उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे पिता-पुत्रांवर ‘बेडूक’ म्हणून टीका का केली?

शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप खासदार नारायण राणे यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवीन नाही. राणेंनी शिवसेना सोडून अनेक वर्षं लोटली. पण, उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील युद्ध अजूनही संपलेलं नाही. निवडणूक, रॅली किंवा पत्रकार परिषद असो. उद्धव ठाकरे आणि राणे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.
रविवारी (ऑक्टोबर 25) शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पुत्रांवर बोचरी टीका केली. त्यावर प्रत्युत्तर देताना नारायण राणे यांनी थेट सुशांत सिंह प्रकरणी आदित्य ठाकरे कोठडीत जातील असा आरोप केला. यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे, महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध राणे हा वाद शमणार अशी चिन्ह दिसत नाहीत.
राणे पिता-पुत्रावर 'बेडूक' म्हणून टीका
"सद्या एक बेडूक आणि त्यांची दोन पोरं या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात, उड्या मारत आहेत," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राणे पिता-पुत्रावर 'बेडूक' म्हणून बोचरी टीका केली. 'बेडूक' कधीच वाघ बनू शकत नाही, असंही ते पुढे म्हणाले.
सुशांत सिंह मत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंवर आरोप
उद्धव ठाकरेंनी राणे पिता-पुत्रावर केलेल्या या थेट शाब्दिक हल्ल्याला किनार आहे ती राणे पिता-पुत्रांनी युवासेनाप्रमुख आणि मंत्री आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांची.

फोटो स्रोत, @AUThackeray
सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियनच्या मृत्यूनंतर राज्याच्या एका तरूण मंत्र्याला वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबलं जात आहे, असा आरोप नारायण राणेंनी केला. राणेंचा इशारा अप्रत्यक्षरित्या आदित्य ठाकरेंकडेच होता.
त्यावर आदित्य ठाकरेंनी 'मी संयम ठेवलाय' माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही, अशा शब्दांत राणेंचे आरोप खोडून काढले होते. आदित्य ठाकरेंनी आरोपांचं खंडन केलं असलं तरी, राणे पिता-पुत्राकडून आदित्य ठाकरेंवर होणारे आरोप बंद झालेले नाहीत.
आदित्य कोठडीत जाणार-राणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या आरोपांवर बोलताना भाजप खासदार नारायण राणे म्हणाले, "सीबीआयने रिपोर्ट दिलेला नाही. यांनी आदित्य ठाकरेंना स्वत:च क्लिन चीट देऊन टाकली. सुशांतची आत्महत्या नाही, हा खून आहे. सीबीआयच्या तपासात या राज्यातील एक मंत्री आत जाईल. तो त्यांचा पुत्र असेल."
उद्धव ठाकरेंनी राणेंना बेडूक म्हंटलं होतं. त्यावर बोलताना राणे म्हणाले, "मला बाळासाहेबांनी खूप पदं दिली. मला मुख्यमंत्री केलं होतं. ते बेडूक म्हणून नाही, तर वाघ म्हणून. हा पुळचट माणूस आहे."
पहिल्यांदाच थेट ठाकरेंवर टीका
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआयने चौकशी सुरू केल्यानंतर 'अब पेंग्विन तो गयो'…असं ट्विट नितेश राणेंनी केलं. तर, ट्विटरवर #पेंग्विन नावाने ट्रेन्ड चालवण्यात आला.
राजकीय वर्तुळात पेंग्विन हा शब्द आदित्य ठाकरेंना संबोधित करून वापरण्यात आल्याची चर्चा सुरू झाली. आरोप ठाकरे कुटुंबातील व्यक्तीवर होत असल्याने उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात, 'बिहारच्या पुत्रासाठी गळे काढता, आणि महाराष्ट्रच्या पुत्रावर चिखलफेक करता' 'ठाकरे सरकारवर, आदित्यवर तोंडात शेण कोंबून गोमूत्राच्या गुळण्याकरून तुम्ही थुंकलात' अशी टीका त्यांनी राणे आणि भाजप नेत्यांवर केली.
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचला ठाकरे-राणे वाद?
उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंच्या या शाब्दिक युद्धावर बोलताना सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर म्हणतात,

फोटो स्रोत, Getty Images
"ठाकरे आणि राणे हा वाद फक्त उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंपुरता आता मर्यादित राहीलेला नाही. हा वाद ठाकरे आणि राणे कुटुंबाच्या दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचला आहे. आदित्य ठाकरे आणि नितेश राणे आता राजकारणात आमने-सामने आहेत. येणाऱ्या काळात या वादाचा आणखी एक अंक पाहायला मिळेल."
तर राजकीय पत्रकार श्रुती गणपत्ये यांचं ठाकरे-राणे वादावर वेगळं मत आहे. त्या म्हणतात, ठाकरे विरुद्ध राणे हा वाद खूप जूना आहे. राणेंनी उद्धव ठाकरेंवर असलेल्या नाराजीमुळे शिवसेना सोडली हे सर्वांना माहीत आहे. पण सद्य परिस्थितीत या वादाचा परिणाम जास्त होताना पाहायला मिळणार नाही.
"वैयक्तिक किंवा शाब्दिक टीका करमणूक म्हणून किंवा निवडणुकीच्या भाषणात टाळ्या मिळवण्यासाठी चांगल्या असतात. पण, कोव्हिडच्या या काळात बदललेल्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत याचा लोकांवर फारसा परिणाम होईल असं वाटत नाही. राणे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी ठाकरे सरकारच्या धोरणांवर अभ्यास करून टीका केली. तर, लोकांना त्यामध्ये जास्त रस वाटेल," असं त्या पुढे म्हणाल्या.
ठाकरे-राणे पहिला वाद
उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंमध्ये वादाची पहिली ठिणगी पडली 1999 साली. नारायण राणेंना मुख्यमंत्री केल्यामुळे उद्धव ठाकरे खूष नव्हते. त्यानंतरच्या काळात राणेंना शह देत उद्धव ठाकरेंनी अनेक निर्णय घेतले. त्यामुळे राणे नाराज झाले होते.
2003 ची महाबळेश्वरची कार्यकारिणी
2003 मध्ये शिवसेनेची राज्य कार्यकारिणी पार पडली. यात राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचं कार्यकारी प्रमुख म्हणून नाव पुढे केलं. नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंच्या नावाच्या प्रस्तावाला विरोध होता. पण, राणेंचा विरोध डावलून उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. यानंतर ठाकरे विरुद्ध राणे या राजकीय संघर्षास सुरूवात झाली.
"शिवसेनेत उद्धव ठाकरेंचा उदय सुरू झाला. ठाकरेंना शिवसेनेवर आपली पकड दाखवायची होती. हळूहळू उद्धव ठाकरेंनी आपली पकड घट्ट केली. उद्धव ठाकरे आणि नारायण राणेंचे सूर कधीच जुळले नाहीत. दोघांची काम करण्याची पद्धत वेगळी होती. त्यामुळे ठाकरे-राणे वाद सुरू झाला," असं मृणालिनी नानिवडेकर पुढे म्हणतात.
'पक्षात पदांचा बाजार मांडला जातोय..'
2004 मध्ये राणे विरोधीपक्षनेते होते. राजकीय विश्लेषकांच्या माहितीनुसार, रंगशारदामध्ये झालेल्या सभेत राणेंनी पक्षात पदांचा बाजार मांडला जात असल्याचं विधान केलं. त्यांचं टार्गेट होतं कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे. पण, बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.

फोटो स्रोत, Getty Images
ठाकरे-राणे वादावर बोलताना वरिष्ठ पत्रकार उदय तानपाठक म्हणतात, "शिवसेनेवरच कब्जा करण्याचं कारस्थान राणे यांनी रचलं आहे, असं उद्धव ठाकरे यांना वाटत होतं. शिवसेनेत फूट पाडण्याची तयारी राणे यांनी चालवली असल्याची चर्चाही तेव्हा दबक्या आवाजात सुरू होती. उद्धव यांच्या हाती शिवसेनेची धुरा देताना त्यांच्या मार्गात कोणताही अडथळा बाळासाहेब ठाकरे यांना नको होता. त्यातूनच उद्धव आणि त्यांच्या जवळच्या नेत्यांनी राणे यांची उपेक्षा सुरू केली. महत्त्वाकांक्षी राणे हे सहन करणे शक्यच नव्हतं."
उद्धव ठाकरेंविरोधातील भाजपचं हत्यार?
मृणालिनी नानिवडेकर पुढे म्हणतात, "शिवसेना-भाजप एकत्र असेपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी त्यांना फार महत्त्व दिलं नाही. उलट राणेंनी संयम पाळावा असा सल्ला दिला. शिवसेनासोबत असताना उद्धव ठाकरे आणि राणे वाद नको असा भाजप नेत्यांचा प्रयत्न होता. पण, शिवसेनेने वेगळी चूल मांडल्यानंतर भाजपला उद्धव ठाकरेंवर सोडण्यासाठी नारायण राणे नावाचं शस्त्र मिळालं."
शिवसेना सोडल्यानंतर राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आक्रमक वृत्ती, सडेतोड भाषा यामुळे काँग्रेसच्या विचारांशी जोडून घेण्यात राणेंना अनेक अडचणी आल्या. पक्षात किंमत नाही असं म्हणत त्यांनी काँग्रेस सोडून स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर आपला पक्ष त्यांनी भाजपत विलीन केला.
"नारायण राणे वैक्यक्तिक रित्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात आहेत. त्यांचा उद्धव ठाकरेंबद्दलचा राग भाजप वापरण्याचा पूरेपूर प्रयत्न करत आहे. पक्षाची लाईन असो वा स्वत:ची भूमिका. नारायण राणेंच्या रागाचा वापर भाजप उद्धव ठाकरेंवर सतत टीका करण्यासाठी करत राहील," असं श्रुती गणपत्ये यांना वाटतं.
तर उदय तानपाठक यांच्यानुसार, "राणे खासदार आहेत. उद्धव ठाकरेंवरचे आरोप म्हणजे राजकीय अस्तित्व टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपने राणेंचा वापर उद्धव ठाकरेंविरोधात सुरू केलाय. राणे जेवढे आक्रमक होतील तेवढं त्यांची बाजू राजकीय दृष्ट्या जमेची होईल. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर आरोप करणं राणेंच्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे."
भाजपमध्ये आपले स्थान बळकट करायचे असेल, तर राणेंना शिवसेनेविरुद्ध बोलत रहावे लागेल, असं तानपाठक यांना वाटतं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








