You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद पवार : 'आयकर विभागाचे छापे लखीमपूरची तुलना जालियनवाला बाग घटनेशी केल्यामुळे'
राज्यात गुरुवारी विविध ठिकाणी प्राप्तीकर विभागानं छापे मारून चौकशी केली. यामध्ये अजित पवारांच्या तीन बहिणींशी संबंधित मालमत्तांवरगही छापे मागण्यात आले. ही कारवाई सूडबुद्धीनं केली जात असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी माध्यांशी बोलताना ही शक्यता व्यक्त केली आहे.
माझ्या तीन पुतण्या ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र त्याला काही वेगळी कारणं असण्याची शक्यता यावेळी पवारांनी बोलून दाखवली.
सत्ताधाऱ्यांनी रागातून कारवाई केली?
उत्तर प्रदेशच्या लखिमपूर खीरी प्रकरणावर माझ्यासह काही विरोधकांनी तीव्र भूमिका घेतली. त्यामुळं महाराष्ट्रात जे काही घडलं त्याचं हे कारण असू शकतं, असं शरद पवार स्पष्टपणे म्हणाले.
"शेतकरी त्यांची भूमिका मांडायला जात असताना सत्ताधारी पक्षातील एका घटकाची वाहनं त्यांच्या अंगावरून जातात. त्यात 6 ते 7 लोकांचा मृत्यू होतो. हे यापूर्वी कधी घडलं नव्हतं."
"साहजिकच याचा तीव्र निषेध सर्वांनी केला. महाराष्ट्र सरकारनंही मंत्रिमंडळाच्या बैठकीत याचा निषेध केला. मीही यावर तीव्रपणे बोललो," असं पवार म्हणाले.
"शेतकऱ्यांवर जो हल्ला झाला त्याची तुलना मी जालियनवाला बागच्या घटनेशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधारी पक्षांना आला आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून हे जे काही चाललंय ते सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही," असं ते म्हणाले.
'अधिकारांचा अतिरेक'
सरकारला एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे. पण संबंधित व्यवहारांशी संबंध नसलेल्या कुटुंबातील सदस्यांची, मुलींची चौकशी करणं हा अधिकारांबाबतचा अतिरेक आहे, असं पवार म्हणाले.
अशाप्रकारे अधिकारांचा गैरवापर कितीदिवस सहन करायचा हे लोकांनी ठरवायचं आहे. काही लोक वेडीवाकडी भाषणं, आरोप करून बोलतात आणि ते बोलल्यानंतर केंद्रीय संस्था संबंधित कार्यवाही करण्यासाठी पुढं येतात, हे सर्वांत आक्षेपार्ह असल्याचंही पवार म्हणाले.
मुंबईतील बोटीवर ड्रग्जसंबंधी छापा टाकला. त्यात आरोपींना घेऊन गेलेले लोक शासकीय संस्थेचे नव्हते. नंतर ते साक्षीदार म्हणून बोलावले होते, असं सांगण्यात आलं.
पण साक्षीदार हे साक्ष देण्यासाठी असतात, आरोपींना पकडून नेण्याचं काम मात्र एनसीबीनं करायला हवं. त्यात हे साक्षीदार सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून ते आरोपींना घेऊन जात असल्याचं दिसून आलं. अशा कारवाई व्हायलाच हव्या, पण त्या निमित्तानं चुकीचा पायंडा पडू नये, असं मत पवारांनी व्यक्त केलं.
महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरी गेल्यास निकाल त्यांच्या बाजुने लागेल, असं प्राथमिकदृष्ट्या समोर येत असल्याचं दिसत आहे. मात्र असे निर्णय वेळोवेळी घ्यायचे असतात, असं म्हणत पवारांनी याबाबत अधिक बोलणं टाळलंय.
पावसाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. त्यादृष्टीनं ठोस पावलं उचलली जातील, याची खात्री असल्याचंही पवार यावेळी म्हणाले.
अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे
अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने गुरुवारी छापे मारले. त्यात अजित पवार यांच्या 3 बहिणींचादेखील समावेश आहे. त्चयाबरोबर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर देखील आयकवर विभागाने छापा मारला आहे.
बहिणींच्या घरी छापे मारल्यानंतर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती.
"आयकर खात्याने कुठे छापे मारावेत हा त्यांचा अधिकार आहे. माझ्याशी संबंधित सर्व कंपन्यांचा कर वेळच्यावेळी योग्य पद्धतीने भरलेला आहे. माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली त्याबाबत मला काही बोलायाचं नाही. पण माझ्या तीनही बहिणींशी संबंधित कंपन्यांवरसुद्धा छापे मारण्यात आले आहेत. माझे कुटुंबिय म्हणून फक्त छापे मारणं हे खालच्या पातळीचं राजकारण आहे. अनेक सरकारं येतात जातात. पण जनता सर्वस्व आहे," असं अजित पवार यांनी याबाबत म्हटलंय.
"माझ्या बहिणींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. कंपन्यांशीही त्यांचा काही संबंध नाही, केवळ त्या माझ्या बहिणी आहेत, रक्ताचं नातं आहे म्हणून धाड टाकली हे दुःख देणारं आहे," असंही अजित पवार म्हणाले आहेत.
दौंड शुगर, आंबलीक शुगर, जरंडेश्वर साखर कारखाना, पुष्पद नतेश्वर शुगर या खासगी साखर कारखान्यांवर आयकर विभागाची छापेमारी केली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)