अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी 5 दिवस छापे, निष्पन्न काय झालं? - शरद पवारांचा सवाल

केंद्रात सत्ता असणाऱ्यांना सामान्यांच्या प्रश्नाविषयी आस्था नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याच्या आरोप पवारांनी पुन्हा एकदा केलाय. ते पिंपरी-चिंचवड येथे बोलत होते.

यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या बहिणींच्या घरी आयकर विभागानं टाकलेल्या छाप्याविषयीही मत व्यक्त केलं.

ते म्हणाले, "माझ्या कुटुंबासंदर्भात काही बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. अजित पवारांच्या भगिनींच्या घरी इन्कम टॅक्सचे छापे टाकले. या कारवाईतून काय निष्पन्न झालं माहिती नाही. त्यांच्या घरावर पाच दिवस छापे सुरू होते. या भगिनी मध्यमवर्गीय आहेत. 14-15 लोक घरात छापे टाकत आहेत, असं चित्र पाच दिवस होतं.

"दीड दिवसानंतर काही मिळत नाहीये हे स्पष्ट झालं. त्यांचं वागणं नीट होतं. त्याविषयी तक्रार नाही. पण त्यांना फोन यायचे. तुम्ही तिथेच थांबा असं त्यांना सांगण्यात आलं.

"भगिनींच्या घरी इतके लोक पाठवणं, इतके दिवस छापे सुरू असणं, यात कुठे अजितदादांचं नाव आहे का? यात काही मिळत नाही. चौकशी करायचा अधिकार यंत्रणांना आहे. त्यांचं काम झाल्यावर थांबण्याचं काय प्रयोजन. पाहुणा दोन चार दिवस थांबला तर ठीक, आठवडाभर ठाण मांडून बसला तर विचार करावा लागतो."

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या जावयावर नार्कोटिक्स विभागाने केलेल्या कारवाईबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, "नार्कोटिक्स यंत्रणा अनेकांना माहिती नव्हती. नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केली, त्यांना 5-6 तुरुंगात ठेवलं. कशाशी त्यांचा संबंध नाही सांगत होते.

"दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. ते केंद्र सरकारविरोधी बोलत असतात. त्यांच्या जावयावर आरोप करण्यात आला. ज्या गोष्टींवर बंदी आहे अशा गोष्टी त्यांच्याकडे सापडल्या असा आरोप होता.

"ज्या कारणासाठी त्यांना अटक केली ते कारण होतं- गांजा सापडला अशी तक्रार. गांजा आहे की नाही याची चौकशी केली. हा गांजा नव्हता तर एक प्रकारची वनस्पती होती. ही वनस्पती गांजा नव्हे. न्यायालयाने निष्कर्ष दिला की, गांजा नसतानाही सहा महिने तुरुंगात ठेवलं. यामुळे जामीन देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला.

"नवाब मलिकांच्या जावयाच्या केसमध्ये गोसावी नावाचा पंच होता. गोसावी स्वत: गुन्हेगार असल्याचं स्पष्ट झालं. गोसावी कुठे आहेत हे यंत्रणांना ठाऊक नाही. पुणे पोलिसांनी वॉरंट काढलंय. जे स्वत: गुन्हेगार आहेत त्यांना पंच म्हणून नेमायचं असं केलं जातं."

देशातल्या सीबीआय, ईडी, आयकर विभाग, नारकोटिक्स या सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर केंद्राद्वारे करण्यात येत असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार शरद पवारांनी केलाय. जिथे भाजपची सत्ता नाही तिथे या यंत्रणांच्या माध्यमातून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं पवारांनी म्हटलंय.

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतींबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, " केंद्रातली सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांना प्रश्नासंबंधी आस्था नाही. पेट्रोल-डिझेलच्या दिवशी दररोज वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती कमी झाल्या.

"देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती तशाच राहिल्या. पेट्रोल, डिझेलच्या किमती हा सरकारी उत्पनाचा स्रोत आहे. मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात आम्हाला पेट्रोल, डिझेलचे दर वाढवावे लागले. त्यावेळी दहा दिवस भाजपने संसदेचं काम चालू दिलं नाही. आता सत्ताधारी भाजपचं धोरण बदललं."

देशातल्या कोळसा संकटाबद्दलही शरद पवार यांनी टीका केलीय. ते म्हणाले, "कोळशापासून, हायड्रो वीज, औष्णिक प्रकल्पातून वीज तयार केली जाते. वीजेचे दर कमी करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे ही भूमिका राज्य सरकारने घेतली. केंद्रातील मंत्री दानवे यांनी मतं मांडली. कोळसा पुरवण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री राज्य सरकारवर आरोप करतात. 35,000 कोटी रुपयांचं येणं केंद्राकडून राज्याला येणं आहे."

'राजकीय आकसातून चौकशा करण्यात येत आहेत'

राजकीय नेते आणि त्यांच्या कुटुंबियांवर करण्यात येणाऱ्या कारवाया या राजकीय आकसातून करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केलायय

ते म्हणाले, "शासकीय यंत्रणासंदर्भात तक्रार असेल तर संबंधित यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी, प्रवक्त्यांनी भाष्य करणं समजू शकतो. पण भाजप नेते समर्थनाला पुढे असतात. या कारवाया आकसातून केल्या जातात. महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्यासाठी या कारवाया केल्या जात आहेत. मी येणारच असं काही लोक सांगत होते. ते जमेना म्हणून अस्वस्थ झालेले लोक राज्याला अस्थिर करत होते. राजकीय आकसातून या चौकशा सुरू आहेत."

एकनाथ खडसेंनी भाजप सोडल्यानंतर त्यांच्या आणि कुटुंबियांची चौकशी सुरू झाल्याचं शरद पवार म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)