You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'उद्धव ठाकरेंकडे लायसन्स नसताना पवारांनी थेट व्होल्वो बस दिली, अजित पवार कंडक्टर बनले, थोरात प्रवासी' #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा..
1. 'उद्धव ठाकरेंकडे लायसन्स नसताना पवारांनी थेट व्होल्वो सब दिली, अजित पवार कंडक्टर बनले, थोरात प्रवासी'
ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली. मात्र, गेल्या दोन वर्षात विनाअपघात प्रवास सुरू आहे, अशा शब्दात शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे तसंच महाविकास आघाडी सरकार यांचं कौतुक केलं आहे.
सांगोला येथे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात गुलाबराव पाटील बोलत होते.
यावेळी पाटील म्हणाले, "गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे कोणी म्हणाले असते तर कोणी विश्वास ठेवला नसता. कोणतेही वाहन चालवायला लायसन्स लागतं, पण शरद पवार यांनी ज्याच्याकडे कसलेच लायसन्स नाही त्याला थेट ड्रायव्हर केलं तर अजित पवार यांना कंडक्टर. बाळासाहेब थोरात प्रवासी बनले.
विना लायसन्स असलेल्या ड्रायव्हरच्या हातात थेट व्होल्वो बस दिली. मात्र, गेल्या दोन वर्षात कितीही अडचणीचे मार्ग आले तरी या ड्रायव्हरची गाडी विनाअपघात सुसाट सुरू आहे, असं पाटील म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली.
2. पाकिस्तानने सुधारावं, अन्यथा पुन्हा सर्जिकल स्ट्राईक - अमित शाह
पाकिस्तानने मर्यादेत राहावं, काश्मीरमधील नागरिकांच्या हत्येसाठी पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहिला आणि मर्यादा ओलांडली तर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होईल, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला आहे. पूर्वी दहशतवादी देशाच्या सीमा ओलांडून दहशतवाद पसरवत होते. त्यावर दिल्लीत एका निवेदनाशिवाय काहीही होत नव्हते. पण पुंछमध्ये हल्ला झाला, तेव्हा देशाच्या सीमेशी छेडछाड करणं इतकं सोपं नाही, हे भारताने दाखवून दिलं होतं, असं त्यांनी सांगितलं.
त्यामुळे पाकिस्तानने कुरघोड्या थांबवल्या नाहीत आणि त्यांची पुनरावृत्ती केली तर सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार राहावं, असा इशारा अमित शहांनी दिला आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली.
3. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं, मी सर्वांची यादी देतो - उदयनराजे
"जसे आपण पेरतो, तसे उगवते, आमच्या मागे ईडी नाही. ज्यांनी वाईट केलं, त्यांच्याच मागे ईडी लागली आहे. हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावं, पुराव्यांसकट मी ईडीला यादी देईन", असं वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.
ईडी कारवाईमागे भाजप असल्याच्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले, कुणीही असू दे, मी सर्वांची यादी देतो. एकमेकांचे झाकायचे आणि सोयीप्रमाणे एकमेकांचे काढत बसायचे, हे राजकारण आता बास झाले, अशा शब्दांत उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला. ही बातमी लोकमतने दिली.
4. NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या सुरक्षेत वाढ
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याची तक्रार केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती समोर आली आहे.
वानखेडे यांच्या सुरक्षेसाठी 4 पोलीस तैनात करण्यात येतील, तसंच त्यांची कारही बदलण्यात आली आहे.
वानखेडे यांनी पोलिसांवर केलेल्या हेरगिरीच्या आरोपानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
राज्य सरकारने कोणत्याही एजन्सीला समीर वानखेडेवर नजर ठेवण्याचे आदेश दिले नाहीत, असं स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलं होतं.
दरम्यान, मुंबई पोलीस वानखेडे यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचंही सांगितलं जात आहे. ही बातमी झी 24 तासने दिली.
5. 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच देश सुरक्षित, बंधुभाव टिकून राहिला'
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसमुळेच देश सुरक्षित असल्याचं मत भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी व्यक्त केलं.
जगामध्ये बंधुत्वभाव टिकून राहण्यासाठी आरएसएसच जबाबदार आहे. तसंच उपद्रव माजवणाऱ्या लोकांपासून आपल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच शांती मिळाली आहे, असा दावा ठाकूर यांनी केला आहे.
दरम्यान, छत्तीसगढमध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे धर्मांतर रोखण्याचं काम संघाकडून सुरू आहे. आरएसएस समजून घेण्यासाठी छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांना काही पिढ्या किंवा जन्म खर्च करावे लागतील, असंही त्यांनी म्हटलं. ही बातमी लोकसत्ताने दिली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)