व्हेनेझुएला अमेरिकन हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यात का असमर्थ ठरला?

    • Author, जुआन फ्रान्सिस्को अलोन्सो
    • Role, बीबीसी न्यूज मुंडो

व्हेनेझुएलाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी 2013 मध्ये घोषणा केली होती की 'या आकाशाला कोणीही स्पर्श करू शकणार नाही.' पण काही दिवसांपूर्वीच अमेरिकेनी त्या आकाशात प्रवेश केला आणि मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेऊन अमेरिकेत आणलं.

कागदावर अभेद्य वाटणारी व्हेनेझुएलाची तटबंदी एका रात्रीत पत्त्यासारखी का कोसळली? यामागचे हे धक्कादायक वास्तव.

"आमची मातृभूमी अभेद्य आहे, या पवित्र भूमीच्या एका इंचालाही कोणी स्पर्श करू शकणार नाही."

2013 मध्ये उच्चारलेल्या या वाक्यातून निकोलस मादुरो यांनी आपला ठाम विश्वास व्यक्त केला होता की, त्यांच्या सरकारने "जगातील सर्वात शक्तिशाली विमानविरोधी यंत्रणा" तैनात केली आहे, जेणेकरून "भविष्यात कधीही कोणत्याही परकीय विमानाला आपल्या मातृभूमीच्या पवित्र आकाशात घुसखोरी करू शकणार नाही."

मात्र, मादुरो यांच्या त्या घोषणेनंतर जवळपास 13 वर्षांनी, गेल्या 3 जानेवारी रोजी, केवळ एक नाही तर 150 पेक्षा जास्त अमेरिकन विमाने आणि हेलिकॉप्टर्सनी व्हेनेझुएलाच्या हवाई हद्दीत प्रवेश केला. एका अभूतपूर्व लष्करी कारवाईत ही विमाने थेट काराकासपर्यंत पोहोचली, ज्याचा शेवट राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी, सिलिया फ्लोरेस यांच्या अटकेने झाला.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या घटनेच्या व्हीडिओ आणि रेकॉर्डिंग्समध्ये व्हेनेझुएलाच्या महागड्या अँटी-एअरक्राफ्ट यंत्रणेकडून कोणताही प्रतिकार झाल्याचे क्वचितच दिसत आहे. यामुळेच या कारवाईत काही अंतर्गत सहकार्य किंवा फितुरी झाली असावी, या दाव्याला बळकटी मिळाली आहे. मात्र, प्रशासनाने हा दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे.

"येथे कोणीही शरणागती पत्करलेली नाही. येथे संघर्ष झाला, मातृभूमीसाठी संघर्ष झाला आणि आमच्या मुक्तीदात्यांसाठी लढा दिला गेला," असे विधान हंगामी राष्ट्राध्यक्ष डेलसी रॉड्रिग्ज यांनी या घटनेच्या 5 दिवसांनंतर लष्करी शहिदांना श्रद्धांजली वाहताना केले.

मग नक्की काय घडले? नेमकी कुठे चूक झाली? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी 'बीबीसी मुंडो'ने लष्करी तज्ज्ञांशी चर्चा केली.

'कागदावर सर्वोत्तम कामगिरी'

"व्हेनेझुएलाच्या हवाई संरक्षण यंत्रणेची निष्प्रभता हे एक गूढ आहे, कारण कागदावर ती अत्यंत शक्तिशाली होती," असे अमेरिकन मरीन कॉर्प्सचे निवृत्त कर्नल आणि 'सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज'चे (CSIS) संशोधक मार्क कॅन्सियन यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना मान्य केले.

परंतु, या दक्षिण अमेरिकन देशाच्या हवाई संरक्षण यंत्रणेच्या अपयशाच्या कारणांचा शोध घेण्यापूर्वी, या यंत्रणेमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टींचा समावेश होता, हे समजून घेणे अगत्याचे ठरेल.

2009 पासून, दिवंगत ह्यूगो चावेझ यांच्या काळापासून रशियासोबत झालेल्या अनेक करारांच्या अंतर्गत, व्हेनेझुएलाने रशियन बनावटीची S-300 आणि Buk-M2 सारखी संरक्षण यंत्रणा घेण्यास सुरुवात केली होती.

पहिली यंत्रणा मोबाइल रॉकेट लाँचर्सनी सज्ज आहे. CSIS कडून प्राप्त माहितीनुसार, यातील क्षेपणास्त्रे 1,480 किलोग्रॅम वजनाची आणि 7 मीटर लांबीची असून, ती 150 किलोमीटर अंतरावरील विमाने, हेलिकॉप्टर किंवा क्रूझ मिसाईल्सचा अचूक वेध घेऊ शकतात. ही प्रणाली अमेरिकेच्या 'पॅट्रियट' संरक्षण यंत्रणेशी तुल्यबळ मानली जाते.

दुसरीकडे, Buk-M2 ही एक मध्यम पल्ल्याची संरक्षण प्रणाली असून ती हवेतील 40 किलोमीटर अंतरापर्यंतचे लक्ष्य नष्ट करण्यास सक्षम आहे.

शेवटी, यामध्ये Pechora आणि Igla-S या क्षेपणास्त्रांचा समावेश होतो, जी दोन्ही कमी पल्ल्याची आहेत. Igla-S ही यंत्रणा सहज वाहून नेण्यासारखी असून ती एकटा सैनिकही डागू शकतो. इन्फ्रारेड तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे, ही क्षेपणास्त्रे कमी उंचीवर उडणारी विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन्स पाडण्यास सक्षम आहेत.

जगातील कोणत्याही लष्करी दलाला Igla-S ची ताकद ठाऊक आहे आणि व्हेनेझुएलाकडे याच्या तब्बल 5,000 युनिट्स आहेत," असे मादुरो यांनी काही आठवड्यांपूर्वी म्हटले होते.

या सर्व शस्त्रास्त्रांशिवाय, यामध्ये चिनी बनावटीचे रडार आणि इराणच्या ड्रोन्सचाही समावेश होतो.

"काही शत्रूंसाठी ही यंत्रणा अत्यंत घातक ठरू शकते, परंतु अमेरिकेसारख्या अत्यंत प्रगत आणि अत्याधुनिक देशासाठी हे 'भंगारा'पेक्षा वेगळे काहीच नाही," असे मत युनायटेड किंगडमच्या 'रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट'मधील (RUSI) इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि रडार तज्ज्ञ थॉमस विथिंग्टन यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना व्यक्त केले.

कॅन्सियन यांनीही याच मताला दुजोरा दिला आहे.

"रशियन बनावटीची यंत्रणा युक्रेनमध्ये बऱ्यापैकी चांगली कामगिरी करताना दिसत असली, तरी इस्रायल आणि आता अमेरिकेसारख्या अव्वल श्रेणीतील बलाढ्य शत्रूंपुढे ती अपयशी ठरली आहे," असे ते म्हणाले.

व्हेनेझुएलाप्रमाणेच इराणची हवाई संरक्षण यंत्रणादेखील रशियन उपकरणांवर अवलंबून आहे. गेल्या वर्षाच्या मध्यात इस्रायली हवाई दलाने आणि त्यानंतर अमेरिकेने इराणच्या अणू प्रकल्पांवर केलेल्या बॉम्बहल्ल्यांना रोखण्यात ही यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरली होती.

संभाव्य तर्क

आतापर्यंत व्हेनेझुएलाच्या लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही, याचे स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, तज्ज्ञांच्या मते यामागे अनेक कारणांचा एकत्रित परिणाम असू शकतो.

"गेल्या 6 महिन्यांपासून अमेरिकेने कॅरिबियन समुद्रामध्ये आपल्या नौदलाचा ताफा तैनात करण्यास सुरुवात केली होती. या ताफ्यामुळे अमेरिकेला व्हेनेझुएलाच्या हवाई संरक्षण यंत्रणेचा नकाशा तयार करण्याची आणि त्यांच्या शक्ती व उणिवांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली," असे थॉमस विथिंग्टन यांनी सांगितले.

ज्या प्रकारे या घटना घडल्या, त्यावरून हे स्पष्ट होते की अमेरिकन सैन्याला व्हेनेझुएलाच्या संरक्षण यंत्रणेतील कमकुवत दुवे सापडले होते.

ब्रिटिश तज्ज्ञ थॉमस विथिंग्टन यांनी सांगितले की, "अशी दाट शक्यता आहे की या यंत्रणेच्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ले करण्यात आले असावेत, आणि त्याच वेळी 'इंटरफेरन्स' (जॅमिंग) सोडून रडार आणि दळणवळण यंत्रणा निकामी करण्यात आली असावी."

व्हेनेझुएलाच्या लष्करातील एका निवृत्त मेजरनेही या मताला दुजोरा दिला आहे.

अमेरिकेचे इलेक्ट्रॉनिक युद्धाचे तंत्रज्ञान अत्यंत प्रगत आहे. त्यांच्याकडे अशी उपकरणे आहेत जी रडार यंत्रणा पूर्णपणे निकामी करू शकतात आणि त्यामुळे त्यांची विमाने रडारवर 'अदृश्य होतात," असे या लष्करी अधिकाऱ्याने बीबीसी मुंडोशी बोलताना सांगितले.

एका रणगाडा युनिटच्या या माजी कमांडरने पुढे सांगितले की, "एकदा का रडार यंत्रणा निकामी केली की, उर्वरित काम खूप सोपे झाले, कारण त्यांच्याकडे 'सरप्राईज फॅक्टर' (अचानक केलेल्या हल्ल्याचा फायदा) होता."

कॅन्सियन यांनी खात्रीपूर्वक सांगितले की, अमेरिकेच्या तांत्रिक वर्चस्वाव्यतिरिक्त, व्हेनेझुएलाच्या सैन्याने वॉशिंग्टनसोबतच्या संभाव्य संघर्षाच्या तयारीत गंभीर चुका केल्या होत्या.

"अनेक संरक्षण प्रणाली उघड्यावर तैनात होत्या, त्यांना लपवण्यासाठी कोणत्याही छुप्या पद्धतींचा वापर करण्यात आला नव्हता, ज्यामुळे त्या नष्ट करणे सोपे झाले," असे त्यांनी सांगितले.

मरीन कॉर्प्सच्या या निवृत्त कर्नलने पुढे जोडले की, "आता मागे वळून पाहताना हे स्पष्ट दिसते की, या तुकड्यांनी स्वतःला चांगल्या प्रकारे लपवून ठेवायला हवे होते आणि शत्रूला फसवण्यासाठी 'शिन्युलोस' म्हणजे खोट्या शस्त्रास्त्रांचा वापर करायला हवा होता."

हल्ल्यानंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये, 'ला कार्लोटा' हवाई तळाच्या धावपट्टीजवळ Buk-M2 बॅटरी उद्ध्वस्त झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, ही यंत्रणा तळाला लागूनच असलेल्या महामार्गावरूनही स्पष्टपणे दिसत होती.

"व्हेनेझुएलाच्या सैनिकांचे प्रशिक्षण आणि पूर्वतयारी कदाचित अत्यंत सुमार दर्जाची होती, हे या संरक्षण यंत्रणांच्या चुकीच्या मांडणीवरून स्पष्ट होते," असे विधानात पुढे जोडण्यात आले.

गेल्या काही महिन्यांत व्हेनेझुएलाच्या प्रशासनाने अनेक लष्करी सरावांची घोषणा केली असली, तरी 3 जानेवारीच्या घटनेने हे सराव अपुरे असल्याचे सिद्ध केले आहे.

बॉम्बस्फोटातून वाचलेल्या एका सैनिकाने काराकास येथील 'ताल क्वाल' या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, "आम्हाला प्रतिहल्ला करण्यासाठी वेळच मिळाला नाही. ते अमेरिकन सैन्य अतिशय वेगवान होते."

ला कार्लोटा' या काराकासच्या पूर्व भागात असलेल्या हवाई तळावर झालेल्या बॉम्बफेकीत जखमी झालेले सार्जंट मेजर रिकार्डो सालाझार यांनी 'टेलिसूर'शी बोलताना असाच काहीसा अनुभव सांगितला.

"मी माझे दोन 'इग्ला' (Igla) बाहेर काढले आणि त्यांना लाँचिंग मेकॅनिझम लावले, पण जसे मी ते खांद्यावर ठेवले, तसाच माझ्या बाजूला एक बॉम्ब येऊन पडला आणि मी हवेत फेकला गेलो त्यानंतर माझी शुद्ध हरपली," असे त्यांनी सांगितले.

सैन्यापेक्षा 'पोलिस दला'सारखीच भूमिका

कॅन्सियन यांनी 3 जानेवारीच्या घटनेच्या परिणामांसाठी चावेझच्या काळात व्हेनेझुएलाच्या सशस्त्र दलांमध्ये झालेल्या धोरणात्मक बदलांनाही जबाबदार धरले आहे.

"अनेक वर्षांपासून, या सैन्याचे लक्ष बाह्य धोक्यांऐवजी अंतर्गत सुरक्षेवरच अधिक केंद्रित राहिले आहे," असे त्यांनी नमूद केले.

व्हेनेझुएलाचे जनरल हेबर्ट गार्सिया प्लाझा यांनीही या तर्काला पाठिंबा दर्शवला आहे.

अमेरिकेला हे लक्षात आले होते की, व्हेनेझुएलाचे सशस्त्र दल केवळ 'प्रतिकार युद्धाच्या' आराखड्यासाठी तयार होते, पारंपारिक युद्धासाठी नाही," असे मादुरो सरकारच्या काळातील माजी वाहतूक आणि अन्न मंत्र्यांनी 'इन्फोबे'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

या लष्करी अधिकाऱ्याने घडलेल्या घटनेसाठी विद्यमान संरक्षण मंत्री जनरल व्लादिमीर पाड्रिनो लोपेझ यांना जबाबदार धरले आहे.

त्यांनी पुढे असेही म्हटले की, "पाड्रिनो आणि (डोमिंगो) हर्नांडेझ लारेझ यांनीच या तथाकथित 'प्रतिकार युद्धाच्या' सिद्धांताचा पुरस्कार केला होता; जो प्रत्यक्षात व्हेनेझुएलातील राजकीय विरोधकांना रोखण्यासाठी आणि बोलिव्हेरियन क्रांतीची सत्ता टिकवून ठेवण्यासाठी राबवलेला एक मार्ग होता."

'द न्यूयॉर्क टाइम्स' सारख्या आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही असा दावा केला आहे की, ट्रम्प यांच्या आदेशानुसार राबवण्यात आलेल्या या मोहिमेवेळी हवाई संरक्षण यंत्रणेचा काही भाग सक्रियच नव्हता. याचे कारण? गेल्या काही वर्षांत देशाने सोसलेली आर्थिक ओढग्रस्त आणि प्रशासकीय गैरव्यवस्थापन.

"जेव्हा राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षेचा प्रश्न येतो, तेव्हा भ्रष्टाचार कधीही पूरक ठरत नाही," असे विथिंग्टन यांनी स्पष्टपणे नमूद केले.

परराष्ट्र धोरण आणि संरक्षण विषयातील तज्ज्ञ तसेच CRIES चे अध्यक्ष आंद्रेई सर्बिन पाँट यांनी काही आठवड्यांपूर्वीच व्हेनेझुएलाच्या या संरक्षण यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

त्यांनी बीबीसी मुंडोशी बोलताना सांगितले की, "व्हेनेझुएलाकडे कागदावर जे काही आहे आणि प्रत्यक्षात किती युद्धसामग्री कार्यान्वित आहे, यात खूप मोठी तफावत आहे."

जखमी पण यंत्रणा निकामी नाही

अमेरिकन हल्ले आणि बॉम्बफेकीमुळे व्हेनेझुएलाच्या हवाई संरक्षण यंत्रणेला मोठा तडा गेला असला, तरी ही यंत्रणा पूर्णपणे नष्ट झालेली नाही.

"अमेरिकेला संपूर्ण यंत्रणा उद्ध्वस्त करायची होती. त्यांनी एक असा हवाई मार्ग तयार केला, ज्यातून हेलिकॉप्टर आत शिरू शकतील आणि मादुरो यांना बाहेर काढता येईल," असे विथिंग्टन यांनी ठामपणे सांगितले.

व्हेनेझुएलाकडे अजूनही अनेक रॉकेट लाँचर्स शिल्लक आहेत. त्याशिवाय, त्यांचा ड्रोन्सचा साठा आणि Sukhoi 30-MK2 या लढाऊ विमानांचा ताफा अजूनही सुरक्षित असल्याचे दिसते.

तथापि, तज्ज्ञांच्या मते, या घटनेमुळे व्हेनेझुएलाच्या लष्करी नेतृत्वाला आपल्या धोरणांचा पुनर्विकास आणि सखोल आढावा घेणे भाग पडले आहे.

अंतर्गत पातळीवर नक्की काय चालले आहे, कोणावर कारवाई झाली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, पुन्हा एकदा प्रभावी आणि घातक ठरायचे असेल, तर संपूर्ण यंत्रणेचा आढावा घेणे आवश्यक आहे," असे ते म्हणाले.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, केवळ जनरल जेवियर मार्कानो ताबाटा यांना पदावरून हटवण्यात आल्याचे समोर आले आहे; जे राष्ट्रपती भवन सुरक्षा आणि 'रेजिमेंट ऑफ प्रेसिडेंशियल ऑनर गार्ड'चे प्रमुख होते. तसेच, गेल्या काही तासांत 'इंटिग्रेटेड एरोस्पेस डिफेन्स कमांड' (CODAI) चे प्रमुख मेजर जनरल जोस लुईस ट्रेमोंट जिमेनेझ यांच्या हकालपट्टीच्या अफवाही पसरल्या आहेत.

ज्या लष्करी मोहिमेने व्हेनेझुएलाच्या अशा उणिवा जगासमोर आणल्या, ज्या काही काळापूर्वी अकल्पनीय वाटत होत्या, त्यानंतर आता लष्करी संरचनेत मोठे बदल होतील का, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)