Gut, Brain: तुमचे पोट आणि मानसिक आरोग्य यांचा काय संबंध आहे?

    • Author, डेव्हिड रॉबसन
    • Role, बीबीसी फ्युचर

हृदयाचा मार्ग पोटातून जातो असं म्हटलं जातं. पण मेंदूचा मार्गही पोटातून जातो असं आम्ही म्हटलं तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का?

यावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांना मात्र आता हे पटू लागलं आहे.

आपल्या मनःशांतीचा आणि पोटाच्या आरोग्याचा अगदी जवळचा संबंध आहे. नैराश्य आलेल्यांनी जर आपल्या पोटाकडे पाहिलं तर कदाचित त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तिथं मिळू शकतं.

ब्रिटिश मनोविकारतज्ज्ञ डॉ. जॉर्ज पोर्टर फिलिप्स यांना गेल्या शतकाच्या सुरुवातीला असाच अनुभव आला होता.

एके दिवशी डॉक्टर फिलिप्स बेथलहेम रॉयल हॉस्पिटलच्या भेटीवर गेले होते. हे हॉस्पिटल मनोरुग्णांसाठी असल्यामुळे तेव्हा कुप्रसिद्ध मानलं जाई.

तिथल्या रुग्णांना पाहिल्यावर त्यांच्या एक लक्षात आलं. ते म्हणजे मनस्थिती नीट नसलेल्या रुग्णांच्या नेहमी बद्धकोष्ठ, पोटात जळजळ होणे, अन्न न पचणे अशा तक्रारी होत्या. त्यांची नखं एकदम नाजूक असत, केस चमकदार नसत आणि चेहरासुद्धा पिवळा पडलेला असे.

या रुग्णांची मन:स्थिती नीट नसल्यामुळे त्यांची अशी अवस्था झालीय असं मानलं जाई. पण यांच्या नैराश्यचं कारण त्यांच्या पोटाच्या आजारांचं तर नाही ना अशी शंका डॉ. फिलिप्स यांच्या मनात आली.

त्यांच्या पोटाच्या समस्यांवर उपाय शोधला तर त्यांच्या मेंदूवर आलेला ताण, समस्या कमी करता येईल का? असा विचार ते करू लागले.

पोटाचा मेंदूच्या आरोग्याशी संबंध

पोट आणि मेंदूच्या आरोग्याच्या सहसंबंधासाठी फिलिप्स यांनी 18 रुग्णांवर एक प्रयोग केला. या रुग्णांच्या अन्नातून त्यांनी मासे सोडून सर्व मांस बंद केलं. तसेच त्यांना एक प्रकारचं फर्मेंटेड दूध (किण्वन प्रक्रिया केलेलं) द्यायला सुरू केलं.

या दुधामध्ये लॅक्टोबॅसिलीस हे बॅक्टेरिया असतात. ते पोटाच्या आरोग्यासाठी चांगले समजले जातात. अन्न पचण्यासाठी लॅक्टोबॅसिलीस बॅक्टेरिया मदत करतात असं सांगितलं जातं.

डॉ. फिलिप्स यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. ज्या 18 रुग्णांवर त्यांनी उपचार केले होते ते 11 दिवसांमध्ये पूर्णपणे ठीक झाले. तसेच त्यानंतर आणखी दोन रुग्णांच्या मानसिक आरोग्यात चांगली सुधारणा दिसून आली.

आपल्या पोटाचा आणि मेंदूचा जवळचा संबंध आहे हे सांगणारा हा पहिला अनुभव होता.

आतड्यामध्ये राहाणाऱ्या अब्जावधी जीवाणूंचं आपल्या आरोग्याशी नातं आहे, तसंच आपल्या मानसिक आरोग्याशीही नातं आहे. हे लोकांना पटायला फार काळ गेला.

फिलिप्स यांच्या अनुभवानंतरही एका पिढीनं त्यावर विश्वास ठेवला नाही.

आता आतड्यातील या जीवाणूंचा आणि मानसिक आरोग्याचा थेट संबंध आहे असं आतड्यांतील जीवाणूंवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ मानतात.

संशोधन काय सांगतं?

कॅनडातील मॅकमास्टर विद्यापीठातील जेन एलिसन फॉस्टर सांगतात, "या मुद्द्यावर कोणता वादच नाही. पोटातील बॅक्टेरियाचा आपल्या मेंदूवर गंभीर परिणाम होतो. म्हणजेच पोटावर उपचार करुन तुम्ही मेंदूवर उपचार करू शकता. या संदर्भात नव्या औषधांचा विकास होण्याची शक्यता दिसत आहे."

जेन फॉस्टर सांगतात, मानसिक अस्वास्थ्यामागे अनेक कारणं असतात, पोट बिघडलेलं असणं त्यापैकी एक असू शकतं.

ज्या लोकांना पोटाची कोणती ना कोणतीतरी समस्या असते, त्या समस्यांवर उपचार केले तर त्यांना मनःशांतीही मिळाल्याचा अनुभव येईल.

याबाबत एक संशोधन जपानच्या क्युशू विद्यापीठात 2004 साली करण्यात आलं होतं.

पोटात एकही बॅक्टेरिया नसलेले काही उंदीर या प्रयोगात पाळण्यात आले. या उंदरांमध्ये कॉर्टिकोस्टेरॉन आणि एसीटीएच नावाच्या हार्मोन्समध्ये (संप्रेरक) चढ-उतार दिसून आला.

जेव्हा ताण आलेला असतो तेव्हा अशी स्थिती निर्माण झालेली असते. दुसऱ्या प्रकारच्या उंदरांमध्ये पोटात असलेल्या बॅक्टेरियांमुळे त्यांची मनस्थिती नीट होती.

या उंदरांच्या पोटातील बॅक्टेरिया काढून आधीच्या बॅक्टेरियामुक्त उंदरांच्या पोटात सोडण्यात आले. त्यानंतर जास्त ताणात असणाऱ्या त्या उंदरांचा ताण कमी होत गेल्याचं दिसून आलं.

उंदरांमधून माणसात किंवा माणसातून उंदरांमध्ये बॅक्टेरियाचं असं ट्रान्सप्लांट (रोपण) केल्यास त्याचा त्यांच्या मानसिक स्थितीवरही परिणाम होतो असंही संशोधनातून समजलं आहे.

उंदरांनाही नैराश्य आलं

चीनच्या चोंगकिंग विद्यापीठामध्ये नैराश्यग्रस्त रुग्णांच्या पोटातून जीवाणू काढून उंदरांच्या पोटात घालण्यात आले. त्यानंतर उंदरांचं वर्तन विचित्र झालं. त्यांना पोहण्याचं प्रशिक्षण दिलेलं असूनही ते पळून जाऊ लागले. त्यांना पिंजऱ्यात ठेवल्यावर ते एका कोपऱ्यात लपून राहू लागले.

म्हणजेच नैराश्यग्रस्त माणसाच्या पोटातले बॅक्टेरिया उंदरांच्या पोटात गेल्यावर त्यांच्यावरही परिणाम झाला असं अनुमान यातून काढलं गेलं. उंदरांनाही नैराश्य आलं.

हा शोधनिबंध लिहिणारे अमेरिकन शास्त्रज्ञ ज्युलियो लिसिनियो सांगतात, "आपल्या पोटातले बॅक्टेरिया बदलले की वर्तनही बदलतं."

या प्रयोगांनंतर माणसाच्या पोटातील बॅक्टेरियाचा मानसिक आरोग्याशी असणाऱ्या संबंधांवर आणखी संशोधन झाले आहे.

पोटातील बॅक्टेरिया मेंदूवर परिणाम करतात हे निश्चित, मात्र कोणत्या विशेष प्रजातीचे बॅक्टेरिया हा परिणाम घ़डवून आणतात हे निश्चित झालेलं नाही.

आतड्याचा मेंदूशी संवाद

बॅक्टेरियांच्या अनेक प्रजाती आतड्याच्या आतल्या स्तरांचं रक्षण करतात. त्यामुळे आतड्यातील द्रव पदार्थ रक्तात मिसळत नाहीत. नाहीतर पोट बिघडणं, जळजळ, पोटात संसर्ग होणे अशा समस्या उद्भवू शकतात.

परंतु आतड्याचं रक्षण करणारे हे जीवाणू मूड जाणं किंवा आळसाचं कारणही ठरू शकतात. दीर्घकाळ ही स्थिती राहिली तर नैराश्य येण्याची शक्यता असते.

आतड्यात असणारे बॅक्टेरिया डोपामाइम आणि सेराटोनिनसारखी हार्मोम्स पचवण्यासाठी आपल्याला मदत करतात.

आपल्या आतड्यांचा थेट मेंदूशी संबंध असतो. वेगस नावाच्या मज्जातंतूद्वारे मेंदू आतड्याच्या कामकाजावर नियंत्रण ठेवतो. वेगसद्वारे मेंदू आणि आतड्यात संवाद होतो.

या मज्जातंतूद्वारे मेंदू आतड्याला संदेश देऊ शकतो तसा आतड्याच्या स्थितीचा परिणामही मेंदूपर्यंत जातो.

जेन फॉस्टर सांगतात, आतड्यातल्या बॅक्टेरियाचा मेंदूवरील परिणामावर सतत संशोधन सुरू आहे. नैराश्याला पराभूत करण्याचा मार्ग आतड्यातल्या बॅक्टेरियातूनच निघेल अशी त्यांना आशा वाटते.

मानवी आतड्याशी संबंधित उपाय

नैराश्य कमी करण्यासाठी जी औषधं दिली जातात ती प्रत्येक व्यक्तीला लागू पडतील असं नाही. 10 रुग्णांपैकी 2 जणांना त्याचा उपयोग होत असल्याचं दिसतं. अशा स्थितीत डोकं आणि आतड्यातले बॅक्टेरिया यांच्यातील संबंधांचा सखोल अभ्यास करुन नैराश्यासारख्या आजारांवर उपाय शोधला जाऊ शकतो असं शास्त्रज्ञांना वाटतं.

परंतु डॉ. फिलिप्स यांनी 1910 साली केलेला प्रयोग असो वा सध्या होत असलेले संशोधन... हे सर्व अजूनही लहान प्रमाणात झालेले संशोधन आहे. यासाठीच खाण्या-पिण्यातील बदलांद्वारे नैराश्यावर मात करण्यासाठी मोठ्या प्रयोगांची गरज आहे.

जेन फॉस्टर सांगतात, प्रत्येक माणसाच्या आतड्यातले जीवाणू वेगवेगळे असतात. त्यामुळेच उपचारही व्यक्तीनुसार बदलतील.

माणसाच्या पोटात आढळणाऱ्या बॅक्टेरियांना एका विशिष्ट प्रकारात विभागलं पाहिजे म्हणजे माणसासाठी एका पद्धतीची उपचारपद्धती विकसित होऊ शकेल.

मेंदू आणि आतड्याचं नातं

ज्युलियो लिसिनियो यांच्या मते भविष्यात होणारं संशोधन मेंदू आणि आतड्याच्या संबंधाद्वारे नैराश्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करेल.

सध्यातरी डॉक्टर चांगल्या खाण्या-पिण्याद्वारे मानसिक आरोग्य चांगलं ठेवता येईल असं सांगत आहेत.

यासाठी मेडिटेरेनियन डाएट म्हणजे भूमध्य सागराच्या आशपास असणाऱ्या देशातील अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. यात फळं, भाज्या, कठिण कवचाची फळं, बिया, सी-फूज, वनस्पती तेल यांचं प्रमाण जास्त असतं. मांस विशेषतः लाल मांस आणि साखरेचं प्रमाण अत्यंत कमी असतं.

ऑस्ट्रेलियाच्या डिकिन विद्यापिठातील फेलिस जॅका सांगतात, "मेंदूचे आरोग्य आणि खाणं-पिणं यांच्यातील घनिष्ठ संबंध सिद्ध करणारी आकडेवारी उपलब्ध आहे. आपल्याला मनःशांती हवी असेल तर खाणं-पिणं चांगलं ठेवावं लागणार."

निरोगी शरीरात निरोगी मन वास करतं याबद्दल दुमत असण्याची शक्यताच नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)