उदयनराजे भोसले : जनतेचे 'महाराज' की 'गांभीर्य नसलेला राजकारणी'?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. एक तर आरक्षण द्या अन्यथा विष पिऊन मरू द्या असं उदयनराजे भोसले म्हणाले.

"मराठा समाजाला आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकांमध्ये गांभीर्य दिसत नाही. टंगळमंगळ करण्यासाठी बैठका घेतल्या जातात?" असं उदयनराजे म्हणाले.

साताऱ्यात एक किस्सा नेहमीच चर्चेत असतो. हा किस्सा आहे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा.

उदयनराजे यांना रात्री शहरात फेरफटका मारण्याची सवय आहे. असंच फिरताफिरता एकदा ते साताऱ्यातील बस स्टँडजवळ पोहोचले. तेव्हा तिथं काही रिक्षावाले उभे होते.

"रात्री 2 वाजताय, काय तुम्ही इतक्या रात्री धंदा करताय, अशानं कसं चालायचं तुमचं आयुष्य. 2 वाजलेपासून सकाळपर्यंत किती धंदा होईल तुमचा?" असा प्रश्न त्यांनी रिक्षावाल्यांना विचारला.

500 रुपये होईल, असं उत्तर त्यांना मिळालं.

त्यानंतर उदयनराजेंनी सगळ्या रिक्षावाल्यांना एकत्र बोलावलं आणि प्रत्येकाच्या हातात 500 रुपयांची नोट टेकवली. आता घरी जाऊन झोपा, असा सल्ला त्यांना दिला. हा किस्सा आजही साताऱ्यात चर्चिला जातो.

भाजपचे आमदार

उदयनराजे भोसले 1991साली राजकारणात आले. सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी काका अभयसिंह राजेंच्या विरोधात स्वत:चं पॅनेल उभं केलं. स्वत: दोन वॉर्डातून उभे राहिलेले उदयनराजे एका वॉर्डातून निवडून आले आणि एकात त्यांचा पराभव झाला.

1991 ते 1996 असे 5 वर्षं ते नगरसेवक होते.

1996मध्ये त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष राहून लढवली. त्यावेळी काँग्रेसचे प्रतापराव भोसले साताऱ्याचे खासदार होते.

"विद्यमान खासदार असल्यामुळे प्रतापरावांची उमेदवारी कापणं शक्य नव्हतं. परंतु प्रतापरावांच्या पराभवाची व्यूहरचना आखण्यात आली होती, असं म्हणतात. त्यासाठी काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी अनेक समविचारी उमेदवार उभे करण्याची खेळी करण्यात आली. उदयनराजे भोसले, पार्थ पोळके, आर. डी. निकम यांच्याशिवाय आणखी दोघे-तिघे तसे उमेदवार होते. त्याचा परिणाम असा झाला की, 12 हजार मतांनी शिवसनेच्या हिंदूराव नाईक-निंबाळकर यांनी प्रतापरावांचा पराभव केला. या निवडणुकीत उदयनराजेंना 1 लाख 13 हजार 658 मतं मिळाली. पहिल्याच प्रयत्नात अपक्ष म्हणून मिळालेली ही मतं दखलपात्र होती," असं 2015च्या कालनिर्णयच्या दिवाळी अंकात उदयनराजेंवरील लेखात ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी लिहिलं आहे.

यानंतर 1998ला लोकसभेची निवडणूक झाली. त्यात अभयसिंहराजे साताऱ्याचे आमदार असतानाही लोकसभेला उभे राहिले आणि निवडून आले. यामुळे मग सातारा विधानसभेची जागा मोकळी झाली आणि तिथं पोटनिवडणूक लागली.

"अभयसिंह राजे लोकसभेत गेल्यानंतर सातारा विधानसभेची जागा आपल्याला मिळेल, अशी उदयनराजेंची अपेक्षा होती. परंतु अभयसिंहराजेंनी लोकसभेची उमेदवारी स्वीकारतानाच पुत्र शिवेंद्रराजे यांच्या उमेदवारीची हमी घेतली होती. त्यामुळे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी शिवेंद्रराजे यांना मिळाली," असं चोरमारे लिहितात.

"याच काळात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष होतं. त्यांनी उदयनराजेंना हेरलं आणि भाजपमध्ये येण्यासाठी त्यांचं मन वळवलं. ते भाजपचे उमेदवार झाले. अभयसिंहराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यारूपानं एकाच घरात खासदारकी आणि आमदारकी असं सत्तेचं केंद्रीकरण दिसू लागलं, त्यातून उदयनराजेंच्या बाजूनं सहानुभूती निर्माण झाली आणि त्यांनी निवडणूक जिंकली," चोरमारे पुढे लिहितात.

युतीच्या मंत्रिमंडळात उदयनराजेंना महसूल राज्यमंत्री पद देण्यात आलं.

खूनप्रकरणी अटक

1999ला विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी उदयनराजे यांच्यासमोर खुद्द अभयसिंहराजे यांचं आव्हान होतं. मतदानाच्या आदल्या रात्री अभयसिंहराजे गटाचे नगरसेवक शरद लेवे यांचा खून झाला. त्यात मुख्य आरोपी म्हणून उदयनराजेंविरुद्ध फिर्याद देण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांना अटक झाली. ते 22 महिने जेलमध्ये होते. नंतर उदयनराजेंची यातून निर्दोष मुक्तता झाली.

पण, या प्रकरणाचा निवडणुकीवर परिणाम झाला आणि उदयनराजेंचा पराभव झाला.

2001ला ते जेलमधून बाहेर आले आणि सातारा नगरपालिकेची निवडणूक मोठ्या फरकानं जिंकले. नगरपालिकेतील 39 पैकी 37 जागा त्यांनी जिंकल्या.

2004ला अभयसिंहराजेंचं निधन झालं. मग तेव्हाची निवडणूक शिवेंद्रराजे विरुद्ध उदयनराजे अशी झाली. या निवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला आणि शिवेंद्रराजे आमदार म्हणून निवडून आले.

'मनोमिलन पॅटर्न' आणि राष्ट्रवादीचे खासदार

2006ला पुन्हा सातारा नगरपालिकेची निवडणूक झाली आणि ती त्रिशंकू झाली. 19 जागा उदयनराजेंच्या आघाडीला, 18 जागा शिवेंद्रराजेंच्या आघाडीला, तर 2 जागा विरोधकांना मिळाल्या.

"त्यावेळेस या राजघराण्यातील ज्येष्ठ असलेल्या शिवाजीराजे भोसले यांनी पुढाकार घेऊन सगळं घराणं एक करायचं ठरवलं. त्यांनी शिवेंद्रराजे आणि उदयनराजे यांचं मनोमिलन घडवून आणलं. हेच पुढे जाऊन 'मनोमिलन पॅटर्न' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. मग या दोघांनी मिळून नगरपालिकेची सत्ता हस्तगत केली," पुण्यनगरीच्या सातारा आवृत्तीचे वृत्त संपादक विनोद कुलकर्णी सांगतात.

2008च्या दरम्यान उदयनराजे काँग्रेसमध्ये गेले. नंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवायचं ठरवलं. पण, 2009च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या जागावाटपात सातारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे होती. त्यामुळे मग शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादीत घेतलं आणि लोकसभेची उमेदवारी दिली.

त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा 3 लोकसभा निवडणुका त्यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर जिंकल्या.

गेल्या वर्षी उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे लोकसभेची पोटनिवडणूक झाली. यामध्ये चुरशीच्या मुकाबल्यात श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा 87,000 मतांनी पराभव केला.

"पण उदयनराजे कधीच मनानं राष्ट्रवादीबरोबर नव्हते. पक्ष गेला खड्ड्यात. मी कुणाला मानत नाही, जनता हाच माझा पक्ष अशी विधानं त्यांनी सातत्यानं केली आहे. पूर्वी भाजपमध्ये असल्याकारणानं त्यांची आणि देवेंद्र फडणवीसांची चांगली मैत्री राहिली. उदयनराजे राष्ट्रवादीत असतानाही त्यांची सगळी कामं फडणवीसांनी केली," कुलकर्णी सांगतात.

यापूर्वी 2016च्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांचं मनोमिलन तुटलं. त्यामुळे गेली दोन-तीन वर्षं दोघांमध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. शरद पवारांनी मध्यस्थी करत हा संघर्ष मिटवला आणि 2019मध्ये उदयनराजेंना लोकसभेची उमेदवारी दिली.

"लोकसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंसाठी काम केलं, मात्र निवडणूक झाल्यानंतर ते भाजपमध्ये गेले. त्यांचं महत्त्व भाजपमध्ये वाढणार, हे लक्षात घेऊन उदयनराजेंनी भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला," कुलकर्णी सांगतात.

दहशतीचे आरोप

सरकारी कर्मचाऱ्यांशी केलेली अरेरावी असो की रात्री 12 नंतर डीजे वाजवण्याचं केलेलं समर्थन असो, उदयनराजे दहशत माजवतात, लोकांना दमबाजी करतात, असा त्यांच्यावर आरोप होतो.

यासंबंधी अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. वर्षभरापूर्वी साताऱ्यात सुरूची राडा प्रकरण गाजलं. सुरूची हे शिवेंद्रराजेंच्या बंगल्याचं नाव आहे. आणेवाडी टोल नाका चालवायला घेण्यावरून दोन राजांमध्ये वाद झाला आणि त्यावरून मोठा संघर्ष झाला. साताऱ्यात गोळीबार झाला. त्यामुळे दहशतीचा मुद्दा उदयनराजेंविरोधात उपस्थित केला जातो.

पण, ही जनतेच्या प्रेमाची दहशत आहे, असं स्पष्टीकरण ते या आरोपावर देतात.

या आरोपांविषयी उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय सुनील काटकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "महाराज मुळात राजकारणी नाहीत. ते राजकारणी असते, तर एकही गुन्हा दाखल झाला नसता. त्यांची मोठी लोकप्रियता राजकीय लोकांच्या डोळ्यांत खुपते आणि तेच गुन्हा दाखल करायला काही लोकांना प्रवृत्त करतात."

"उदयनराजेंनी कधीही कुणालाही शिवीगाळ केला नसल्याचा दावाही काटकर यांनी केला. तसंच, ते सरकारी कर्मचाऱ्यांशी मित्राप्रमाणे वागतात," असंही ते म्हणाले.

मतदारसंघासाठी काय केलं?

उदयनराजेंच्या राजकीय कारकिर्दीविषयी चोरमारे सांगतात, "उदयनराजे यांना साताऱ्यात महाराज या नावानं ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज असल्याचा त्यांना अभिमान आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन भाषेवर प्रभुत्व मिळवून संसदीय राजकारणात कर्तृत्व गाजवावं, असं त्यांच्या शुभेच्छुकांना वाटतं. पण उदयनराजेंना अजिंकताऱ्याच्या पलिकडे रस नाही. तसं व्यापक राजकारण करण्याचा आवाकाही त्यांच्याकडे नाही. त्यासाठीचं गांभीर्यही नाही."

"राष्ट्रवादी पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी ते अनेकदा शरद पवारांकडे जातात आणि निवडून आल्यानंतर मी माझाच, माझा पक्ष कोणताच नाही, असं म्हणतात. हे कुठलं गांभीर्य आहे. संसदेत ते 10 वर्षं आहेत. या काळात ते किती दिवस हजर राहिले आणि त्यांनी एखादा प्रश्न विचारला का? सातारा जिल्ह्याच्या किती प्रश्नांचा त्यांनी फॉलोअप घेतला, किती प्रश्न व्यापक स्तरावर नेले? सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपमध्ये जात आहे, असं ते म्हणाले. पण, खासदार निधीतून काय काय केलं हे त्यांनी दाखवायला हवं. किंवा मला या गोष्टी करायच्या आहेत, पण सत्तेत नसल्यामुळे त्या होत नाही, हे सांगायला हवं. पण ते तसं करताना दिसत नाहीत," चोरमारे पुढे सांगतात.

"उदयनराजे यांच्याविरोधात अनेक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. सत्तेच्या विरोधात राहिलं तर कायद्याची टांगती तलवार राहिल, अशी भीतीही त्यांना आहेच. त्यामुळे आता त्यांनी भाजपची वाट धरली आहे. त्यांचा सुरुवातीपासूनचा प्रवास बघितल्यास ते भाजपमध्ये किती दिवस टिकतील हेही सांगता येत नाही," चोरमारे सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)