इराणच्या 'या' ताकदीमुळे डोनाल्ड ट्रम्प मागे हटले आहेत का?

    • Author, रौनक भेडा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध लष्करी कारवाईचा विचार करत आहेत, असं काहीसं दिसून आलं. अमेरिकेने इराणबाबत एक अ‍ॅडव्हायजरी जारी केल्यानंतर ही भीती आणखी वाढली.

कतारने पश्चिम आशियातील अमेरिकेचा सर्वांत मोठा हवाई तळ असलेल्या 'अल-उदेद'वरून काही सैन्य मागे घेण्याचे आदेश जारी केले.

ट्रम्प यांनी असंही म्हटलं होतं की जर इराणने आंदोलकांना फाशी दिली तर अमेरिका कठोर कारवाई करेल, परंतु गुरुवारी संध्याकाळपर्यंत इराणकडून फाशी पुढे ढकलण्यात आल्याची बातमी आली.

त्यानंतर मग ट्रम्प असंही म्हणाले की, "आम्हाला असं सांगण्यात आलं आहे की इराणमधील हत्या थांबल्या आहेत. फाशी देण्याची कोणतीही योजना नाहीये."

गुरुवारी संध्याकाळपर्यंत, पश्चिम आशियातील गरम झालेलं वातावरण थंड होत असल्याचे स्पष्ट झालं. अमेरिकेने कतारमधील त्यांच्या अल-उदेद हवाई तळावरील सुरक्षा सतर्कतेची पातळी कमी केली. या सैन्य तळावर बुधवारी सुरक्षा सतर्कता जारी करण्यात आली होती.

'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने एका सूत्राचा हवाला देत म्हटलं आहे की, बुधवारी या तळावरून काढून टाकण्यात आलेली अमेरिकन लष्करी विमाने आता हळूहळू परत येत आहेत.

पण 'द टेलिग्राफ' या इंग्रजी वृत्तपत्रातील एका बातमीने सर्वांनाच धक्का बसला. त्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की अमेरिकन सैन्य हल्ल्यासाठी तयार नव्हते.

बीबीसी पर्शियनने ब्रिटिश वृत्तपत्र 'द टेलिग्राफ'चा हवाला देत म्हटलं आहे की, "अमेरिकन अधिकाऱ्यांना गुप्तपणे इशारा देण्यात आला होता की मर्यादित पर्याय आणि क्षमतांमुळे देशाचं सैन्य इराणवर हल्ला करण्यास तयार नाही."

या वृत्तानुसार, "असं म्हटलं जातंय की, ट्रम्प यांनी त्यांच्या राष्ट्रीय सुरक्षा पथकाला असे आदेश दिले होते की, त्यांनी तेव्हाच हल्ला करावा, जेव्हा या राजवटीविरुद्ध निर्णायक हल्ला करण्याची हमी असेल."

परंतु अधिकाऱ्यांनी 'एनबीसी न्यूज'ला सांगितलं की ते अशी हमी देऊ शकत नाहीत तसेच त्यांनी इशारा दिला की लष्करी कारवाईमुळे मोठा संघर्ष सुरू होऊ शकतो. जो संघर्ष काही आठवड्यांपर्यंत टिकू शकतो. तसेच, इराणकडूनही यावर तीव्र प्रतिक्रिया येऊ शकते.

परंतु, कारवाई केली जाईल की नाही या सगळ्या द्विधा परिस्थितीमध्ये, 11 जानेवारीच्या 'टाईम मॅगझीन'च्या रिपोर्टमध्येही असेच संकेत देण्यात आले होते.

या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, मोठमोठी वक्तव्यं बाजूला ठेवून पाहिलं तर साधी वस्तुस्थिती अशी आहे की कोणताही लष्करी पर्याय ट्रम्प यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करू शकत नाही.

अमेरिकेने जरी प्रतीकात्मक हल्ला केला तरी तो इतका कमकुवत असेल की त्याचे काहीच महत्त्व राहणार नाही.

जरी हे संकट सध्या तरी टळलेलं असले तरी, संरक्षण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की इराणचं भौगोलिक स्थानचं असं आहे की, ते त्याच्याविरुद्धच्या कोणत्याही लष्करी कारवाईला एक 'प्रतिबंधात्मक संरक्षण' प्रदान करतं.

याशिवाय, गेल्या काही महिन्यांत इराणने आपल्या संरक्षण यंत्रणेतही आमूलाग्र बदल केलेले आहेत.

इराण किती मजबूत आहे?

इराणी लष्कराचे कमांडर-इन-चीफ मेजर जनरल अमीर हतामी यांनी अनेक प्रसंगी हे सांगितलेलं आहे की मागील संघर्षापासून इराणने कशाप्रकारे स्वतःला कितपत मजबूत केलेलं आहे.

रशियाच्या सरकारी वृत्तसंस्थेनुसार, "अमीर हतामी असं म्हणाले आहेत, की जून 2025 मध्ये झालेल्या 12 दिवसांच्या युद्धाच्या तुलनेत आज इराणी सशस्त्र दल खूपच सज्ज आहेत. ते युद्ध इराणी सैन्यासाठी एक अनोखा अनुभव होता. त्यामुळे आमची ताकद वाढली. सैनिकांच्या प्रशिक्षणाची पातळी वाढली आणि वेगवेगळ्या तुकड्यांमधील समन्वयदेखील सुधारला."

"कोणत्याही संभाव्य हल्ल्याला रोखण्यासाठी आणि इराणची सुरक्षा आणि सार्वभौमत्वाचं रक्षण करण्यासाठी इराणने आपल्या सशस्त्र दलांची क्षमता बळकट केली आहे."

मध्य पूर्वेतील घडामोडींचे तज्ज्ञ आणि आयसीडब्ल्यूएचे वरिष्ठ फेलो डॉ. फज्जुर रहमान यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं की, "इराणचं भौगोलिक स्थान नेहमीच त्यांच्यासाठी फायदेशीर राहिलेलं आहे, ही गोष्ट अगदी खरी आहे. याचा भूतकाळातही इराणला धोरणात्मकदृष्ट्या फायदा झाला आहे."

"मात्र, आधुनिक युद्धात, जमिनीवरून हल्ला होण्याची शक्यता कमी असते. अमेरिकेकडे बी-2 बॉम्बर्स आणि हवाई हल्ले करू शकतील अशी धोकादायक क्षेपणास्त्रं आहेत. जमिनीवर हल्ला करण्याची योजना आखताना इराणच्या भौगोलिक स्थानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, हे स्पष्ट आहे."

इराणवर हल्ला करणं इतकं कठीण का आहे?

इंग्रजी वृत्तपत्र 'द गार्डियन'नुसार, "व्हेनेझुएलाचे नेते निकोलस मादुरो यांना 'पकडल्यानंतर' ट्रम्प यांनी उत्साहानं इराणविरुद्ध कठोर कारवाई करण्याबद्दल भाष्य केलं."

"पण, अमेरिकेने प्रत्यक्षात कोणतीही लष्करी तयारी केलेली नाही. खरं तर, गेल्या काही महिन्यांत इराणच्या आसपास असलेलं अमेरिकन सैन्य कमी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्यायदेखील मर्यादित झालेले आहेत. ऑक्टोबर 2025 पासून पश्चिम आशियात एकही अमेरिकन विमानवाहू जहाज (एअरक्राफ्ट कॅरिअर) तैनात नाहीये."

याचा अर्थ असा आहे की, अमेरिका स्वतःहून इराणी सरकारी तळांवर किंवा इराणचे नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावर हल्ला करू शकत नाही.

हे करण्यासाठी, अमेरिकेला पश्चिम आशियातील देशांमध्ये हवाई तळांचा वापर करावा लागेल. मात्र, इराणने त्यांना आधीच याबद्दल इशारा देऊन ठेवला आहे.

अमेरिकेकडे दुसरा एक पर्याय आहे आणि तो म्हणजे बी-2 बॉम्बरचा. जो त्यांनी जून 2025 मध्ये वापरलेला होता. मात्र, इराणचा असा दावा आहे की, त्यामुळेही त्यांचे अण्वस्त्रांचे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले नाहीत.

डॉ. फज्जुर रहमान असंही म्हणतात की, "अमेरिकेने ऑक्टोबरमध्ये आपले विमानवाहू जहाज मागे घेतले. त्यामुळे इराणला काहीसा दिलासा मिळाला. पण आता अमेरिका पुन्हा आपले विमानवाहू जहाज मध्य पूर्वेत पाठवत आहे. मात्र, असंही काही नाहीये की, हल्ला करायचा असल्यास हेच फक्त वापरलं पाहिजे. अमेरिका इराणच्या शेजारील देशांमध्ये असलेलं लष्करी हवाई तळ देखील वापरू शकते."

इराणचं भौगोलिक स्थान आहे अमेरिकेसाठी आव्हान

इराणचे भौगोलिक स्थान हे त्याचं सर्वात मोठे बलस्थान राहिलेलं आहे.

'अ‍ॅटलास ऑफ वॉर'नुसार, इराण मजबूत नैसर्गिक सीमांनी वेढलेला देश आहे, जो शत्रूसाठी एक महत्त्वाचा अडथळा निर्माण करतो. इराण नैसर्गिक संरक्षणांनी वेढलेला देश आहे.

उत्तरेला कॅस्पियन समुद्र, दक्षिणेला पर्शियन आखात आणि ओमानचे आखात आहे आणि पूर्वेला आणि पश्चिमेला वाळवंट आणि पर्वत आहेत. पश्चिमेला झाग्रोस पर्वतरांगा आहेत आणि उत्तरेला एल्बर्झ पर्वत आहेत.

या सगळ्या गोष्टी कोणत्याही शत्रू सैन्यासाठी खूप मोठ्या अडचणी निर्माण करतात. ऐतिहासिकदृष्ट्या, या पर्वतांनी अनेकदा आक्रमण करणाऱ्या सैन्यदलांना थांबवलेलं आहे.

1980 च्या दशकात इराण आणि इराकमध्ये युद्ध झालं होतं. 1980 मध्ये सद्दाम हुसेनच्या सैन्याने इराणवर आक्रमण केलेलं होतं. मात्र, झाग्रोस पर्वतरांगांमुळे, इराकी सैन्य इराणमध्ये फार पुढे जाऊ शकलं नव्हतं.

सद्दाम हुसेनची अशी योजना होती की, प्रथम अहवाज (एक महत्त्वाचा तेल प्रदेश) काबीज करावा आणि नंतर पर्वत ओलांडून इराणमध्ये पुढे जायचं. पण ही योजना पूर्णपणे अयशस्वी झाली.

कारण, तिथे निसर्ग हाच एक भयंकर असा अडथळा ठरला आणि हे युद्ध तब्बल आठ वर्षांपर्यंत चाललं. शेवटी, कुणीही युद्ध जिंकलं नाही. दोन्ही बाजूंमधील फक्त ओढाताण कायम राहिली.

त्याचप्रमाणे, जर एखाद्याला पूर्वेकडून इराणवर हल्ला करायचा असेल तर त्याला 'दश्त-ए-लूत' आणि 'दश्त-ए-कवीर'सारखे विस्तीर्ण वाळवंट ओलांडावे लागतील. हे वाळवंट मोठ्या लष्करी कारवाईसाठी अडचणी निर्माण करू शकतात.

पर्वत आणि वाळवंटांव्यतिरिक्त, इराण समुद्राशी देखील जोडलेला आहे. पर्शियन आखातातील होर्मुझची सामुद्रधुनी खूप अरुंद आहे आणि त्यावर इराणचंच नियंत्रण आहे.

हा जगातील सर्वात महत्त्वाचा सागरी मार्ग आहे. जगातील सुमारे 20 टक्के तेल या अरुंद वाहिनीतून जाते. म्हणूनच, कोणत्याही मोठ्या संघर्षात इराणसाठी हे एक महत्त्वाचं शस्त्र आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवल्यास इराण जगाचा तेल पुरवठा रोखू शकतो. या भीतीमुळे इराणचे शत्रू त्यावर हल्ला करण्यापूर्वी कचरतात.

इराणची लष्करी ताकद

'ग्लोबल फायरपॉवर'च्या मते, इराण जागतिक स्तरावरील शीर्ष 20 लष्करी शक्तींमध्ये समाविष्ट आहे. 145 लष्करी शक्तींमध्ये इराण 16 व्या क्रमांकावर आहे.

इराणमध्ये 6.10 लाख सक्रिय सैनिक आणि 3.50 लाख राखीव सैन्य आहे. म्हणजे या सैनिकांची एकत्रित संख्या 9.60 लाखांच्या जवळपास जाते.

इराणचे रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) हे अपारंपरिक युद्धात पारंगत असलेलं एक वेगळे युनिट आहे. तर इराणकडे 551 लढाऊ विमानं आहेत.

मानवरहित हवाई वाहनांमध्ये (अनमॅन्ड एरियल व्हेईकल) इराणचा जगात आघाडीचा क्रमांक लागतो. इराणकडे 147 नौदल मालमत्ता आहेत, ज्यामध्ये 25 पाणबुड्यांचा समावेश आहे.

'इराण वॉच'च्या रिपोर्टनुसार, इराणकडे असलेला क्षेपणास्त्रांचा साठा हा मध्य पूर्वेतील सर्वात मोठा साठा आहे.

2022 मध्ये, यूएस सेंट्रल कमांडचे जनरल केनेथ मॅकेन्झी म्हणाले होते की, "इराणकडे तीन हजारहून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं आहेत. यामध्ये क्रूझ क्षेपणास्त्रांची संख्या समाविष्ट नाही."

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मते, 2024 मध्ये इराणचं संरक्षण बजेट 7.9 अब्ज डॉलर्स होते. हे जीडीपीच्या अंदाजे 2.0 टक्के आहे. 2023 मध्ये इराणचा लष्करी खर्च अंदाजे 10.3 अब्ज डॉलर्स होता.

लष्करावर खर्च करणाऱ्या देशांमध्ये इराण जगात 34 व्या क्रमांकावर आहे. इराणने 2025 साठीचे आकडे जाहीर केलेले नाहीत. परंतु, इराण त्याचं संरक्षण बजेट 200 टक्क्यांनी वाढवून 16.7 अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याची योजना आखत आहे.

अमेरिका आणि इराणच्या लष्करी ताकदीत लक्षणीय तफावत असली तरी, ग्लोबल फायरपॉवर इंडेक्समध्ये अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे आणि तो पहिल्या क्रमांकावर आहे.

अमेरिकेकडे 13.28 लाख सक्रिय सैनिक आणि 7.99 लाख राखीव सैन्य आहे. यामुळे त्यांच्या एकूण सैन्याची संख्या अंदाजे 21 लाख झाली आहे. 2005 पासून, अमेरिका ग्लोबल फायरपॉवर इंडेक्समध्ये सातत्यानं प्रथम क्रमांकावर आहे.

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटच्या रँकिंगमध्येही अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानुसार 2024 मध्ये अमेरिकेचे संरक्षण बजेट 997 अब्ज डॉलर असेल.

हे अमेरिकेच्या जीडीपीच्या 3.4 टक्के आहे. जागतिक लष्करी खर्चात अमेरिकेचा वाटा 37 टक्के आहे.

भलेही इराण आणि अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्यात खूप फरक असला तरी, विश्लेषकांचा असा विश्वास आहे की इराणवर हल्ला करणं ही गोष्ट तितकीही सोपी नाही.

"इराणवर हल्ला न करण्यामागचं एक कारण हे इराणचे शत्रू इराणला घाबरतात असं नाहीये. तर कारण हे आहे की, ते ही गोष्ट पूर्णपणे जाणतात की, इराणविरोधातील कोणतंही युद्ध हे एक अतिशय गंभीर युद्ध असेल," असं नेव्हल पोस्ट ग्रॅज्युएट स्कूलमधील राष्ट्रीय सुरक्षा प्रकरणांचे सहायक प्राध्यापक अफशोन ओस्तोवर यांनी 2024 मध्ये म्हटलं होतं.

संरक्षण विश्लेषक राहुल बेदी यांचा असा विश्वास आहे की, "अमेरिकेशी लढण्यासाठी इराणकडे क्षेपणास्त्रं आणि ड्रोन ही सर्वोत्तम शस्त्रं आहेत. इराणची लढाऊ विमानं बऱ्याच काळापासून निष्क्रिय आहेत. त्यांच्या नौदलाची ताकद देखील सरासरीच आहे."

ते सांगतात की, "जर हल्ला झाला आणि इराणने प्रत्युत्तर दिलं तर ते क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अमेरिकेकडे लक्षणीय लष्करी शक्ती आहे आणि इस्रायलचा पाठिंबादेखील आहे. इस्रायलला मध्यपूर्वेची चांगली माहिती आहे आणि तो अमेरिकेला सर्व प्रकारे मदत करू शकतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)