You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
हिमालयापेक्षा प्राचीन आणि 49 फूट लांबीच्या महाकाय 'वासुकी इंडिकस' सापाचा शोध कसा लागला?
- Author, के. सुभगुनम
- Role, बीबीसी तामिळ
2005 मध्ये जीवाश्मशास्त्रज्ञ डॉ. सुनील वाजपेयी प्राचीन व्हेलचा अभ्यास करण्यासाठी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात गेले होते.
तिथल्या एका कोळशाच्या खाणीत ते व्हेल माशाचे जीवाश्म शोधत होते. त्यावेळेस त्यांना आणखी एका महाकाय प्राण्याच्या पाठीच्या कण्याच्या हाडांचे तुकडे सापडले.
मात्र, ते अवशेष नेमके कोणत्या प्राण्याचे आहेत हे त्यांना त्यावेळेस माहित नव्हतं. त्यांना याची कल्पना नव्हती की ते 4.7 कोटी वर्षांपूर्वी भारताच्या मुख्य भूमीवर राहणाऱ्या 49 फूट लांबीच्या महाकाय सापाचे अवशेष होते.
डॉ. सुनील बाजपेयींनी बीबीसीला सांगितलं, "सुरूवातीला 18 वर्षे आम्ही ते अवशेष बाजूला ठेवले. आम्हाला वाटलं होतं की, ते एखाद्या मगरीचे अवशेष असतील. मग एके दिवशी अचानक, संशोधक देबाजित दत्ता आणि मी त्या अवशेषांची तपासणी केली. त्यातून आम्हाला आढळलं की ते एका सापाचे जीवाश्म आहेत."
मग त्यांनी त्या जीवाश्माचा तपशीलवार अभ्यास करण्यास सुरूवात केली. त्यांनी त्याला नाव दिलं, 'वासुकी इंडिकस'.
वासुकी सापाचं जीवनचक्र कसं होतं? ही जगातील सर्वात लांब सापाची प्रजाती होती का? जीवाश्मशास्त्रज्ञ डॉ. सुनील बाजपेयी आणि देबाजित दत्ता यांनी या मुद्द्यांबाबत बीबीसीला सविस्तर माहिती दिली.
18 वर्षे दुर्लक्षित राहिलेले जीवाश्म
ज्यावेळेस वासुकी सापाच्या हाडांचे अवशेष सापडले होते, तेव्हा सुनील बाजपेयी यांना वाटलं होतं की, ते कदाचित एखाद्या मगरीचे अवशेष असतील. त्यामुळे त्यांनी त्या अवशेषांचा अभ्यास न करता ते त्यांच्या संग्रहात ठेवून दिले होते.
सुनील वाजपेयी म्हणाले, "मग 18 वर्षांनी एक दिवस आम्ही जुन्या थोलेचा संग्रहाची तपासणी करत होतो. त्यावेळेस दत्ता आणि मला ते अवशेष दिसले, ज्यांना आम्ही मगरीच्या हाडांचे अवशेष समजलो होतो. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की त्या अवशेषांवर अतिशय सूक्ष्म खुणा आणि पॅटर्न आहेत."
"त्यातून निर्माण झालेल्या कुतुहलातून आम्ही त्या अवशेषांवर व्यापक संशोधन केलं. परिणामी, वासुकी सापाची शरीररचना, त्याचा इतिहास किंवा जीवनचक्र आणि तो कोणत्या प्रकारच्या अधिवासात राहत असावा, याबद्दल जीवश्मशास्त्रीय दृष्टीकोनातून बरीच माहिती आमच्या समोर आली," असं सुनील बाजपेयी म्हणाले.
फक्त एवढंच नाही, तर त्यांना असंही आढळलं की इओसीन कालखंडातील या सापाचे सुळे 4.7 कोटी वर्षे जुने आहेत. या संशोधकांना असंही आढळलं की तो पृथ्वीवरच्या आतापर्यंतच्या सर्वात लांब सापांपैकी एक आहे.
वासुकी सापाची शिकारीची पद्धत अजगराप्रमाणेच
लाखो वर्षांपूर्वी भारताच्या मुख्य भूमीवर राहणाऱ्या या महाकाय सापाचं आयुष्य कसं होतं? भक्ष्याची शिकार करण्यासाठी हा साप कोणत्या पद्धतींचा वापर करायचा?
हे मुद्द स्पष्ट करताना, जीवाश्मशास्त्रज्ञ देबाजित दत्ता म्हणतात, "आम्हाला सापाच्या फक्त मध्यवर्ती भागाचे अवशेष सापडले आहेत. त्याच्या पाठीच्या कण्याच्या हाडांच्या आकारावरून असं दिसतं की या महाकाय सापाची शरीररचना पर्वतांमध्ये आढळणाऱ्या आधुनिक काळातील सापांसारखीच होती."
"त्यामुळेच आम्हाला वाटतं की या प्राचीन सापांची शिकार करण्याची पद्धत आणि आजच्या डोंगराळ प्रदेशात आढळणाऱ्या सापांची शिकार करण्याची पद्धत जवळपास सारखीच असावी," असं ते पुढे म्हणाले.
आज डोंगराळ प्रदेशात आढळणाऱ्या सापाच्या प्रजाती, सक्रिय शिकारी नाहीत. ते भक्ष्याचा पाठलाग करत नाहीत. त्याऐवजी ते एखाद्या ठिकाणी पडून राहतात किंवा दबा धरून बसतात आणि भक्ष्य त्यांच्याजवळ येण्याची वाट पाहतात.
त्यानंतर ते भक्ष्याला वेढा घालतात आणि त्यांच्या ताकदीचा वापर करून भक्ष्याला चिरडतात.
देबाजित दत्ता म्हणतात, "वासुकी इंडिकस प्रजातीच्या सापांनीही देखील शिकार करण्यासाठी अशाच प्रकारची पद्धत अंमलात आणली असेल. वासुकी भक्ष्याची वाट पाहत दबा धरून बसत असेल आणि मग भक्ष्य टप्प्यात आल्यावर तो भक्ष्याभोवती स्वत:ला गुंडाळत असेल."
"त्यानंतर तो भक्ष्याभोवती फास आवळून त्याला चिरडत असेल आणि नंतर गिळून टाकत असेल."
ते पुढे म्हणतात, "ज्या ठिकाणी वासुकी सापाचे अवशेष सापडले होते, त्या जागेचं संशोधकांनी निरीक्षण केलं. त्यानंतर त्यांनी निष्कर्ष काढला की तो एक दलदलीचा किंवा पाणथळ भाग असावा."
म्हणून, "आजच्या डोंगराळ सापांप्रमाणे, ते कदाचित अवतीभोवती जे भक्ष सापडत असेल त्यांची शिकार करत असावेत आणि ते खात असावेत," असं दत्ता म्हणाले.
वासुकी साप उभयचर प्राणी होते का, असं विचारलं असता, ते म्हणाले की त्याची जीवनशैली प्रामुख्यानं जमिनीवर राहण्याची असली तरी, तो जलाशय, तलाव आणि पाणथळ जागांमध्ये देखील राहत होता.
हिमालयापेक्षाही जुना साप
सुनील बाजपेयी म्हणतात की, डायनॉसर नष्ट झाल्यानंतर 1.8 कोटी वर्षानंतर सापाची ही प्रजाती पृथ्वीवर वावरत होती.
त्यांनी असंही नमूद केलं की, "या सापांचा जरी मानवजातीच्या उत्क्रांतीच्या कालखंडाशी संबंध नसला, तरीदेखील प्रायमेट्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानवाच्या पूर्वज प्रजातींसह मोठ्या जैविक प्रजातींमधील काही जीव किंवा प्राणी या सापांच्याच काळात अस्तित्वात असतील."
इतकंच नाही, तर ते म्हणाले की हे साप जेव्हा इथे वावरत होते, तेव्हा हिमालय पूर्णपणे अस्तित्वात आलेला नव्हता. त्याची भूगर्भशास्त्रीय प्रक्रिया तेव्हा सुरू होती.
त्यांच्या मते, या महाकाय सापांच्या काळात, गोंडवाना महाद्वीपापासून वेगळे झालेल्या भारतीय खंडाचं आशिया खंडात विलीनीकरण होण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मात्र, "ती प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती."
म्हणजेच हिमालय पूर्ण अस्तित्वात यायच्या आधीपासून वासुकी प्रजातीचे साप भारताच्या मुख्य भूमीवर अस्तित्वात होते.
सुनील बाजपेयी यांनी सांगितलं की वासुकी साप, मत्सुओडिया प्रजातीतील होते. ते उष्णकटिबंधीय हवामानात राहत होते.
ते पुढे म्हणाले की, "तो असा काळ होता, जेव्हा गोंडवानापासून वेगळा झालेला भारतीय खंड, जवळपास आशिया खंडाशी जोडला गेला होता. म्हणजेच, गोंडवानापासून वेगळा झालेला हा भूभाग 5 कोटी वर्षांपूर्वी आशिया खंडाला धडकला होता."
"परिणामी, हिमालयाचा जन्म होण्यास सुरूवात झाली होती. मात्र हिमालयाची निर्मिती पूर्ण झालेली नव्हती. अशा या कालखंडात वासुकी साप आताच्या गुजरात प्रदेशात राहत होता."
देबाजित दत्ता म्हणाले की वासुकी सापाच्या जीवाश्माबरोबर प्राचीन व्हेल, शार्क, मगरी आणि कासवांचे अवशेष सापडले होते.
सुनील वाजपेयी यांच्या मते, हा भाग पूर्वी समुद्र होता. त्यामुळे समुद्रात राहणाऱ्या इतर जीवांबरोबर वासुकी सापाचे अवशेष सापडले आहेत.
वासुकी हा जगातील सर्वाधिक लांबीचा साप आहे का?
वासुकी सापाला जगातील सर्वाधिक लांब साप म्हटलं जातं, याबद्दल विचारलं असता सुनील वाजपेयी म्हणाले, "तो निश्चितच जगातील सर्वात लांब सापांपैकी एक आहे. मात्र तो जगातील सर्वाधिक लांबीचा साप आहे असं म्हणता येणार नाही."
2004 मध्ये कोलंबियामध्ये टायटानोबोआ नावाच्या एका प्राचीन सापाचे जीवाश्म सापडले होते. त्यानंतर तो जगातील सर्वात लांब साप आहे, असं म्हटलं जात असताना, "वासुकी हा साप त्या सापाइतकाच लांबीचा असावा हे स्पष्ट झालं आहे," असं सुनील बाजपेयी म्हणाले.
या सापाची किमान लांबी ते कमाल लांबी किती असू शकते याचा त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांनी निष्कर्ष काढला आहे की या सापाची लांबी साधारणपणे '11 मीटर ते 15 मीटर' दरम्यान असू शकते. म्हणजेच वासुकी सापाची लांबी 36 फूट ते 49.2 फुटांदरम्यान असू शकते.
टायटानोबोआ सापाच्या अभ्यासानुसार, त्याची लांबी 42.7 फूट आहे. त्यामुळेच संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की वासुकी सापाची लांबीदेखील तितकीच किंवा त्याहूनही अधिक असू शकते.
ते पुढे म्हणाले की, मात्र, "हे शक्य आहे की तो किमान 36 फूट लांबीचा असेल. आपल्याला सापाच्या फक्त मध्यभागाचेच अवशेष सापडले आहेत. त्यामुळे वासुकी नेमका किती लांब होता हे आपल्याला निश्चितपणे सांगता येणार नाही."
"त्याचा पूर्ण आकार निश्चितपणे समजण्यासाठी आपण अधिक जीवाश्म गोळा करून त्याचा अभ्यास केला पाहिजे."
वासुकी सापाच्या लांबीव्यतिरिक्त, त्याच्या वजनाचा विचार करता, "वासुकीचं वजन जवळपास एक टन असावं. मात्र, टायटानोबोआचं वजन 1.25 टन होतं. म्हणजेच तो मोठा होता," असं सुनील बाजपेयी म्हणतात.
ते पुढे म्हणाले, "भारतीय उपखंडात हे साप कुठवर पसरलेले होते, हे जाणून घेण्यासाठी, तसंच त्यांच्याबद्दल अधिक जाणण्यासाठी अधिक संशोधन करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच आणखी संशोधन करण्यासाठी कच्छला परत जाण्याची आमची योजना आहे."
"मात्र चिंतेची बाब म्हणजे जिथे वासुकी सापाचे जीवाश्म सापडले होते, ती एक कोळशाची खाण आहे. तिथल्या जमिनीत बरेच बदल झाले असतील. त्यामुळे जर आपण वासुकी इंडिकस सापाचे अवशेष इतर ठिकाणी शोधले आणि ते गोळा केले, तर आपल्याला अनेक नवीन गोष्टींची माहिती मिळू शकते," असं सुनील बाजपेयी म्हणाले.
इतकंच नाही, अलीकडचे या दोन्ही संशोधकांनी वासुकी सापाच्या कालखंडातील म्हणजे इओसीन काळात राहणाऱ्या एका जलचर सापाचे अवशेषदेखील शोधले आहेत.
याशिवाय, दोन्ही संशोधक वासुकीबद्दल पुढील संशोधन करत आहेत. वासुकी साप भारतीय उपखंडात आणखी कुठे कुठे होता आणि त्याच्या शरीराच्या इतर भागांचे अवशेष शोधण्यासाठी त्यांनी संशोधन सुरू ठेवलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)