शरद पवारांकडून लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी #5मोठ्याबातम्या

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्वर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.

1. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी नाकारली शरद पवारांना भेट

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी शरद पवारांना भेट नाकारल्याचं वृत्त टीव्ही9 मराठीने दिलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचाराची तुलना जालियनवाला केली होती. देशातले शेतकरी हे कधीही विसरणार नसल्याचंही ते म्हणाले होते.

मंगळवारी (5 ऑक्टोबर) दुपारी शरद पवार आणि पियुष गोयल यांची भेट नियोजित होती, पण गोयल यांनी ऐनवेळी ही भेट रद्द केली.

सत्तेचा गैरवापर करून दडपशाही सुरू आहे, शेतकऱ्यांचा आवाजा दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर यश मिळणार नसल्याचंही शरद पवारांनी टीका करताना म्हटलं होतं.

2. जम्मू काश्मीरमध्ये कट्टरतावाद्यांचा हल्ला

जम्मू काश्मीरमध्ये कट्टरतावाद्यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांची हत्या केली आहे.

कट्टरतावाद्यांनी ज्या लोकांची हत्या केली त्यामध्ये एका स्थानिक काश्मिरी पंडिताचा समावेश असल्याचं पोलिसांनी म्हटलंय.

माखनलाल ब्रिंदू यांची कट्टरतावाद्यांनी त्यांच्या फार्मसीबाहेर गोळ्या झाडून हत्या केली. ब्रिंदूंच्या मुलाचं डॉ. सिद्धार्थ बिंद्रूंचंही तिथेच क्लिनिक आहे.

बीबीसी हिंदीने ही बातमी दिली आहे.

3. परतीच्या पावसाला सुरुवात

नैऋत्य मोसमी मान्सून परतीच्या वाटेवर असल्याचं भारतीय हवामान खात्याने म्हटलंय. 1960नंतर दुसऱ्यांदाच मान्सून इतक्या उशीरा परतत असल्याचं हवामान खात्याने म्हटलंय.

2019मध्ये पावसाच्या परतीला सर्वात उशीरा सुरुवात झाली होती. 2019मध्ये 9 ऑक्टोबर मान्सून परतायला सुरुवात झाली होती. गेल्या वर्षी 28 सप्टेंबरला मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली होती.

राजस्थानवर अजूनही काही ढग असले तरी ते लवकरच जातील आणि यावेळी मान्सून अधिक वेगाने परत जाईल असं हवामान खात्याने म्हटल्याचं वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलंय.

4. मूडीजचे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी चांगले संकेत

ग्लोबल रेटिंग एजन्सी मूडीजने भारतीय अर्थव्यवस्थेला पूर्वीपेक्षा जास्त चांगलं रेटिंग दिलंय. मूडीजने भारतासाठीचं रेटिंग निगेटिव्ह श्रेणीमधून सुधारून स्टेबल श्रेणीमध्ये आणलं आहे.

भारतीय बाजारपेठेमध्ये भांडवलाची उपलब्धता चांगली असून परिणामी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना जोखीम कमी असल्याचं मूडीजने म्हटलंय.

ई -सकाळने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

5. रामायण मालिकेत रावणाची भूमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदींचं निधन

रामायणामध्ये रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं 5 ऑक्टोबरला निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. गेले 2-3 दिवस त्यांची तब्येत बरी नसल्याचं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं.

अरविंद त्रिवेदींचा जन्म मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये झाला होता. गुजराती रंगभूमीपासून त्यांनी कारकीर्दीला सुरुवात केली.

रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेतल्या रावणाच्या भूमिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्रिवेदींनी सुमारे 300 हिंदी आणि गुजराती सिनेमांमध्ये काम केलं.

दैनिक भास्करने हे वृत्त दिलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)