पंकजा मुंडे यांच्या महत्त्वाकांक्षांना वास्तवाची साथ मिळेल का?

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, PAnkaja munde twitter

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"आपल्याला एक दिवस शिवाजी पार्क भरवायचं आहे. एकदातरी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेऊन दाखवणारच"...! पंकजा मुंडे यांनी भगवान गडावर केलेल्या भाषणात ही महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आणि कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष झाला.

या भाषणात बोलताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्या मनात सुरू असलेली पुढची राजकीय रूपरेषा बोलून दाखवली. एका वर्षापूर्वी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पहिल्यांदाच त्या भगवान गडावर दसरा मेळाव्यात बोलत होत्या.

पंकजा मुंडे यांचं राजकारण संपलं, त्या पक्षांतर करणार का? या चर्चेला उत्तर देताना त्या म्हणाल्या, "खूप चर्चा झाली मी राजकारण सोडलं घरी बसले. पण राजकारण सोडलेलं नाही. मी घर बदलणार नाही जिथे आहे तिथेचं राहणार आहे," असं म्हणत पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिला.

निवडणूकीत पराभूत झाल्याची सल त्यांनी बोलून दाखवली पण यावेळी कार्यकर्त्यांना धीर सोडू नका मी संपलेली नाही हा आत्मविश्वास त्यांच्या भाषणातून दाखवून दिला.

"रात्र वैर्‍याची आहे त्यामुळे सजग राहावंच लागेल. आपली वज्रमूठ कायम असेल तर मोठी सत्ताही हादरते हे लक्षात असू द्या. धर्मकारण आणि राजकारण याची सांगड घालून आपल्याला पुढे जायचं आहे. राज्यात 120 आमदार निवडून आणायचे आहेत. बीड माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी जिथे आहे तिथेचं आहे. मी शर्यतीतही असेन. चक्रव्यूह कसा भेदायचा हे मला चांगलंच माहीत आहे,"असं म्हणत त्यांनी पक्षातल्या आणि विरोधी पक्षातल्या सर्व राजकीय विरोधकांना सूचक इशारा दिला.

यानिमित्ताने पंकजा मुंडे यांनी भाषणातून व्यक्त केलेल्या या महत्त्वाकांक्षा भाषणापुरतीच मर्यादित राहतील की त्यांना वास्तवाची साथ मिळेल? हा प्रश्न उपस्थित झालाय.

कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणारं भाषण?

पंकजा मुंडे यांनी राजकीय मुद्यांबरोबर ऊसतोड कामगार, शेतकऱ्यांना केली जाणारी मदत या सामाजिक मुद्यांनाही हात घातला. अनेक महिन्यांनंतर पंकजा मुंडे यांच्या राजकीय भाषणाची चर्चा होतेय.

पराभूत झाल्यानंतर कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याची गरज असते. तसंच काहीसं पंकजा मुंडे यांचं भाषण असल्याचं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात.

"पंकजा मुंडे बर्‍याच दिवसांनी कार्यकर्त्यांसमोर मोकळेपणाने बोलताना दिसल्या. त्यांच्यात एक आत्मविश्वास दिसला. भविष्याचं माहिती नाही पण कार्यकर्त्यांमध्ये राजकीय ऊर्जा निर्माण करण्यासाठी हे भाषण निश्चित फायदेशीर ठरेल."

लोकमतचे सहाय्यक संपादक संदिप प्रधान म्हणतात, "कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी नेत्यांना काहीवेळा अतिरंजित भाषणं करावी लागतात ते पंकजा मुंडे यांनी केलं".

पंकजा मुंडेंचं आतापर्यंतचं भावनिक राजकारण?

2009 साली गोपीनाथ मुंडे हे बीडमधून लोकसभेवर निवडून गेले. बीडमधल्या स्थानिक राजकारणात मुंडेचे वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे बघितलं जात होतं. पण अचानक विधानसभा निवडणुकीत धनंजय यांना डावलून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावेळी अधिकृतपणे पंकजा मुंडे यांची राजकीय पटावर 'एन्ट्री' झाली. 2009 ते 2014 हा पंकजा यांचा काळ वडिलांच्या छत्रछायेखाली गेला.

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Facebook/Pankaja Munde

2014 ला गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर पंकजा यांचा थेट संघर्ष चुलत भाऊ धनंजय मुंडे यांच्याशी सुरू झाला. गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर पाच महिन्यांत विधानसभा निवडणुका होत्या. त्यावेळी पंकजा यांनी संघर्ष यात्रा काढली. गोपीनाथ मुंडेंनंतर स्वत: चं अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्याचा फायदा भाजपला झाला. पंकजा मुंडे मोठ्या मताधिक्याने विधानसभेत निवडणून गेल्या.

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये ग्रामविकास, महिला आणि बालकल्याण, जलसंधारण या खात्यांचं कॅबिनेट मंत्रिपद त्यांना मिळालं.

विधानसभा निवडणुकीनंतर वैद्यनाथ साखर कारखाना आणि वैद्यनाथ बँक या स्थानिक निवडणुकीतही पंकजा विरूद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष झाला. त्यात पंकजा मुंडे यांनी यश मिळवलं. राज्य पातळीवर त्या भाजपचा चेहरा बनू लागल्या. पंकजा मुंडे यांच्या महत्त्वाकांक्षां वाढू लागल्या.

मे 2015 मध्ये "मला प्रत्यक्षात मुख्यमंत्री होता आलं नसलं तरी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मीच आहे". असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आणि राज्यातल्या भाजप नेतृत्वालाच आव्हान दिलं. त्यानंतर पंकजा मुंडे यांचे भाजपले आणि पक्षाबाहेरचे शत्रू वाढत गेले.

अपयशाच्या दिशेने वाटचाल?

जुलै 2015 मध्ये पंकजा मुंडे यांच्यावर 206 कोटी रूपयांचा चिक्की घोटाळा केल्याचा आरोप झाला. विधीमंडळात पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे असा संघर्ष बघायला मिळाला.

चिक्की घोटाळ्याचा आरोप पंकजा मुंडे यांच्या जिव्हारी लागला. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या राजकारणाला उतरती कळा लागल्याचं चित्र दिसलं.

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण-भावाच्या संघर्षामुळे बीडच्या स्थानिक निवडणुकांकडेही राज्याचं लक्ष लागलेलं असतं.

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Facebook/Pankaja Munde

डिसेंबर 2015 मध्ये झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी 33 पैकी 27 जागांवर यश मिळवत वर्चस्व राखलं.

2017 च्या जिल्हापरिषद निवडणूकीत पुन्हा राष्ट्रवादीने सर्वाधिक जागा मिळवल्या आणि भाजप दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष राहीला. पण सुरेश धस यांची साथ मिळवून पंकजा यांनी सत्ता खेचून आणली.

मे 2017 मध्ये अनेक वर्षं गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात असलेली कृषी उत्पन्न बाजार समिती पंकजा मुंडे यांच्या हातातून निसटली.

राज्याच्या राजकारणात पंकजा यांच्या वाढलेल्या महत्त्वाकांक्षा आणि चिक्की घोटाळ्याचे आरोप यामुळे त्यांचं महत्त्व कमी करण्यात आलं. पंकजा मुंडे यांच्याकडे असलेलं जलसंधारण हे खातं काढण्यात आलं.

त्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातल्या मतभेदाच्या चर्चा समोर येऊ लागल्या. पंकजा मुंडे यांचा जनसंपर्क कमी होत गेला. त्या कार्यकर्त्यांसाठी 'अनरिचेबल' असल्याचं बोललं जाऊ लागलं. याचाचं परिणाम 2019 विधानसभा निवडणुकीत दिसला. पंकजा मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी पराभूत केलं.

याचं विश्लेषण करताना मॅक्स महाराष्ट्रचे संपादक रविंद्र आंबेकर सांगतात, "पंकजा यांच्या राजकारणात जोश आहे, पण स्ट्रॅटेजीची कमतरता जाणवते. भावनिक आणि सिझनल राजकारण हे फार काळ टिकत नाही त्याला सातत्य लागतं. ते पंकजा मुंडेंकडे दिसत नाही."

पंकजा मुंडेंच्या राजकारणाला पुन्हा झळाळी मिळेल?

आतापर्यंतच्या पंकजा मुंडे यांच्या राजकारणात स्वत:वर झालेला अन्याय, गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई आणि भाषणातली आक्रमकता यावर भर दिलेला दिसून आला.

यावर आंबेकर सांगतात, "भगवानगडाच्या माध्यामातून जिल्हयातल्या 15-20 जागांवर प्रभाव टाकण्याची राजकीय रणनिती असायची, पण पंकजा यांना ती रणनीती टिकवता आला नाही. त्याचबरोबर त्या ओबीसी समाजाबद्दल आक्रमक झालेल्या दिसल्या नाहीत. त्यांनी हाती घेतलेले मुद्दे हे नंतर रणनितीतून गायब झालेले बघायला मिळाले.

"गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. त्यामुळे कितीही राजकारण झालं तरी त्यांना डावलणं शक्य झालं नाही. जर पंकजा मुंडे यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांची राजकीय ताकद वाढवली तर निश्चितपणे त्यांच्या महत्वाकांक्षा वास्तवात उतरू शकतात. कारण लोकनेत्याची ताकद डावलणं हे तितकसं सोपं नसतं," आंबेकर सांगतात.

पंकजा मुंडे

फोटो स्रोत, Pankaja Gopinath Munde/fb

पंकजा मुंडे यांनी आता राज्याच्या दौर्‍याचीही घोषणा केली आहे. तिथून पंकजा यांच्या राजकारणाला नवी सुरवात होईल का?

यावर लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, "राजकारणात कोणी एका पराभवामुळे संपत नसतं. पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचा चेहरा आहेत. त्यांना एका मोठ्या राजकीय घराण्याचा वारसा आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कामांची पुण्याईही आहे. सध्या त्या राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी बोलल्याप्रमाणे जर मेहनत केली तर निश्चितच त्या पुन्हा राजकारणात मजबूतीने उभ्या राहू शकतात."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)