्ववादाची भूमिका जाहीरपणे घ्यायला सुरुवात केली. तेव्हापासून अगदी गेल्या वर्षभरापर्यंत शिवसेना कट्टर हिंदूत्ववादी पक्ष आहे हे लोकांच्या मनात बिंबवण्यात सेनेला यश आलं.

कोरोना
लाईन

३० वर्षांहून अधिक काळ शिवसेना आपला मित्र पक्ष भारतीय जनता पार्टीसोबत युतीत होता. पण गेल्या पाच वर्षांत शिवसेनेची युतीत घुसमट होऊ लागली. मित्र पक्षासोबत संसाराचा गाढा चालवणं शिवसेनेला अशक्य वाटू लागलं.

२०१४ च्या लोकसभा निवडणूकीनंतर भाजप शिवसेनेवर कुरघोडी करू लागली. बाळासाहेबांनी कधीच भाजपला वरचढ ठरू दिलं नव्हतं. बाळासाहेबांनी भाजपला छोटा भाऊ म्हणूनच वागणूक दिली.

पण २०१४ नंतर परिस्थिती बदलू लागली. 'ठाकरे विरुद्ध ठाकरे' पुस्तकाचे लेखक धवल कुलकर्णी सांगतात, "विरोधकांसहीत मित्रपक्षालाही संपवायची भाजपची रणनीती शिवसेनेच्या लक्षात येऊ लागली. जेव्हा मित्रपक्षातील शिवसैनिकांनाच फोडण्याचे प्रयत्न भाजप करू लागली तेव्हा शिवसेना संपेल अशी भीती पक्षाला होती." शिवसेना टिकवण्यासाठी शिवसेनेतील पहिल्या फळीतील नेत्यांच्या हालचाली तेव्हाच सुरू झाल्या.

बाळासाहेब ठाकरे

फोटो स्रोत, Getty Images

काँग्रेसच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार अगदी २०१४ पासूनच राज्यात वेगळ्या समीकरणांची चाचपणी करायला काही नेत्यांनी सुरुवात केली होती.

"भाजप इतकाच कट्टर हिंदुत्वाचा नारा महाराष्ट्रात देणारा शिवसेना एकमेव पक्ष होता. त्यामुळे भाजपच्या नैसर्गिक वाढीत अडचण येत होती. तर दुसऱ्या बाजूला युतीची सत्ता असूनही शिवसेनेच्या मंत्र्यांची कामं होत नव्हती. त्यामुळे युतीत असूनही शिवसेनेची कोंडी होत असल्याचं स्पष्ट दिसून येत होतं," असं धवल कुलकर्णी सांगतात.

अखेर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेच्या वाटाघाटीची वेळ आली आणि मुख्यमंत्रिपदावरून बोलणी फिस्कटली. शिवसेना अस्तित्व टिकवण्यासाठी युतीतून बाहेर पडली आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले.

भाजपसोबतचा वाद शिगेला पोहचला होता. तर दूसऱ्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी तडजोड करावी लागणार होती.

पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांच्या 'चेकमेट - हाऊ बीजेपी वोन अँड लॉस्ट' या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओक इथं झालेल्या बैठकीत एक मोठा निर्णय झाला. शरद पवारांनी शिवसेनेला हिंदुत्ववादाचा 'टोन डाऊन' करण्याचा सल्ला दिला.

याकाळात सर्व चक्र फिरली. दिवस-रात्र 'मातोश्री'वर खलबतं सुरू होती. बैठकांचं सत्र सुरू झालं. काही दिवसांतच राजकीय समीकरणं बदलत गेली. एका नव्या शिवसेनेचा जन्म झाला.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, FACEBOOK/UDDHAV THACKERAY

ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत सांगतात, "कोणत्याही राजकीय पक्षाला बदलावंच लागतं, नाहीतर त्याचा ऱ्हास होतो. त्यानुसार शिवसेनेमध्येही बदल झाले. राडेबाजी करणारी शिवसेनेची भूमिका आता विधायक प्रक्रियेने पुढे जाऊ लागली आहे. सत्तेत येण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी हा बदल शिवसेनेसाठी अपरिहार्य होता."

उद्धव ठाकरे : मीतभाषी की धाडसी?

उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे आक्रमक दिसत नसले तरी ते धाडसी आहेत. तसे नसते तर आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढण्यापासून ते काँग्रेससोबत आघाडी करून स्वत: मुखमंत्रिपदावर विराजमान होण्यापर्यंतचे आव्हान त्यांनी स्वीकारलं नसतं. याचे संदर्भ शिवसेनेच्या इतिहासातही दिसून येतात.

४६-४७ वर्षं बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत सक्रिय राहिले. आजही शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांचंच नाव घतेलं जातं. १९९० दशकात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत काम करायला सुरुवात केली. "१९९९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यास आपली हरकत नसल्याचं जाहीरपणे बोलून दाखवलं होतं," असं धवल सांगतात.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे शिवसेना सांभाळू शकतील का? अशी शंका त्यावेळी अनेकांनी उपस्थित केली होती. आक्रमक शिवसैनिकांना एक मीतभाषी नेतृत्व लाभलं होतं. त्यावेळी राज ठाकरे यांची 'जहाल' भाषणं ऐकणारा वर्ग उद्धव ठाकरेंची तुलना राज ठाकरेंशी करत होता.

"उद्धव ठाकरेंनी आपल्या निवडक विश्वासू सहकाऱ्यांच्या मदतीने शिवसेनेचं नेतृत्व तर सांभाळलंच शिवाय शिवसेनेला थेट मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचवलं. जे बाळासाहेबांच्या काळातही जमलं नाही ते उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं," असं भारतकुमार राऊत सांगतात.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, FACEBOOK/UDDHAV THACKERAY

उद्धव ठाकरेंच्या स्वभाव प्रकृतीमुळे शिवसेना बदलत चालली आहे का आणि या बदलाचे कोणते परिणाम शिवसेनेला भोगावे लागतील हे लगेचच सांगता येणार नाही. कारण शिवसेनेला महाविकास आघाडीसोबत सत्तेत येऊन अवघे काही महिने झाले आहेत.

पण असं असलं तरी शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. यावर राऊत सांगातात," बाळासाहेबांसोबत असलेला शिवसैनिक आता साठी ओलांडतो आहे. त्यामुळे तो काळ गेलाय असं म्हणायला हरकत नाही. पण असं असलं तरी खेड्यापाड्यातला शिवसैनिक हा भगव्या झेंड्यामुळेच शिवसेनेशी जोडलेला होता. जर शिवसेनेला हिंदुत्ववाद टिकवता आला नाही किंवा एखादी नवी भूमिका ठरवता आली नाही तर मात्र उद्धव ठाकरेंची भविष्यात लोकांचा विश्वास मिळवण्यात अडचण होऊ शकते."

शिवसेनेला वेगळी भूमिका नाही. त्यांची स्वत:ची ठोस विचारसरणी नाही, असं कम्युनिस्ट नेते एस. ए. डांगे एकदा एका भाषणात म्हणाले होते. हेच मत पत्रकार धवल कुलकर्णी यांचंही आहे.

ते म्हणतात, "शिवसेनेला विचारसरणीच नाही. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असता तर मराठी माणसासाठी त्यांनी मुंबईत गुजरात्याविरोधात आंदोलन केलं नसतं. त्यामुळे मराठीची भूमिका सोडली तर शिवसेनेला विचारधारा नाही."

पण अयोध्येतील राम मंदिराबाबत शिवसेनेने जी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे देशभरात शिवसेनाला हिंदुत्ववादी पक्ष म्हणूनच ओळखलं जातं. पण आता हाच पक्ष काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनेच्या हिंदुत्ववादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय.

"सावरकरांना जेव्हा भारतरत्न देण्याची मागणी केली गेली तेव्हा शिवसेना तटस्थ राहिली. यामुळे सत्तेसाठी शिवसेना आपल्या विचारांशी तडजोड करते, असा संदेश जनमानसात गेलाय," असं मत भारतकुमार राऊत यांनी मांडलंय.

शिवसेना विचारसरणीबाबत संभ्रमात?

शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही धर्मनिरपेक्ष विचारसरणी असलेल्या पक्षांसोबत सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेनेची नेमकी आता विचारसरणी काय? भविष्य काय? कोणत्या दिशेने वाटचाल करायची असा प्रश्न शिवसैनिकांमध्ये आहे.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, FACEBOOK/UDDHAV THACKERAY

शिवसेना गेल्या कित्तेक वर्षांपासून काँग्रेसचा विरोध करत आली आहे. त्याच काँग्रेससोबत शिवसेना आज सत्तेत आहे. ज्या सोनिया गांधी,राहूल गांधी विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनं केली त्या हायकमांडच्या आता भेटीगाठीही घ्याव्या लागतात. त्यामुळे स्थानिक पातळीवरही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत जुळवून घेणं शिवसैनिकांसाठी जिकिरीचे आहे.

"शिवसैनिक हा स्वभिमानी माणूस आहे. त्यामुळे ही तडजोड शिवसैनिकांसाठी कठीण आहे. म्हणूनच आज कोरोनाच्या काळातही एकनाथ शिंदे हा एक नेता सोडला तरी एकही शिवसेनेचा नेता रस्त्यावर उतरून काम करताना दिसत नाही. शाखा प्रमुख, पदाधिकारी यांनी लोकांसाठी केलेली कामं म्हणजेच जनतेसाठी शिवसेनेनं केलेली कामं होती," असं राऊत सांगतात. त्यामुळे शिवसैनिकांमधला संभ्रम वाढण्याआधी शिवसेनेला आपली विचारसरणी, भूमिका आणखी ठळकपणे सांगण्याची गरज आहे.

शिवसेना पुन्हा प्रादेशिकवादाकडे?

आताचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे असले तरी आदित्य ठाकरे हे त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन पक्षात सक्रिय आहेत, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे शिवसेनेचे वर्तमान आणि भविष्य काय याविषयी चर्चा करत असताना उद्धव आणि आदित्य ठाकरे दोघांची भूमिका लक्षात घ्यायला हवी.

बाळासाहेबांनी ज्या मुद्याला उचलून शिवसेना पक्ष स्थापन केली तोच मुद्दा आता शिवसेनेला तारणार का? शहरांमध्ये मराठी माणसासोबतच भूमीपुत्र असलेल्या इतर भाषिकांच्या प्रश्नातही हात घालणार का? थोडक्यात काय तर महाराष्ट्रवाद हाच शिवसेनेची भूमिका असणार आहे का?

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात, "शिवसेनेला आता ६०-७० च्या दशकाप्रमाणे पुन्हा मराठी अस्मितेच्या मुद्द्याकडे वळावे लागणार आहे."

खरं तर हीच भूमिका सत्तास्थापनेच्या आधी शिवसेनेने घेतली. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर वारंवार टीका करत असताना दिल्लीपुढे महाराष्ट्र झुकणार नाही, हा नारा शिवसेनेने पुन्हा दिला. यात सेनेला यशही मिळालं.

"दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र हे कार्ड राजकारणात कायम चांगला निकाल देणारं आहे. आज महाराष्ट्राला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे उद्धव ठकरे यासाठी दिल्लीला कसे हाताळतात हे महत्त्वाचं आहे. तसंच यानिमित्ताने प्रादेशिक वादासाठी आक्रमक भूमिका घेण्याची ही शिवसेनेकडे चालून आलेली संधी आहे," असं धवल कुलकर्णी सांगतात.

कोरोनाच्या आरोग्य संकटात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठी आव्हानं आहेत. सबंध महाराष्ट्राच्या नजरा त्यांच्या निर्णय प्रक्रियेवर आहेत. त्यामुळे ही त्यांच्यासाठी एक संधीही आहे. राज्यासमोर आलेलं आर्थिक संकट, बेरोजगारी, गरीबी, शिक्षण यातून ते महाराष्ट्राला कसे सावरतात, यावरही बरंच काही अवलंबून आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)