You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उदयनराजे भोसले: 'EVM कसं फुलप्रूफ असू शकतं? माणसाची गॅरंटी नाही'
कॉम्प्युटर हॅक होऊ शकतो, मग EVM हॅक होईल अशी जर शंका व्यक्त केली तर यात गैर काय, असा सवाल साताऱ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला आहे.
दोन दिवसांपूर्वी EVMद्वारे झालेल्या मतदानावर शंका उपस्थित केल्यानंतर सोमवार त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपला मुद्दा पुन्हा मांडला.
"ही माझी वैयक्तिक पत्रकार परिषद आहे, कोणत्याही पक्षाकडून नाही," असं भोसले यांनी अधोरेखित केलं आणि लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या EVM विषयी शंका परिषदेत उपस्थित केल्या.
"या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला जशी राष्ट्रभक्ती आहे तशीच मला देशभक्ती आहे. मी रडीचा डाव कधी खेळत नाही. तो माझा स्वभाव नाही. मी खासदार आहे. प्रामाणिकपणे निवडून आलोय. हरलो असतो आणि बोललो असतो तर तुम्ही म्हणाला असता हरला म्हणून बोलतोय. पण मी निवडून आलोय.
"माझं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना चॅलेंज आहे. माझ्या मतदारसंघात जेवढे बुथ आहेत तिथे मी स्वखर्चाने बॅलेट बॉक्स ठेवतो. नाही फरक दिसला तर मिश्या काय भुवया काढून टाकेन," असं आव्हान त्यांनी दिलं.
परिषदेत पुढे बोलताना भोसले म्हणाले, "EVM हे फुलप्रुफ आहे म्हणतात. कसलं फुलप्रुफ? एप्रिल फूल असतं ते. कुठलंही मशीन माणूसच बनवतो. EVM फूल प्रुफ आहे, असं म्हणताहेत. कसं शक्य आहे? इथे आपल्यालाच आपली गॅरंटी देता येत नाही."
बॅलेट पेपरचा खर्च EVMपेक्षा कमी आहे. EVMला 5 हजार कोटी खर्च झाला, अशी माहिती त्यांनी दिली.
सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात झालेल्या मतदानात आणि प्रत्यक्ष मतमोजणीच्या आकड्यांमध्ये फरक आहे, असा दावा त्यांनी केला. दोन दिवसांपूर्वी ते म्हणाले होते की EVM द्वारे झालेले मतदानातल्या मतांची संख्या 12,45,797 एवढी होती तर EVM मधून 12,46,256 मतं मोजण्यात आली होती.
शनिवारी त्यांनी एका ट्वीटद्वारे या कथित गफलतीबद्दल शंका उपस्थित केली होती.
"या निवडणुकीत EVMव्दारे झालेले मतदान आणि मतमोजणीत आढळलेले मतदान यात मोठी तफावत आढळून आली, तरीही निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय याबाबत काही बोलायला तयार नाही. हा लोकशाहीचा घात असून काय व्हायचे ते होऊ द्या, मी खासदारकीचा राजीनामा देतो, त्यानंतर सातारा मतदारसंघात बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या," असं आव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी सरकारला दिले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)