You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चिपी विमानतळावरचं नाट्य : उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकत्र आले तेव्हा...
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अखेरीस सिंधुदुर्गात जे घडेल असं वाटत होतं ते घडलं. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्या जुगलबंदीची किंबहुना तळकोकणाचा संदर्भ घेतला तर शब्दयुद्धाच्या दशावताराची पार्श्वभूमी अगोदरच तयार झाली होती.
जेव्हापासून चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या बातम्या येऊ लागल्या तेव्हापासून श्रेय कुणी घ्यायचं यावरुन राणे विरुद्ध शिवसेना असा वाद सुरु झाला होता. शिवसेनेची खिंड खासदार विनायक राऊत लढवत होते. पण या वादाच्या शेवटचा अंक उद्धव ठाकरे यांच्यासोबतच पार पडला.
महविकास आघाडीच्या डझनभर मंत्र्यांच्या समोर, राणेंसोबतच केंद्रात मंत्री झालेल्या ज्योतिरादित्य शिंदेंच्या समोर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात हे वाग्युद्ध झालं.
बऱ्याच काळानं ते एकाच मंचावर एकत्र आले होते. उद्धव ठाकरे शक्यतो पत्रकारांनी कितीही विचारलं तरी राणेंवर बोलत नाहीत, त्यांच्या सभांमध्येही अप्रत्यक्ष बोलतात, पण आता समोरासमोरच आल्यानं त्यांच्यासमोर पर्याय उरला नसावा.
मागच्या महिन्यात राणेंची जनआशीर्वाद यात्रा कोकणात आली असतांना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्यानंतर जे अटकनाट्य घडलं होतं, त्यांनं चिपीचा वाद आणखी वरच्या पट्टीला नेला.
अगोदर नारायण राणे आणि नंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण सर्वांनी एव्हाना टिव्हीवर आणि समाजमाध्यमांवर पाहिलं असेल. पण केवळ ही भाषणं हीच चिपी विमानतळावर घडलेल्या नाट्याचा एकमेव प्रवेश नव्हता. त्याच्या आजूबाजूला घडत होतं तेही तितकंच नाट्यपूर्ण होतं.
ठाकरे, राणे आणि दोन वेगवेगळी विमानं
चिपीच्या उद्घाटनाचं विमान, या नव्या धावपट्टीच्या सेवेची सुरुवात, अलायंन्स एअरलाईन्सच्या मुंबई-सिंधुदुर्ग या पहिल्या विमानानं होणार होती. मंत्रिगणासह निवडक आमंत्रितांना त्याचे बोर्डिंग पास होते आणि ते विमान उतरुन या नव्या विमानतळाचं काम खरं सुरु होणार होतं. नारायण राणे यांच्यासहित रामदास आठवले सुभाष देसाई, अनिल परब, अनिल देसाई, आदिती तटकरे असे सगळे नेते मुंबईतून याच विमानानं सिंधुदुर्गला आले.
पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मात्र या विमानातून आले नाहीत. त्यांनी या विमानसेवेच्या अगोदर स्वतंत्र विमानानं येणं पसंत केलं. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर हेसुद्धा या अगोदरच्या विमानानं आले.
जवळपास पाऊण तास अगोदर हे मुख्यमंत्र्यांचं विमान आलं आणि ते सगळे एअरपोर्टवर मुख्य विमानाची वाट पाहात बसले. विमानसेवेच्या पहिल्या विमानानं येणं हे प्रतिकात्मक म्हणूनही महत्वाचं ठरलं असतं, पण राणे त्यात असल्यानं तसं केलं नसावं, या कयासाची चर्चा सुरु होती.
स्टेजवर उद्धव ठाकरे आणि राणे यांच्या खुर्च्या शेजारी शेजारीच होत्या. त्यामुळे ते प्रत्यक्ष येतील तेव्हा काय होणार याकडे प्रेक्षकांतल्या सगळ्यांचंच लक्ष होतं. पण (कदाचित ठरवून) मध्यभागी असणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपासून उजव्या आणि डाव्या बाजूच्या दोन्ही खुर्च्या साधारण दोन फुटाचं अंतर सोडून ठेवण्यात आल्या होत्या.
म्हणजे चुकूनही बोलण्याच्या प्रश्न येऊ नये. त्यातल्या एकीत राणे बसले, तर दुसरीत अजित पवार. बसल्यानंतर पूर्ण कार्यक्रमभर उद्धव ठाकरे वाकून अजित पवारांशी मधे मधे बोलत होते, पण एकदाही नारायण राणेंशी बोलले नाहीत.
सगळे मंचावर आल्यापासूनच तिथं असलेला तणाव प्रेक्षकांनाही जाणवत होता. एक तर ते खूप काळात मंचावर एकत्र आले होते आणि दुसरं म्हणजे अलिकडे राणे विरुद्ध सेना हे राडे म्हणता येतील असे वाद. मंचावर आल्यावर शेजारी असूनही राणे आणि ठाकरे एकमेकांशी नजरानजर तर दूरच, पण शक्यतो विरुद्ध दिशेलाच बोलत होते.
फक्त, जेव्हा राणेंच्या मागे बसलेल्या सीताराम कुंटेंशी जेव्हा उद्धव यांना बोलायचं असायचं तेव्हाच ते त्या बाजूला वळायचे. एक गोष्ट मात्र घडली आणि तो फोटो मात्र लगेच सोशल मीडियावर पसरायला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातील जेव्हा दीपप्रज्वलन झालं, तेव्हा मेणबत्तीनं पहिला दीप उद्धव यांनी लावला.
तो लावल्यावर ती मेणबत्ती त्यांनी पुढचा दीप लावायला राणेंकडे दिली. लगेच कॅमेऱ्यांचे असंख्य क्लिक्स ऐकायला आले. पण त्याही फोटोत नजरानजर मात्र नाही.
दोघे मंचावर एकमेकांशी बोलताना दिसले नाहीत, तरी नंतर राणेंनी त्यांच्या भाषणात सुरुवातीला असं म्हटलं की उद्धव ठाकरे मंचावर आल्यावर माझ्या कानाशी काही बोलले, पण मला फार काही ऐकू आलं नाही, फक्त एकच शब्द ऐकू आला. तो शब्द कोणता हे मात्र राणेंनी शेवटपर्यंत सांगितलं नाही.
भाषणांत काय होणार?
राणे आणि ठाकरे वादाचे पडसाद या उद्घाटनाच्या मंचावर पडणार का याचं सगळ्यांना कुतूहल होतं आणि तणावही होता, पण जसा कार्यक्रम सुरु झाला तसा मात्र रंग थोडा बदलला.
विनायक राऊत, जे कालपर्यंत माध्यमांमध्ये राणेंविरुद्ध बोलत होते, तेही सूत्रसंचालन करतांना त्यांच्या आवश्यक आदरानं उल्लेख करत होते. उदय सामंत, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, अजित पवार यांनीही तो केला.
त्यात घडलेल्या वादाचा कुठलाही उल्लेख नव्हता. केवळ देसाईंनी जेव्हा 'उद्धव ठाकरे यांच्या पायगुणामुळे अखेरीस हा एअरपोर्ट पूर्ण झाला' असं म्हटल्यावर काही दिवसांपूर्वी राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या पायगुणावरुन केलेल्या वक्तव्याचा संदर्भ आठवला. पण तेवढंच.
असं वातावरण तयार झालं की वाद बाजूला ठेवून आजचा कार्यक्रम सगळे नेते पार पडणार. रामदास आठवले हे पहिले होते ज्यांनी या भांडणाचा उल्लेख केला, पण तो त्यांच्या शैलीत. त्यांनी यमक जुळवत, राणे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेत कविता केली, तेव्हा तणावातही सारे हसले.
माध्यमांशिवाय या कार्यक्रमात आमंत्रित प्रेक्षक फार निवडक होते, पण त्यातही राणेसमर्थक आणि सेनासमर्थक असे गट पडले होते. दोघांचीही घोषणाबाजी मधे मधे सुरु होती. एकदा ती एवढी झाली की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
पण तरीही सगळं निवांत पार पडेल असं वाटत असतांना नारायण राणेंचं भाषण सुरु झालं आणि सगळा नूरच पालटला. राणे सुरुवातीला साधंच बोलले. सगळ्यांच्या भुवया थोड्या उंचावल्या, जेव्हा त्यांनी मुख्यमंत्र्यांपासून मंचावरच्या प्रत्येकाचं नाव अगोदर 'सन्माननीय' असं विशेषण लावून घेतलं.
आदित्य ठाकरेंचंही. त्यामुळे कालच्या मुंबईतल्या पत्रकार परिषदेतला राणेंचा सूर आणि आजचा सूर वेगळा वाटत असतांनाच, त्यांनी आपल्या इच्छा नसतांना राजकारणावर बोलावं लागतं आहे असं म्हणत सूर बदलला.
नंतरचा सूर रागाचा होता, आक्रमक होता. राणेंनी सेनेचे नेते कसं श्रेय घेत आहेत आणि कसं खोटं बोलत आहेत असं सुनावलं. त्यांच्या बहुतांश रोख विनायक राऊत यांच्याकडे होता. पण तरीही सेनेला, उद्धव ठाकरे यांना त्यांच्या शैलीत सुनावायला राणे आक्रमक होते.
बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख वारंवार करत त्यांनी सिंधुदुर्गचा कसा कायापालट केला यावर ते विस्तारानं, पण रागानं बोलले. काही प्रकल्पांना सेनेच्या नेत्यांनी केलेल्या विरोधाची वर्तमानमत्रातली कात्रणंच त्यांनी आणली होती. शेवटी तर आदित्य ठाकरेंना उद्देशून बोलतांना 'आदित्य टॅक्स फ्री आहे' असं म्हणत त्यांनाही काही अभ्यास करण्याचा सल्ला दिला.
राणेंचं सेनेला झोडणारं भाषण सुरु होतं तेव्हा मंचावर आणि प्रेक्षकांतही स्तब्धता होती. आता पुढे काय होणार? उद्धव ठाकरे शांतपणे ते ऐकून घेत होते. मधेमधे ते अजित पवारांशी बोलत होते. चेहऱ्यावर मास्क असल्यानं भाव दिसत होते.
पण मंचावरचे नेते, विशेषत: शिवसेनेचे नेते, राणेंकडे वा एकमेकांकडे न पाहता अन्यत्र नजर लावून केवळ ऐकत होते. राणे भाषण संपवून खाली बसले तेव्हा सूत्रसंचालन करणारे विनायक राऊत त्यांना लगेच उत्तर देणार का असंही काहीना वाटलं, पण राऊतांनी त्याविषयी काहीही न बोलता ज्योतिरादित्य शिंदेंना भाषण करण्याची विनंती केली. मराठी उत्तम जाणणारे शिंदे राणेंचं प्रस्तावित वेळेपेक्षा लांबलेलं भाषण दिल्लीत शांतपणे ऐकत होते.
उद्धव ठाकरेंचं उत्तर
शिंदेंनंतर उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले. ते काय उत्तर देणार किंबहुना ते उत्तर देतील की मुख्यमंत्रिपदाकडे बोट दाखवून आता राजकीय बोलणारच नाहीत हा प्रश्न राणेंचं भाषण सुरु असतांनाच सगळ्यांना पडला होता. पण उद्धव यांनी पहिल्या मुद्द्यातच संस्कारांचा आणि मातीचा उल्लेख करत थेट राणेंकडे मोर्चा वळवला.
पण उद्धव त्यांच्या भाषणात त्यांच्या शैलीत उपमांचा वापर करत चिमटे काढत राहिले. हे स्पष्ट जाणवत होतं की त्यांना राग आला आहे, पण तो त्यांच्या शब्दांच्या निवडीत आणि आवाजात त्यांनी दाखवला नाही. तळमळ-मळमळ, नजर लागू नये लावणारा डाग असं म्हणत त्यांनी राणेंना काही ठिकाणी नाव न घेता टोमणे मारले.
काही ठिकाणी मात्र त्यांनी राणेंचं नाव घेत सुनावलं. उद्धव ठाकरे यांनी राणेंचा उल्लेख त्यांच्या भाषणात 'नारायणराव' असा केला. बाळासाहेबांना खोटं बोलण्याचा राग होता हे राणेंचं वाक्य बरोबर आहे असं म्हणून त्यांनी वर जे खोट बोलले त्यांना सेनेतून बाहेर काढलं असं उद्धव यांनी म्हटलं.
ज्या गोष्टी तुम्ही चांगल्या केल्यात त्यासाठी धन्यवादच देतो असंही उद्धव म्हणाले. पण मी विकासाच्या आड येत नाही असं म्हणत त्यांनी राणेंना मेडिकल कॉलेजच्या वेळेस त्यांच्या एका फोननंतर मी लगेच कशी सही केली हेही उद्धव यांनी ऐकून दाखवलं.
राणेंच्या वक्तव्यांवर बहुतांशी न व्यक्त होणाऱ्या उद्धव ठाकरेंनी यंदा 'न बोलणं' टाळलं, हेही नोंद घेण्यासारखं. राणेंकडून शब्दांचा मार मिळालेल्या विनायक राऊतांवर माझा विश्वास आहे असं सांगून उद्धव काही काळ पक्षप्रमुखही झाले. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मराठीबद्दल, नाळेशी जुळल्याबद्दल, तत्परतेनं वेगळ्या पक्षात असूनही महाराष्ट्रासाठी निर्णय घेण्याबद्दल उद्धव राणेंच्या उपस्थितीत बराच वेळ कौतुक करत राहिले.
या भाषणांनंतर कार्यक्रम संपला तरी चव बदललेली होती. ती उद्घाटनाची राहिली नव्हती, ती कडवट झाली होती. 'कोकणच्या विकासासाठी' असं हे दोन्ही नेते अनेकदा आपल्या भाषणांत म्हणाले तरीही चव व्यक्तिगत भावनांची झाली होती.
मंचावरुन जातांनाही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं नाही. आलेले निमंत्रित एकत्र जेवले. राणे मात्र सर्वात लवकर बाहेर पडले आणि सिंधुदुर्गातल्या निवासस्थानी गेले. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कानात तो एक कोणता शब्द सांगितला जो त्यांनी ऐकला, तो मात्र शेवटपर्यंत इतरांना समजलाच नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)