क्रांती रेडकरची NCBचं कौतुक करणारी पोस्ट, काय म्हटलं आहे पोस्टमध्ये?

'समाजात असे काही लोक आहेत ज्यांनी एनसीबी फक्त बॉलिवूडला टार्गेट करत असल्याचं म्हटलंय. मी अशा लोकांना म्हणेन की त्यांनी जरा अभ्यास करावा. . घरी आरामात बसून आपल्या महागड्या फोनमधून टीका करणं सोपं आहे. मात्र, तुम्ही हे करत असताना एनसीबीचे लोक आघाडीवर राहून लढा देतायत. आपल्या देशासाठी लढणाऱ्या लोकांचा सन्मान करायला हवा,' अशी पोस्ट लिहीत अभिनेत्री क्रांती रेडकर हिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या कामाचं कौतुक केलं आहे.

शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला एका क्रूझवरच्या पार्टीत ड्रग्जप्रकरणी अटक झाल्यानंतर खळबळ उडाली. आर्यन खान आणि त्याच्यासह इतर आठ जणांना अटक जणांवर ही कारवाई एनसीबी म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने केलीये.

तेव्हापासून एनसीबी आणि एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे खूपच चर्चेत आहेत. कारण ही कारवाई त्यांनी स्वतः क्रूझवर जाऊन केली होती. या कारवाईवर टीकाही झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी या रेडमध्ये भाजपचे काही कार्यकर्ते सहभागी असल्याचा आरोप केला. सोशल मीडियावरही अनेकांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या टीकेलाच प्रत्युत्तर देणारी पोस्ट क्रांती रेडकरनं लिहिली आहे. समीर वानखेडे हे अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे पती. मराठी सिनेसृष्टी आपल्या कामामुळे ठसा उमटवणाऱ्या क्रांती रेडकर यांचा विवाह समीर यांच्यासोबत 2017मध्ये झाला.

त्यांच्या कामाबद्दल फारशी चर्चा न करणाऱ्या क्रांतीने आता इन्स्टाग्रामवर समीर यांच्या कामाचं कौतुक करत त्यांच्या टीकाकारांना उत्तर दिलंय.

काय म्हटलं आहे या पोस्टमध्ये?

क्रांती या पोस्टमध्ये म्हणते, "तुमच्या सगळ्यांच सहकार्य आणि पाठिंबा मिळाल्याबद्दल मी आभारी आहे. आपण सगळ्यांनीच एनसीबीचं काम आणि त्यांनी टाकलेल्या धाडींचं कौतुक केलंत. मात्र, फक्त बॉलिवूडचा उल्लेख आला की लोक यात रस घेतात. मात्र, माध्यमांनी यापूर्वीही एनसीबीने मोठ्या गँगस्टर्सना पकडल्याबद्दल वार्तांकन केलंय याचीही सगळ्यांनी नोंद घ्यावी.

समाजात असे काही लोक आहेत ज्यांनी एनसीबी फक्त बॉलिवूडला टार्गेट करत असल्याचं म्हटलंय. मी अशा लोकांना म्हणेन की त्यांनी जरा अभ्यास करावा. यापूर्वीची आकडेवारी गोळा करावी. घरी आरामात बसून आपल्या महागड्या फोनमधून टीका करणं सोपं आहे. मात्र, तुम्ही हे करत असताना एनसीबीचे लोक आघाडीवर राहून लढा देतायत. आपल्या देशासाठी लढणाऱ्या लोकांचा सन्मान करायला हवा."

यापूर्वी क्रांतीने टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. यावेळी ती म्हणाली होती की, "माझे पती देशासाठी त्यांचं आयुष्य, मुलं आणि कुटुंबीय यांच्याशी तडजोड करतायत. मला त्यांचा अभिमान आहे. तो यापूर्वीही निष्ठेने काम करत होता. मात्र, आता बॉलिवूडशी संबंधित ड्रग्ज प्रकरण समोर आल्याने तो प्रकाशझोतात आलाय."

एकीकडे एनसीबीचं कौतुक होतयं, तर काही जण या संस्थेवर टीकाही करत आहेत. पण मुळात ही संस्था आहे काय आहे? या संस्थेचे कार्य, रचना आणि इतर गोष्टी समजून घेऊया.

इतिहास

अंमली पदार्थाची तस्करी हा जगभरात कायम चर्चेचा विषय असतो. अंमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री हा एक मोठा गुन्हा आहे. त्यामुळे शिक्षेची तरतूदही मोठी आहे.

अंमली पदार्थांचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. तो रोखण्यासाठी भारतीय घटनेच्या कलम 47 नुसार अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या मार्गदर्शक सूचनांचांही अंतर्भाव करण्यात आला आहे.

अंमली पदार्थांचा प्रसार रोखण्यासाठी भारतात. Drugs and Cosmetics Act, 1940, The Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985, and The Prevention of Illicit Traffic in Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1988. या तीन कायद्यांचा आधार घेतला जातो.

अंमली पदार्थांचा वापर रोखण्याची जबाबदारी केंद्र आणि राज्यातली अनेक मंत्रालयं आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांची असतात.

अर्थ मंत्रालय आणि वाणिज्य विभागाकडे ही प्राथमिक जबाबदारी असते. या कायद्यानुसार अधिकाऱ्यांना उपलब्ध माहितीच्या आधारे छापे मारण्याचा अधिकार असतो. एखादी व्यक्ती दोषी आढळल्यास त्यांना ताब्यात घेण्याचा अधिकारही या कायद्याने दिला आहे. त्यांना इतर संस्था सहकार्य करत असतात. NCB ही त्यापैकीच एक आहे.

अंमली पदार्थांचं सेवन आणि वाहतूक रोखण्यासाठी The Narcotics and Psychotropic substances act 1985 या कायद्याची मदत घेतली जाते. या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय पातळीवर एखादी संस्था असावी अशी तरतूद करण्यात आली होती. त्यातूनच 17 मार्च 1986 ला Narcotics Control Bureau या संस्थेची स्थापना करण्यात आली.

संस्थेचं काम

NDPS कायद्याअंतर्गत एखाद्या राज्याने कारवाई केल्यास केंद्र आणि राज्य यांच्यात समन्वय साधणं, हे या संस्थेचं मुख्य काम आहे. जागतिक पातळीवर असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा आधार घेऊन अंमली पदार्थांचा व्यापार रोखणं, किंवा ही तस्करी रोखण्यासाठी भविष्यात कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येतील याची चाचपणी करणं या संस्थेच्या कार्यक्षेत्रात येतं.

अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी इतर देशांच्या संस्थांना मदत करणं हेही या संस्थेचं काम आहे. अंमली पदार्थांचं सेवन करून जे गुन्हे घडतात त्याबद्दलच्या कारवाईसाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय साधण्याचं काम ही संस्था करते.

NCB ची विभागीय आणि उपविभागीय कार्यालयं भारतभर पसरली आहेत. विभागीय कार्यालयं अहमदाबाद, बेंगलुरू, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, इंदुर, जम्मू, जोधपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई आणि पाटण्यात आहेत.

या विभागीय आणि उपविभागीय कार्यालयातील कर्मचारी देशभरातून अंमली पदार्थ जप्तीची खडान्‌खडा माहिती गोळा करतात. अंमली पदार्थांची तस्करी आणि वाहतूक कशी होते. त्याच्या विविध पद्धतींचा अभ्यास करतात आणि पोलीस, कस्टमस अशा इतर संस्थांबरोबर ते कार्य करतात.

पदांची रचना

NCB ला एक पूर्णवेळ महासंचालक आणि पाच उपमहासंचालक असतात. सध्या सत्यनारायण प्रधान संस्थेचे महासंचालक आहे. ते 1988 च्या तुकडीचे IPS अधिकारी आहेत. त्यांना प्रत्येक विभागाचे संचालक सहकार्य करतात.

समीर वानखेडे मुंबई विभागाचे संचालक आहेत. त्यांनीच गेल्या काही मोठ्या कारवाया करत खळबळ उडवून दिली आहे.

शाहरुख खानचा मुलगा आणि इतर आठ जणांना अटक करणाऱ्या पथकाचं त्यांनी नेतृत्व केलं.

समीर वानखेडे कोण आहेत?

समीर वानखेडे IRS ऑफिसर आहेत. मुंबई विमानतळावर ते सहायक आयुक्त असताना त्यांनी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना कस्टमस ड्युटी चुकवण्याच्या आरोपाखाली दंड ठोठावण्यास सुरुवात केली. त्यात मिनिषा लांबा, गायक मिका सिंग यांचाही समावेश होता.

तेव्हापासून ते चर्चेत आहेत. त्यांनी बराच काळ NIA मध्येही काम केलं. गेल्या एक दीड वर्षांपासून ते NCBत आले. सारा अली खान, श्रद्धा कपूर, दीपिका पादुकोण, भारती सिंग, रिया चक्रवर्ती, आणि आता आर्यन खान यांना वानखेडे यांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना गृहमंत्रालयातर्फे उत्कृष्ट तपासासाठीचा पुरस्कारही गेल्या महिन्यात देण्यात आला आहे.

ते मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे पती आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)